व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे
व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे
एका मांजरीला ९ वेळा जन्म मिळतो. असे म्हटले जाते. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या एका मित्राच्या बाबतीत त्याच्या २९ वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा पट ऐकल्यानंतर हे खरे आहे की, त्याला २ वेळेस जन्म मिळाला. पहिल्यांदा नैसर्गिक आयुष्य मिळाले. म्हणजे जेंव्हा त्यांच्या आईने जन्म दिला. आणि दुसरा जन्म बायकोमुळे 'क्रिपा व्यसनमुक्ती' केंद्र येथे मिळाला. जेथे त्यांचे चांगल्या निर्व्यसनी मनुष्यामध्ये रुपांतर झाले. फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याच्या वागण्यात आणि एकंदर व्यक्तीमत्वामध्ये त्यानंतर खुप फरक पडला. याच केंद्रामध्ये तो परत परत चांगला विचार करायला व वागायला शिकला. आणि समाजातला उपयुक्त असा नागरिक बनला.
रमेश भिकाजी सांगळे हा युवक शालांत परीक्षा पास होऊन, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड पवई येथे १५ सप्टेंबर १९७७ साली शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला. आणि प्रशिक्षण पूर्ण करून १३ डिसेंबर १९८१ साली कामगार म्हणून कायम झाला. कंपनीच्या सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदा बिअरचा ग्लास उचलून त्याने स्वताच्या ओठाशी लावला. जिभेवर रेंगाळलेल्या याच पहिल्या घोटाने पुढे त्याचे जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. अतिशय सावकाश, मजेसाठी दारूने त्याच्या जीवनात प्रवेश केला. आणि मग दारू म्हणजे मजा, आनंद, जल्लोष असा ठसा त्याच्या मनावर उमटला. प्रचंड मजा येऊ लागली. त्याला दारू खुप मोठी-मोठी स्वप्ने दाखवू लागली. सुरुवातीला त्याला वाटले इतरांप्रमाणे मी सर्वसामान्यपणे दारु पिऊ शकेल. पण अचानकच यात बदल झाला. त्याला त्याचे व्यसन जडले. आणि त्याचा त्याच्यावर ताबाच उरला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीतील कामावर होऊ लागला, कामावरची गैरहजेरी वाढली. त्यामुळे चार्जशीट, नोटिसा मिळाल्या. दारू ही त्याच्या जीवनाची समस्या झाली. या अविवेकी दारूपायी वारंवार पैशाची चणचण त्यामुळे बायकोशी रोजची भांडणे व मारहाण यामुळे संसार रोज मोडू लागला. असे का झाले ? का होत आहे ? व मला दारू एवढी का प्यावी लागत आहे ? हे त्याला कळेनासे झाले. आता तर दारू पिण्यासाठी घरात चोऱ्या, खोटं बोलणे सुरू झाले. पैसे अपुरे पडू लागल्यामुळे दारूचा दर्जा घसरला. घरातील सर्वजण हरले होते. प्रतिष्ठित कंपनीतील एक कामगार रस्त्यावरील दारुड्याचे जीवन जगायला लागला. शेवटी एका प्रसंगात तर बायकोला जाळण्याचा असफल प्रयत्न करीत, स्वतः देखील रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेला होता. एका चांगल्या मुलाचा दारूने राक्षस केला होता. त्या दारूच्या नशेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. बायकोवर नाही-नाही ते आरोप करू लागला. नराधमासारखा वागू लागला. वेड लागल्यासारखा बडबडू लागला. मग मात्र बायको घाबरली, घरचे हादरले व त्याची दारू सोडविण्याचे प्रयोग सुरू झाले. मद्यपाश हा एक आजार आहे. आणि आपण या आजारला बळी पडलो आहोत हे त्याला समजले पण उमजत नव्हते. जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा त्याचे मित्र , कामावरील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याला दारु सोडण्याचा सल्ला दिला. परिणामी त्याने त्यांच्याशी मैत्री कमी केली. निरनिराळ्या जागा बदलून मित्र बदलून त्याचे पिणे चालूच होते. परंतु जेंव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की, याचे अजुन दारु पिणे धोक्याचे आहे. तेंव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. नंतरही दारू सोडण्याचे खूप प्रयत्नही केले गेले. आणाभाका घेतल्या, परंतु नाही जमले. पुन्हा पहीले पाढे पंच्चावन. नातेवाईक आणि मित्रांनी पुन्हा पुन्हा खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण एक दारूडया दुसऱ्यांचे सहसा ऐकत नाही. कारण आडवा येतो त्यांचा अहंकार व तो याबाबत दुस-यांनाच दोषी धरतो. त्याने दारूचे व्यसन सोडावे म्हणून बायकोने गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, बाबा, बुवा इत्यादी सर्व प्रयोग त्याच्यावर करून पहिले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिच्या पदरी निराशाच आली. नंतर तिच्याच प्रयत्नाने एल अँड टी मधील त्याचे विभागीय व्यवस्थापक पी.एल.चावला, कामगार कल्याण विभागाच्या लीला करकरीया यांच्या सांगण्यानुसार त्याला बांद्रे येथील फादर जो परेरा यांच्या क्रिपा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले.
