मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

उठ मराठ्या उठ (कोकणातल्या)

उठ मराठ्या उठ (कोकणातल्या)

गुलामांना आणि लाचारांना जात नसते असे म्हणतात, कोकणातल्या काही मराठयांचा व्यवसाय हा 'राजकारण' असल्याने शेताच्या बांधावर न जाता नेत्यांची हुजरेगिरी करीत त्यांचे वर्षाचे बाराही महिने सुगीचे दिवस म्हणूनच उपभोगत असतात, त्यांना ना आरक्षणाची गरज ना कुणबी प्रमाणपत्राची गरज ! त्यांच्या चेल्याचपाटयाना कोण सांगणार 'जात नसते ती जात' ! तुम्ही ९६ - ९२ कुळी म्हणूनच जगणार आणि मरणार आहात ! पण मयताला डोक्याचे मुंडण करणारा तुमचा सख्खा बांधव गरीबीने-उपासमारीने मरतोय हे दिसत नाही का ? तो आजपर्यंत तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर आशेने जगत होता, परंतु तो आता स्वतः च्या हक्काच्या भाकरीसाठी जागा झालाय ! ते पदरात पाडून घेईलच, परंतु यापुढे तुमची "जागा" तुम्हाला दाखवून देईल. चार महिने शेती आणि आठ महिने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शस्त्र घेऊन मोहिमेवर जाणाऱ्या असंख्य मावळ्यांचे आम्ही कोकणातील वारसदार ! तुम्ही नक्की कोण ते पांघरलेली राजकीय झुल झुगारून क्षणभर एकदा काय ते ठरवा ! नाही ठरवलेत तर मराठा आता 'मतदार' म्हणूनही जागा झालाय ! ज्याला ना गाव ना शेतीवाडी आणि पत्र्याच्या घरात पण स्वाभिमानाने राहतो आहे, असा फाटका माणूस मनोज जरांगे पाटील...सर्वच मराठयांचा नेता झाला आहे, मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.ज्याने आपले प्राण पणाला लावून झोपलेल्या मराठा समाजाला जागृत केले.घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी मरायला तयार झाले.

आज उपोषणाचा सहावा दिवस. अन्न, पाणी, औषध असं सर्व वर्ज्य करून हा ढाण्या वाघ गेल्या सहा दिवसांपासून प्राणांतिक उपोषणाला बसलेला आहे.चौथ्या दिवशीच प्रकृती चिंताजनक झाली होती.हात थरथरत होते. अंगात त्राण शिल्लक नाही. आवाज स्पष्टपणे येत नाही.तरिही पठ्ठ्या मागे हटायला तयार नाही. अनेकांनी विनवण्या केल्या पाटील पाणी घ्या.पाणी हे आपल्यासाठी आवश्यक आहे.तरिही ते मानायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या डोळ्यात काळजी आहे. अश्रुचे मळभ दाटले आहे वाट करून दिली.भावनांचे बांध फुटले.सर्वांनी आर्त स्वरात विनवणी केली पाटील पाणी घ्या.आपला जीव तितकाच महत्त्वाचा आहे.आरक्षण तर आपण मिळवूच.मात्र आपल्या शिवाय त्या आरक्षणाला काहीही अर्थ नाही.लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.असे आवाहन एका सुरात लाखों बांधवांनी केले आहे. समाजाच्या शब्दाचा मान राखत त्यांनी घोटभर पाणी घेतलं.मात्र अन्नाचा कण ही घेतला नाही.औषधाला स्पर्शही केला नाही.आणि स्पष्टपणे समाजाला ठणकावले की,असा चुकीचा आग्रह यापुढे करायचा नाही.माझ्या जिवापेक्षा समाजाचे आरक्षण महत्वाचे आहे.आणि पुन्हा पाण्याचा एक थेंबही न घेण्याचा वज्र निर्धार केला.राज्यात समाजाच्या मनात सरकार आणि प्रमुख राजकीय पक्षांविषयी एक तिडीक निर्माण झालेली आहे. मराठा आणि ओबीसी समूह यांच्यात विनाकारण द्वेषाचे वातावरण राज्य सरकारचे हस्तक व काही राजकीय पक्षांचे नेते करीत आहेत.कावळ्याच्या श्रापाने ढोरं मरत नसतं.तुम्ही कितीही पटकून घ्या.मराठा समाजासोबत ग्राउंड लेवलवर सर्व समाज भक्कमपणे उभे  आहेत.सरकारने अंत न पाहता आरक्षण द्यावे.यापुढची शांततेतील आंदोलने ही परवडणारी नसतील.सरकारने अहंकार टाळावा.कोणीही आत्महत्या करू नयेत.गावागावात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आरक्षण फक्त शिक्षणासाठी हवं आहे याचा अनुभव अनेक मराठा पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे, राज्यातील मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावे. आमची लेकरं मग हिमतीने पुढे जातील अन तुमची लेकरं आमच्यावर राज्य करण्यासाठी 'काळे इंग्रज' म्हणून तुमची घराणेशाही व तुमचे वारसदार या नात्याने तुमच्या राजकीय गादीवर आणि चौकाचौकात बॅनर्सवर असतील. 

