सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

 शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

◆ महेश सावंत कोण ?
२१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याचबरोबर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीही केली होती. परंतु महेश सावंत यांना माहीम, वडाळा, दादर, वरळी येथील काही मोठ्या सेनानेत्यांचा छुपा पाठींबा होता हे काही गोष्टीत लक्षात येत होते.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे ८३०० मते मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा २५० मतांनी निसटता विजय झाला होता. निकालाची ती संध्याकाळ मला आठवतेय, सामना दैनिकाच्या आणि महेशच्या वाकडी चाळीच्या समोर महेशच्या निवडणूक चिन्ह असलेल्या नारळ या चिन्हावर राग काढताना शेकडो नारळ रस्त्यावर फोडीत ढीग रचला होता. पुढे ४ महिन्यानंतर मातोश्री निवासस्थानी सावंत यांना उध्दवजींनी पुन्हा शिवसेना पक्षात घेतले.
सरवणकर शिवसेना कार्यकर्ता ते आमदार अशी राजकीय वाटचाल आहे. १९९२ ते २००४ तीन वेळा नगरसेवक, त्यावेळी २००२-२००४ या दोन वर्षात स्थायी समिती अध्यक्ष. त्यानंतर २००४, २०१४, २०१९ विधानसभेत शिवसेनेचे आमदार, २००९ च्या निवडणूकीच्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर नारायण राणेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून निवडणूक लढवली परंतु पराभव झाला. २०१२ मध्ये शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.
कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. २००९ मध्ये सदा यांनी विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांच्यासोबत तेव्हाचे शाखाप्रमुख महेश सावंत हे सुद्धा होते, सदा सरवणकर (काँग्रेस), आदेश बांदेकर (शिवसेना) यांचा पराभव झाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे नितीन सरदेसाई आमदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा पराभव मातोश्रीला फारच अस्वस्थ करून गेला. दादर प्रभादेवीत अनेक मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी सदा सरवणकर यांना पायघड्या घालून शिवसेना पक्षात घेतले गेले आणि पुन्हा ते आमदार झाले. आता 'आमचीच खरी शिवसेना' म्हणत पुन्हा त्यांनी शिंदेगट जवळ केला आहे. मात्र 
एकेकाळी एकाच रस्त्यावर स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या आसपासच्या चाळीत राहणारे हे दोघे मित्र एकेकाळी कट्टरमित्र होते, परंतु सध्या सरवणकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. एकनाथ शिंदे यांनी अलीकडे शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या बरोबर ज्या ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यात सदा सरवणकर हेही अखेरच्या काळात गोहोटी येथे सहभागी झाले.....

◆ दादर आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध
दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. दादर आणि शिवसेना हे अतूट बंधन ! दादर म्हणजे ठाकरे घराण्याच्या वास्तव्याचा १२० वर्षाचा कालखंड ! सुरुवातीला प्रबोधनकार मुंबईत आल्यानंतर दादरमध्ये 'मिरांडा' चाळीत राहिले, त्यानंतर प्लाझा समोर 'कामाठी चाळीत' व शेवटी सेनापती बापट यांच्या पुतळा आहे त्याठिकाणी. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचे वितरण तिथूनच होत असे. १३ ऑगस्ट १९६० ला दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करून मार्मिक सुरु झाला. १९ जून १९६६ ला रितसर शिवसेनेची स्थापना झाली.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तुडुंब गर्दीत झाला. एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान आणि गर्दीचा उच्चांक मोडणारी शिवाजी पार्कची सभा असे समीकरण दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला आले नाही. त्याला यंदा ५६ वर्षे होत आहेत. १९७१ साली शिवसेनेचे पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते हे दादरच्या. त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत हे मुंबईचे महापौर झाले आहेत. १९ जून १९७७ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादरमध्ये शिवसेनेचा कारभार चालविण्यासाठी शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दादरचा भाग असलेल्या प्रभादेवी येथील नागुसयाजीच्या वाडीत सुरु झाला.
१९९२ ला युतीची पहिली सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दादरच्या प्रि. मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. पोर्तुगीज चर्च येथे प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे यांचा पूर्णाकृती तर शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्येच लाखोंच्या उपस्थितीत करण्यात आले.