तो दिवस होता मंगळवार दि. २४ मार्च १९९२. तशी त्याची पण इच्छा होतीच दारू सोडण्याची. परंतु त्याला आपण व्यसनमुक्त होण्याची शाश्वती नव्हती. इथे आल्यावर त्याला इथले वेगळेच चित्र दिसले. प्रत्येक चेहरा वेगळा होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा भाव होता. कोणी बळजबरीने ऍडमिट केल्यामुळे रागात होता, कोणी आत्मविश्वासाने ओथंबत होता, कोणी व्यसनमुक्ती होईल की नाही यामुळे साशंक होता. त्यात स्वत:च्या अनुभवातून शिकत चांगल्या बदलासाठी प्रयत्नशील असणारे पेशंट पण होते. त्यांना विश्वास होता की प्रयत्न केला तर माणूस बदलू शकतो. व्यसनाधीनता या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने प्रथम अपयशाची जबाबदारी स्वत:ची स्वत: घ्यायला हवी. माणूस अपयशाची जबाबदारी इतरांवर टाकायला लागतो. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनामध्ये अधिकाअधिक गुरफटत जाते. मुद्दा असा आहे की, आपण व्यसनात गुरफटलो हा एक उत्तम प्रतीचा मूर्खपणा केला हे ठणठणीत पणे मान्य करायला खूप मोठ मन लागतं, आणि हा स्वतःचा अपराध रमेशने मनापासून तेथे स्वीकारला होता. त्याने त्याच्यासाठी घेतलेला हा एक योग्य निर्णय होता. सुरुवातीच्या दिवसांत त्याला बरेच काही उमगू लागले. खरे तर त्याला तेथे मिळालेला सुविचार ‘one day at a time’ चा अर्थ इथे कळला. आणि समुपदेशातून बरेच काही म्हणजेच आपला ‘प्रत्येक दिवस हा आजचाच दिवस’ असतो. कालची रात्र पडद्याआड गेली. उघाच्या दिवसाची सावली सुध्दा नाही आली, सत्य आहे आजचा दिवस, आत्ताचा तास, आणि हातातला आत्ताचा क्षण! डिप्रेशन आणि ऍडिक्शन या दोन्हीमधून बाहेर पडण्यासाठी आहे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा. तिथेच व्यसनमुक्तीचा मार्ग सुरू होतो. दारू सोडणं ही प्रवासाची सुरूवात आहे. अंतिम बिंदू नव्हे. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न हा उपचाराचा भाग आहे. व्यसन करण्याची कृती थांबविणे म्हणजे वरवर दिसणाऱ्या लक्षणावरचा उपाय... "treatment of symptoms" या शब्दाचा अर्थ आहे "treatment of diseases within" आणि व्यक्ती आहे तोवर व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्याबद्दलचे गुणदोषही आहेत. त्यामुळे उपचाराची प्रतिक्रिया सतत चालूच राहणार. अगदी अखेरच्या क्षणापर्यत ! स्वत:ला स्वत:च्या मनाशीच बऱ्याच लढाया लढाव्या लागणार हे त्याच्या काही दिवसातच लक्षात आले. काळानुसार अनुभवांची समृध्दी आली. तरी त्या लढाया संपत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांचे स्वरूप बदलेल. हा निश्चयसुद्धा मनाशी कोरून ठेवला. ‘सोचो तुम क्या चाहते हो, जो चाहते हो वही मिलेगा, जो सोचते हो वही देखो, जो देखते हो वही मॉँगो, ओर जो मॉँगेगा वही मिलेगा ! रमेशने जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातील शिबिर पूर्ण करून आत्मविश्वासाने बाहेर नव्याने पाऊल ठेवले. तेव्हा प्रत्येक संधीचा उपयोग करायचा व यश मिळेपर्यत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवायचे याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली.
ReplyForward |
कार्याला सलाम
उत्तर द्याहटवा