कदाचित ऊद्या गड फत्ते झालेला असेल..

पण हा गड पहायला जर आमचा सिंहच राहीला नाही तर??

मराठ्यांनो गड आला पण सिंह गेला ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना?

४०० वर्षांनतर सिंहगडाच्या डोळ्यात आज पुन्हा अश्रू का दाटलेत?

पाटील आम्हाला भीती वाटतेय,आपण पाणी घ्यावे

- रवींद्र मालुसरे 

 

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता - प्रा डॉ अशोक चौसाळकर


 

कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता 

- प्रा डॉ अशोक चौसाळकर

भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घेतला, भारतीय कामगार चळवळीचा जन्म, बाल्यावस्था व निरनिराळ्या स्थित्यंतरातून जात असताना आलेले अडथळे आणि झालेला विकास याचे ते साक्षीदार होते. लाखो कामगारांची संख्या असलेल्या आयटक या भारतातील मोठ्या संघटनेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचे एक नामवंत पुढारी होते.  त्यामुळे त्यांचे जगभरच्या सुप्रसिद्ध नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. आंतरराष्ट्रीय राजकारण व कामगार चळवळ यात डांगें यांच्याइतकी मान्यता इतर कोणत्याही कम्युनिस्ट नेत्यास प्राप्त झाली नाही असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकार यांनी मांडले.

मुंबईतील माजी नगरसेवक कॉम्रेड जयवंत पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉम्रेड डांगे यांच्या १२४ वा जयंती कार्यक्रम प्रभादेवी येथील 'भुपेश गुप्ता भवनात आयोजित केला होता,चौसाळकर हे  "कॉम्रेड डांगे आणि कम्युनिस्ट चळवळ" या विषयावर आपले विचार मांडत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकवाड्मय गृहाचे कॉ राजन बावडेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव कॉ मिलिंद रानडे, कॉम्रेड प्रा क्रांती जेजुरकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इस्त्राएल आणि हमास यांनी एकमेकांवर हल्ले करून युद्ध सुरु केल्यामूळे निरपराध नागरिकांची हत्या होत आहे या नरसंहाराचा निषेध करून ठराव करण्यात आला. हा ठराव कॉ  मिलिंद रानडे यांनी मांडला त्यावेळी त्यांनी आवाहन केले की, फॅसिझमच्या विरोधात लढताना पक्षाची ताकद कमी असेल किंबहुना त्यांचा पराभव करण्यासाठी आमच्याकडे साधने कमी असतील परंतु कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या न पटणाऱ्या धोरणाविरोधात आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवला पाहिजे.











चौसाळकर यांनी डांगे यांच्या बालपणापासून १०२० ते  १९८० या कालखंडातील आयुष्याचे चार भागात विभागणी करून विषयाची मांडणी करताना पुढे म्हणाले की, कॉ. डांगे हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे व संस्कृतीचे खोल असे अभ्यासक होते. महाराष्ट्राच्या राष्ट्रकाची जडणघडण कशी झाली हे पाहण्यात त्यांना आस्था होती. मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे, असे त्यांचे मत होते. भारतीय संघराज्य हे स्वतंत्र, स्वायत्त घटकराज्यांचा संघ असावा अशीच त्यांची या बाबतची भूमिका होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेस त्यांचा पाठिंबा होता. डांगे हे जनतेचे पुढारी होते. डांगे यांचे संपूर्ण जीवन अभ्यासले तर ते समाजातील पीडित, शोषित व दारिद्राने गांजलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी वाहिलेले होते हे लक्षात येते. ते अत्यंत  उत्तम वक्ते आणि नेहमी चळवळीत व्यस्त असत. स्वातंत्र्यत्तोर भारतातील अनेक चळवळीत ते अग्रभागी होते. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेक सभा त्यांनी  जिंकल्या होत्या. कॉम्रेड डांगे यांनी रशियाच्या सर्वोच्च नेत्यांशी गाठीभेटी होत असत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीची भूमिका सातत्याने वेगवेगळ्या परिषदांत मांडली, म्हणून त्यांना वयाच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रशियन सरकारने लेनिन पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला होता.  गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी हिरीरीने लढविली. डांगे हे इतिहास, साहित्य व संस्कृती यांचे श्रेष्ठ भाष्यकार होते. खऱ्या अर्थाने कॉ डांगे हे एकोणिसाव्या व विसाव्या शतकात सुरु झालेल्या प्रबोधन पर्वाचे अपत्य होते व त्या व्यापक चळवळीचे ते शेवटचे प्रतिनिधी होते.

