सोमवार, २४ जुलै, २०२३

लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने

 लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा डॉ तात्याराव लहाने

प्रभादेवीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न



 

मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबरतिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणकमोबाईलटॅबआयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतरलगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते.  यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते. अपत्य लहान असल्यापासूनअगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅबमोबाईल आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात. डोळे हे माणसाच्या जगण्याचेच नव्हे तर आनंदाचे साधन असल्याने मायबापांनो काळजी घ्या असा सल्ला डॉ तात्याराव लहाने यांनी प्रभादेवीकरांना दिला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या आयोजनातून तसेच विभग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने प्रभादेवी महापालिका शाळेत शिबिराचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभादेवीतील नागरिकांकरिता सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक पद्मश्री तात्याराव लहाने,  डॉक्टर रागिणी पारिखडॉक्टर सुमित लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीतेमाजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार सुनील शिंदे, विभाग प्रमुख महेश सावंत, आशिष चेंबूरकरश्रद्धा जाधवआरती कीनरे ,उद्योजक अनिल मानेविभाग संघटक शशी पडते ,राजू पाटणकरनिरंजन नलावडे,  मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले,  नगरसेविका हेमांगी वरळीकरउपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जेउप विभाग प्रमुख कैलास पाटीलयशवंत विचलेअभय तामोरेरेखा देवकरहिरु दासविनायक देवरुखकर ,शाखाप्रमुख विनय अक्रेशाखा समन्वयक गणेश देवकर, चंदन साळुंखे, रत्नाकर चिरनेरकरअभिजीत कोठेकररवी पड्याचीकीर्ती मस्केसंजना पाटीलवैष्णवी फोडकर, युवा सेनेचे मुंबई समन्वयक सागर चव्हाणअभिजीत पाताडेजाई सोमणयुवा विभाग अधिकारी सप्नील सूर्यवंशीगुर्शिन कौरसाईश मानेचिंतामणी मोरेसौरभ भगत तसेच विभागातील व शिवसेना संघटनेतील मान्यवरांनी भेट दिली सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखाप्रमुख संजय भगत यांचे आभार व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर सुजन मंत्रीसुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


शुक्रवार, १४ जुलै, २०२३

संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे


 संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे

१९५७ सालापासून सतत ९ वेळा म्हणजे एकाच प्रभागातून ४७ वर्षे मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून वरळी कोळीवाड्यातून निवडून येणारे कॉम्रेड मणिशंकर कवठे यांचे नाव आणि कार्य मध्यमुंबईतील नागरिक कायम लक्षात ठेवतील. सुरुवातीला ते लालनिशाण पक्षाचे प्रतिनिधित्व करीत होते. पुढे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लाल निशाण सतत फडकवीत कष्टकरी जनतेचा 'लालबावटा' त्यांनी आमरण हातात घेतला होता. अगदी शिवसेनेच्या लाटेतही ते प्रचंड बहुमताने विजयी होत असत.

