शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

 

स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

कबराच्या दरबारातील तानसेन केवळ माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यानाही आपल्या गायनाने मुग्ध करीत असे, विझलेले दिवे प्रकाशित करणे आणि मेघमल्हार राग गाऊन वर्षाव घडवून आणणे आदी किमया देखील त्याने घडविल्याच्या दंतकथा त्यांच्या गायनातील कर्तबगारीपुढे जोडल्या जातात. या शतकाच्या प्रारंभी कलकत्त्याजवळील एका बातमीने जगभर  उडवून दिली होती. एका मंदिराजवळ एक खजुरीचे झाड होते व ते ६० अंशाच्या कोनात कललेले होते. या मंदिरात सायंकाळी रितीनुसार घंटानाद केला जात असे. प्रार्थनेच्या वेळी होणाऱ्या या घंटानादास प्रारंभ होताच हे झाड वाकून जात असे. जणू काही प्रार्थनेसाठीच ते मस्तक झुकवीत असे. सकाळ होताच ते झाड पुन्हा आपले मस्तक उंचावून घेत असे. झाडाचा हा भक्तिभाव पाहून परिसरातील माणसे अवाक झाली. या झाडाची पूजाही होऊ  होऊ लागली. भाविकांना असं वाटू लागलं होत की, या झाडाची पूजा केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होईल. पण असा काही भाग नव्हता. हा केवळ संगीताचाच परिणाम होता.

जेव्हा जेव्हा आपण  पंडित भीमसेन जोशींचा भटियार ऐकतो. पं. जसराजचा भैरव ऐकतो किंवा प्रभा अत्रेंचा कलावती ऐकतो तेव्हा भारतीय संस्कृती जोपासणारी अभिजात  संगीत कला आणि त्यातून कलात्मक अविष्कार घडविणाऱ्या विविध घराण्यांचा हेवा वाटतोच, परंतु भजनसम्राट स्व. खाशाबा कोकाटे, मारुतीबुवा बागडे आणि गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या संगीत भजन अथवा चक्रीभजनाच्या निमित्ताने कंठातून निघालेल्या स्वरात आपल्याला साक्षात परमेश्वराची लीला दिसत असते. आपल्या सुरांमुळे गेल्या ४०-५०  वर्षात यांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले. त्यामुळेच या कलाकारांना कृतज्ञतेपोटी रसिकांनी भरभरून  प्रेम दिले.
१९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या. अशा परिस्थितीत स्वतः भजन, गायन करत असताना नवी भजनगायक पिढी घडवण्याचे काम हरिभाऊ रिंगे महाराजांनी केले. सुशिक्षित तरुणांच्यामध्ये भजनाची संस्कृती रुजविण्याचा ध्यास घेतला. मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले. पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी जी थोडी मंडळी प्रयत्न करीत होती त्यात हरिभाऊ महाराज रिंगे यांचे योगदान फार मोठे होते.
भक्ती संगीताची लोकप्रियता शिष्ट समाजात हरिओम शरण, अनुप जलोटा, पं भीमसेन जोशी, सुरेश वाडकर,अजित कडकडे, अभिषेकीबुवा अशा अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमातून वाढत असताना शिवरामबुवा वरळीकर, फुलाजीबुवा नांगरे, महादेवबुवा दांडेकर, एकनाथबुवा हातिस्कर, केसरीनाथबुवा भाये,  साटमबुवा, सावळारामबुवा शेजवळ, स्नेहल भाटकर, तुळशीरामबुवा दीक्षित, मारुतीबुवा  बागडे, खाशाबा कोकाटे आणि हरिभाऊ रिंगे महाराज यांनी चक्रीभजनाचे आपले स्वतंत्र अस्तित्व अधिकाधिक समृद्ध केले. चक्रीभजन आजही अबाधित राहिले याचे कारण वारकरी संप्रदायाची परंपरा हा चक्रीभजनाचा पाय असल्याने व्यावसायिकिकरणाच्या आपत्तीतून ते सुटले व आपला स्तर शाबूत राखला आहे. ‘गायकी’ पेक्षा ‘भावकी’ला म्हणजे सांप्रदायिक श्रद्धेला चक्रीभजनात प्राधान्य असल्याने ते शेकडो वर्षे टिकून राहिले आहे.
गायनामध्ये प्रत्येक घराण्यांची आपली अशी ठशीव वैशिट्ये असतात. शिस्तीच्या चौकटी असतात. त्यानुसार गायकीला ढंग असतो. किराणा घराणे म्हणजे अतिशय सौंदर्यपूर्ण संथ आलापी. जयपूर घराणे म्हणजे लयकारीशी लवचिक खेळ. ग्वाल्हेर म्हणजे जोरकस, भिंगरीसारख्या ताना अशी समीकरणे जाणकारांच्या घराणातही आखलेली असतात.

