बुधवार, २७ जुलै, २०२२

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार


मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले. 
यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई लढतो आहोत. हे हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केली. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत डोके, अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे, कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,  अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे,  नगराध्यक्ष सुनील चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड  सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे, मुरबाडचे हिम्मत महाराज गगे, शहापूरचे योगेश महाराज वागे, योगेश महाराज घरत, वासींदचे ज्ञानेश्वर महाराज शेळके, खडवलीचे नारायण महाराज बजागे, बदलापूरचे अशोक महाराज घरत, मोहन महाराज राऊत, टिटवाळाचे दशरथ महाराज किणे, आंबिवलीचे भीमसेन महाराज पाटील, ठाण्याचे जगन्नाथ महाराज म्हस्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम रिंगे, नवोदित गायक चिन्मय रिंगे, आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होते. 



शुक्रवार, १५ जुलै, २०२२

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता

 

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता 

कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे होते. त्या दिवशी बातमी घेऊन येणारी सकाळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक होती.  सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा माणिकरावांच्या रूपाने लोकनेता हरपला होता. व्यक्तिगत पातळीवर माझे संबंध अतिशय जवळचे होते.  काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला होता. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकीय क्षेत्रातील  कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले, देश, राज्य, कोकण एका स्वच्छ, पारदर्शी आणि उच्चशिक्षित राजकारण्यास मुकला आहे. तरूण, निष्ठावंत, प्रचंड क्षमता असलेले आणि जबरदस्त उमदे नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले.  अत्यंत कमी वयात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती.  काँग्रेसचे युवा नेते, माजी आमदार माणिकरावांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, नेतृत्व गमावले आहे. जनसामान्यांशी एकरूप असलेला, विकासासाठी झटणारा लोकनेता हरपला अशीच भावना कोकणात आणि महाराष्ट्रात होती.   मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना माणिकराव यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 
रायगड जिल्ह्याचे राजकारण डोळ्यांपुढे आणले की, अनेक दिग्गज आणि कर्तबगार राजकीय नेते डोळ्यांपुढे येतात. त्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून माणिकराव यांचे स्थान अग्रणी होते.  आपल्या कर्तबगारीने त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो तडीस लावेपर्यंत ते स्वस्थ बसत नसत.  रायगडच्या  प्रत्येक क्षेत्रातील प्रश्नांची त्यांची जाण होती.  विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत त्यांनी सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल उचलले. महाविद्यालयीन विद्यार्थी नेतृत्व करण्यापासून पुढे युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं, पुढे जिल्हापरिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नंतर लोकप्रिय आमदार ही वाटचाल स्वत:च्या हिंमतीवर केली.  वजनदार नेते अशी त्यांची प्रगती होत गेली. ही करताना अनेकांच्या मदतीला धावून येणारा आपला हक्काचा माणूस अशीच त्यांच्याबद्दल असे.  प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री माणिकराव. मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरूप झालेले त्यांचे नेतृत्व होते. महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. या डोंगराळ तालुक्याच्या अविकसित भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलेजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अभ्यासू, चिंतनशीलपणा, परखड, सजग नेतृत्व, त्यांच्यातील माणुसकी आणि निखळ-निकोप मैत्री, वक्तशीरपणा, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्यातील आक्रमक व स्पष्टवक्तेपणा, त्यांच्या नजरेचा धाक, अंत:करणातील हळवेपणा व भावुकपणा, त्यांच्यातील आध्यात्मिक श्रद्धाळूपणा, त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा आदी विविध पैलू आहेत.

राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी ते सदैव आक्रमक राहिले. त्यांनी स्वत:चा आदर्श स्वत: निर्माण केला व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारणातही हे दाखवून दिले. त्यांनी अतिशय कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आणि अनेक वादळं पाहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, तीनवेळा त्यांना पराभव पाहावा लागला. पण लोकनेत्यांसाठी या क्षुल्लक गोष्टी ठरल्या. ते पुन्हा पुन्हा  राजकारणात सक्रियच  राहिले आणि त्यांची लोकप्रियतेची यशाची कमान चढतच राहिली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता.  राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे माणिकराव जगताप यांची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. त्यात माणिकराव हे  झंझावातासारखे असल्याने त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. ते रोखठोक बोलत. अशा बोलण्याचा फटकाही काहीवेळा त्यांना बसला. मात्र, अंतर्यामी ते मृदू होते. त्यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. . तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे माणिकराव