बालपण - आद्य मुंबईकरांच्या म्हणजे कोळी समाजात वरळी कोळीवाड्यात त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वरळी कोळीवाडा आणि दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यावेळी १९४२ चा चलेजाव आंदोलनाचा लढा सुरू झाला. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.   पिस्तुल हातात घेऊन त्यांनी वरळीच्या पोलिस चौकीवर हल्ला केला होता, त्यात एक गोरा साहेब मृत्युमुखी पडला होता. पोलिसचौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत ते पकडले गेले होते पण वयाने लहान असल्याने ते त्या प्रकरणातून सुटले. मात्र, ब्रिटिश पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. काही सहका-यांना घेऊन वरळी येथील बंगाल केमिकलची फॅक्टरीही जाळली होती. १४-१५ व्या वर्षी व्यायामशाळेत सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, हॅन्डबॅलन्सिंग, बाराअंगी सूर्यनमस्कार असे शरीर संवर्धन करीत असताना राष्ट्रसेवा दलाच्या १०-१२ शाखांवर शारीरिक शिक्षण देण्याचे काम ते पार पाडीत असत. त्याच वेळी पूज्य साने गुरुजींच्या सहवासात राहून समतेचे प्रबोधनही करीत असत.  पुढे नाना पाटलांचे प्रतिसरकाचे सैनिकांना वरळी कोळीवाड्यात आणून शिबीर घेतले. मात्र स्वातंत्र्यानंतर सुराज्यासाठी लालबावटा हाती घेऊन कष्टकऱ्यांच्या चळवळीत सहभाग, संयुक्त महाराष्ट्र समितीचा वरळी गावातील खांदा कार्यकर्ता, लालनिशाण पक्षाचा एकमेव नगरसेवक, वरळी कोळीवाडा भाडेकरू संघाची स्थापना व भाडेकरू झोपड्पट्टीवासियांचे संरक्षण, त्यांच्यासाठी आंदोलन व न्यायालयीन लढाईसाठी दिवसरात्र कार्यरत असणारा त्यांचा नेता अशा भूमिका घेत ते आयुष्यभर न थकता अविश्रांत काम करीत राहिले.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग - तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असतानाच त्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत उडी घेतली. महात्मा गांधींच्या 'करो या मरो' हा आदेश त्यांची मुख्य प्रेरणा होती. क्रांतिसिंह नाना पाटील व कारुण्यमूर्ती साने गुरुजी या गुरूंचे ते एकलव्य झाले आणि भूमिगत कार्यात स्वतःला झोकून दिले.  पुढे पुण्याला असताना कॉ एस के लिमये यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मार्क्सवादी विचारानुसार कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली. ह्या सर्व घडामोडीत कॉ दत्ता देशमुख, कॉ लक्ष्मण मेस्त्री, सुमन कात्रे, शरद दिघे, साने गुरुजी, कॉ नाना पाटील यांच्यासोबत त्यांच्या संघर्ष लढ्यात कायमच कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऐन तारुण्यात त्यांची जडण घडण होत होती. मध्यमुंबईतील सेवादल शाखांमध्ये शरद दिघे बौद्धिक घ्यायचे तर मणिशंकर कवठे शारीरिक शिक्षणाचे उपक्रम शिकवायचे. एका गरीब कोळी कुटुंबात जन्मलेला हा लढवय्या एकाच वेळी संघर्ष व करुणा यांचा पाईकच नव्हे बिनीचा सैनिक झाला.  नेरळच्या सेवादलाच्या कॅम्पमध्ये साने गुरुजींच्या उपस्थितीत दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याण नदीत सूर मारून पोहून आलेल्या मणीशंकरला साने गुरुजींनी 'देव मासा' पदवी दिली होती. नेरळ कॅम्पमधून सहा जणांची अलाहाबाद कॅम्पसाठी निवड झाली. तो कॅम्प ३ महिने चालला. तेथून परत आल्यावर डी एस उर्फ मीना देशपांडे यांच्या संपर्कात आले. 'नवजीवन संघटनेच्या म्हणजेच लाल निशाण गटाच्या' संपर्कात आल्यावर त्यांनी मार्क्सवादाचा पूर्ण स्वीकार केला. १९४६ साली झालेल्या नाविक उठावाला पाठिंबा देत कवठे यांनी त्या आंदोलनात भाग घेतला होता. १९४८ साली कम्युनिस्ट आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यावेळी त्यांना कोकणातून तडीपार करण्यात आले होते. १९४९-५०मध्ये ते नवजीवन संघटना, लाल निशाण पक्षात दाखल झाले. कोळी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले, सावकारी जाचातून कोळी महिलांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी कोळ्यांची बँक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. १९६० साली वरळी कोळीवाड्यात त्यांनी पाचवी ते दहावीसाठी शाळा काढली. कोळी समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी सतत संघर्ष करून धसास लावले.सेंच्युरी मिलमध्ये त्रासन खात्यातील कामगारांचा संप संघटित केला म्हणून वरळीच्या जेलमध्ये त्यांना सहा महिने स्थानबद्ध करण्यात आले होते.