कॉम्रेड प्रा क्रांती जेजुरकर या आपल्या भाषणात म्हणाल्या की, कॉ डांगे यांचे वक्तृत्व असाधारण होते. मैदानी सभा गाजवणारे डांगे कमालीचे मिश्किल होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर चर्चा करताना साहित्य, संस्कृती, कला व इतिहास यांचा त्यांनी सखोल असा अभ्यास केला होता हे माझ्या लक्षात आले होते.








तर रवींद्र मालुसरे आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्यांचे २ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत निधन झाल्यानंतर त्यांना अग्नी दिला त्या ठिकाणी एक तरुण पहाटे जातो, त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असंख्य वेदना असतात. दुःखी अंतःकरणाने तो तरुण त्याठिकाणची चिमूटभर राख सोबत आणलेल्या डबीत घरी घेऊन जातो आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत देवघरात ठेवतो. तो तरुण म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होत, तरुण डांगे हे  लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. चारित्र्य, स्वार्थत्याग, झुंजारपणा व आलेल्या संधीची आपल्या अंगीकृत कार्यार्थ राबवून घेण्याची मुत्सद्देगिरी याबाबत डांगे फक्त टिळकांशी बरोबरी करतात. माडखोलकरांनी व्यक्त केलेल्या मताशी सर्वजण सहमत आहेत. कॉम्रेड डांगे यांनी गिरणगावात कामगारांचा लढा लढवताना संघर्ष केला, सर्वत्र लाल झेंडे लावले, गिरण्यांचे गेट अडवले मात्र कम्युनिस्ट चळवळ थंडावल्यानंतर गिरण्यांचे भोंगे जाऊन मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत. डांगे सारखे संघर्ष करणारे नेते आणि कॉ जयवंत पाटलांसारखे तळागाळात जाऊन निष्ठेने आणि निर्भयपणे काम करणारे कार्यकर्ते सुद्धा आज दुर्मिळ झाले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ मधुकर कदम यांनी केले. कॉ अनंत मोरे, कॉ बाबा सावंत,कॉ चित्तरंजन कांबळे,कॉ विश्वनाथ घवाळी, कॉ विजय मोरे, कॉ बबन वगाडे, कॉ प्रकाश बागवे, कॉ मंगला सावंत, कॉ नंदा जाधव, कॉ लक्ष्मण चिंतल, कॉ मामिडाल या जन्मशताब्दी समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला ज्येष्ठ कॉ प्रकाश रेड्डी, ऍड विजय दळवी, कॉ सुबोध मोरे उपस्थित होते. 







रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव

गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव  










रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा

पोलादपूरच्या पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारीअंगणवाडी सेविकामदतनीस सेविका यांना पुरस्कार प्रदान

मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच अलिबाग येथील होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात बिट स्तरावर १०० टक्के मोबाईल  व्हेरिफिकेशन पर्यवेक्षिका पुरस्कार -  पोलादपूर तालुक्यातील गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर), सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर)पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेला प्रकल्प - बाल विकास प्रकल्प अधिकारी माधुरी  फड पोलादपूर, आदर्श अंगणवाडी सेविका - विमल जगदाळे (कापडे बुद्रुक), आदर्श अंगणवाडी मदतनीस सेविका - शुभांगी कासार (चरई) यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  














गेल्या चार वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह अभियानात रायगड जिल्ह्याने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, जिल्हा नेहमीच राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला आहे, असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी अलिबागमध्ये आयोजित कार्यक्रमात काढले. रायगड जिल्ह्यात पोषण माह अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याचे श्रेय प्रशासनासोबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आहे. यापुढील कालावधीत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील, असे काम करू असा विश्वास व्यक्त केला. तसेच आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबीर, नवरात्रीनिमित्त नऊरंग पोषणाचे या उपक्रमांची माहिती देत, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबीज भेट दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली.

 तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड आपल्या भाषणात  म्हणाले की, राज्याच्या विकासात महिला व बालकांचा मोठा वाटा आहे. सरकारच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व पोषण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सुदृढ बालके जन्माला येण्यासाठी गरोदर महिलांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. तसेच बालकांच्या जन्मानंतर स्तनदा मातांना आहार देण्यात येतो. जिल्ह्यात 3 वर्षांपर्यंतच्या सुमारे ४२  हजार बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण आहार पुरविण्याकडे लक्ष देत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, तसेच उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोषणविषयक विविध पदार्थ, पालेभाज्यांच्या स्टॉलचे प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंगणवाडी उपायुक्त विजय क्षीरसागर, पोषण माह उपायुक्त आनंद खंडागळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद मुख्य वित्त लेखा अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

यापूर्वी ९ सप्टेंबर २०१९ रोजी  रायगड जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने महाड तालुक्यातील नागाव बिटमधील प्राविण्य मिळविल्याबद्दल  गीता निवृत्ती उतेकर यांना आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अलिबाग येथील पी एन पी सभागृहात झालेल्या  या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य शेकाप नेते आमदार जयंत पाटील आणि लोकसभा सदस्य खासदार सुनील तटकरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा आदिती तटकरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आस्वाद पाटील, आमदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. 

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

माजी सभापती सि दौ सकपाळ : शतकाच्या इतिहासाचे साक्षीदार

 

माजी सभापती सि दौ सकपाळ : 

शतकाच्या इतिहासाचे साक्षीदार

मुंबई : (रवींद्र मालुसरे) 

शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या पानापानावर पोलादपूर तालुक्यातील शूरवीरांचा आणि भौगोलिक पाऊलखुणांचा ठसा उमटला आहे, तीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याच्या सत्तेचे केंद्र असलेला आणि स्वाभिमान जपणारा हा तालुका परंतु रायगड किल्ल्यावर ब्रिटिश राजवटीचा युनियन जॅक फडकल्यानंतर मागच्या पन्नास वर्षांपर्यंत हा तालुका म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा अविकसित भाग अशीच ओळख शासकीय दप्तरात नोंद झाली होती. परंतु रोजगार हमी योजना लागू झाल्यानंतर हळूहळू रस्ते, साकव, दळणवळण यांची वाढ झाली, हल्ली विकासाच्या नावाखाली करोडो रुपये तालुक्यात येत आहेत मात्र गाव आणि वाड्यावस्त्या ओस पडू लागल्या आहेत अशी खंत सि. दौ. सकपाळ यांनी त्यांच्या ९४ व्या वाढदिवशी व्यक्त केली.

पोलादपूर तालुक्याच्या गेल्या शंभर वर्षातील घडामोडींचा साक्षीदार असलेल्या सि. दौ. सकपाळ यांचा ९४ वा वाढदिवस अतिशय उत्साहात नुकताच त्यांच्या जन्मगावी साजरा करण्यात आला.
सि. दौ. हे रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सभापती, श्रीगुरु आजरेकर फड पंढरपूरचे विश्वस्त, १९६७-७२ या कालावधीत पोलादपूर तालुका पंचायत समितीचे सभापती होते.
प्रतिक्रिया देतांना सकपाळ पुढे असेही म्हणाले की, वारकऱ्यांचा तालुका म्हणून सर्वपरिचित असलेल्या या तालुक्यात राजकीय आणि शैक्षणिक पीछेहाट होती, अशावेळी आज हयात नसलेले बंधुजीराव पालांडे, बाळाराम मोरे, वि सु मालुसरे, कोंडीराम मास्तर उतेकर, कमलाकर दादा चित्रे, श्रीपतीबाबा मोरे, बाबाजी महाडिक आणि मी तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी कार्य करू लागलो. आम्ही सर्वजण अल्प शिक्षित होतो तरी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कार्यरत होतो, राजकारणाची व समाजकार्याची आवड होती, लोकांचे पाठबळही होते त्यामुळे पोलादपूर, कापडे, देवळे, साखर, उमरठ, मोरसडे याठिकाणी शाळा - हायस्कूल उभी करु शकलो. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. हल्लीच्या पिढीने विकासाबरोबर तालुक्याला लाभलेल्या परंपरेचा वारसासुद्धा जपावा.
याप्रसंगी त्यांची पत्नी, कन्या कांताताई जगदाळे, सुना, नातसुना यांनी औक्षण केले. रायगड शिक्षण प्र. मंडळाचे विश्वस्त शैलेश सलागरे, मुख्याध्यापक येरूणकर, कापडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण साने, बाजीराव मालुसरे, अमर सलागरे, सतीश गोळे, राजाराम शेलार, प्रमोद काटे यांनी याप्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा देणारी भाषणे करून शुभेच्छा दिल्या. सकपाळ सर यांनी सूत्रसंचालन तर रामदास सकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. गणपती निमित्ताने आलेले पंचक्रोशीतील शेकडो चाकरमानी आणि ग्रामस्थ या वाढदिवसाला उपस्थित होते. विकास पवार, राजेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