◆भविष्यातली राजकीय वाटमारी
माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची माहीम-दादर-प्रभादेवीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली. सरवणकर यांच्या सोबत सावली सारखे असलेले त्यांचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी उपविभाग संघटक कैलास पाटील, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी व असंख्य कार्यकर्ते उध्दवजींच्या सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान आणि संघर्ष काय होणार आहे त्यातून भविष्यात सदा सरवणकर राजकीय पटलावर कुठे असतील हे काळ ठरवणार आहे. मतदार संघात ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना सरवणकर हे लोकप्रिय आणि कार्यसम्राट म्हणून परिचित आहेत. लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणारा नेता म्हणून ओळख आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्ता जाग्यावरच आहे. मतदारांची सहानुभूती सध्या तरी संयमाने मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उध्दवजींच्या बाजूने आहे. ती मतांच्या स्वरूपात निवडणुकी पर्यंत किती टिकून राहतेय हे सुद्धा महत्वाचे आहे.
शिवाय शिवसेना पक्षफुटी पुर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे माहिम मधून विधानसभा लढवणार अशी वदंता माध्यम जगतात होती. तशी बॅनर्सबाजी सुध्दा परिसरात दिसून येत आहे. राजकारणात काहीही घडू शकते हे मागचे माविआचे सरकार पडताना दिसून आले. पोलादी आणि बलदंड असलेल्या शिवसेना पक्षात नेतृत्वाच्या विरोधात जात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन पक्ष संपवण्याची प्रक्रिया होईल असे कोणत्याही मराठी माणसाला स्वप्नातही वाटले नसावे. आणि पक्ष फुटल्यानंतर गद्दारांच्या विरोधात सेनाभवनावर निदर्शने आणि शिंदेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानंतर आपले नेते आमदार सरवणकर बंडखोरी करीत डायरेक्ट टीव्हीच्या बातमीत गोहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये दिसतील असे स्थानिक शिवसैनिकांनाही वाटले नसेल....

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ
9323117704




सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

 मातोश्रीवर नवशक्तिच्या जमका चळवळीच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ



वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ती लेखणीची धार कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे 'फटकारे' नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होतो.  परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही 'कर नाही त्याला डर कशाला' या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मातोश्री येथे कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, आमदार नितीन बानूगडे पाटील, आमदार रवींद्र वायकर, चंद्रकांतमामा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनिल कुवरे आणि दिलीप ल सावंत यांना यंदाचा जीवन गौरव प्रदान करण्यात आला.  तर नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि वृत्तमानसचे सहसंपादक सुनिल रमेश शिंदे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राजन देसाई यांनी संपादित केलेल्या '"शिवसेना आणि मराठी माणूस" हे वृत्तपत्र लेखकांनी व्यक्त केलेले ई पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याचे देशभरचे वातावरण पाहाता अघोषित आणीबाणी आहे की काय अशी परिस्थिती आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली होती परंतु ती घोषित आणीबाणी होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा दिला होता तरी मार्मिकसह सर्व वर्तमानपत्रांवर आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने होती. आजच्या प्राप्त परिस्थितीत मतस्वातंत्र्य मानणाऱ्यांची मग ती प्रिंट मीडिया असो वा अलीकडच्या सोशल मीडियावर तात्काळ व्यक्त होणे असो यांची जबाबदारी वाढली आहे. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आणि तुम्ही जुनी जाणती परंतु समाजातील जागती मंडळी आज माझ्यासमोर आहात. बाळासाहेब मला नेहमी सांगायचे लोकांना काय पाहिजे हे समजण्यासाठी एकवेळ तू अग्रलेख वाचू नकोस परंतु सामान्य माणसांचा आवाज असलेली वाचकांची पत्रे जरूर वाच. तुमच्या जागेची अडचण आहे तेव्हा हे जागल्यांचे व्यासपीठ अबाधित ठेवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. असे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी दिले.