सुराज्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी - अमळनेरच्या ऑइल मिल  कामगारांचा लढा कॉ लक्ष्मण मेस्त्री लढवीत होते.त्या लढ्यात मणिशंकर साथ देण्यासाठी पोहोचले. भोरमध्ये नाचणी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे लढ्यातही ते सहभागी झाले. मुळशी खोऱ्यात सुद्धा शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कार्यरत राहिले. १९४९-५० ला रत्नागिरीला पोस्ट अँड टेलिग्राफ खात्याच्या युनियनचे काम केले. रत्नागिरीला तडीपार असताना ते शेतमजुरांच्या लढ्यात रामभाऊ पाटील या टोपण नावाने वावरायचे. पुढे कोकणातूनही तडीपार झाल्यावर धुळ्याला शिवाजी मराठी विद्यालयाच्या गच्चीवर वास्तव्यास होते. पश्चिम खान्देशात शेकाप पक्षाच्या शाखांवर जाऊन प्रचार कार्य करीत असताना त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. गाडगे बाबांबरोबर पहाटे चार वाजता उठून सफाई अभियानात भाग घ्यायचे. नाशिक सेंटरला मॅट्रिकची परीक्षा उत्तम मार्काने पास झाले. हे कार्य चालू असतानाच पुण्याला एस के लिमये यांना भेटले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत लाल बावट्याचे सैनिक म्हणून वावरले - जगले - लढले.

रचनात्मक कार्य - मणिशंकर कवठे केवळ संघर्ष करीत राहिले नाहीत तर रचनात्मक कामाचा डोंगर उभारीत राहिले. त्यासाठी लागणारी लवचिकता दाखविली. 'संघर्ष व सहकार्य' यांची योग्य सांगड घातली. वरळी येथे  जनता शिक्षण संस्था उभी  केली व अल्पावधीत नावारूपास आणली. वरळी कोळीवाडा भाडेकरू संघ स्थापून भाडेकरूंचे सरंक्षण केले. रत्नदीप क्रीडा मंडळास मोलाचे सहकार्य करून कबड्डी खेळास उत्तेजन दिले. स्काऊट अँड गाईड संस्थेस मौल्यवान जागा मिळवून दिली. मावळ मराठा व्यायामशाळा व अमरप्रेम क्रीडा मंडळ उभारण्यास मोलाचे सहकार्य केले. पक्षातीत दृष्टीकोन ठेऊन कोळीवाड्यात सांस्कृतिक हॉल उभा केला. बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेशी सहकार्य करून जनता शिक्षण संस्थेमध्ये तिची शाखा सुरु केली. लोकांची सोय झाली व शाळेस आर्थिक पाठबळ मिळाले. डॉ डी वाय पाटील यांचे सहकार्य घेऊन संस्थेची पक्की इमारत उभी केली. लग्नकार्यासाठी व सामाजिक कार्यासाठी सुसज्ज हॉल त्याठिकाणी निर्माण झाला. सातत्याने मुंबई मनपामध्ये ४७ वर्षे निवडून आल्यानंतर २००२ साली त्यांच्या विक्रमी कामांची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. एक काळ असा होता की, मुंबईच्या गिरणगाव ते गिरगाव परिसरातून कॉ. कृष्णा देसाई, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. एस. जी. पाटकर, कॉम्रेड एस एस मिरजकर कॉ. अहिल्या रांगणेकर, कॉ. तारा रेड्डी, कॉ. जी एल रेड्डी, कॉ. पी के. कुरणे, कॉम्रेड तु कृ सरमळकर, कॉ. मणिशंकर कवठे, कॉ. मधु शेटे, कॉम्रेड मोहम्मद शाहिद, कॉ. पीर मोहम्मद, कॉ. जया पाटील, कॉ.बाबूराव शेलार, कॉ. जी एल पाटील इत्यादी अनेक गिरणी कामगार नेते, कम्युनिस्ट नेते महापालिका व विधानसभेत कामगारांनी निवडून पाठविले होते. अलीकडच्या काळात फक्त लोकांच्या मधून निवडून जाणारे कॉ कवठेच राहिले. आज गेल्या पन्नास वर्षात देशातील व महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या वेगाने बदललेले आहे, की स्वातंत्र्यापूर्वी असलेल्या काँग्रेसचा आणि स्वातंत्र्यानंतरच्या कम्युनिस्टांचा काही बाबतीतला पुरोगामी वैचारिक वारसा, मूल्यांचे राजकारण बदलत गेले आणि त्याची जागा संधीसाधू राजकारणाने घेतली आहे. पक्ष आणि पक्षनिष्ठा जपणारे कवठेंसारख्यांची पिढी संपली आहे हेच खरे.