हरिभाऊंचे गुरुजी स्व खाशाबा कोकाटे यांनीही अविरत साधना, रियाज करून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. तीच गोष्ट हरिभाऊंची. पहाडी आणि सुरेल आवाजाच्या हरिभाऊंकडे गायनातील रागांचा साठा तर खूप मोठा आहेच. परंतु एकाच रागातील अनेक चीजाही त्यांनी आत्मसात केल्या आहेत. आज विश्वनाथ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आपल्याकडील हा साठा पुढील पिढीकडे देण्यासाठी त्यांची वयाच्या ८१ व्या वर्षातही अहोरात्र खटपट चालू असते. त्यांची एक संगीत साधक या नात्याने ही भावना लक्षात घेऊन त्यांच्या शिष्यवर्गाने एक रिकामपणाचा उद्योग म्हणून संगीत न शिकता विद्येची, ज्ञानाची ओढ घेऊन शिकावे आणि नावलौकिक मिळवावा. आज समाजातील विशेषतः वारकरी क्षेत्रातील गायन वादन क्षेत्रातील तरुणांचे ते आधारवड आहेत. भाऊ थोर कलावंत तर आहेतच, परंतु श्रद्धास्थानीही आहेत. त्यांनी जीवनात आलेली सर्व सुख-दुःखे समोर न आणता समाजाशी असणारं आपलं नातं कधीही तोडलं नाही. लहान-थोर सर्वांचे ते सुहृदय आहेत. प्रचंड यश, कीर्ती लाभूनही भाऊ कधीही अहंमन्य, आढ्यताखोर वागत नाहीत. एक कलावंत आणि माणूस म्हणूनही भाऊंचं व्यक्तिमत्व फार उत्तुंग. भव्य असंच आहे. वारकरी क्षेत्रातील अशा महापुरुषाचा परिचय होणे, सहवास लाभणे हा काळ सर्वकाळ धन्यतेचा कृतार्थतेचा असतो.
आयुष्यात भजनाशिवाय कोणताही विचार त्यांच्या डोक्यात आला नाही. 'दिनरजनी हाचि धंदा | गोविंदाचे पोवाडे || ही तुकाराम महाराजांची उक्ती हरिभाऊंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडल्याचे दिसून येते. कुणाशीही बोलताना ते भजन याच विषयावर बोलतात. विचार करताना भजनाविषयीच करतात. 'बोलणेही नाही देवाविण काही' ही अनुभूती त्यांच्याशी चर्चा करताना येते. १९८५ नंतर भजन संस्कृती पुन्हा समृद्ध करण्यासाठी हरिभाऊंनी कठोर परिश्रम केले. त्यासाठी स्वतः तपश्चर्या केली. आज इतक्या उतार वयातही ते स्वतः पहाटे उठून रियाज करतात. आपला आवाज  जपण्यासाठी अनेक तऱ्हेचे पथ्य पाळून मनोनिग्रहाचे दर्शन घडवितात. स्वतःची भजन गायकी समृद्ध करत असतानाच ही गायकी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची तळमळ पाहून मन अचंबित होते. आजही दररोज तीन-चार तास रियाज केल्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथ, कल्याण, घाटकोपर, करीरोड येथे जाऊन विद्यार्थ्यांना भजनाचे धडे देतात. आपला विद्यार्थी भजन गायनात सर्वांगांनी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. रियाज करताना घोटून घेतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे हजारो शिष्य आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांचा आवाज गोड आणि सुराला धरून असेल त्याला संगीतातील समाज चांगली असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करीत सतत त्याला प्रोत्साहन देत असतात. तर एखाद्याची या क्षेत्रातील समज कमी असेल तर त्याला शिकविण्यासाठी स्वतः त्याच्यासोबत कष्ट घेतात. पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्यानंतर त्याच्या गळ्यातून एखादी तान ज्यावेळी उमटते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सार्थकतेचे आनंदी भाव तरळताना दिसतात. 