सध्याच्या राजकीय परिस्थिती वर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी देशभर इतर पक्षांना भारतीय जनता पक्ष अस्पृश्य होता तेव्हा शिवसेनेने हात पुढे करून त्यांच्याशी युती केली. नंतर ती वाढत गेली आणि जवळ गेलेले दुरही होत गेले. आम्हाला म्हणतात तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडून आलात तर आता बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मते मिळणार नाहीत आता मोदी महाराष्ट्रात चालणार नाहीत हे तुम्हाला उमगले आहे.

सुरुवातीला प्रस्तावना करताना संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी १९४९ च्या पहिल्या जमका संमेलनापासून कसे दृढ होते याचे अनेक दाखले दिले. संस्था आणि वृत्तपत्र लेखक अडचणीच्या काळातही नाउमेद न होता कसा कार्यक्रम-उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यशील आहे. हे आपल्या भाषणात सांगताना मालुसरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संस्था भविष्यात कार्यरत राहावी यासाठी उद्धव साहेबांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ज्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली असे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधू शिरोडकर, वि अ सावंत, श्रीनिवास डोंगरे, मधुकर कुबल, अनंत आंगचेकर, श्रीमती मंदाकिनी भट, डॉ दिलीप साठ्ये, कृष्णा ब्रीद, ऍड मनमोहन चोणकर, कृष्णा काजरोळकर, प्रकाश बाडकर यांचा सन्मान उध्दवजींच्या हस्ते करण्यात आला.

संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, अरुण खटावकर, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, दिगंबर चव्हाण, सतीश भोसले, सुनिल कुडतरकर, नारायण परब, पंकज पाटील, दत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

'मार्मिक' सुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध

 'मार्मिकसुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे 

काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध

 - ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई


रवींद्र मालुसरे)

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या तथाकथित भक्तीचे नाटकी प्रदर्शन करणाऱ्या भाजपने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे टीमनेउद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे ठरवले आहे. तरी या दोन गोष्टींत अर्थातच विसंगती आहे ! मात्र एका गोष्टीकडे मुद्दामहून लक्ष वेधायचे आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला नसताअसे सांगितले जात आहे. परंतु फडणवीस सरकारात शिवसेनेच्या मंत्र्यांना काडीची किंमत नव्हती आणि म्हणून त्यांनी राजीनामे खिशात ठेवले होते. बाळासाहेब जर त्यावेळी हयात असतेतर त्यांनी 'कमळाबाई'ला शेलक्या शब्दांत सुनावूनआपल्या मावळ्यांना सरकारबाहेर पडण्याचा त्यावेळी सल्ला दिला असता. असे सद्यस्थितीच्या घटनेची मीमांसा ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी दादर येथे केली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या 'कुठे नेऊन ठेवला आहे आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्रया विषयावर परिसंवादाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चित्रलेखाचे संपादक आणि सुप्रसिद्ध निर्भीड वक्ते ज्ञानेश महारावज्येष्ठ विधिज्ञ ऍड राजेंद्र पैज्येष्ठ उद्योजक प्रमोद घोसाळकरमराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेदासावाचे कोषाध्यक्ष मनोहर साळवीआचार्य अत्रे स्मारक समितीच्या ऍड आरती सदावर्ते-पुरंदरे उपस्थित होते. देसाई पुढे असेही म्हणाले कीमोदी सरकारने केंद्रात शिवसेनेला महत्त्वाचे खाते दिले नाहीम्हणूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असता. शिवसेनेला तुच्छतेची वागणूक देणाऱ्या फडणवीसांनात्यांनी ठाकरे शैलीत फटकारले असते. उलट महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार असल्यामुळेबाळासाहेब आणि त्यांचे अधिक जमले असते. अर्थात समजा मतभेद झाले असतेतर पवारांनाही बाळासाहेबांनी सोडले नसते हा भाग वेगळा. परंतु बाळासाहेबांच्या नावाने आपल्याला हव्या त्या गोष्टीच सोयीस्करपणे सांगायच्या ही भाजपची आणि शिंदे गटाची  लबाडी आहेहे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय 'मार्मिकसुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध होतेहे सर्वज्ञात आहे. काँग्रेसच्या हिंदुत्ववादी दुष्मनांनी या गोष्टी दडवून आणि दुसरीकडे बाळासाहेबांची ढाल पुढे करूनउद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपूर्वक हल्लाबोल सुरू केला आहे. ही चाल सर्वजणांनी लक्षात ठेवली पाहिजे.

