सोमवार, १५ एप्रिल, २०२४

फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न


युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे - वीरमाता अनुराधा गोरे

फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

मुंबई (रवींद्र मालुसरे) :-  युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा करण्यासाठी विविध सेवा मार्ग  खुले आहेत. त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा, आत्मविश्वासाने पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षण सामोरे जा. स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो. आपल्याला सुरक्षितता हवी असते मात्र देशाच्या सुरक्षिततेचा विचार आपण विशेषतः युवा पिढी करणार आहे की नाही. देशाचे भविष्य घडविणे तुमच्या हाती आहे असे आवाहन शहिद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. शेकडो युवा-युवतींना प्रेरित करताना अनेक प्रासंगिक उदाहरणे ओघवत्या शब्दात देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना दादर येथे मार्गदर्शन केले


महाड येथील फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील मुंबई निवासी युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दादर येथील धुरू हॉल मध्ये केले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन केले.  

 

स्पर्धा  परीक्षा तज्ज्ञ आणि  लक्ष्य अकॅडमीचे सिनियर फॅकल्टी वसीम खान यांनी प्रारंभीचे सत्र गुंफताना म्हणाले की, सरकारी नोकरीत आर्थिक सुरक्षितता आहे, मानसन्मान मिळतो, हाती अधिकार येतात, हाती अधिकार आल्यामुळे देशसेवा करायला मिळते, चांगलं काम करता येते .... एकूणच काय तर आकर्षण ही अशी गोष्ट आहे जी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित करतेइंजिनिअरिंग आणि एमएमबीबीएचे अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आली आहे, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही वाढली आहे. काही विद्यार्थी मात्र याला अपवाद आहेत. ते केवळ आकर्षणापोटी नव्हे तर मनाशी ध्येय बाळगून आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते म्हणून विचाराअंती स्पर्धा परीक्षेकडे आलेले असतात. यूपीएससीमध्ये निवड होणाऱ्यांमध्ये बीई, एमई, एमटेक, डॉक्टर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढते आहे. यंदाही निवड झालेल्यांमध्ये अभियांत्रिकीतील पदवीधरांची संख्या लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी अथक परिश्रम आवश्यक असतात,


लक्ष्य अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. आपली ध्येयनिश्चिती ही वास्तववादी असायला हवी. आपल्या सामर्थ्याची आणि मर्यादांची जाणीव असायला हवी. स्पष्टता असेल तर इकडे वळण्यात अर्थ आहेघर, परिस्थिती, आईवडील, स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण या सर्वांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवास्पर्धा परीक्षा देणे हे करिअर नव्हे. परीक्षा पास झाल्यावर आपल्या करिअरची खरी सुरुवात होत असते. पास झाल्यानंतर पुढे काय आणि नाही झाल्यास पुढे काय या दोन्हींचा विचार करायला हवास्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपली लक्ष्मणरेषा आखायला हवी. म्हणजे मी किती वर्षे हा अभ्यास करणार आहे, हे ठरवायला हवे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो. परीक्षेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात पण एका मर्यादेपेक्षा जास्त काळ आपण इथे राहिलो तर त्याचे नकारात्मक परिणामही होतात. परीक्षेत अपयश आले म्हणून सगळे संपले असे वाटून घेणेही चुकीचे आहे. परीक्षेतील अपयशाचा संबंध आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाशी जोडता येत नसतो. परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. तो आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. परीक्षेत अयशस्वी झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांत नंतर देदिप्यमान यश मिळवले आहे.

बँकिंग परीक्षा तज्ज्ञ ओंकार तपकीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, बहुसंख्य विद्यार्थ्यांना 'आयपीएस' आणि ‘आयएएसच व्हायचे असते. तेच ध्येय त्यांनी बाळगलेले असते. त्यामुळे इतर पोस्ट आणि परीक्षांकडे पाहण्यात त्यांना रस नसतो. 'एमपीएससी' देणारे विद्यार्थीही काही ठराविक पोस्ट लक्ष्य ठेवून परीक्षा देत असतात. असे ध्येय असणे चांगले असले तरी,परीक्षार्थींनी असे एकाच पदावर किंवा परीक्षेवर अडून राहता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या इतरही परीक्षांचा विचार करायला हवा, जेणेकरून त्यातून अनेक संधी खुल्या होतील. म्हणूनच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्या अंतर्गत किती परीक्षा येतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