 

भजनानंदी हरिभाऊ रिंगे यांचा जन्म १९४२ मध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील लहुळसे या गावी झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर घरच्या गरिबीमुळे कुटुंबीयांची जबाबदारी शिरावर घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी १९५८ साली मुंबईस येऊन सुरुवातीला क्राऊन मिलमध्ये व त्यानंतर कमला मिल मध्ये नोकरी केली. दुर्गम कड्याकपाऱ्यात वसलेल्या लहुळसे ग्रामस्थांच्या मुंबईतील बैठकीच्या खोलीत राहून १९५९ सालापासून तब्बल ३६ वर्षे भजनसम्राट वै. खाशाबाबुवा कोकाटे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तर १९६२ साली अखिल महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सेक्रेटरी वै सदगुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचे शिष्यत्व पत्करून वारकरी संप्रदायाची द्योतक तुळशीमाळ कंठी धारण केली. 
पुढे खाशाबांचे शिष्यत्व पत्करून आपला छंद जोपासला, वाढवला इतकेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला. पन्नास-शंभर वर्षांपूर्वी संगीत किंवा संगीताचे शिक्षण घेणे याला समाजजीवनात फारशी प्रतिष्ठा नव्हती. घरदार सोडल्याशिवाय गायन कला वश होणे शक्य नाही अशीही सर्वसामान्यांची समजूत होती. ही विद्या शिकून लोकप्रियता व धनलाभ होऊन संसाराचा गाडा चालेल याची खात्री नसायची. संगीताची विद्या मुक्तहस्ते देणारे गुरु मुळातच संख्येने कमी होते. त्यात विक्षिप्त आणि तऱ्हेवाईक अधिक. त्यांची वर्षानुवर्षे सेवा केली तरी पदरात काही पडेलच याची खात्री नसे. ग्रंथांची उपलब्धता आणि प्रवासाची साधने आजच्या तुलनेने कमी. अनुदान, शिष्यवृत्ती नाही, प्रोत्साहन नाही, दिलासा देणारी दाद नाही त्यामुळे कसलेही भविष्य नाही. अशा प्रतिकूलतेवर मात करून ज्यांनी ही संगीत विद्या तिच्या प्रेमापोटी व ध्यासापोटी आत्मसात करून जोपासली, पाळली, सांभाळली व पुढील पिढीच्या हवाली केली अश्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ.