देशातील बहुजन समाज बुद्धीचा वापर न करता भावनेच्या आहारी जात असल्याने मातीचे गोळे डोक्यावर घेऊन बुडविले जातात. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असतेतो देश मोठा कसा होणार?  ‘चित्रलेखा’चे संपादक आणि फर्डे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी या परिसंवादाचा महाराष्ट्र महोदया संदर्भात मुद्दा मांडताना असा परखड सवाल केला. आज आचार्य अत्रे असते तर महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर चाललेल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर घणाघात केला असतात्याचबरोबर वाढती बुवाबाजीकर्मकांड आणि जातियवाद्यांवर आणखी प्रहार केले असते. आयुष्यभर त्यांनी आपल्या अग्रलेखातून आणि पुस्तके लिहून हे काम केले आहेच  ज्ञानेश महाराव आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले किसंत बहिणाबाईसंत तुकारामकबिरसंत एकनाथज्ञानेश्वरतुकडोजी महाराजयांच्या ओव्याअभंगपोवाड्यातील कडवी उद्धृत करुन भटशाही हा सामाजिक आणि राजकीय रोग असल्याचे ठासून सांगितले. सावित्रीबाई फुलेम.ज्योतिबा फुलेडॉ.बाबासाहेब आंबेडकरप्रबोधनकार ठाकरेआचार्य अत्रेशाहीर अमरशेख  इत्यादी महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. बुवाबाजीकर्मकांड ह्या भ्रामक गोष्टी आहेत हे आपल्या साहित्यातून मांडले. आचार्य अत्रेंचा त्याकाळातील महाराष्ट्र प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता  ते काही वर्षे जगले असते तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता. त्याअगोदर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना आणि ते वाढविताना तिथी आणि मुहूर्त कधी पाहिले नाही. परंतु आजकालचा सुशिक्षित लोक अजूनही वास्तुशास्त्राचा आधार घेतात. घरात दिशा शोधणाऱ्यांची नेहमीच ‘दुर्दशा’ झालीअसे स्पष्ट करुन श्री.महाराव यांनी भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा बुद्धीने विचार करावाअसे आवाहन केले.



ऍड राजेंद्र पै यांनी दोन्ही वक्त्यांनी परखड भाषेत आपले विचार मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सुद्धा आज आचार्य अत्रे असते तर कसे व्यक्त झाले असते याची अनेक तत्कालीन प्रासंगिक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले. 'कुटुंब रंगलय काव्यात'चे विसुभाऊ बापट यांनी शिवाजीपार्क येथील आचार्य अत्रे कट्ट्याच्या संदर्भात माहिती दिली. ऍड आरती सदावर्ते यांनी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या तर रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ वृत्त निवेदिका शिबानी जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळेकोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडमाजी अध्यक्ष विजय ना कदमकार्यवाह नितीन कदमसुनील कुवरेराजन देसाईनारायण परबदत्ताराम गवसदिगंबर चव्हाण,चंद्रकांत पाटणकरअनंत आंगचेकर,राजेंद्र घरतश्रीमती मंदाकिनी भटकृष्णा काजरोळकरश्रीनिवास डोंगरेदीपक गुंडयेभाऊ सावंत,शांतू डोळस यांनी विशेष परिश्रम घेतले.  