कोकण हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कोकणातले अनेक जटील प्रश्नांवर प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत नेऊन ते सोडवून घेत. ती सोडविण्याची त्यांची एक वेगळी आक्रमक शैली होती.  त्यामुळे कोकणच्या विकासाचा ध्यास घेत, आजच्या पिढीतील कोकणातले देखील ते अभ्यासू नेते ठरले आहेत.   त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची जिद्द आणि धडाडी ही यापुढच्या  नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांना अनुकरणीय अशीच ठरणार आहे.

 हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला माणिकराव हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना त्यांच्यातली ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली. दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो. कॉँग्रेसच्या आदर्शांवर निष्ठा ठेऊन चालणारा प्रचंड ताकत असणारा माणिकराव हा नेता होता, स्वपक्षीयांच्या भूमिकेला विरोध न करता इतरांच्या भूमिकांचे स्वागत करणारा दिलदार आणि धाडसी नेता, अशी ओळख म्हणजे माणिकराव. 

माणिकरावांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा कोणाकडे असणार याचा निवाडा त्यांनी आपल्या हयातीतच घेतला होता. त्यांची कन्या स्नेहलताई यांना राजकारणात पदार्पण करताना अडचणी आल्या नाहीत. मात्र त्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या पित्याच्या निधनाचे दुःख काळजाच्या कोपऱ्यात ठेवत त्यांनी चारच दिवसात पूरग्रस्त महाडकरांच्या सेवेसाठी धावल्या. त्यामुळे  महाडच्या  नगराध्यक्षा म्हणून त्यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.  भविष्यात त्यांची उज्वल वाटचाल त्यांना प्रगतीकडे घेऊन जाणारी असणार आहे मात्र त्यासाठी त्यांनी लोकसंपर्क वाढवायला हवा.

त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. सामाजिक-ऐत्याहासिक काही प्रश्नावर चर्चा करायची असली तर  एकमेकांचा फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाडचे काँग्रेसनेते ऍड सुधाकर सावंत यांच्या सोबत माणिकराव आले होते. तालुक्याचे काँग्रेसचे नेतृत्व करणारे स्व महादेवराव मालुसरे, श्री ज्ञानोबा मालुसरे यांचा कार्यक्रम मुंबईत यशस्वी करण्यासाठी आवर्जून त्यांनी हजेरी लावली होती. पुढे नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचे बांधकाम आणि परिसर सुशोभित करण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना घेऊन आले होते. आमच्या साखर गावावर त्यांनी आणि साखर गावकऱ्यांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. शक्य होईल असा विकासही केला.  आजच्या पहिल्या स्मृतिदिनी  त्यांचे  हसणे, त्यांचे नेतृत्व, पक्षाशी निष्ठा आणि मैत्री माझ्या कायम आठवणीत राहिल."त्यांना भावपूर्ण आदरांजली !!



रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४


सोमवार, ११ जुलै, २०२२

भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते

 भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते

                                                                                                                              - डॉ पी एस रामाणी


मुंबई : मनुष्याचे जीवन सुखदुःखानी भरलेले आहे. यातून कोणीही सुटू शकत नाही. सुख तर प्रत्येकाला प्रिय असते. परंतु दुःखाचे चटके मात्र कोणालाच नको असतात. अशावेळी सर्वसामान्य माणूस दुःखाने निराश होतो. जगाशी भांडणे उकरून काढतो. ईश्वराला दोष देतो. येथेच गीतेची शिकवण उपयोगात येते. जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाचा स्वीकार करण्यास गीता सांगते आणि ते दुःख समर्थपणे पचविण्याचा उपायही शिकवते. श्रीमद भगवद्गगीता जितकी वाचावी तितकी ती वेगवेगळ्या पद्धतीने समजून येत राहते. त्याचप्रमाणे या शब्दाचा अर्थही विविध प्रकारे जाणून घेता येतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शस्त्रसज्ज झालेला अर्जुन आपल्याच आप्तेष्टांना समोर पाहून हातपाय गाळतो आणि स्वजनांशी लढण्यापेक्षा संन्यास वा मरण पत्करलेले बरे अशी त्याची धारणा झाली. हे युद्धच करायचे नाही असा निश्चय करून हातातील शस्त्रे टाकून देतो. अशावेळी आपल्या नियत कर्मापासून दूर चाललेल्या अर्जुनाला त्याचा सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णाने दिलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवदगीता. या गीतेच्या स्वरूपात तत्वज्ञानाच्या आधारे स्वधर्म व कर्तव्यपालनाचा उपदेश देऊन अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले व त्याला युद्धाला प्रवृत्त केले. असे प्रतिपादन वरिष्ठ न्यूरो आणि स्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या 'श्रीमद भगवदगीता : जनसमान्यांसाठी ... जवळ असूनही दुर्बोध' या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृतींचा प्रकाशन समारंभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केला होता. पुस्तकाचे प्रकाशन कैवल्यधाम मुंबईचे योगगुरू रवी दीक्षित, बँकर आणि कंपनी डायरेक्टर श्रीमती अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्री विनायक प्रभू, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, उद्योजक आनंद लिमये हे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर होते.