कलावंत हा मुळातच जन्माला यावा लागतो. त्याला त्याच्या भाग्याचे पैलू पाडणारा गुरु भेटला की जन्मजात कलावंत त्या क्षेत्रातील महान मानदंड होऊ शकतो. परंतु एखादा जन्मजात नसूनही त्या संगीत विद्येसी सर्वस्व समर्पणाच्या भावनेने झोकून त्याने परिश्रमाची सीमा गाठली तर तोही थोर विद्यावंत व कलावंत होऊ शकतो. हरिभाऊ आणि रामभाऊ या दोघांनी हे सिद्ध करून दाखविले. संगीताचा अभ्यास हा खरा तर सात अधिक पाच अशा बारा स्वरांचा पायाभूत अभ्यास आहे. ज्याच्या गळ्यावर हे बारा स्वर पूर्णार्थाने विराजमान झाले त्यालाच त्यापुढची वाट अधिक सुकर होते. संगीताचा साधक हा प्राधान्याने स्वरसाधक'' असलाच पाहिजे. ही संगीताची पहिली मागणी आहे. स्वरसाधना हीच या क्षेत्रातली पहिली मागणी असते आणि असायला हवी. आणि म्हणूनच गायनाचार्य हरिभाऊसारख्या स्वरसाधकाची वेळोवेळी वारकरी समाजाने पूजा बांधली. गेल्या ६० वर्षाचा वारकरी संप्रदायाच्या भजन क्षेत्रातील इतिहास लिहिताना हरिभाऊंना डावलून चालणार नाही. इतके या क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व आणि योगदान आहे. '
पोलादपूर तालुका हा खरं तर वारकऱ्यांचा तालुका. वै हबाजीबाबा, वै. हनवतीबुवा, वै मारुतीबाबा मोरे, वै गणेशनाथ महाराज, वै ढवळेबाबा, वै नारायणदादा घाडगे, वै श्रीपततात्या,वै विठोबाअण्णा मालुसरे, वै मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली, परंतु या क्षेत्रातील दुसरे अंग उणे होते. काही वर्षानंतर पखवाज वादनात ख्यातनाम स्व रामदादा मेस्त्री आणि गायनात हरिभाऊ रिंगे यांनी न्यूनता भरून काढली.हरिभाऊ कीर्तनात प्रमाण व चाली यांची बरसात करीत सोबतीला रामभाऊ मेस्त्रींचा पखवाज असला की कीर्तनात क्षणभर स्तब्धता होत असे.  
ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे नाव उच्चरताच एक निरागस, निर्मळ व निरहंकारी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. धोतर, सदरा त्यावर जॅकीट व डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा साधा सुद्धा पेहराव. आजही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा आहे की, हजारो व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधाच्या नात्याने त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. संगीत भजन क्षेत्रातील एक ज्येष्ठ कलावंत म्हणून त्यांचा आजही पंढरपूर, आळंदी, रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. आजही एखाद्या कीर्तनात रिंगे महाराज चाल म्हणायला उभे राहातात तेव्हा त्यांच्या गायकीचा थाट त्यांच्या या क्षेत्रातील ऐश्वर्याची साक्ष प्रत्येक तानेतून देतात. भजन ही वारकरी पंथाची मुख्य उपासना आहे. पारमार्थिक जीवनातून भजन वजा केले तर जीवन उपासनाशून्य होईल. वारकरी संतांनी आत्मोद्वाराकरिता भजन केले आणि लोकोद्वाराकरिता कीर्तन केले. भजन हे प्रभूचे निवासस्थान, जेथे हरिदास हरिभजन करीत असतात तेथे त्याचा अखंड वास असतो. अशा हरिभजनाचा वसा घेऊन त्याचा वारसा अनेकांना मुक्तपणे आयुष्यभर वाटणारे हरिभाऊ सावित्रीच्या कुशीतील लहुळसे गावचे.
त्यांच्याकडून धडे घेतले अनेक नामवंत भजन गायक आज महाराष्ट्रात आपल्या भजन गायकीचा ठसा उमटवीत आहेत. इतकेच नव्हे तर कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या अनेक मान्यवर प्रबोधनकारांनी त्यांच्याकडून स्वरांचे ज्ञान घेतले आहे. एखाद्या कीर्तनकाराची विषय मांडण्याची हातोटी चांगली असते. परंतु संगीत आणि स्वरांचे ज्ञान नसल्याने कीर्तनकारात न्यूनगंड येण्याची शक्यता असते. अशा अनेकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. भजन गायकी ही मनाला  समाधान देणारी कला असून भगवंताच्या जवळ जाण्याचे ते एक साधन आहे ते आत्मसात करताना खूप कष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे हरिभाऊ सांगतात.
कोणतीही विद्या किंवा कला वीर्यवती व्हावयाची म्हणजे ती केवळ निखळ श्रद्धेने आत्मसात करावी लागते. ज्या गुरूकडून विद्या संपादन करावयाची त्याच्याविषयी त्या विद्यार्थ्यांच्या मनात  असीम श्रद्धा असावी लागते. शिवाय जी विद्या हस्तगत करायची असते तिच्याबद्दल उत्कट प्रेम असावे लागते. 'स्वीकृत गुरु आणि संकल्पित विद्या' या दोघांवरही परम श्रद्धा असावी लागते. समर्थ रामदास स्वामी याबाबत म्हणतात-