   


बुधवार, २७ जुलै, २०२२

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार


मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले. 
यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई लढतो आहोत. हे हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केली. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत डोके, अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे, कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,  अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे,  नगराध्यक्ष सुनील चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड  सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे, मुरबाडचे हिम्मत महाराज गगे, शहापूरचे योगेश महाराज वागे, योगेश महाराज घरत, वासींदचे ज्ञानेश्वर महाराज शेळके, खडवलीचे नारायण महाराज बजागे, बदलापूरचे अशोक महाराज घरत, मोहन महाराज राऊत, टिटवाळाचे दशरथ महाराज किणे, आंबिवलीचे भीमसेन महाराज पाटील, ठाण्याचे जगन्नाथ महाराज म्हस्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम रिंगे, नवोदित गायक चिन्मय रिंगे, आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होते. 



शुक्रवार, १५ जुलै, २०२२

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता

 

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता 

कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे होते. त्या दिवशी बातमी घेऊन येणारी सकाळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक होती.  सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा माणिकरावांच्या रूपाने लोकनेता हरपला होता. व्यक्तिगत पातळीवर माझे संबंध अतिशय जवळचे होते.  काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला होता. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकीय क्षेत्रातील  कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले, देश, राज्य, कोकण एका स्वच्छ, पारदर्शी आणि उच्चशिक्षित राजकारण्यास मुकला आहे. तरूण, निष्ठावंत, प्रचंड क्षमता असलेले आणि जबरदस्त उमदे नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले.  अत्यंत कमी वयात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती.  काँग्रेसचे युवा नेते, माजी आमदार माणिकरावांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, नेतृत्व गमावले आहे. जनसामान्यांशी एकरूप असलेला, विकासासाठी झटणारा लोकनेता हरपला अशीच भावना कोकणात आणि महाराष्ट्रात होती.   मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना माणिकराव यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 
रायगड जिल्ह्याचे राजकारण डोळ्यांपुढे आणले की, अनेक दिग्गज आणि कर्तबगार राजकीय नेते डोळ्यांपुढे येतात. त्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून माणिकराव यांचे स्थान अग्रणी होते.  आपल्या कर्तबगारीने त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो तडीस लावेपर्यंत ते स्वस्थ बसत नसत.  रायगडच्या  प्रत्येक क्षेत्रातील प्रश्नांची त्यांची जाण होती.  विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत त्यांनी सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल उचलले. महाविद्यालयीन विद्यार्थी नेतृत्व करण्यापासून पुढे युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं, पुढे जिल्हापरिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नंतर लोकप्रिय आमदार ही वाटचाल स्वत:च्या हिंमतीवर केली.  वजनदार नेते अशी त्यांची प्रगती होत गेली. ही करताना अनेकांच्या मदतीला धावून येणारा आपला हक्काचा माणूस अशीच त्यांच्याबद्दल असे.  प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री माणिकराव. मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरूप झालेले त्यांचे नेतृत्व होते. महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. या डोंगराळ तालुक्याच्या अविकसित भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलेजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अभ्यासू, चिंतनशीलपणा, परखड, सजग नेतृत्व, त्यांच्यातील माणुसकी आणि निखळ-निकोप मैत्री, वक्तशीरपणा, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्यातील आक्रमक व स्पष्टवक्तेपणा, त्यांच्या नजरेचा धाक, अंत:करणातील हळवेपणा व भावुकपणा, त्यांच्यातील आध्यात्मिक श्रद्धाळूपणा, त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा आदी विविध पैलू आहेत.

राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी ते सदैव आक्रमक राहिले. त्यांनी स्वत:चा आदर्श स्वत: निर्माण केला व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारणातही हे दाखवून दिले. त्यांनी अतिशय कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आणि अनेक वादळं पाहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, तीनवेळा त्यांना पराभव पाहावा लागला. पण लोकनेत्यांसाठी या क्षुल्लक गोष्टी ठरल्या. ते पुन्हा पुन्हा  राजकारणात सक्रियच  राहिले आणि त्यांची लोकप्रियतेची यशाची कमान चढतच राहिली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता.  राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे माणिकराव जगताप यांची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. त्यात माणिकराव हे  झंझावातासारखे असल्याने त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. ते रोखठोक बोलत. अशा बोलण्याचा फटकाही काहीवेळा त्यांना बसला. मात्र, अंतर्यामी ते मृदू होते. त्यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. . तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे माणिकराव

