शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

वाचन प्रेरणा दिन

 वाचनाचे महत्त्व

वाचन’ ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे हे खाली दिलेल्या मुद्द्यावरून अधिक स्पष्ट होईल :- 

💐रवींद्र मालुसरे (अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)💐

वाचन प्रेरणा दिवशी विजयादशमीचा सुवर्णयोग. चला वाचूया.. विचारांचं आणि ज्ञानाचं सोनं लुटुया.

आपण लिहिलेलं प्रत्येक वाक्य भविष्यात अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. 

भविष्यातल्या असंख्य वाचकांसाठी लिहिते व्हा, व्यक्त होत रहा, प्रेरणा देत रहा.

वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. केले आहे.

» ज्या देशात मोठी ग्रंथालये असतात, तोच देश मोठी प्रगती करू शकतो. भारतात आजही वाचन संस्कृती आणि ग्रंथालय यांच्या विकासाला पुरेसे महत्व दिले जात नाही 
» आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. आज जर त्यांचा वर्तमान चांगला असेल; तर देशाचे पुढील भविष्यही चांगलेच असेल. त्यासाठी लहान मुलांना चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांना वाचनाची सवयी लागणे अगत्याचे आहे.
» एकदा एक व्यक्ती इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या घरात गेली घरातील इतस्तत: पडलेली भरपूर पुस्तके पाहून त्यांनी ती बुकशेल्फ मध्ये का ठेवली नाही अशी विचारणा केली ? तेव्हा ते लेखक म्हणाले - ज्या मार्गान मी ही पुस्तके जमविली आहेत, त्या मार्गाने बुकशेल्फ जमवायला गेलो तर तुरुंगात जाईन मी. याचा अर्थ त्यांनी बरीच पुस्तके ग्रंथालयातून चोरून आणून आपला वाचनाचा छंद जोपासला होता हे यावरून लक्षात येते.

» "Shakespare read the novel 'Plutarck' and got inspired by it and started his carrier as Author. He had also read poet Milton Homer and Orids Literature."

» Author Bitcher says that if you make a book as you teacher, they will guide you how to show strength, hardwork to succeed in your life.

» Mr. George Eliot spent his many years in reading Novels.

» When you give someone a book , you do not give him just paper, ink & glue, but you give him a chance to make the possible of a whole new life. ~ Christoper Morley

» No man can be truly educated in life, unless he is a reader of books. ~ Bejamin Franklin

» A room without books is like a body without sole. ~ Cisero

राजसत्तेतल्या कारभारणी ..... महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप

राजसत्तेतल्या कारभारणी .....

महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप


स्नेहल माणिकराव जगताप ... महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली 'सावली; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या, कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण....

महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी श्री. वीरेश्वर देवस्थानच्या  गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले हा इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर पडत गेली. 

महाड-पोलादपूर हा मतदारसंघ हा तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा हा मतदारसंघ आहे. पुर्वी महाड - पोलादपूर या मतदारसंघाची हा "समाजवाद्यांचा" मतदारसंघ अशी ओळख होती. क्रांतिवीर नाना पुरोहित, मोहन धारिया, नानासाहेब कुंटे, किशोर पवार, शांतारामभाऊ फीलसे, अशी समाजवादी नेत्यांनी नेतृत्व केले आहे. श.बा सावंत, चंद्रकांत देशमुख आणि माणिकराव जगताप अशी काही वर्षे काँग्रेसची सोडली तर १९९० नंतर हा "शिवसेनेचा" मतदारसंघ झाला. अगदी अपवादात्मक परिस्थितीत येथे काँग्रेसला यश मिळाले. महाड विधान सभा मतदार संघ हा कायम काँग्रेस विरोधी विचारांचा राहिलेला आहे. चंद्रकांत देशमुख, व माणिकराव जगताप यांना सोडले तर पुन्हा कधी या मतदार संघांत यश मिळविता आले नाही. एकदा तर सम-समान मत झाल्यामुळे चिठ्ठीवर टाकून इथला आमदार निवडला गेला होता.