व्यापक दृष्टीकोन - मणिशंकर कवठे यांच्या विरोधात महापालिकेची निवडणूक लढलेल्या शिवसेना उमेदवार श्री बा. स. पाटील यांना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद दिले. आपण स्वतः आमरण कार्यवाह म्हणून कार्यरत राहिले. केवढी लवचिकता व मनाचा मोठेपणा ! काँग्रेसचे कार्यकर्ते कृष्ण ब्रीद व शांताराम पारकर यांना सतत पंचवीस वर्षे कार्यकारी मंडळात निवडून आणण्यात पुढाकार त्यांनीच घेतला. याशिवाय जनता हायस्कुल धर्मनिरपेक्ष लोकांच्या हातात राहील याची काळजी घेतली. जनता हायस्कुल हे सामाजिक परिवर्तनाचेच केंद राहावे अशी खटपट मरेपर्यंत केली. जातीयवाद व संकुचित धर्मवादापासून देशाला वाचवायचे असेल तर 'ब्रॉड डेमोक्रॉटिक फ्रंट' उभारावयास हवा म्हणून ते सातत्याने मांडणी करीत असत. असा व्यापक दृष्टीकोन असल्यामुळेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच आचार्य अत्रे जनता हायस्कुलमध्ये तीन वेळा भेट देऊन गेले. कॉ दत्ता देशमुखांनी जनता शिक्षण संस्थेसाठी जागा मिळवून  दिली. बिहारचे राज्यपाल प्रा. आर डी भंडारे हे जनता शिक्षण संस्थेचे आजीव सभासद होते. ते बहुतेक वेळा सर्वसाधारण सभेस उपस्थित असत. भारताच्या महान समाज शास्त्रज्ञ गेल ऑमवेट तीन वेळ या शाळेत प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांस आणि शिक्षकांना  मार्गदर्शन करण्यास आले होते.हजारो बालकांच्या आई सिंधुताई सकपाळ यांना आग्रहाने शाळेत बोलावून शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांचा हृद्य सत्कार केला. आपल्या जनता शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक दर्जा कायम राहावा मुलांना व शिक्षकांना मराठी साहित्याचे मार्गदर्शन व्हावे म्हणून शिक्षण महर्षी के जी अक्षीकर यांना हायस्कुलचे प्रथम मुख्याध्यापक म्हणून आणले. बालवयातच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेणारे, विविध आंदोलनात आग्रही भूमिका घेऊन संघर्ष करणारे आणि कोळी समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणून त्या प्रश्नांची तड लावणारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड मणिशंकर कवठे यांचे वार्धक्याने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. कवठे यांच्या समर्पित जीवनाची ज्योत दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी विचारांचा वसा मागे ठेऊन अनंतात विलीन झाली.

अत्यंत स्वच्छ पंधरा शुभ्र शर्ट, दररोज ढाढी करणारा, केस विंचरणारा, मित्रमंडळींसोबत चारचौघात चहा खारी आवडीने खाणारा, मान खाली ठेऊन चालणारा परंतु थंड डोक्याचा अन विचाराने पक्का असलेला आगळा वेगळा लालबावाटेवाला कॉ कवठे मुंबईच्या चिरस्मरणात कायमचा राहील.

कृष्णा ब्रीद - निवृत्त मुख्याध्यापक, जनता शिक्षण संस्था वरळी





रवींद्र मालुसरे  

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 


सोमवार, १० जुलै, २०२३

पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक

 पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक 

अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर 

जागी होते अस्मिता 

अन पेटून उठतो माणूस संघर्षासाठी 

तुम्ही म्हणाल प्रश्न संघर्षाने सुटत नाहीत 

ठाऊक आहे आम्हाला संघर्ष उध्वस्त करतो 

माणसातल्या माणूसपणाला 

आमचा संघर्ष नाही माणसाविरुद्ध

आमचा संघर्ष आहे माणूसपणासाठी

करावाच लागेल संघर्ष आम्हाला 

तालुक्याच्या न्याय हक्कासासाठी 

या ओळी संपादकीयात छापून १९९८ मध्ये म्हणजे २५ पर्षांपूर्वी 'पोलादपूर अस्मिता' चा विशेषांक प्रकाशित केला होता. पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा हा विशेषांक कोणाला वाचायचा असेल तर तर 9323117704 वर मेसेज पाठवा..... सन १९९८ मध्ये मी सीताराम रेणुसे,सीतारामबुवा कळंबे, ज्ञानेश्वर मोरे, दिवंगत अशोक जंगम, सुनील मोरे-काटेतली (बडोदा), मुजुमले गुरुजी, प्रकाश कदम, ज्ञानोबा ला कळंबे या माझ्या सहकार्यांना सोबत घेत "पोलादपूर तालुका विशेषांक" प्रकाशित केला होता,  त्यांनी विशेष मेहनत घेतल्याने हा अंक त्यावेळी प्रकाशित करू शकलो होतो.