जाणत्यासी गावे गाणे | जाणत्यासी वाजविणे |
नाना आलाप सिकणे | जाणत्यासी ||
जाणता म्हणजे ज्ञानी गुरु, जे शिकायचे ते जाणत्याकडून शिकले म्हणजे विद्येत काही न्यूनता उरत नाही.
संगीतात घराणी मानावीत की नाही, घराण्यांच्या शिस्तीच्या चौकटीनुसार मैफल करणारा प्रतिभावान असतो की नसतो. या प्रचलित वादाच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष बुद्धीने मान्य करायला पाहिजे की हरिभाऊंनी अथक परिश्रम करून वारकरी संप्रदायात आपले योगदान सिद्ध केले आहे.
खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न करता तो मडके साकारणाऱ्या कुंभारासारखे कष्ट घेतो. कुंभार जसा ओली माती मळून योग्य मिश्रण करून त्या मातीतून हळुवार हाताने सुबक मडके आकारास आणतो, तसाच खरा गुरुही शिष्यरूपी ओल्या मातीत सुविचारांचे-सद्गुणांचे सिंचन करून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करत असतो, हरिभाऊंकडे समाज याच दृष्टीकोनातून पाहत आला आहे.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई







 

 

 

 

 

 

 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

पोलादपूरकरांनी वारकरी संचित जोपासले - प्रविण दरेकर

 पोलादपूरकरांनी वारकरी संचित जोपासले - प्रविण दरेकर



मुंबई : (रवींद्र मालुसरे) महाराष्ट्राच्या वैभवशाली संत परंपरेचा मोलाचा वारसा या भूमीत जन्मलेल्या शेकडो संतांनी जोपासला. ज्ञानेश्वर ते तुकाराम या वारकरी संप्रदायातला महत्वाचा टप्पा. आणि हेच मराठी माणसाचे संचित आहे, त्याचबरोबर पोलादपूर तालुक्यात दुर्गम खेडोपाडी जन्मलेल्या वारकरी सांप्रदायातील धुरीणांनी गेल्या शंभर वर्षात आपल्या सुगंधित कार्याने तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात करून दिली आहे. त्यांचे ऋण पुण्यात राहणाऱ्या तुम्हा तालुकावसीयांच्या मनात असल्यानेच त्यांना अर्पण करणारी दिनदर्शिका तुम्ही प्रकाशित करीत आहात हा विचार मला मोलाचा वाटतो. असे उदगार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे या संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या धार्मिक दिनदर्शिकेचे प्रकाशन दरेकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी पुण्यात बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भवनासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर केली. यावेळी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी संघाने केलेल्या ठळक कामांचा आढावा घेताना पोलादपूर मधिल दरडग्रस्त आणि पूर ग्रस्तांसाठी भरघोस मदत केली होती. तसेच पुणे मनपाने आवाहन केल्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते असे सांगितले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, शहर संघटक राजू कदम, नगरसेवक पुणे मनपा आदित्य माळवे आदी मान्यवर उपस्थित होते.


मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

 

नादब्रम्हाचा उपासक

सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर 

पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह, भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५  ते  १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे, ढवळे बाबा,नारायणदादा घाडगे, गणेशनाथ बाबा, हनवतीबुवा, हबुबुवा, ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाअण्णा मालुसरे, ढवळे गुरुजी, भजनानंदी हरिभाऊ रिंगे, सुप्रसिद्ध पखवाजवादक रामदादा मेस्त्री, शंकर मेस्त्री, भाईबुवा घाडगे, विठोबा घाडगे (पखवाज), विठोबा घाडगे (गायक) अशी बुद्धिमान आणि ईश्वराशी समरस झालेली मोठी माणसे होऊन गेली. त्यावेळी पांडुरंगबुवा आपली गायनकला भजन-कीर्तनातून श्रोत्यांसमोर सादर करीत होते. हळूहळू त्यांचा वेगळा असा श्रोतृ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आजरेकर समाज फड आणि पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायासह संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना "रायगड भूषण" पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविले होते. 

        सुरवातीच्या काळात तरुण वयातच त्यांना गावागावातील भजने ऐकून त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर  गायनाचार्य पं रामबुवा यादव (लोअर परेल) यांच्याकडे संगीत भजन शिकण्यास सुरुवात केली. यादवबुवांकडे काही काळ संगीत भजनाचे धडे घेतल्यानंतर सेंच्युरी गिरणीतील नोकरी आणि गावाकडची शेतीवाडी यामुळे त्यांना संगीत क्षेत्रातील शिक्षणाला वेळ देवू शकले नाहीत, मात्र त्यांनी स्वसाधनेने शास्त्रीय संगीताची साधना केली.  किर्तनात गायनसाथ करण्याची संधी लाभलेल्या पांडुरंगबुवांच्या आवाजात विशेष गोडी होती. आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने पोलादपूर, मुंबई, आळंदी, पंढरपूर परिसरातील श्रोत्यांना देखील बुवांच्या सुमधुर आवाजाची भुरळ पडली. वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम वारकरी पंथात आहे.आजरेकर फडाच्या जवळपास पाच पिढ्यांशी ते एकनिष्ठ राहिले. आळंदी-पंढरपूर पायी वारीतील बऱ्याचदा ज्येष्ठ म्हणून मुख्य चाल म्हणण्याचा अधिकार फडप्रमुख त्यांना देत असत. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होत असत त्यावेळी सेंच्युरी मिल भजन मंडळ सतत पहिला क्रमांक पटकावत असत. भजन सम्राट वै मारुतीबुवा बागडे यांच्या साथीला बुवा नेहमी असत.

 पांडुरंगबुवांना मानणारा वारकरी संप्रदायातील एक मोठा वर्ग आहे.  काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अखेर आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाल्याची भावना कलाकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावे लागते. त्यासाठी नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची  साधनाही असावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते. पांडुरंगबुवा उतेकर तसे खरेच भाग्यवान ! वय वर्षे ८७ या उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहुबाजुंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरणारा हा आवाज खूपच जबरदस्त गोड. साधारणपणे बारीक, टोकदार, रुंद, घुमारदार, पिळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची  आस आणि गोडवा हेही त्यात होतेच. कोणतीही गायकी जन्माला येते तेव्हा ती परिपूर्ण नसते. हळूहळू ती परिपक्व होत जाते. गाणारा स्वरभास्कर अस्ताला गेला असला तरी त्यांची आठवण कायम राहील.  पोलादपूर वासियांच्या इतिहासात घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांचा काळातील पिढीने समृद्ध केले. पांडुरंगबंवा यांनी तर शेकडो अभंगांच्या पाठांतरामुळे वारकरी कीर्तन लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतातील रागांची तोंडओळख खेड्यापाड्यातल्या लोकांना भरभरून करून दिली. अनेकांना गाण्याची आवड लावली. खेडोपाडीच्या नुसत्याच भक्तीनं किंवा भावनेनं वेडेवाकडे गाणाऱ्यांना शास्त्रकाट्याची कसोटी दिली. त्यांचं गाणं वाढवलं. आणि संगीताच्या गाभाऱ्यात श्रद्धेचं, भक्तीच निरांजन लावलं. त्यांच्या वागण्यातला साधेपणा, गोडवा, निरागसता, समरसता, भक्ती हीच त्यांच्या गोड गळ्यातून स्वरांच्या रूपाने बाहेर पडत असे. गायकासाठी सूर हाच ईश्वर आहे व तो सच्चा लागला तरच ईश्वराला प्रिय आहे.   