गेली पंधरा वीस वर्ष या प्रतिकूल मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन माणिकराव जगताप उभे होते. महाड तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून ते तीन वेळा यापूर्वी निवडून आले आहेत.  २००४ चा अपवाद सोडला तर विधानसभा निवडणुकीत यश त्यांना हुलकावणी देत राहिले आहे. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती,  एकदा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला किंवा तो निवडणुकीच्या राजकारणातून थोडा बाजूला झाला तर कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत जातो. पण काळाच्या ओघात जेव्हा 'माजी' हा शब्द राजकारण्यांच्या मागे जेव्हा लागतो तेव्हा प्रवाहापासून माणसे दुर होत जातात, माणसांच्या गर्दीला ओहोटी लागते पण माणिकरावांना जनतेचे निर्व्याज्य प्रेम सतत लाभत आले होते. अशा प्रभावशाली राजकारण्याच्या घरी जन्माला आलेल्या स्नेहलजींना राजकारणाचे बाळकडू घरूनच मिळाले. माणिकराव जगताप यांच्या त्या सुविद्य कन्या. महत्वाच्या चर्चेसाठी घरी येणाऱ्या राजकारणातील मान्यवरांचा सहवास मिळाला त्यातूनच त्यांचे राजकीय शिक्षण झाले.शिक्षण होईपर्यंत स्नेहलताई राजकारणापासून दूरच राहिल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये माध्यमिक तर कीर्ती महाविद्यालयातून बी.एसी.एल.एल.बी शिक्षण घेतल्यानंतर अलिबागच्या एल.एल.बी. जे.एस. एम कॉलेज मधून पदवी संपादन केली.

मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला महाड शहरात सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि  नंतर त्या अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर दिसू लागल्या. २०१६ मध्ये त्या थेट महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरल्या आणि मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खऱ्या अर्थाने स्नेहलजींच्या राजकारणाराला सुरुवात झाली.

सर्वांना हसत-खेळत आपलसे करून मिळून-मिसळून राहणाऱ्या,ऐतिहासिक महाड शहराच विकासात्मक कायापालट करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचं कमालीचं समीकरण असणाऱ्या महाड नगर परिषदेच्या कार्यसम्राट नगराध्यक्षा म्हणून गेल्या ४ वर्षात स्नेहल माणिक जगताप यांनी आपला ठसा उमटवला आहे.

महाडच्या १५० वर्षाच्या नगरपालिका इतिहासात प्रथमच जनतेतून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार. आणि त्यासुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत. महाड शहराचा आपल्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडताना नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या काळात महाडकरांना देण्यात आलेल्या जवळपास प्रत्येक आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली. त्यामध्ये राजमाता जिजाऊ कन्यारत्न योजना (१०लाख),महाडकरांचा विमा (१५लाख),महाड शहरात वायफाय सुविधा(१५लाख), महिलांसाठी इ टॉयलेट (१५लाख),महाड शहर सुशोभीकरणासाठी

१ कोटी २५ लाख मंजूर केले. आणि हा अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही. आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास पाच वर्षात महाड शहराचा कायापालट करण्याची ग्वाही आपण निवडणूक प्रचाराच्या काळात महाडकरांना दिली होती. त्याची पूर्तता आपण केली आहे असे त्यांच्या भाषणात त्या म्हणाल्या तेव्हाच महाडकरांना भविष्यात चांगले दिवस येतील हे दिसू लागले. आणि याची प्रचिती लवकरच आली. नगरपालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे अहमदनगरच्या "सह्याद्री समूहाच्या वतीने  "सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार-२०१७" गौरविण्यात आले. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात प्रथम आणि कोकणात दुसरा क्रमांकावर घेत शासनाकडून ५ कोटीचे बक्षीस सुद्धा पटकावले. महाड शहरात जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी क्लोरियशन यंत्रणा कार्यान्वियत केली आहे.

राजकारणाचा वारसा असतानाही स्नेहल यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही त्यांनी नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले. संवेदनशील स्वभावामुळे लोकांचे प्रश्न वेगाने मार्गी लागावेत यासाठी त्या अनेकदा संबंधितांशी स्वतः संवाद साधतात. प्रश्न समजून घेत असतात आणि ते तातडीने उपाययोजना होत मार्गी कसे लागतील याच्या प्रयत्नात राहतात. महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यांचे वडील आणि राजकारणातील 'गॉडफादर' माणिकराव जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे.