मंडळाचे माजी सचिव  नितीन पवार यांनी प्रास्ताविक करताना मंडळाचे कार्य, शिबीर आयोजनाचा हेतू  सांगताना फौजी आंबवडे गावाचे ऐत्याहासिक महत्व आपल्या भाषणात सांगितले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, मृत्यु समोर आहे हे माहित असुनही सैन्यातील नोकरीत स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३ लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सुद्धा आमचे पूर्वज होते. पहिल्या महायुद्धात गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाली. याची साक्ष ब्रिटिश सरकारने गावात उभारलेला स्मृतिस्तंभ आजही देत आहे. दुस-या महायुद्धात २५० तरुणांनी भाग घेतला त्यातील ७० जणांना वीरगती प्राप्त झाली. एकाच दिवशी २१ धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्या होत्या. भारत- पाकिस्तान, बांगलादेश युद्धातही गावातील अनेक सुपुत्रांनी मर्दुमकी गाजवली. आज सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. परंतु १९५६ साली स्थापन झालेल्या मंडळाने सरकारी पाठपुरावा करून गावात धरण बांधून घेतले. हायस्कुलसाठी प्रयत्न करून शिक्षणाची सोय केली. सामाजिक सुधारणासह मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रयत्न केला.

संस्थेचे सचिव जयदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले. तर शेकडो विद्यार्थी उपस्थित असलेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ना पवार यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र पवार, शशिकांत पवार, सुशील पवार, विलास ता.पवार, संतोष जाधव, दाजी कदम, विश्वास पवार जयदीप पवार, प्रमोद पवार, सुरेश शिंदे, आत्माराम गायकवाड आदींनी विशेष प्रयत्न केले.

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 









रविवार, २१ जानेवारी, २०२४

प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०८ रामायणांची माहिती करून घ्या





प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०८ रामायणांची माहिती करून घ्या 

हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आपण उगवतीला देव मानतो, मावळतीला हात जोडतो, सूर्याला नैवेद्य दाखवतो, चंद्राला ओवाळतो, दाही दिशांना अर्ध्य देतो, सागराची पूजा करतो, विहिरीला हळदकुंकू वाहतो, धरित्रीची पूजा बांधतो....हे सर्व करण्यामागे ज्या देवानं आकाशात अनंत तारे निर्माण केले,चंद्र-सूर्याचं दर्शन घडवले, अथांग सागर निर्माण केला, नादिनाले वाहावले, सुवासिक फुलं फुलविली, रुचकर फळं पिकवली, ऊन, वारा, पाऊस यांचा वर्षाव केला, जिवाभावाची नाती जोडायला शिकवलं, आणि अन्नासह वस्त्र, निवाऱ्याची सोय केली, देवाचा आपल्यावर, आपल्या कुळाचारावर अनंत काळ वरदहस्त असावा, देवानं आपल्यावर प्रसन्न असावं.

त्या देवाबद्दलचा नम्रभाव प्रकट करण्यासाठी आपण नित्य नियमित पूजा-अर्चाना करण्यासाठी त्याचे देवालय उभारतो, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करतो !

मित्रो, उद्या अयोध्येत आपल्या हिंदू धर्माची अस्मिता म्हणून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची उभारणी आणि प्राणप्रतिष्ठा करीत आहोत. राममंदिर हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही, असे असताना धर्मभावना चेतवण्यासाठी अफूची गोळी देऊन देशव्यापी गुंगी आणण्याचे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत होते आहे, यासाठी करोडो रुपये खर्च करून आगामी निवडणूकीच्या मतांची बेगमी करण्याचे मनसुबे आहेतच. देशभरात ३६०० गावे राम नावावर आहेत, मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर गावागावात - वाडीवस्त्यांमध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात झाडू मारण्यासाठी वा घंटा वाजवण्यासाठी उद्याचे उत्साही भक्त वर्षातून कितीवेळा जातात, व आपल्या चरणांना भक्तिभावाने स्पर्श करण्यासाठी नक्की कितीजण येतात हे प्रभू श्रीरामच जाणतो ! 