ते पुढे असेही म्हणाले की, वास्तविक गीता हा केवळ श्रीकृष्णार्जुनाचा संवाद नसून हा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे आणि गीतेचे ज्ञान हे केवळ अर्जुनापूरते मर्यादित नाही; तर ते कालातीत आहे, म्हणजे कुठल्याही युगात त्याचे महत्व नाकारले जाऊ शकत नाही. गीतेचे ज्ञान आसक्ती आणि अज्ञानामुळे ग्रस्त असलेल्या मनुष्याच्या जीवनात कर्तव्याचे वर्चस्व दर्शवते आणि भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे वारंवार सांगते.
श्रीमती अनुराधा ठाकूर आपल्या भाषणात म्हणाल्या की, गीता हा असा ग्रंथ आहे की, तो आपल्याला प्रत्येकाच्या कुवतीनुसार समजतो. आयुष्य कशाप्रकारे जगायचे हे गीता आपल्याला सांगत असते. आपण वयाने जसजसे मोठे होत जातो तसतसा त्याचा वेगवेगळा अर्थ समजत जातो. म्हणून गीता ही तरुणपणातच वाचायला पाहिजे. आपला फक्त कर्मावर अधिकार आहे फळावर नाही. आजचा तरुण जबरदस्त स्पर्धेच्या वातावरणात काम करतो आहे. 
बेकारी वाढते आहे, त्याच्या कामात अनिश्चितता आहे स्पर्धेत मागे पडले याची मनात भीती असते तेव्हा या पिढीची ही गंभीर मानसिकता मला हतबल करते. त्यांचं जगणं हरवलेली ही स्पर्धा मला कोरडी वाटते. हे पुस्तक तरुण पिढीने वाचले तर डॉ रामाणि यांनी दोन लाख शस्त्रक्रिया करून माणसांचा कणा जसा ताठ केला तसा तरुणांचा अध्यात्मिक मनाचा कणा मजबूत होईल. ८४ वर्ष वय असलेल्या डॉक्टरांचे हे ७५ वे पुस्तकाबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी भूषण जॅक यांनी केले, सूत्रसंचालन वृत्त निवेदिका स्मिता गवाणकर आणि घनश्याम दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन संजय दिवाडकर यांनी केले. 

मंगळवार, ५ जुलै, २०२२

भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर

भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर

गावांतील समस्या कोणतातरी एक प्रश्न सोडवून संपत नाहीत. कारण त्यांचे मूळ कारण दुस-याच समस्येत लपलेले असते. समस्यांची एकमेकात असलेली गुंफण ज्याला लक्षात आली, त्याला ग्रामविकासाची नाडी कळली असे म्हणता येईल. असे उदगार  भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी मुंबईत घाटकोपर येथे काढले. पोलादपूर तालुक्यातील यशस्वी शेतकरी श्री रामचंद्रशेठ कदम यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने उद्यान पंडित पुरस्कार प्रदान केला त्याप्रित्यर्थ त्यांचा भव्य सत्कार कांगोरीगड विभाग सर्वांगीण विकास मंडळाच्या वतीने डॉ देवधर यांच्या हस्ते आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उद्योजक संजय उतेकर, पांडुरंग साळेकर, कृष्णा पां उतेकर, तुकाराम मोरे, रामशेठ साळवी, कृष्णा कदम, सचिन उतेकर, लक्ष्मण वाडकर, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग दाभेकर यांनी केले.