 त्यांच्याबद्दल तरुणांमधल्या मोठ्या वर्गाला त्यांच्याविषयी आकर्षण होते, त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा एकदा करावे अशी इच्छा अलीकडे जोर धरू लागली होती. आणि त्यांना संधी मिळाली तर अभ्यासू वृत्तीने आपले वडील नक्की विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघात ते बदल घडवून आणतील असा विश्वास स्नेहलजींना होता. कोणत्याही पदावर नसताना हा विश्वास जनतेत टिकुन ठेवणं ही माणिकरावांची मोठी जमेची बाजू होती आणि हीच जिद्द एकदिवस त्याना नव्याने हि संधी मिळवून देण्यासाठी स्नेहलताई भविष्यात कठोर परिश्रम घेणार होत्या, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकरावांनी हे जग सोडले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यासह कोकण आणि राज्यात कार्यकर्ते आणि जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला. एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कुशल संघटक,आक्रमक आणि तडाखेबंद वक्तृत्व काँग्रेसने आणि तमाम जनतेने गमावले. कार्यकर्ते दुःखात असताना त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला. असे असताना महाड नगरीच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या म्हणजेच माणिकराव जगतापांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून स्वतःला सावरत महाडवर आलेले पुराचे प्रलयंकारी संकट लक्षात घेतले. त्या दुसऱ्याच दिवशी आपल्या कार्यालयात हजर झाल्या. स्नेहल जगतापांचे आगमन कार्यालयात होताच सर्व अधिकारी वर्ग व तेथे असणारे सर्व लोक अवाक झाले होते.


आता मात्र त्यांना स्वतःच्या ताकदीवर दमदारपणे पण सावधानता बाळगत पाऊलं टाकावी लागणार आहेत.

--- रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

'अँग्री यंग मॅन' अमिताभ

 


बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज ८ वा वाढदिवस.  आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केलं आहे. 

बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या ८ व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी  ठरणारा या रुपेरी पडद्यावरच्या अनभिषिक्त सम्राटाचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा  !

'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असलेल्या अमिताभ यांनी १९६९ च्या दशकापासून सिनेसृष्टीचे रुप पालटले. चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी १८० हून अधिक चित्रपटांत काम केले. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्तम अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंच चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवलाय. अग्नीपथ, ब्लॅक, पा आणि २०१५ मध्ये आलेला पिंकू या सिनेमांसाठी बिग बींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन यांनी गायक, निर्माता आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं आहे.


भारत आणि जगभरातल्या सात विद्यापीठांकडून अमिताभ यांना डॉक्टरेट  देण्यात आलीय. यात इजिप्तमधल्या अकॅडमी ऑफ आर्ट्स आणि ऑस्ट्रेलिया  क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटीजचा समावेश आहे. देश-विदेशातले शंभराहून अधिक मानाचे पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत. भारत सरकारचा पद्मविभूषण  तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमिताभ यांना प्रदान करण्यात आलाय. लंडनमधल्या प्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयात अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय. हा मान मिळवणारे अमिताभ बच्चन हे आशियातले पहिले अभिनेते आहेत.

अमिताभ बच्चन हा महानायक ... पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या टीव्ही शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन  तब्बल २० कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. या वयातही त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही.

अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, हे यापूर्वी अनेकदा लिहून आले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला जंजीर, दिवार या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. ७२ च्या युद्धानंतर आणीबाणी लादेपर्यंतचा तो काळ म्हणजे व्यवस्थेविरुद्ध खदखद होती. ती सुरुवातीला जंजीर आणि दिवार चित्रपटातील नायक अँग्री यंग मॅन अमिताभच्या रूपाने पडद्यावर लोकांना दिसली, अभिनयाचा तो अंगार आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर ठसलेला आहे. अडल्या-नाडलेल्यांची पिळवणूक करणाऱ्यांना ठोसे लगावणारा कोणीतरी मासिहा अवतीर्ण व्हावा असे लोकांना वाटत होते असा तो काळ. 

सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटच्या मृत्यूच्या सीनपर्यंत मनाची पकड घेतो. अमिताभ या चित्रपटामुळे सुपरस्टार झाला तो आजही त्या पदावर विराजमान आहे. 

अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मधील त्यांचे सूत्रसंचालन खूपच लोकप्रिय आहे

दादासाहेब फाळके पुरस्कार या भारत सरकारकडून दिला जातो त्यासाठी अमिताभ यांची दोन वर्षांपूर्वी निवड केली. हा एक वार्षिक पुरस्कार असून भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीतील त्याच्या योगदानाला सरकारने दिलेली ही कौतुकाची थाप असते. 



- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४


गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

सामाजिक कार्यकर्तृत्वाची दुसरी माळ

 पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी



जीवरसायन शास्त्रामध्ये मूलभूत संशोधन करणा-या पहिल्या भारतीय महिला कमला सोहनी या ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या त्या भगिनी होत.  कमला भागवत-सोहोनी यांचं भागवत घराणं साधी राहणी, उच्च विचारसरणी असं होतं. सर्वच माणसं बुद्धिमान. घेतलेलं काम उत्तमरीत्या तडीस नेणारी. कमलाबाईंचा जन्म १९११ सालचा.  त्यापूर्वी मागच्या पिढीतली त्यांची आजी मॅट्रिक झालेली, इंग्रजीवर प्रभुत्व असलेली होती. मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यापूर्वी लग्न नाही, या ठाम विचारांची. त्यांच्या नाती त्यांना इंग्रजीबद्दलच्या शंका विचारीत. आत्या, काका घरातले सर्वच लोक उच्च शिक्षण घेतलेले.

दुर्गाबाई, कमलाबाई आणि विमलाबाई तिघीही बहिणी शिकल्या. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळवणा-या त्या पहिल्या आणि त्या काळातील एकमेव महिला होत्या. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आणि स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती मिळवल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगलोर’ या संस्थेत प्रवेश मिळवला.  इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.'

 जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कमलाबाई सोहोनी यांचा भारतातल्या पहिल्या स्त्री शास्त्रज्ञ म्हाणून सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यांतील प्रथिने शोधणे, निरा पेयाचे परिणाम व उपयोग आणि ताडगुळाविषयीचे त्यांचे संशोधन.

१९३६ मध्ये कमलाचा प्रबंध पूर्ण झाला. तिला मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. आता पीएच.डी.! तिने जानेवारी १९३७ मध्ये मुंबईच्या हॉफकिन इन्स्टिटय़ूटमधे प्रवेश घेतला. औषधासाठी प्राण्यांचं विच्छेदन करण्याचं काम तिच्याकडे आलं. ते काम करता करता इकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं चालू होतं. आणि मुंबई विद्यापीठाने तिला दोन शिष्यवृत्त्या दिल्या. ‘स्प्रगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणारीही ती पहिलीच विद्याíथनी. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये तिने अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. तिला पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमलाने केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही अजब मुलगी कोण? तिची माहिती कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी ध्येयवेडी मुलगी आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’ फार प्रभावित झाली. त्यांनी कमलाला ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ (१९३८) ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमलाला पडला. तिने हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमलाला अत्यंत आनंद झाला. मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं तिला सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर ती भारतीय, शिकत होती केंब्रिजमध्ये (म्हणजे युरोपात) आणि अमेरिकन फेडरेशनने तिला फेलोशिप दिली म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला ती गेली. तिला ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात तिने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली. तिच्या या भाषणाचं अर्थातच कौतुक झालं.

केंब्रिजला परतल्यावर तिचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता तिनं व डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने काम करत असताना तो क्षण आला. अचानक कमलाला एक महत्त्वाचा शोध लागला. बटाटय़ातील प्रेसिपिटेट हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना तिला एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. तिने आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चच्रेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व ‘नेचर’मधील त्यांच्या लेखाचा (१९३९) उल्लेख असतोच. ‘वनस्पतींमध्ये सायटोक्रोमचा शोध’ हा पीएच.डी.चा विषय तिला आवडला. तिने मार्गदर्शक रॉबिन यांचा सल्ला घेऊन प्रबंध लिहिला.

केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी ती पहिली भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या उदात्त विचाराने ती भारतात परतली..