सत्ययुगात घडलेल्या रामायणाचा नायक हा जरी श्रीराम असले तरीही रामायणाच्या एकंदरीत कथानकातील माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व म्हणजे हनुमान … हनुमानाची अनेक रूपे आहेत … जसे महाबलवान वीर, विनम्र दास, प्रिय सखा वगैरे. आणि निःसीम भक्ती हे त्याचे सर्वोच्च गुणवैशिष्ट्य आहे असे मला वाटते. रामायणातील नीतीविचार आणि आजचा नीतीविचार आणि आजचा नीतीविचार यात जमीन अस्मानाचा फरक आहे … त्यामुळे मला तरी वाटते की आजच्या काळात श्रीरामापेक्षा हनुमान हा जास्त लागू आहे … जो अत्यंत विनम्र आहे पण भोळा नाही तर चतूर आहे, महासामर्थ्यवान आहे पण अत्यंत भावनिकही आहे, निष्ठावान आहे पण कर्मठ नाही. त्यामुळे रामायणातील हनुमान हा आज खरा आदर्श म्हणून घेतला पाहिजे.

नक्की कोणते रामायण हे खरे रामायण म्हणून वाचावे कारण प्रत्येकाने आपापल्या परीने रामायणाचे संदर्भ आणि कथा नमूद केल्या आहेत?

आजच्या स्थितीत तरी सर्वाधिक लोकप्रिय असलेले रामायण आहे तुलसीदासांचे. आदिकाव्य रामायण फक्त वाल्मिकी चे आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत तमिळ मध्ये, तेलगू मध्ये, कंबोडिया मध्ये, जावा मध्ये, थाय मध्ये… मूळ रामायण वाल्मिकी रचीत रामायण आहे. तुलसी रामायण हे जरी जास्त प्रसिद्ध असले किंवा बाजारात सहज उपलब्ध असले तरीही त्यापूर्वीचे वाल्मिकी रामायण असल्यामुळे अर्थातच तुलसीदासांनी सुद्धा वाल्मिकी रामायण वाचूनच आपले रामायण रचले असणार. आपल्या हिंदुस्थानात आजपर्यंत पुढीलप्रमाणे १०८ रामायणे उपलब्ध आहेत, ज्यांना  ज्यांना श्रीप्रभू आणि सीतामैय्या जशी जशी भावली तशी तशी त्यांनी लिहिली. 