गावातली घरेदारे ओस आणि शेतीवाडी ओसाड सोडून मुंबईत अल्प पगारात मोलमजुरी करणाऱ्या तालुक्यातील तरुणांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी डॉ देवधर यांचे 'कोकणातील ग्रामीण विकासाचे सुत्र' या विषयावर याप्रसंगी व्याख्यान आयोजित केले होते. निमंत्रित वक्ते म्हणून या विषयावर बोलताना ते पुढे असेही म्हणाले की, “धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणा-या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला मुरायला लावा". कोकणात चांगला पाऊस पडूनही फेब्रुवारीच्या नंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाऊस भरपूर पडला तरीही समुद्र जवळ असल्याने वेगाने समुद्रास मिळते. यासाठी तुमच्या पंचक्रोशीत हे जलसूत्र अवलंबलेत तर बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न सुटेल. हे पाणी जमिनीत मुरायला वनसंपदा मदत करते. झाडांची मुळे जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवतात आणि पाण्यालाही रोखतात. मग तसे का होत नाही? उत्तर शोधताना माझ्या लक्षात आले की काही वर्षांत झाडेही कमी झाली आहेत. जवळपासची अरण्ये ओस पडत आहेत. अचानक वणवे लागत आहेत. खेड्यातील घरांमध्ये चुलींवर जेवण रांधण्याची पध्दत. त्यासाठी जळणाचा साठा करावा लागतो. ही लाकडे येणार कुठून? दरवर्षी कुठून मिळणार सुकी लाकडे? मग लावा वणवे…पेटवा झाडे. झाड तोडायला बंदी आहे, पण सुकलेलं झाड तोडायला नाही. अशा पध्दतीने कळत नकळत मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली. विहीरी लवकर तळ गाठू लागल्या. शेतीला पाणी पुरेनासं झालं. यासाठी ‘जल है तो कल है’ हा जागतिक विचार समोर ठेवून शेततळी बांधा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ तुमच्या ग्रामिण भागात उभी करा.

डॉ देवधर यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात केलेले ग्रामविकासाचे, जलसंवर्धनाचे प्रयोग, त्यामागची भूमिका, आलेले अनुभव, बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, परसदारातली हळद, सुरण लागवड, पूरक शेतीचे आर्थिक गणित त्यातून कुटुंबाला येणारी सुबत्ता, उपलब्ध बाजारपेठ याबाबत देवधर यांनी सविस्तर माहिती दिली.





बुधवार, २२ जून, २०२२

*आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !*

 *आचार्य  अत्रे  यांच्या  स्मृतींना  मुंबईत अभिवादन !*

 

संयुक्त  महाराष्ट्र  चळवळीचे  अध्वर्यू, महाराष्ट्राचे  अष्टपैलू  व्यक्तीमत्त्व, दै मराठा चे संपादक, साहित्यसम्राट *आचार्य  प्रल्हाद  केशव  अत्रे  यांच्या ५३ व्या  स्मृतीदिनानिमित्त  विनम्र  अभिवादन ! 
आज सकाळी १० वा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने वरळीनाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा सौ आरती पुरंदरे-सदावर्ते, कार्याध्यक्ष विसुभाऊ बापट, उपाध्यक्ष ऍड अक्षय पै, रवींद्र मालुसरे, रवींद्र आवटी, अमर तेंडुलकर उपस्थित होते.

सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे

 सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे

मुंबई : पोलादपूर तालुक्याला सुभेदार वामन बांदल यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची भारतीय सैन्यातील त्यांची शौर्याची वाटचाल आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर शिपाई, मग लान्स नाईक, त्यानंतर नाईक, हवालदार, नाईक सुभेदार, ते सुभेदार अश्या वेगवेगळ्या पोस्टवर प्रमोशन घेतल्यानंतर एन एस जी म्हणजे ब्लॅक कमांडो,त्यांच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत त्यांची ज्युनिअर कमिशनड ऑफिसर अधिकारी या पदावर काम केल्यानंतर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.