तत्पूर्वी, भारतात परतण्यापूर्वी एक घटना घडलेली होती.. दिल्लीच्या लेडी हार्डिज कॉलेजला ‘लेडी डफरीन फंड’ची मदत होत होती. आणि त्या फंडच्या सल्लागार समितीवर कमलाबाईंचे केंब्रिजमध्ये गुरू सर एफ. जी. हॉफकिन्स होते. त्या कॉलेजमध्ये जीवरसायनश्स्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभाग प्रमुख म्हणून सर हॉफकिन्सनी कमलाबाईंचं नाव कळवून टाकलं. त्या वेळी कमलाबाई पीएच.डी.साठीच्या संशोधनात मग्न होत्या. त्या हॉफकिन्सना म्हणाल्या, ‘मी ज्या कामासाठी इथे आलेय ते पूर्ण झाल्याशिवाय परत जाण्याचा विचारही करणार नाही.’ हॉफकिन्सना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी दिल्लीला कळवलं, ‘ती जागा कमला भागवत यांच्यासाठी राखून ठेवावी. ते पद भरू नये.’ त्यामुळे भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून कमला भागवत दिल्लीत लेडी हाìडज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्यामहाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना (एम.एस्सी.) त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत.

पुढे कमलाबाई इन्स्टिटय़ूटच्या संचालक झाल्या. या पदाची धुरा नि:पक्षपाती बुद्धीने सांभाळून १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या. प्रख्यात शास्त्रीय संशोधन संस्थेच्या त्या पहिल्या स्त्री संचालक ठरल्या. त्यांनी इतिहास घडवला. कमलाबाईंच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे.

त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात गुरूचं नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून आणि आपुलकीने प्रेमाने ज्ञान दिलं. निवृत्त झाल्यावरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ इंडियासाठी काम करीत तिथेही अन्नातली भेसळ कशी ओळखायची यावरती शिबिरं घेतली. यावरती प्रात्यक्षिक देऊन खेडय़ापाडय़ात, शहरात सर्वसामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोध पेटी तयार केली. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं.१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाशांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण अगदी थोडय़ा दिवसांत त्या गेल्याच. तारीख होती २६ सप्टेंबर १९९७. वयाच्या ८५ व्या वर्षी त्या अनंतात विलीन झाल्या. कमलाबाईंनी केंब्रिजपर्यंत धडक मारली आणि प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन करता उत्तम काम केलं. या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रेमळ कर्तव्यतत्पर शास्त्रज्ञस्त्रीला माझे लाख लाख प्रणाम !



..... रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

 

सामाजिक कार्यकर्तृत्वाची पहिली माळ

  ज्ञानाई सावित्रीबाई फुले 



सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. क्रांतिबा जोतिराव फुले यांच्या पत्नी.  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली.त्या शाळेत जय लागल्या कि कर्मठ लोक त्यांच्यावर दगड,शेण व चिखल फेकत असत. काहीजण त्यांच्या अंगावर धावून जात परंतु ह्या सर्वाना सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले.  अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. तसेच पुण्यात व मुंबईतही मुलींसाठी शाळा सुरु केला. गिरगावातील कमलाबाई हायस्कुल अजूनही कार्यान्वयीत आहे. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.

१९  व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते.  शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा १० पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.

स्त्रियांसोबत होणाऱ्या क्रूर प्रथाना त्यांनी विरोध केला. बालविवाह,बाळ-जरठ विवाह, सतीप्रथा,केशवपन अश्या नावाखाली वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी सरकार दरबारी आवाज उठवला. तरुण मुली अनेकदा नराधमांच्या शिकार बनत त्यांच्या आणि गरोदर विधवांच्या संततीला समाजात मंचाने स्थान नव्हते. अशा स्त्रियांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करताना त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. सावित्रीबाई व ज्योतिराव फुलेंना स्वतःचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला. पुढे रीतसर यशवंतला दत्तक घेतले. तसेच त्याच्या आईचा सांभाळ केला अनेकांचे आंतरजातीय विवाह लावून दिले. पुनर्विवाह चळवळीत भाग घेतला. विधवा केशवपना विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास १८५६ मध्ये मान्यता मिळाली. 



सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. त्यामुळेच १८७६७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.'काव्यफुले' व 'बावनकशी' हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा जन्मदिन हा 'बालिकादिन' म्हणून ओळखला जातो.



रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४ 

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधीजी कळणार नाहीतच

 

मेल्यानंतरही माणूस जिवंत राहतो काय ? तो माणूस कसा आहे यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे किंवा तो माणूस कशासाठी जगत होता यावरही अवलंबून आहे.

मारूनही जीवंत राहातो...प्रेषित म्हणून जगाला प्रेरणा देत नतमस्तक व्हायला लावतो तो "गांधी"
स्वातंत्र्य-संघर्षात, जीवन संग्रामात माणसाची कुळी लावणाऱ्याने जगावे कसे व मरावे कसे यांची मोलाची शिकवण देणारा गांधी नावाचा एक भणंग महात्मा जन्माला आला होता. केवळ भाषणापूरता, कृतीपुरता, किंवा लौकिकापुरताच लोकोत्तर नव्हे तर साध्या साध्या दैनंदिन गोष्टीत, अविर्भावात व श्वासोच्छ्वासात लोकोत्तर वाटणारा हाडामासाचा कुणी एक 'गांधी' नावाचा माणूस या भारत भूमीत वावरला यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहीशा उशिराने जन्मलेल्या आमच्या पिढीला गांधी फक्त पाठ्यपुस्तकातून माहित होते, गांधींना पाहिलेली वा त्यांच्या हाकेला ओ देत चळवळीत भाग घेतलेली पिढी संपत चालली आहे. पडद्यावरचा गांधी मात्र घराघरांत पोहोचला.
ब्रिटिश निर्माता रिचर्ड एटनबरो यांनी १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा तर राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.


निष्पाप माणसाचं जेव्हा जालियनवाला बागेत क्रूर हत्याकांड केले जाते तेव्हा हा महात्मा गांधींनी ब्रिटिशांना इशारा दिला होता, 'तुम्ही जा नाही तर तुम्हाला जावे लागेल.' गांधीजी हे केवळ निर्भय नेते नव्हते तर शाश्वत सत्याचा आग्रह धरणारे आणि तेच ध्येय उराशी बाळगणाऱ्या समुदायाचे नेतृत्व करणारे होते. अफगाणिस्तान पासून बांगलादेश पर्यंत सर्वधर्मीय स्वातंत्र्याच्या ध्येयापोटी गांधींना नेता मानून एकत्र
आले होते, कारण गांधींच्या नेतृत्वात लोकांना जगण्याची नैतिकता स्पष्ट दिसत असे. गांधी म्हणजे निर्मळ, अधिक उन्नत, उदात्त, निर्भयता, धैर्य आणि त्याग यांचे जीवंत प्रतीक होते म्हणूनच नायक या नात्याने स्वीकारले होते.

गांधींचा निर्भयपणा, बावनकशी सच्ची प्रामाणिकता आता कुठेच दिसत नाही. मूल्यहीन समाजात आपण एकमेकांना, परस्परांना ओरबाडून घेण्यात मग्न आहोत.
गांधीहत्येपूर्वीच तुकडे झालेल्या या अवाढव्य देशात आजच्या घडीला आमच्या तरुण पिढीला दिसतोय उध्वस्त जीवन जगणारा अफाट जनसमुदाय. बंद उद्योग, बेकारी आणि बेशिस्त, बेजबाबदार राजकारणी आणि त्यामुळेच लोकशाहिवरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास आपण पाहतोय.
गांधीने गोऱ्यांचे राज्य खालसा केले पण गेल्या ७४ वर्षात आपल्याच काळ्या माणसांच्या राज्यात जातीय दंगे, राजकीय हिंसाचार आणि प्रांतीय संकुचित दृष्टीचा उदोउदो चौफेर ऐकू येतोय !
खून, मारामाऱ्या, गुंडगिरी, हिंसाचार व क्रौर्य यांचा सुळसुळाट असलेल्या गुन्हेगारी दुनियेतच आपण जगतोय. त्यातूनच अस्थिरता, असुरक्षिता यांनी आम्हाला पुरतं घेरलेय. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या समाजजीवनात वासना, विकृती, द्वेष, लोभ, स्पर्धा, मत्सर, लाचारी आणि स्वार्थ, राजकिय वारसदारी या प्रवृत्तींना उधाण आलंय आणि त्याचमुळे वैफल्य भावनेने युवकाला ग्रासले आहे.