आता तो अंक दुर्मिळ झाला आहे. अजूनही त्या अंकाबाबत विचारपूर होत असते.

या अंकात .......

(१) पोलादपूरच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा इतिहास, 

(२) चालीरीती व जाती जमाती, भौगोलिक परिस्थिती, 

(३) ऐत्याहासिक स्थळे, तालुक्याचा सांस्कृतिक वारसा काल-आज-उद्या, 

 (४) तालुक्याची स्वयंपूर्णता, उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर उपाय, 

 (५) शैक्षणिक आढावा, 

(६) तालुक्याच्या विकासाची दिशा आणि दशा, 

 (७) गोपीनाथभाई गांधी घराण्याची स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी परंपरा, 

(८) नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चार शब्द, 

(९) पोलादपूरच्या ऐत्याहासिक वास्तू अस्मितेचा ठेवा,

(१०) तालुक्यातील गडभ्रमंती, 

 (११) साद सह्याद्रीची भटकंती तालुक्यातील दऱ्याखोऱ्याची, 



इत्यादी वाचनीय आणि उपयुक्त माहिती छापली आहे. कोणाला हा अंक पाहिजे असल्यास ९३२३११७७०४ या व्हॅट्सऍपवर किंवा chalval1949@gmail.com या मेलवर नावासह मेसेज पाठवावा..... 

रवींद्र मालुसरे 

(अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )  

सोमवार, ३ जुलै, २०२३

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा - रवींद्र मालुसरे

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा  - रवींद्र मालुसरे 





मुंबई : (रवींद्र मालुसरे) 


महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवलेले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. ‘‘ ‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे,’’‘‘स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले. नव्वद टक्क्याहून ज्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करताना हा विचार मनात कायमस्वरूपासाठी रुजवला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय न्यूरो स्पायन सर्जन डॉ प्रेमानंद रामाणी यांनी काढले. श्री शांता सिद्धी ट्रस्टच्या वतीने दादर येथे संस्थेच्या या वेबसाईटचे उदघाटन आणि इयत्ता दहावीमध्ये उत्तम मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, डाइव्हिंग या ऑलम्पिक या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकाराचे  पंच  श्री मयूर व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

डॉ रामाणी विद्यार्थ्यांना पुढे असेही म्हणाले की, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यारणा, ध्यान आणि समाधी. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार होते.  व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.तर रवींद्र मालुसरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी-बारावीचे सर्वोच्च मार्कांचे यश म्हणजे आई -वडिलांची लादलेली आकांक्षा पूर्ण करण्याचे यश. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या आयुष्यात आपली स्वतःची वाट निवडायला हवी. का, कशासाठी, कुठपर्यंत पोहोचण्यासाठी  असे प्रश्न मनात धरून विशिष्ट ध्येय ठेऊन आपण निवडलेला मार्ग आनंद, यश, कीर्ती आणि पैसे देतो. तंत्रज्ञानाच्या शतकात वावरताना स्वतःचा चेहरा ओळखा  म्हणजे तुमच्या गुणवत्तेला न्याय दिल्यासारखे होईल. श्री मयूर व्यास यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एकातरी क्रीडाप्रकारात विद्यार्थ्याने मैदानात उतरायला हवे. संस्थेची माहिती  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यवाह भूषण जॅक यांनी केले. 


सोहम मोये, सिया मोये, वेदांत पराग व्होरा, महालक्ष्मी श्रीधर शानबाग,रुजूला भाटकर, श्रावणी जोशी, रीती करण रावत, साची जवाहर खांडेपारकर, आषिता आरोसकर या ९२% हुन अधिक मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. किशोर  कुलकर्णी, संजय  दिवाडकर, जयंत  गायतोंडे, विनायक  पंडीत, संजय  कुलकर्णी, सतीश  दाभोळकर, दीपक  देसाई इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला हजर होते














रवींद्र मालुसरे





अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४  

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...