सत्यशोधक समाज 150


सत्यशोधक समाज :  शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

१८१८ साली पेशवाई अस्तास गेली आणि हिंदुस्थानात ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरु झाला. हा काळ म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने अवनतीचा काळ  म्हटला पाहिजे, ब्राम्हण कर्मकांडात बुडाले होते, समाजामध्ये कनिष्ठ जातीच्या लोकांना सामाजिक आणि बौद्धिक जीवनात कोणतीच प्रतिष्ठा नव्हती. वर्ण जातिस्त्रीदास्य व धर्मास प्राप्त झालेले विकृत स्वरूप यामुळे तत्कालीन समाजाची स्थिती दयनीय झाली होती, शोषक आणि शोषित अशा दोन वर्गामध्ये समाजाचे विभाजन झाले होते. १८६० साली भारतीय दंड संहिता अस्तित्वात आल्यानंतर दळणवळणाच्या आधुनिक साधनामुळे लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला.  विचारांची देवाणघेवाण व बदलत्या जगाचा परिचय यामुळे संकुचितपणाची जागा उदारमतवादाने घेतली.  आधुनिक शिक्षण पद्धतीने हिंदू - मुस्लिम पारंपरिक, धार्मिक, शिक्षणसंस्था मागे पडल्या इतिहास, गणित, भूगोल, सृष्टीविज्ञान अशा आधुनिक विद्याशाखांनी धार्मिक विद्यांचे स्थान घेतले. शब्दप्रामाण्यवर आधारित कोणतीही जुनी धर्मसंस्था समाजाचा विकास खुंटवणारी आहे, हे नवशिक्षितांच्या लक्षात आले, त्यातून धर्मचिकित्सा सुरु झाली, यालाच ब्रिटिश राजवटीतला प्रबोधनाचा काळ असे म्हणतात, या काळात उदारमतवादी ब्रिटिश सत्तेच्या आगमनामुळे व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात अनेक प्रकारच्या गोष्टींच्या चर्चा सुरू झाल्या, विशेषतः हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरेबद्दल व पुरोहित शाहीच्या वर्चस्वाबद्दल, अमानुष जातीप्रथेबद्दल, स्त्रियांच्या दयनीय स्थितीविषयी लिहिणाऱ्यांची संख्या वाढली. उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.आपल्या समाजात प्राचीन काळापासून धार्मिक आणि सामाजिक जीवनाच्या व्यवच्छेदक सीमारेषा कधीही स्पष्ट झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सामाजिक प्रश्नाचा कोठे ना कोठे धर्माशी संबंध आलेला आहे. प्रथम सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य हा वाद एकोणिसाव्या-विसाव्या शतकात निर्माण झाला होता लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे . सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत असे त्यांना वाटत होते तत्कालीन राजकीय चळवळ आणि बहुजन समाजाची समाजोन्नती या परस्पराहून भिन्न असल्याने ही राजकीय चळवळ मागासलेल्या व उपेक्षित वर्गाच्या उन्नतीस मारक आहे त्यामुळे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक सुधारणाच महत्वाच्या आहेत असा विचार त्यांनी व्यक्त केला.