खरंतर प्रत्येक पोलादपूर वासीयांच्या हृदयात कोरली जायला हवी अशी ही कामगिरी आहे. असे उदगार सुभेदार नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव मालुसरे यांनी काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सुभेदार वामनराव बांदल यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते. बाजीराव मालुसरे पुढे असेही म्हणाले की, अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यावर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीराच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती आहे. सैनिकांच्याप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव देखील तितकीच महत्वाची आहे. याप्रसंगी शिवसेना शिर्डी संपर्क प्रमुख उद्धव कुमठेकर, नगरसेवक महेश शेठ गायकवाड, नगरसेवक विशाल दादा पावशे, नगरसेवक निलेश दादा शिंदे , नगरसेवक हर्ष वर्धन दादा पालांडे , कल्याण पूर्व शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद दादा पाटील ,उपशहर संघटक अशोक जी कुबल ,मा. नगरसेवक कल्याण जी धुमाळ,निवृत्त पोलिस निरीक्षक राम चिकणे, निवृत्त कस्टम अधिकारी पांडुरंग दाभेकर, शाखाप्रमुख प्रशांत जी बोटे, मनसे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ, क्राईम ब्रांच सुचेत टिकेकर, माजी सैनिक सोपान जाधव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.






मंगळवार, १० मे, २०२२

खाकी वर्दीतील दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन

महाड : पोलिस वा ‘खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं . खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम सध्या ठाणे येथे राहणारे परंतु मूळचे महाड तालुक्यातील किंजळोली - भालेकर कोंड या गावातील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव जाधव यांनी केले आहे. माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील रिंगेवाडी येथे घडली आहे. २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये साखर गावातील सुतारवाडीवर दरड कोसळली, त्यात संपूर्ण वाडी उध्वस्त होताना ६ मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. यातील एका निकटच्या घरात सौ सुनीता विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईमध्ये घरकाम करून व पै पै पुंजी जमवून काही दागिने बनवले होते, दागिन्यांचा तो डबा पुरात वाहून गेला. मुलीचे लग्न तर पुढच्या वर्षी करण्याचे ठरले होते. त्यात पूजाचे वडील विठ्ठल चव्हाण हे अपंग आणि निराधार. त्यामुळे या कुटुंबासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार यांनी महाड येथील तळिये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर-सुतारवाडी व केवनाळे गावातील पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मिटिंग आयोजित केली होती. सभेला सुरुवात करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी महाड पोलादपूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन कसे विस्कळीत होऊन जीवित व वित्तहानी झाली आहे याचा संपूर्ण आढावा घेत केवनाळे येथील ११ वर्षीय साक्षी दाभेकर दिड वर्षाच्या मुलाला वाचवताना पाय गमावून बसली आहे तर साखर येथील पूजा चव्हाण हिचे लग्नाचे दागिने वाहून गेल्याचे सभेत आपल्या भाषणात सांगितले. त्याचवेळी दिलीप जाधव यांनी मालुसरे यांना जवळ बोलावून पूजाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे आणि या गोष्टीची कोणाकडेही वाच्यता करू नये असे सांगितले. दागदागिने कपड्यालत्यासह सर्व खर्चाची जबाबदारी घेत जाधव साहेबांनी आश्वासनाची पूर्तता करीत पूजाचे लग्न नुकतेच विष्णू सीताराम गोगावले यांच्याशी साखर येथे करून दिले.
यानिमित्ताने खाकी वर्दीतील माणुसकीचा चेहरा दिलीप जाधव यांच्या रूपाने समोर आला आहे. महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी अशी गोष्ट कायम स्मरणात ठेवावी आणि अशाच पद्धतीने खास होऊनही आम राहावे. सामाजिक भावनेतून त्यांनी केलेल्या या कामाबद्दल जाधव यांना जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणाले की, मी फक्त माझं कर्तव्य केलं...वेगळं काहीच नाही." पोलिसांना जात नसते ना धर्म असतो. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो. त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो. लहानपणी अनुभवलेली गरिबी आणि उदरनिर्वाहासाठी आईसोबत केलेले कष्ट याचे स्मरण मला अजूनही आहे. समाजात आपल्या हातून चांगले कार्य घडावे हीच अपेक्षा व जाणीव ठेवून मी माझ्या जन्मगावात आणि समाजात काम करीत असतो. शाळेत आम्हाला प्रार्थना होती. 'खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे' आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो. लोकांनी ही प्रार्थना लक्षात ठेऊन काम केलं पाहिजे. सर्वधर्म समभावाने राहिलं पाहिजे. "जात, धर्म महत्त्वाचा नाही. माणसाने, माणसासाठी माणसासारखं वागलं पाहिजे."
पूजा व विष्णू यांना शुभेच्छा देण्यासाठी महाड-पोलादपूर तालुक्यातील महाड तालुका शिवसेनाप्रमुख सुरेश महाडिक, शिवसेना महाड संपर्क प्रमुख सुभाष पवार, शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, नाईक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, उद्योजक संजय उतेकर, उद्योजक विनोद पवार, महाड सहसंपर्क प्रमुख विजय सावंत, रायगड जिल्हा बँक साखर विभाग सोसायटीचे अध्यक्ष नारायण कळंबे, प्रमोद गोगावले, भरत चोरगे, गणेश ज्ञानोबा मालुसरे, नारायण चोरगे गुरुजी, महाड संपर्क प्रमुख बंधू तरडे, नाईक मराठा समाज महाड नाते विभाग अध्यक्ष बापू तथा आबा डोंबे, नाईक मराठा समाज कामथे विभाग अध्यक्ष तुकाराम केसरकर, उद्योजक रामदास कळंबे, यांच्यासह शेकडो स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित होते. दिलीप जाधव यांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचे मनोज्ञ दर्शन समाजसेवकाच्या रूपात त्याचप्रमाणे रवींद्र मालुसरे यांनी सामाजिक जाणिवेतून या प्रश्नाला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आल्याने समाजातल्या या सुपुत्राच्या कार्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