वाल्मिकीरामायण

व्यासोक्तरामायण

वसिष्ठरामायण

शुक्ररामायण 

नाटकरामायण

बिभीषणरामायण

ब्रम्हरामायण 

अगस्तीरामायण 

अध्यात्मरामायण

पद्मरामायण 

भरतरामायण 

धर्मरामायण 

आचार्यरामायण 

मुद्गलरामायण

भावार्थरामायण

कौतुहलरामायण 

नावार्थरामायण

नारदरामायण 

तुळसीकृतरामायण

आगमरामायण

कूर्मरामायण

स्कंदरामायण

पौलस्त्यरामायण 

कलिकरामायण 

अरुणरामायण 

श्रीरमणीयरामायण

सन्नामगर्भरामायण 

उमारामायण 

गंगारामायण  

प्रयागरामायण 

मात्रारामायण 

तीर्थरामायण 

ऋषीरामायण

राजरामायण 

सप्तमंत्ररामायण

दिव्यरामायण 

सुखरामायण  

शिवरामायण

विबुधप्रियरामायण

श्रीमन्मथमयूररामायण

पंचचामररामायण

पुष्पीताग्रारामायण

श्रीप्रियरामायण

ओवीरामायण

पूतरामायण

सत्वरामायण

काशीरामायण

जलोद्वतगतीरामायण

राममंत्ररामायण

श्री हररमणीयरामायण

श्रीमत्सुरामायण

श्रीरामायणरामायण

सद्भक्तसर्वस्वरामायण

प्रहर्षणरामायण

श्रीगुरुरामायण

सवायारामायण

स्तोत्रारामायणे दहा

पुत्ररामायण

तन्वीरामायण

आद्यार्यारामायण

दंडकरामायण

सतरामायण

बालमंत्ररामायण

नानाछंदरामायण

साररामायण

एकश्लोकीरामायण

डोहासोरटारामायण

सद्रत्ररामायण

पृथ्वीछंदरामायण

स्रग्विणिरामायण

सद्वित्तरामायण

पियुषरामायण

भावरामायण

सच्छराव्यरामायण

सौम्यरामायण

सीतारामायण

हनुमंतरामायण

पंचशतीरामायण

मंत्ररामायण

परंतुरामायण

लघुरामायण

विद्युन्मालारामायण

मंत्रगर्भसाकीरामायण

धनाक्षरीरामायण

वरदरामायण

सद्वर्भदरामायण

दामरामायण

निरोष्ठरामायण

अनुष्टपरामायण

त्रिसप्तमंत्ररामायण

कन्यारत्नरामायण

श्रवणामृतरामायण

कथासुधारामायण

गदघ्नरामायण

अभंगरामायण

नामांकरामायण

मत्तमयूररामायण

सतकीर्तीरामायण



- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४ 

घरकुल सोसायटी, प्रभादेवी 


गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान'स्पर्धा




 मराठी भाषा दिवसानिमित्त स्पर्धा

'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान' लेख स्पर्धा

या विषयावर खुली लेख स्पर्धा


मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य ' माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान ' या विषयावर १२०० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते.  बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे,  पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख  chalval1949@gmail.com यावर पाठवावेत तसेच स्पर्धेचीअधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा संयोजक राजन देसाई ८७७९९८३३९० यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.

खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी 

अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते 

कशीही असो ती 'मराठी' च म्हणून 

मराठी माणसाला आवडते 

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर

मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर 

इंग्रजी भाषा ही खरं तर जगाच्या व्यवहाराची भाषा आणि जीवनात स्थैर्य येण्यासाठी ती उत्तमपणे सर्वाना यायला हवी. मात्र आपण मराठी माणसांनी गेल्या काही दशकात याचा गैर अर्थ काढला आणि आपल्या दोन पिढ्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी घातल्या त्यामुळे त्यांची मराठी भाषेची तोंडओळखसुद्धा पुसली गेली आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्याचे घरीच शिक्षक होऊन त्यांना मराठीचे धडे द्यायला हवेत. मराठी भाषेला भवितव्य नाही अशी ओरड सर्व व्यासपीठावरून अलीकडे होत असते मात्र संत ज्ञानोबा-तुकोबांपासून सर्व साधुसंत, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिकांनी समृद्ध केलेल्या शेकडो वर्षाच्या मराठी भाषेची गळचेपी होणार नाही, ती मरणारही नाही मात्र दिवसेंदिवस खंगत जाईल. मराठी भाषेच्या भविष्याचा असा चिंता व्यक्त करणारा विचार सहायक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी व्यक्त केला. 

प्रभादेवी येथील आगरी समाज सेवा संघाच्या हॉलमध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते आपले विचार मांडत होते. याप्रसंगी चतुरंग सन्मान पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, मनसे उपाध्यक्ष आणि दादर-माहीम विधानसभाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  भागडीकर साहेब पुढे असेही म्हणाले की, मराठी माणसांनी डोळसपणे अनुभव घेतला तर त्यांच्याच लक्षात येईल की, मराठी साहित्य आणि संस्कृती जपण्याची आता वेळ आली आहे. मराठी माणसाचे मन जेव्हा अशांत होते तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड अशा गडकोटांवर जायला हवे म्हणजे आपण किती दगड आहोत हे लक्षात येते. 


याप्रसंगी यशवंत किल्लेदार यांनी  विचार मांडले, ते म्हणाले की मराठी भाषा, संस्कृती याचबरोबर मुंबईतील मराठी माणसांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे प्रयत्न करीत असतात, त्यांची भाषा अनेकांना पटत नाही मात्र कालांतराने त्यांचा विचार बरोबर होता हे लक्षात येते. मी मराठीमध्ये शिकलो त्यामुळे लहानपणापासूनच बहुश्रुत होत गेलो. आयुष्याच्या या टप्प्यावर मला जाणवतेय ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांचे सरकारी आशीर्वादाने परप्रांतीयकरण झपाट्याने होते आहे, त्यामुळे मराठी माणसांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी यापुढे संघर्ष करावाच लागणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मी अनेक उपक्रम करीत असतो, यापुढे मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सोबत असेल.

शिवराजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब यांचे याप्रसंगी ' शिवपूर्वकाल ते शिवराजाभिषेक' या विषयावर व्याख्यान झाले. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र जुलमी राजवटीच्या अंधारात होता. स्वजात - स्वधर्माचा विसर पडून क्षत्रिय आपापसात लढत होते, अशावेळी आई जिजाऊंनी आपल्या पुत्रामध्ये स्वराज्य स्थापण्याचा विचार रुजविला. शिवरायांनी महाराष्ट्रातील अठरा पगड जातीजमातींना एकत्र आणून मावळ्यांमध्ये स्वतःचे राज्य निर्माण करण्याची जिद्द निर्माण केली. त्याचीच परिणीती पुढे रयतेचे राज्य निर्माण होण्यात झाले. त्यासाठी अनेक शूरवीरांनी पराक्रम केला, धारातीर्थी पडले काही गडाच्या पायरीचे दगड झाले. त्यावेळी इतर धर्मियांचे पातशहा, बादशहा यांच्या राजवटी हिंदुस्थानात होत्या, अशावेळी स्वाभिमान जागवत शिवाजी महाराजांनी राज्यरोहन करीत स्वतःला अभिषेक करून घेतला. स्वतःचे सोन्याचे व चांदीचे नाणे व स्वतःचा शिक्का तयार करून घेतले.  संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या उपक्रमांचा आणि चळवळीच्या ७५ वर्षाचा आढावा घेतला आणि संस्थेच्या उन्नतीसाठी भविष्यात सरकार आणि हितचिंतकांनी संस्थेच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले.   

कार्यक्रमास स्थानिक नागरिक, मराठी भाषाप्रेमी आणि दिवाळी अंकांचे अनेक संपादक-प्रकाशक उपस्थित होते. संघाचे कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, सुनील कुवरे, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, कृष्णा काजरोळकर, अबास आतार, ऍडव्होकेट प्रीती बने, रामचंद्र जयस्वाल, राजन देसाई, चंद्रकांत (चंदन) तावडे  यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर म्हात्रे यांनी केले. 




रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण





बैल दिवाळी

इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदाया दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदीपावली(बैलदिवाळी ). हा दिवस कोकणातदेव दीपावलीकिंवादेवदिवाळीया नावानं साजरा होतो. पोलादपूर तालुक्यात 'बैल दिवाळी' म्हणून साजरा होतो.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या देवदीपावलीचा  उत्साह आबालवृद्धांच्या अंगी संचारलेला असतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती -

दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच ! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. या दिवसालानवान्न पौर्णिमाअसेही म्हणतातकारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी धाकटी दिवाळी आणि थोरली दिवाळी सणाची योजना झालेली दिसते. प्रसिद्ध गोवंश अभ्यासक पशुतज्ज्ञ मिलिंदजी देवल यांनी या सणामागची कारणमीमांसा फार चिकित्सकपणानं उलगडून दाखवलीय.







ओला-चारा बैल माजले- लेझीम चाले जोरात

शेतकरी मन प्रसन्न झाले- ढामटीकी ढूमढूम।।

एका सुप्रसिद्ध मराठी कवीच्या या ओळी सत्यातच उतरलेल्या असतात. भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशाकड़े नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडताच पिके तरारून उठतात. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. तुकड्या-तुकडय़ांत विभागलेली अडचणीच्या जागेत, डोंगरात, कडय़ाकपारीत असलेली शेती कसायला, शेतक-याला बैल हा जीवाभावाचा सखासोबती वाटतो. शेतकरी आपल्या बैलजोडीची कसोशीनं निगा राखतो. रानवनातला हिरवागार चारा (गवत) आणि पेंड घालून  बैलाला तजेलदार बनवलेला असतो.  थंडी पडायला सुरुवात झालेली असते. कोकणातली थंडी म्हणजे हाडं गोठवणारी. ओला चारा कसदार झालेला असतो. कोवळी उन्हं आल्हाददायक वाटू लागतात. अशा वेळी कोकणातील शेतकरी जवळजवळ शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो. टपोर्या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे. उन्हाळी भाजीपाला, नाचणीची कापणी संपलेली असते, अशा वेळी पशुधनाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडला गेला असावा, असं मिलिंद देवल यांनी सांगितलं. मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवदीपावली हे संस्कृती परंपरेतील सण आपण डोळसपणानं स्वीकारायला हवेत.






