सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

 शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

◆ महेश सावंत कोण ?
२१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याचबरोबर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीही केली होती. परंतु महेश सावंत यांना माहीम, वडाळा, दादर, वरळी येथील काही मोठ्या सेनानेत्यांचा छुपा पाठींबा होता हे काही गोष्टीत लक्षात येत होते.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे ८३०० मते मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा २५० मतांनी निसटता विजय झाला होता. निकालाची ती संध्याकाळ मला आठवतेय, सामना दैनिकाच्या आणि महेशच्या वाकडी चाळीच्या समोर महेशच्या निवडणूक चिन्ह असलेल्या नारळ या चिन्हावर राग काढताना शेकडो नारळ रस्त्यावर फोडीत ढीग रचला होता. पुढे ४ महिन्यानंतर मातोश्री निवासस्थानी सावंत यांना उध्दवजींनी पुन्हा शिवसेना पक्षात घेतले.
सरवणकर शिवसेना कार्यकर्ता ते आमदार अशी राजकीय वाटचाल आहे. १९९२ ते २००४ तीन वेळा नगरसेवक, त्यावेळी २००२-२००४ या दोन वर्षात स्थायी समिती अध्यक्ष. त्यानंतर २००४, २०१४, २०१९ विधानसभेत शिवसेनेचे आमदार, २००९ च्या निवडणूकीच्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर नारायण राणेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून निवडणूक लढवली परंतु पराभव झाला. २०१२ मध्ये शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.
कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. २००९ मध्ये सदा यांनी विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांच्यासोबत तेव्हाचे शाखाप्रमुख महेश सावंत हे सुद्धा होते, सदा सरवणकर (काँग्रेस), आदेश बांदेकर (शिवसेना) यांचा पराभव झाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे नितीन सरदेसाई आमदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा पराभव मातोश्रीला फारच अस्वस्थ करून गेला. दादर प्रभादेवीत अनेक मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी सदा सरवणकर यांना पायघड्या घालून शिवसेना पक्षात घेतले गेले आणि पुन्हा ते आमदार झाले. आता 'आमचीच खरी शिवसेना' म्हणत पुन्हा त्यांनी शिंदेगट जवळ केला आहे. मात्र 
एकेकाळी एकाच रस्त्यावर स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या आसपासच्या चाळीत राहणारे हे दोघे मित्र एकेकाळी कट्टरमित्र होते, परंतु सध्या सरवणकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. एकनाथ शिंदे यांनी अलीकडे शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या बरोबर ज्या ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यात सदा सरवणकर हेही अखेरच्या काळात गोहोटी येथे सहभागी झाले.....

◆ दादर आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध
दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. दादर आणि शिवसेना हे अतूट बंधन ! दादर म्हणजे ठाकरे घराण्याच्या वास्तव्याचा १२० वर्षाचा कालखंड ! सुरुवातीला प्रबोधनकार मुंबईत आल्यानंतर दादरमध्ये 'मिरांडा' चाळीत राहिले, त्यानंतर प्लाझा समोर 'कामाठी चाळीत' व शेवटी सेनापती बापट यांच्या पुतळा आहे त्याठिकाणी. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचे वितरण तिथूनच होत असे. १३ ऑगस्ट १९६० ला दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करून मार्मिक सुरु झाला. १९ जून १९६६ ला रितसर शिवसेनेची स्थापना झाली.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तुडुंब गर्दीत झाला. एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान आणि गर्दीचा उच्चांक मोडणारी शिवाजी पार्कची सभा असे समीकरण दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला आले नाही. त्याला यंदा ५६ वर्षे होत आहेत. १९७१ साली शिवसेनेचे पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते हे दादरच्या. त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत हे मुंबईचे महापौर झाले आहेत. १९ जून १९७७ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादरमध्ये शिवसेनेचा कारभार चालविण्यासाठी शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दादरचा भाग असलेल्या प्रभादेवी येथील नागुसयाजीच्या वाडीत सुरु झाला.
१९९२ ला युतीची पहिली सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दादरच्या प्रि. मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. पोर्तुगीज चर्च येथे प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे यांचा पूर्णाकृती तर शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्येच लाखोंच्या उपस्थितीत करण्यात आले.

◆भविष्यातली राजकीय वाटमारी
माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची माहीम-दादर-प्रभादेवीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली. सरवणकर यांच्या सोबत सावली सारखे असलेले त्यांचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी उपविभाग संघटक कैलास पाटील, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी व असंख्य कार्यकर्ते उध्दवजींच्या सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान आणि संघर्ष काय होणार आहे त्यातून भविष्यात सदा सरवणकर राजकीय पटलावर कुठे असतील हे काळ ठरवणार आहे. मतदार संघात ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना सरवणकर हे लोकप्रिय आणि कार्यसम्राट म्हणून परिचित आहेत. लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणारा नेता म्हणून ओळख आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्ता जाग्यावरच आहे. मतदारांची सहानुभूती सध्या तरी संयमाने मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उध्दवजींच्या बाजूने आहे. ती मतांच्या स्वरूपात निवडणुकी पर्यंत किती टिकून राहतेय हे सुद्धा महत्वाचे आहे.
शिवाय शिवसेना पक्षफुटी पुर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे माहिम मधून विधानसभा लढवणार अशी वदंता माध्यम जगतात होती. तशी बॅनर्सबाजी सुध्दा परिसरात दिसून येत आहे. राजकारणात काहीही घडू शकते हे मागचे माविआचे सरकार पडताना दिसून आले. पोलादी आणि बलदंड असलेल्या शिवसेना पक्षात नेतृत्वाच्या विरोधात जात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन पक्ष संपवण्याची प्रक्रिया होईल असे कोणत्याही मराठी माणसाला स्वप्नातही वाटले नसावे. आणि पक्ष फुटल्यानंतर गद्दारांच्या विरोधात सेनाभवनावर निदर्शने आणि शिंदेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानंतर आपले नेते आमदार सरवणकर बंडखोरी करीत डायरेक्ट टीव्हीच्या बातमीत गोहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये दिसतील असे स्थानिक शिवसैनिकांनाही वाटले नसेल....

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ
9323117704




वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...