इंग्रजांच्या अमलांत विशेषतः बंगाल प्रांतात बदलाचे वारे वाहू लागले होते, महाराष्ट्रात सुद्धा ते लवकरच पोहोचले.  महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी, सुधारणावादी, शिक्षित वर्गाने ब्रिटिश राजवटीतील सुधारणांचा स्वीकार आनंदाने केला. या मंडळींनी वैयक्तिक प्रयत्नांबरोबरच संघटनात्मक प्रयत्ननांवर देखील विशेष जोर दिला. उच्च शिक्षित अत्यंत बुद्धिमान व समाजोद्धाराची तळमळ असणाऱ्या समाजसुधारकांनी प्रबोधनाचा लढा सुरू केला, आर्य समाज, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज यांची भूमिका मात्र वेगळी म्हणजे वेद हे ईश्वरनिर्मित आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. या तीन समाजाचे संस्थापक वरिष्ठ ब्राम्हण जातीतील होते, आध्यात्मिक समतेसाठी त्यांचे प्रयत्न होते परंतु त्यांचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संबंध नव्हता, या तीन समाजाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाजाने खेड्यापाड्यातील जनसामान्यांच्या मनात स्थान मिळविले, तसेच त्यांच्या जाणिवांना, आकांक्षाना आधुनिक भारताच्या जडणघडणीत जोतिबा फुले यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.  ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, परमहंस सभा, मानवधर्म सभा, यांच्याप्रमाणे सत्यशोधक समाजाचे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले यांनी माणसाला साध्य मानले आणि व्यक्तिवाद, विवेकवाद, इहवाद या आधारभूत तत्त्वावर स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, न्याय, सहिष्णुता या मूल्यांवर आधारित नवसमाजरचना निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. साहित्य, नियतकालिके, कृतीकार्यक्रम इत्यादींच्या माध्यमातून प्रबोधनाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संघटनात्मक समाजसुधारणेचे कार्य करताना हे सर्वजण एकेश्वरवादी होते सर्व मानव एकाच ईश्वराची अपत्ये आहेत, ईश्वराची आराधना करण्यासाठी पुरोहितांची आवश्यकता नाही, महात्मा फुले यांना तर कोणताही धर्मग्रंथ, धर्मसंस्था आणि समाजसंस्था ईश्वरप्रणित आहे असे वाटत नव्हते . सारे ग्रंथ माणसानेच निर्माण केलेले आहेत त्यांच्या भोवती ईश्वरी आज्ञेचे वलय निर्माण करून समाजाची वंचना केली जाते असे त्यांचे प्रतिपादन होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्यशोधक चळवळ ही एक गतिशील परिवर्तनवादी सामाजिक चळवळ होती. महात्मा फुले यांनी  आपल्या सहकाऱ्यांसमवेत २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या कार्याला संघटनात्मक  रूप दिले. धर्मसत्तेखाली भरडले व अर्थसत्तेखाली पिळलेले शेतकरी, शेतमजूर, दलित, पददलित, स्त्रिया आदी शोषित जनसमूह हे सत्यशोधक चळवळीच्या केंद्रस्थानी होते. सत्यशोधक चळवळीने आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाचाआग्रह धरला. बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा अपूर्व लढा दिला. हजारो वर्षांपासून दबलेल्या, पिचलेल्या, शोषलेल्या जनसमूहाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपले मानवी हक्क व मानवी प्रतिष्ठेसाठी पुकारलेले ते एक लोकआंदोलन होते. सत्यशोधक चळवळीचा मराठी जनसमूहांच्यावर दूरगामी परिणाम झाला. आधुनिक महाराष्ट्राचा पुरोगामी विचार घडविण्यात सत्यशोधक चळवळीचे सर्वाधिक श्रेय आहे. सत्यशोधक चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतातील पहिली प्रबोधनपर लोकचळवळ होती.

महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्मांडणीचे  बीजारोपण केले. सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनाची चळवळ म्हणून सतत उल्लेखलेली गेली, पण त्याबरोबर च ती शेतकऱ्यांना आत्मभान देणारी , त्यांचे मागासलेपण आणि शोषण यांची कारणमीमांसा करणारी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी चळवळ होय.  सत्यशोधकांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील अठराविश्वे दारिद्रय दुःख अज्ञान श्रद्धा अंधश्रद्धा याचबरोबर त्यांना नागविणारी प्रस्थापित व्यवस्था यांचे वस्तुनिष्ठ चित्र सत्यशोधकीय नियतकालिकांतून मराठी जनसमुहापुढे ठेवले या देशात सर्वाधिक शोषित उपेक्षित हा शेतकरीच असून त्याची मनमानी लूट प्रत्येकजण कशी करत असतो याचे वास्तव लोकभाषेतून निर्भीडपणे मांडले गेले.  परंतु सत्यशोधक चळवळीचा शेतकरी आणि शेती विषयक विचार कोणीच गंभीरपणे घेतला नाही याचे कारण शेतकऱ्यांविषयी असलेला तुच्छताभाव आणि त्याच्या जगण्याची दखलच न घेण्याची अभिजन मानसिकता हे आहे शोषणाची मुळे शोधताना धर्मसंस्था, राज्यसंस्था, सरंजाम शाही नोकरशाही याचबरोबर इथला सामान्य जो शेतकऱ्यांच्या श्रमावर जगत होता तोही शेतकऱ्यांची मनमानी लूट करीत होता सत्यशोधक चळवळीचा श्वासच हा मुळी शेतकरी होता त्यामुळे त्यांनी या घटकांचा समाचार घेताना शेतकऱ्यांमधील घातक समजुती, रूढीपरंपरा अडाणीपणा यासारखे त्याचे जगणे उध्वस्त करणारे घटक या साऱ्यांवर सत्यशोधक चळवळीने रोखठोक आसूड ओढले.

महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीने मध्यमवर्गीय, नागर, पांढरपेशा वर्गाबाहेर असलेल्या ग्रामीण शेतकरी कष्टकरी दलित वंचित जनसमूहांच्या मागासलेपणाची व शोषणाची मूलगामी मीमांसा केली व त्यांच्या समग्र मुक्तीचे क्रांतीतत्व मांडले. महात्मा फुल्यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेली सत्यशोधक चळवळ ही प्रामुख्याने शोषित जनसमूहांना केंद्रित ठेवून निर्माण झाली होती, तसेच मानवी हक्काच्या प्रस्थापनेसाठी एका पर्यायी शोषणमुक्त, समतामूलक समाजरचनेची गरज प्रतिपादन करणारी अशी ही चळवळ होती, या चळवळीने सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी ध्येयधोरणे निश्चित करून ती यथाशक्ती राबविण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधकीय साहित्य, विधिविवाह, शेतकरी संघटन, कामगार संघटन, नियतकालिके, सत्यशोधक जलसे, प्रबोधन कीर्तने - प्रवचने, शिक्षण प्रसार अशा विविध क्षेत्रात व्यापक रचनात्मक कार्य उभे राहिले.

दीड शतक उलटल्यानंतर महात्मा फुले यांचे चरित्र आणि कार्य, त्यांची महानता, महात्मेपण उत्तरोत्तर प्रभावित आणि प्रकाशमान होत चालले आहे, काही प्रतिगामी शक्ती त्यांचे चरित्रहनन करतात परंतु सनातन विचारांच्या लोकांनीही आता जोतीरावांचे मोठेपण मान्य केले आहे, पण ज्या स्तरातील लोकांसाठी, बहुजन शेतकरी कामगारांसाठी सत्यशोधक चळवळ निर्माण झाली होती, त्यांना आता या समाजाचे महत्त्व वाटत नाही, त्यांना सत्यशोधक विचारसरणीचा विसर पडला आहे, सारा समाज गुलामगिरीतून मुक्त व्हावा, समाजात सुधारणा व्हावी, त्यांची नैतिक प्रगती घडून विवेकमूल्यांची अभिवृद्धी व्हावी हा सत्यशोधक समाज स्थापनेमागील हेतू होता, पण स्वातंत्र्यानंतर समाजाचा विवेक वाढला नाही, याउलट भ्रष्टाचार, काळाबाजार, शोषण करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी व समान हक्क दिले पण अस्पृश्यांवर अन्याय होतच आहेत, खेड्यापाड्यात स्त्रियांचे शिक्षण वाढले नाही, समाजात आजही म्हणावा तसा बुद्धिवादी दृष्टीकोन निर्माण झाला नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे याचाच अर्थ सत्यशोधकांचे कार्य आजही संपले नाही, दीडशे वर्षानंतरही अपेक्षित यश प्राप्त झाले नाही त्यामुळे आता सत्यशोधक समाजाने काही गोष्टीचा फेरविचार करणे काळाची आवश्यक आहे.