धाकट्या दिवाळीची म्हणजे शहरात फटाक्यांची आतषबाजी करंज्या-लाडू-फरसाण, आणि  दारात कंदील ही दिवाळीची सुरूवात होते ती अश्विन वद्य द्वादशीला म्हणजे गोवत्सद्वादशीला.  या सणातही  पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. थोरली दिवाळी मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या नव्या दिवसाला साजरी होते. या दिवसाच्या तयारीसाठी आधीपासूनच धामधूम सुरू होते. कोकणातील देवदिवाळी म्हणजे जणू बैलपोळाच !
अरडं मरड बैल खरडं
देव दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या,लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा ...
दे माय खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी...!

हे गीत आठवलं की जाणीव होते देव दिवाळीची, पोलादपूर तालुक्यात गावागावात ही दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी होत असते.  या ऐतिहासिक दिवाळीच्या वर्णनाच्या काही नोंदी तत्कालीन पेशवाई दप्तरातील कागदपत्रांमध्ये आढळतात.  या दिवाळीपूर्वी दोन महिने आधी काही शेतकरी आपल्या बैलांना रानातला हिरवागार चारा आणि पेंड घालून धुष्टपुष्ट करतात. शरीराने मस्तवाल झालेला  बैल पाहूनच आणि तो मारकुटा असला तर  उरात धडकी भरली पाहिजे अशी त्यांनी त्याची तयारी केलेली असते. बैल दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यापासून आपल्या बैलावर  प्रेम करणारा शेतकरी किंवा गावात असलेली शाळकरी मुलं बैलांच्या शिंगांना रंगबेरंगी गोंडा लावण्यासाठी रानातून खवशीचे झाड तोडून आणतात. त्याच्यावर दिवसरात्र बरीच मेहनत केल्यानंतर त्यापासून गोंडा बनवतात. गोंडा तयार झाल्यानंतर त्याची विणलेली वीण आणि त्याला लावलेला रंगबेरंगी रंग फारच आकर्षक दिसतो

त्यानंतर आदल्या दिवसापासूनच बैलाच्या शिंगाना तो गोंडा बांधण्यासाठी आणि तो सहज कुणी उपटू नये यासाठी मेहनत घेतात. बैलाच्या शिंगाना गुळ आणि चुना लावून तो अधिक घट्ट चिटकेल तो गोंडा सहजासहजी कुणालाही उपटता येणार नाही असा प्रयत्न यामागे असतो.  आपल्या सजवलेल्या बैलाकडे त्या दिवशी तर घरधनीण (गृहलक्ष्मी) आणि बैलाचा मालक ( बळीराजा ) मायेने निरखून पाहत असतात. शेतकऱ्याचे हृदय अभिमानाने फुलून जात असते  कारण तो मनोमन कबूल करीत असतो की त्याची मेहनत आणि घाम त्याच्या विश्वासू बैलाच्या घामाशी अखंडपणे गुंफलेले आहे, जो पेरणी, पालनपोषण आणि कापणी या शाश्वत नृत्यात आपला भागीदार झालेला असतो म्हणून घरात असलेली धान्याची कणगी भरलेली असते.

त्या दिवशी शक्यतो घराघरात वडे-मटणाचा झणझणित बेत ठरलेला असतो. सोयरे धायरे पाहुणचारासाठी आलेले असतात. हे सजवलेले बैल ज्या पूर्वपरंपरागत खाचरात दिवाळी साजरी होते त्या ठिकाणी आणून बांधून ठेवले जातात.  गावातील आबालवृद्ध आणि आजूबाजूच्या गावातील पैपाहुणे, सगे-सोयरे त्या खाचराच्या बांधांवर हातात काठी घेऊन उभे असतात. सोडल्यानंतर मस्तवाल बैल गर्दीच्या दिशेने जर अंगावर आला तर त्याला हुसकावण्याचा प्रयत्न होतो.  गावऱ्हाटीच्या परंपरेनुसार त्यानंतर दिवाळीला सुरुवात होते. मानकऱ्यांच्या प्रथेनुसार एका अंगणात गावातील मुख्य एकत्र येतात. त्याठिकाणी फुले-रांगोळीचा कना काढून त्यावर बैलांना बांधण्यासाठीचा मजबूत जाडीचा एक दोरखंड (सोल) ठेवलेला असतो. ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून त्याची पूजा केली जाते 