बुधवार, २० एप्रिल, २०२२

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया 


(रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले. ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होती. आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत. रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ.उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे,अनिल मालुसरेश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा शिवतीर्थावर गौरव ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला उपस्थित असलेल्या समस्त मालुसरे यांच्यावतीने रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ) यांनी हा सन्मान स्वीकारला. सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात दिला. यावेळी राज्याच्या विविध ७२ गावातून सुमारे शेकडो मालुसरे पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २५ एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा नारळ देऊन रायगडावर सन्मान करण्यात आला होता त्यानंतर १२७ वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे अनिल मालुसरे, मिलिंद मालुसरे (साखर), सुभाष मालुसरे, सपना मालुसरे, अनिल मालुसरे (पारमाची), नितीन मालुसरे, सुनीता मालुसरे, स्नेहल मालुसरे (गोवा साखळी) प्रदीप मालुसरे, कल्पना प्रदीप मालुसरे (कासुर्डी), संतोष मालुसरे (लव्हेरी), सुनील मालुसरे (सुधागड),शिवराम मालुसरे (किये), संजय विजय मालुसरे (धुळे), बाळासाहेब मालुसरे(निगडे), मधुकर मालुसरे ((भावे पठार), भगवान मालुसरे, रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, विठ्ठल मालुसरे, सचिन मालुसरे, सुधीर मालुसरे, अविनाश मालुसरे, मारुती मालुसरे, पांडुरंग मारुती मालुसरे,,तेजस मालुसरे, यशवंत मालुसरे, कैलास मालुसरे,आंबेशिवथर),संतोष मालुसरे (फुरुस ), राकेश अ मालुसरे,सूर्याजी द मालुसरे, अनिल मा मालुसरे, सागर संतोष मालुसरे, अजय काशिनाथ मालुसरे (गावडी ),रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे (आंबे शिवथर), आबासाहेब मालुसरे,मंगेश मालुसरे (गोडवली), राजेंद्र मालुसरे, रुपेश मालुसरे,कुर्ले महाड), अनिल मालुसरे (बडोदा), संतोष शा मालुसरे (खोपोली), महीपत मालुसरे, गेणू मालुसरे, सोनल म मालुसरे (पारमाची), अरुण मालुसरे, धोंडिबा मालुसरे, सुनीता अ मालुसरे-सरपंच (हिरडोशी), वालचंद मालुसरे (केळघर), मेघनाथ मालुसरे (पौड), चंद्रकांत मालुसरेआदी प्रमुख मालुसरे वंशजांचा याप्रसंगी मंडळाच्या वतीने सन्मान केला. समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आलातर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...