शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?
२१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याचबरोबर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीही केली होती. परंतु महेश सावंत यांना माहीम, वडाळा, दादर, वरळी येथील काही मोठ्या सेनानेत्यांचा छुपा पाठींबा होता हे काही गोष्टीत लक्षात येत होते.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे ८३०० मते मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा २५० मतांनी निसटता विजय झाला होता. निकालाची ती संध्याकाळ मला आठवतेय, सामना दैनिकाच्या आणि महेशच्या वाकडी चाळीच्या समोर महेशच्या निवडणूक चिन्ह असलेल्या नारळ या चिन्हावर राग काढताना शेकडो नारळ रस्त्यावर फोडीत ढीग रचला होता. पुढे ४ महिन्यानंतर मातोश्री निवासस्थानी सावंत यांना उध्दवजींनी पुन्हा शिवसेना पक्षात घेतले.
कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. २००९ मध्ये सदा यांनी विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांच्यासोबत तेव्हाचे शाखाप्रमुख महेश सावंत हे सुद्धा होते, सदा सरवणकर (काँग्रेस), आदेश बांदेकर (शिवसेना) यांचा पराभव झाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे नितीन सरदेसाई आमदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा पराभव मातोश्रीला फारच अस्वस्थ करून गेला. दादर प्रभादेवीत अनेक मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी सदा सरवणकर यांना पायघड्या घालून शिवसेना पक्षात घेतले गेले आणि पुन्हा ते आमदार झाले. आता 'आमचीच खरी शिवसेना' म्हणत पुन्हा त्यांनी शिंदेगट जवळ केला आहे. मात्र
◆ दादर आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध
दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. दादर आणि शिवसेना हे अतूट बंधन ! दादर म्हणजे ठाकरे घराण्याच्या वास्तव्याचा १२० वर्षाचा कालखंड ! सुरुवातीला प्रबोधनकार मुंबईत आल्यानंतर दादरमध्ये 'मिरांडा' चाळीत राहिले, त्यानंतर प्लाझा समोर 'कामाठी चाळीत' व शेवटी सेनापती बापट यांच्या पुतळा आहे त्याठिकाणी. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचे वितरण तिथूनच होत असे. १३ ऑगस्ट १९६० ला दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करून मार्मिक सुरु झाला. १९ जून १९६६ ला रितसर शिवसेनेची स्थापना झाली.
१९९२ ला युतीची पहिली सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दादरच्या प्रि. मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. पोर्तुगीज चर्च येथे प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे यांचा पूर्णाकृती तर शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्येच लाखोंच्या उपस्थितीत करण्यात आले.
◆भविष्यातली राजकीय वाटमारी
शिवाय शिवसेना पक्षफुटी पुर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे माहिम मधून विधानसभा लढवणार अशी वदंता माध्यम जगतात होती. तशी बॅनर्सबाजी सुध्दा परिसरात दिसून येत आहे. राजकारणात काहीही घडू शकते हे मागचे माविआचे सरकार पडताना दिसून आले. पोलादी आणि बलदंड असलेल्या शिवसेना पक्षात नेतृत्वाच्या विरोधात जात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन पक्ष संपवण्याची प्रक्रिया होईल असे कोणत्याही मराठी माणसाला स्वप्नातही वाटले नसावे. आणि पक्ष फुटल्यानंतर गद्दारांच्या विरोधात सेनाभवनावर निदर्शने आणि शिंदेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानंतर आपले नेते आमदार सरवणकर बंडखोरी करीत डायरेक्ट टीव्हीच्या बातमीत गोहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये दिसतील असे स्थानिक शिवसैनिकांनाही वाटले नसेल....
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ
9323117704