त्यानंतर परंपरेचा मानाचा बैल त्याठिकाणी आणून त्याला सोल लावून वाजंत्र्यांसोबत तो गावदेवी आणि हर हर महादेवाचा गजर करीत दिवाळीच्या खाचरात घेऊन जातात. सोलाच्या मध्यभागी बैल बांधलेला असतो तर दोन्ही बाजूने १५-२० तरबेज गडी ती सोल पकडून असतात. त्या खाचरात एका ठिकाणी मांगोळी उभारलेली असते. तो बैल त्या ठिकाणी आणल्यास त्याला बकऱ्याचे कातडे लावलेल्या लांब काठीने हुसकावले जाते, त्यामुळे तो बैल वाजंत्र्याच्या तालावर नाचायला लागतो. बैल जर मारकुटा आणि रागीट असला तर तो ढुशी मारून सोलकऱ्यांना लोळवतो किंवा खाचरात असणाऱ्यांना शिंगाने मारायला धावतो. बैल त्या मंगोलीच्या खालून जायला पाहिजे असा दंडक आहे. थोडावेळ असे केल्यानंतर त्या बैलाला बांधलेला गोंडा उपटण्यासाठी दिवाळीसाठी आलेल्या सोयऱ्यांना बोलावले जाते अनेकदा काही हौशी व्यक्ती स्वतःच बेधडकपणे पुढे जातात, आणि बैलाशी झुंजण्याचा व गोंडा उपटण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा एखादा उत्साही गडी बैलाच्या ताकदीचा अंदाज न आल्याने जखमी होतो.  यानंतर जेव्हढे बैल दिवाळीसाठी आणलेले असतात ते एकामागोमाग एक खाचरात आणले जातात आणि वाजंत्र्याच्या तालावर नाचवले जातात. काही गावात दुपारनंतर  रेड्यांच्या झोंब्या होत असत. मात्र आता ही परंपरा थांबली आहे. 

पोळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेळ्या पद्धतीने विशेषतः पोलादपूर तालुक्यात सावित्री-कामथी-ढवळी खोऱ्यात हा एक महत्त्वपूर्ण कृषी उत्सव  असतो.  नांगर आपल्या हातात असतो, पण पुढे जमीन नांगरण्याची ताकद आणि चैतन्य बैलाच्या हृदयातून येते. ज्यांच्या घामाने मातीचे पोषण होते. आशेचे बीज पेरले जाते आणि श्रमाने शेतातले सोने हातात येते. जेव्हा बैल पुढे जातो म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग नांगरतो म्हणूनच समृद्धी येते अशी बळीराजाच्या मनाची धारणा आहे.  या सणाद्वारे ग्राम्य संस्कृती गावकऱ्यांची एकता व केवळ उपजीविकाच नाही तर ग्रामीण भारताची भावना देखील टिकवून ठेवण्यास मदत होते. अलीकडच्या काळात वाडीवस्त्यांवरील तरुणाईने उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. गावच्या गावे आणि वाड्यावस्त्या ओस पडत चालल्या असताना ही देवदिवाळी साजरी करण्यासाठी हौसेने आपल्या गावी जाणारी तरुणाई आजही मोठ्या प्रमाणात आहे. शिकल्या सावरल्या आजकालच्या पिढीला शारीरिक ताकद दाखविण्यासाठी उद्युक्त करणारा हा सण म्हणजे कदाचित वेडेपणा वाटेल परंतु आपले वाडवडील म्हणजे बळीराजा यांनी ही कृषी संस्कृती जोपासण्या सोबतच पूर्वापार पशुधनही जोपासत आला आहे. मित्रानो पोलादपूर तालुक्यातील हा एक सण आहे जो परंपरेच्या पिढ्यानपिढ्या ओलांडतो आहे. एक परंपरा अशी आहे जी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे कृतज्ञता आणि आदराच्या मायेमध्ये विणली जाते. शेतकर्‍यांची लवचिकता, बैलांची ताकद आणि समाज आणि संस्कृती टिकवून ठेवणार्‍या कृषी जीवनशैलीचे सौंदर्य साजरे करण्याच्या या बैल दिवाळीच्या दिवशी स्थानिक परंपरेनुसार तुम्ही मनापासून जर यात सामील झालात तर तुम्हाला मनापासून आनंद, उत्साह देण्यासाठी ही दिवाळी येते व संध्याकाळी होते तेव्हा मात्र ती मनाला हुरहुर लावून.





- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०२ 

संदर्भ सहकार्य : ह.भ.प. रामदादा ह मालुसरे (साखर)


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...