कोकण हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कोकणातले अनेक जटील प्रश्नांवर प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत नेऊन ते सोडवून घेत. ती सोडविण्याची त्यांची एक वेगळी आक्रमक शैली होती.  त्यामुळे कोकणच्या विकासाचा ध्यास घेत, आजच्या पिढीतील कोकणातले देखील ते अभ्यासू नेते ठरले आहेत.   त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची जिद्द आणि धडाडी ही यापुढच्या  नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांना अनुकरणीय अशीच ठरणार आहे.

 हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला माणिकराव हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना त्यांच्यातली ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली. दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो. कॉँग्रेसच्या आदर्शांवर निष्ठा ठेऊन चालणारा प्रचंड ताकत असणारा माणिकराव हा नेता होता, स्वपक्षीयांच्या भूमिकेला विरोध न करता इतरांच्या भूमिकांचे स्वागत करणारा दिलदार आणि धाडसी नेता, अशी ओळख म्हणजे माणिकराव. 

माणिकरावांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा कोणाकडे असणार याचा निवाडा त्यांनी आपल्या हयातीतच घेतला होता. त्यांची कन्या स्नेहलताई यांना राजकारणात पदार्पण करताना अडचणी आल्या नाहीत. मात्र त्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या पित्याच्या निधनाचे दुःख काळजाच्या कोपऱ्यात ठेवत त्यांनी चारच दिवसात पूरग्रस्त महाडकरांच्या सेवेसाठी धावल्या. त्यामुळे  महाडच्या  नगराध्यक्षा म्हणून त्यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.  भविष्यात त्यांची उज्वल वाटचाल त्यांना प्रगतीकडे घेऊन जाणारी असणार आहे मात्र त्यासाठी त्यांनी लोकसंपर्क वाढवायला हवा.

त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. सामाजिक-ऐत्याहासिक काही प्रश्नावर चर्चा करायची असली तर  एकमेकांचा फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाडचे काँग्रेसनेते ऍड सुधाकर सावंत यांच्या सोबत माणिकराव आले होते. तालुक्याचे काँग्रेसचे नेतृत्व करणारे स्व महादेवराव मालुसरे, श्री ज्ञानोबा मालुसरे यांचा कार्यक्रम मुंबईत यशस्वी करण्यासाठी आवर्जून त्यांनी हजेरी लावली होती. पुढे नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचे बांधकाम आणि परिसर सुशोभित करण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना घेऊन आले होते. आमच्या साखर गावावर त्यांनी आणि साखर गावकऱ्यांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. शक्य होईल असा विकासही केला.  आजच्या पहिल्या स्मृतिदिनी  त्यांचे  हसणे, त्यांचे नेतृत्व, पक्षाशी निष्ठा आणि मैत्री माझ्या कायम आठवणीत राहिल."त्यांना भावपूर्ण आदरांजली !!



रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४


सोमवार, ११ जुलै, २०२२

भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते

 भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते

                                                                                                                              - डॉ पी एस रामाणी


मुंबई : मनुष्याचे जीवन सुखदुःखानी भरलेले आहे. यातून कोणीही सुटू शकत नाही. सुख तर प्रत्येकाला प्रिय असते. परंतु दुःखाचे चटके मात्र कोणालाच नको असतात. अशावेळी सर्वसामान्य माणूस दुःखाने निराश होतो. जगाशी भांडणे उकरून काढतो. ईश्वराला दोष देतो. येथेच गीतेची शिकवण उपयोगात येते. जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाचा स्वीकार करण्यास गीता सांगते आणि ते दुःख समर्थपणे पचविण्याचा उपायही शिकवते. श्रीमद भगवद्गगीता जितकी वाचावी तितकी ती वेगवेगळ्या पद्धतीने समजून येत राहते. त्याचप्रमाणे या शब्दाचा अर्थही विविध प्रकारे जाणून घेता येतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शस्त्रसज्ज झालेला अर्जुन आपल्याच आप्तेष्टांना समोर पाहून हातपाय गाळतो आणि स्वजनांशी लढण्यापेक्षा संन्यास वा मरण पत्करलेले बरे अशी त्याची धारणा झाली. हे युद्धच करायचे नाही असा निश्चय करून हातातील शस्त्रे टाकून देतो. अशावेळी आपल्या नियत कर्मापासून दूर चाललेल्या अर्जुनाला त्याचा सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णाने दिलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवदगीता. या गीतेच्या स्वरूपात तत्वज्ञानाच्या आधारे स्वधर्म व कर्तव्यपालनाचा उपदेश देऊन अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले व त्याला युद्धाला प्रवृत्त केले. असे प्रतिपादन वरिष्ठ न्यूरो आणि स्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या 'श्रीमद भगवदगीता : जनसमान्यांसाठी ... जवळ असूनही दुर्बोध' या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृतींचा प्रकाशन समारंभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केला होता. पुस्तकाचे प्रकाशन कैवल्यधाम मुंबईचे योगगुरू रवी दीक्षित, बँकर आणि कंपनी डायरेक्टर श्रीमती अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्री विनायक प्रभू, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, उद्योजक आनंद लिमये हे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर होते.

ते पुढे असेही म्हणाले की, वास्तविक गीता हा केवळ श्रीकृष्णार्जुनाचा संवाद नसून हा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे आणि गीतेचे ज्ञान हे केवळ अर्जुनापूरते मर्यादित नाही; तर ते कालातीत आहे, म्हणजे कुठल्याही युगात त्याचे महत्व नाकारले जाऊ शकत नाही. गीतेचे ज्ञान आसक्ती आणि अज्ञानामुळे ग्रस्त असलेल्या मनुष्याच्या जीवनात कर्तव्याचे वर्चस्व दर्शवते आणि भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे वारंवार सांगते.
श्रीमती अनुराधा ठाकूर आपल्या भाषणात म्हणाल्या की, गीता हा असा ग्रंथ आहे की, तो आपल्याला प्रत्येकाच्या कुवतीनुसार समजतो. आयुष्य कशाप्रकारे जगायचे हे गीता आपल्याला सांगत असते. आपण वयाने जसजसे मोठे होत जातो तसतसा त्याचा वेगवेगळा अर्थ समजत जातो. म्हणून गीता ही तरुणपणातच वाचायला पाहिजे. आपला फक्त कर्मावर अधिकार आहे फळावर नाही. आजचा तरुण जबरदस्त स्पर्धेच्या वातावरणात काम करतो आहे. 
बेकारी वाढते आहे, त्याच्या कामात अनिश्चितता आहे स्पर्धेत मागे पडले याची मनात भीती असते तेव्हा या पिढीची ही गंभीर मानसिकता मला हतबल करते. त्यांचं जगणं हरवलेली ही स्पर्धा मला कोरडी वाटते. हे पुस्तक तरुण पिढीने वाचले तर डॉ रामाणि यांनी दोन लाख शस्त्रक्रिया करून माणसांचा कणा जसा ताठ केला तसा तरुणांचा अध्यात्मिक मनाचा कणा मजबूत होईल. ८४ वर्ष वय असलेल्या डॉक्टरांचे हे ७५ वे पुस्तकाबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी भूषण जॅक यांनी केले, सूत्रसंचालन वृत्त निवेदिका स्मिता गवाणकर आणि घनश्याम दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन संजय दिवाडकर यांनी केले. 