 


- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

सार्वजनिक गणेशोत्सव : राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक


सार्वजनिक गणेशोत्सव : 

राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक

- रवींद्र मालुसरे


भारताचे लक्षवेधी सांस्कृतिक वैशिष्टये ठरलेला आणि मुख्यतः महाराष्ट्रासह सध्या देशापरदेशात भूषणावह असलेला व १३० वर्षाची परंपरा लाभलेला वार्षिक सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने आणि उत्साहाने सुरु होत आहे. श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते आपल्या प्रिय गणरायाच्या आगमनाचे. बाप्पा नुसता आठवला तरी मन कसं प्रसन्न होतं. उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती ही उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे तर प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः हि आर्येतर देवता. वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभप्रसंगी श्रीगणेशाचे आवाहन करण्याची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा हि पूर्वापार परंपरा आहे.

गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी व लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश हि विद्येची देवता ! साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश हि अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला 'गणपती' हे अधिदान प्राप्त झालेले आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला 'वरदा चतुर्थी' असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान, कथेकरी, हरिदास यांचे व शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार व दरबारी प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव इतमामाने होत असे.
इ स १८९२ मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले, श्री धोडवडेकर व श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित होवून ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल हि कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसेच राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता हि साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक व आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो.

लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामागे मुख्यतः लोकशिक्षण आणि समाज जागृती हाच एकमेव उद्देश होता. शिवाय या सार्वजनिक उत्सवामध्ये समाजातील सर्व जाती-धर्माचे,श्रीमंत-गरीब अशा विविध समाज घटकांनी गुण्यागोविंदाने एकत्र यावे आणि सलोखा,सहकार्य आणि बंधुभावाचा नात्याने परस्परातील नाते घट्ट होऊ शकेल असाही या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा त्यांचा विधायक हेतू होता. सश्रद्ध भावनेने साजऱ्या भावनेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला लोकमान्यांचा खरा उद्देश लोकशिक्षण आणि लोकजागृती असाच होता. आणि त्याच कारणास्तव उत्सव काळामध्ये दहा दिवस समाजसुधारक,विचारवंत,
अभ्यासक यांची व्याख्याने होऊ लागली. अर्थात त्या भाषणाचा अंतस्थ हेतू सामान्य जनतेला पारतंत्र्याचे तोटे आणि स्वातंत्र्याचे फायदे समजावून सांगणे हाच होता. यथावकाश अशा वैचारिक प्रबोधनाचा, समाज जागृतीच्या मार्गदर्शक उपक्रमांमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांची भर पडली. स्वातंत्रोत्तर काळात मात्र यथावकाश लोकशिक्षण आणि लोकजागृती ही उद्दिष्टये क्षीण होऊ लागली.
टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक,न चि. केळकर, नाट्याचार्य खाडिलकर,काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम. अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे. पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे ह.भ. प. सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत, वक्ते, कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर,
गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे. महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण'गणेश' बाजूला पडून 'उत्साही उत्सवच' जास्त होत आहे हि दुःखदायक बाब आहे.

देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी व जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे.
यावेळी गणेशोस्तव साजरा करताना परिस्थितीचे आत्मभान जागे ठेवत राष्ट्रीय एकात्मता, सलोखा व सर्वधर्म समभावाशी सुसंगत वर्तन आणि आपापल्या कुटुंबाचे आरोग्य यांचे पुरेपूर भान ठेवून सुसंकृत महाराष्ट्राला साजेसा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा पार पाडावा. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्ग गीतेवरील भाष्य 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाला प्रारंभ करताना विद्यादाता श्री गणेशाची प्रार्थना करतानाच प्रार्थना आळवली आहे, "देवा तूंचि गणेशु सकळमति प्रकाशु." गणराया तू येत आहेस तर तुझ्या दिव्यप्रकाशाने सारे घरदार,परिसर आणि विश्वही उजळून जावो. सर्वांच्या मनातल्या अंधाराचाही विनाश होवो. तुझ्या मूर्त स्वरूपाची आम्ही जरी पूजा करीत असलो, तरी तूच या विश्वाचा निर्माता आहेस, तू ज्ञानरूप आणि विज्ञानरुप आहेस. तू ओंकार स्वरूप विश्वव्यापी आहेस. सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहेस. तुझे आगमन आम्हाला नवी जिद्द,निर्धार आणि नवे बळ देणारे ठरावे.

रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...