या क्षेत्रात वावरताना त्यांना मानमरातब, आदर नेहमीच मिळत राहिला. पूर्वजन्मीचे सुकृत त्याला कारणीभूत असावे, ते अशा घरात जन्माला आले की तिथं स्वर-तालाची पूजा होत नव्हती. लहानपणी काहीसा पोरकेपणा वाट्याला आला होता. परंतु वर्तनातूनच आपल्यामधील कलेमध्ये हुनर दाखवत एक साधा माणूस म्हणून ते 'उजेडी राहिले उजेडी होऊन' जगले.  त्यांच्या गाण्यातला मोठा बिंदू म्हणजे भक्ती ! भक्ती  म्हणजे  भक्तिपदे गायन करणे नव्हे. तर गायकाच्या स्वभावातून निर्माण झालेला भक्तीचा भाव आणि त्या भावातून निघालेले स्वर आणि राग याच्यांशी एकरूप होऊन समर्पित होण्याची भक्ती आणि हीच गाण्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या लोकांनी पांडुरंगबुवांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ज्यांना त्याची प्रचिती मिळाली ते सर्वजण धन्यता व सार्थकतेचा अनुभव करतात. म्हणूनच गेली पाच दशकांतील पिढ्यासाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. मध्यसप्तकाचा षड्ज हा संगीतातील 'आधारस्वर' होय हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. सर्व सांप्रदायातील वारकरी बंधूना नम्रपणे हात जोडून नमस्कार करणारा पांडुरंगबुवांचा प्रेमाचा आधार मात्र यापुढे नसेल मात्र त्यांची कीर्ती दिगंत उरणार आहे. 
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

रवींद्र मालुसरे (अध्यक्ष)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

 

दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा  एक अविभाज्य भाग आहे.  म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.

दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे.

या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती. मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती. त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे.  गेली ११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.  गेल्या ११३ वर्षांमधील  दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते.  शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे.  त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि  विक्रेत्यांना वाटते आहे.  कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.

दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज, दीपावली, आवाज, चंद्रकांत, धनंजय, किस्त्रीम, साधना,हंस, नवल, शतायुषी, आक्रोश, कलाकुंज, प्रसाद, धर्मभास्कर इत्यादी  दिवाळी अंक २५, ५० किंवा किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत.

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक  विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली.  या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला  या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहेत. दोन वर्षे लागोपाठ जागतिक कोरोना संकट टाळेबंदीचा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते आहे.  साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. 'कोरोना'मुळे बाजारात दिवाळी अंक येणार नाहीत असे वातावरण तयार होत असतानाही आलेल्या इतर अनेक संकटांवर मात करीत, नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.  'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही', अशा तक्रारी कानावर येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे. परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,  महाराष्ट्रामधे गेल्या वर्षभरात वादळ आणि पावसाच्या  महापूराने थैमान घातलेले आपण अनुभवले  आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर व  विस्कळीत झालेले जनजीवन या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे  केवळ परंपरा खंडित होऊ नये या  हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे.  या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.

 भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी. 

मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. 

महागडे मोबाईल आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना  धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती स्वतःला समृद्ध करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी आत्मीयतेने  मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !

 रवींद्र तुकाराम मालुसरे,  अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४  

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...