मंगळवार, ५ जुलै, २०२२

भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर

भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर

गावांतील समस्या कोणतातरी एक प्रश्न सोडवून संपत नाहीत. कारण त्यांचे मूळ कारण दुस-याच समस्येत लपलेले असते. समस्यांची एकमेकात असलेली गुंफण ज्याला लक्षात आली, त्याला ग्रामविकासाची नाडी कळली असे म्हणता येईल. असे उदगार  भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी मुंबईत घाटकोपर येथे काढले. पोलादपूर तालुक्यातील यशस्वी शेतकरी श्री रामचंद्रशेठ कदम यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने उद्यान पंडित पुरस्कार प्रदान केला त्याप्रित्यर्थ त्यांचा भव्य सत्कार कांगोरीगड विभाग सर्वांगीण विकास मंडळाच्या वतीने डॉ देवधर यांच्या हस्ते आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उद्योजक संजय उतेकर, पांडुरंग साळेकर, कृष्णा पां उतेकर, तुकाराम मोरे, रामशेठ साळवी, कृष्णा कदम, सचिन उतेकर, लक्ष्मण वाडकर, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग दाभेकर यांनी केले.

गावातली घरेदारे ओस आणि शेतीवाडी ओसाड सोडून मुंबईत अल्प पगारात मोलमजुरी करणाऱ्या तालुक्यातील तरुणांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी डॉ देवधर यांचे 'कोकणातील ग्रामीण विकासाचे सुत्र' या विषयावर याप्रसंगी व्याख्यान आयोजित केले होते. निमंत्रित वक्ते म्हणून या विषयावर बोलताना ते पुढे असेही म्हणाले की, “धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणा-या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला मुरायला लावा". कोकणात चांगला पाऊस पडूनही फेब्रुवारीच्या नंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाऊस भरपूर पडला तरीही समुद्र जवळ असल्याने वेगाने समुद्रास मिळते. यासाठी तुमच्या पंचक्रोशीत हे जलसूत्र अवलंबलेत तर बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न सुटेल. हे पाणी जमिनीत मुरायला वनसंपदा मदत करते. झाडांची मुळे जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवतात आणि पाण्यालाही रोखतात. मग तसे का होत नाही? उत्तर शोधताना माझ्या लक्षात आले की काही वर्षांत झाडेही कमी झाली आहेत. जवळपासची अरण्ये ओस पडत आहेत. अचानक वणवे लागत आहेत. खेड्यातील घरांमध्ये चुलींवर जेवण रांधण्याची पध्दत. त्यासाठी जळणाचा साठा करावा लागतो. ही लाकडे येणार कुठून? दरवर्षी कुठून मिळणार सुकी लाकडे? मग लावा वणवे…पेटवा झाडे. झाड तोडायला बंदी आहे, पण सुकलेलं झाड तोडायला नाही. अशा पध्दतीने कळत नकळत मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली. विहीरी लवकर तळ गाठू लागल्या. शेतीला पाणी पुरेनासं झालं. यासाठी ‘जल है तो कल है’ हा जागतिक विचार समोर ठेवून शेततळी बांधा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ तुमच्या ग्रामिण भागात उभी करा.

डॉ देवधर यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात केलेले ग्रामविकासाचे, जलसंवर्धनाचे प्रयोग, त्यामागची भूमिका, आलेले अनुभव, बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, परसदारातली हळद, सुरण लागवड, पूरक शेतीचे आर्थिक गणित त्यातून कुटुंबाला येणारी सुबत्ता, उपलब्ध बाजारपेठ याबाबत देवधर यांनी सविस्तर माहिती दिली.





बुधवार, २२ जून, २०२२

*आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !*

 *आचार्य  अत्रे  यांच्या  स्मृतींना  मुंबईत अभिवादन !*

 

संयुक्त  महाराष्ट्र  चळवळीचे  अध्वर्यू, महाराष्ट्राचे  अष्टपैलू  व्यक्तीमत्त्व, दै मराठा चे संपादक, साहित्यसम्राट *आचार्य  प्रल्हाद  केशव  अत्रे  यांच्या ५३ व्या  स्मृतीदिनानिमित्त  विनम्र  अभिवादन ! 
आज सकाळी १० वा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने वरळीनाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा सौ आरती पुरंदरे-सदावर्ते, कार्याध्यक्ष विसुभाऊ बापट, उपाध्यक्ष ऍड अक्षय पै, रवींद्र मालुसरे, रवींद्र आवटी, अमर तेंडुलकर उपस्थित होते.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...