गांधींनी आयुष्यभर ज्या स्वप्नांना जिवापाड जोपासले त्यांची होत असलेली होळी आपण पाहतोय. काँग्रेसने गांधींच्या 'रामराज्य' या संकल्पनेचा पार विचका केला तर ज्यांनी गांधींच्या हत्येचे समर्थन केले तेच 'गांधीवादाचा बुरखा' पांघरून त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत आपल्याकडे मते मागत आहेत.
गांधीजी मध्ये काय होते, अतिशय विशुद्ध अशी सत्यसाधना आणि करुणेचा ओलावा..... म्हणूनच मित्रांनो महात्मा गांधी या व्यक्तीची हत्या होऊ शकली मात्र त्यांच्या विचारांची नाही. ज्या शतकात विंधवस्क बॉम्ब जन्माला आला त्याच शतकात मोहनदासचा जन्म झाला जो पुढे जगाच्या अंतापर्यंत
एक प्रेषित म्हणून 'महात्मा गांधी' नावाने शिल्लक राहणार आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

दारुच्या व्यसनातून पतीला बाहेर काढणाऱ्या सोशिक पत्नीच्या संघर्षाचीही ही कहाणी





*मद्यपी लोक हो, जीवन मातीमोल करू नका 

त्याकरिता वाचावेच लागणारे हे आत्मकथन !*


https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=4771461299581344&id=100001525637794

वरील लिंक क्लिक करा .... महत्वाचा व्हिडीओ जरूर ऐका 

ही आहे शालेय वयापासून सिगारेट आणि दारु पिण्याच्या व्यसनामुळे जीवन मातीमोल करणाऱ्या माणसाची सत्यकथा.

दारुच्या व्यसनामुळे जीवनाची कशी दुर्दशा होते ? या पुस्तकातील पहिली सात-आठ पृष्ठेच वाचल्यावर मद्यपी आणि सर्वसामान्यांच्या अंत:करणात खोलवरच्या 
कप्प्यात शरमेने ढवळाढवळ होते. 

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या सुमारास सिगारेट-बिअरने केलेल्या मजेच्या नशेने या माणसास दारुडा म्हणून शिक्कामोर्तब केले. शिकाऊ उमेदवारी करताना आणि पुढे 
प्रख्यात लार्सन आणि टुब्रो या कंपनीत काम करीत असताना दिवसरात्र दर दोन-चार तासांनी अगदी हातभट्टीचीही दारु पिणाऱ्या या माणसाला दारुने इतके गुरफटून घेतले, की कंपनीने नोकरीवरुन काढण्याची नोटीस काढली. 

ही आहे रमेश सांगळे या माणसाच्या दारुच्या अतिव्यसनामुळे घरादाराची आणि शरीराची कशी दुर्दशा होते आणि त्यातून मुलेबाळे व घर कसे पोळून निघते याची कहाणी.

जी सत्य कहाणी आहे, दारुच्या व्यसनात असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठीही एका हाती येईल, अशी ही या पुस्तकाची ताकद आहे. 

*तरीही या पुस्तकाची आणि व्यसनाधीन सांगळे यांची मुख्य ताकद आहे त्यांच्या दिवंगत पत्नी नंदाताई, ज्यांनी मेलेले मासे जसे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात, त्या परिस्थितीत 
असणाऱ्या सांगळेना दारुपासून परावृत्त करुन जीवानोन्मुख बनवून माणूसपणाच्या प्रवाहात आणून ठेवले.* 

दारुच्या व्यसनातून पतीला बाहेर काढणाऱ्या सोशिक पत्नीच्या संघर्षाचीही ही कहाणी आहे, जी सर्वांकरिता प्रेरक आहे. 

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

"शहेनशहा अमिताभ आणि दिवार"

 'शहेनशहा अमिताभ' हे बाबूमोशाय यांचे पुस्तक वाचून झाल्यानंतर कालच (२९ सप्टेंबर) दादर सार्वजनिक वाचनालयाला परत केले, ...…आणि आज संध्याकाळी ७ वा टेलिव्हिजनच्या ZEE CLASSIC चॅनेलवर 'दिवार' चित्रपट सुरु झाला, पूर्ण पाहिला. Thanks Zee Classic चित्रपटाचे बारीकसारीक तपशील पुन्हा पाहण्याची संधी दिलीत, त्याचबरोबर माझे आवडते अभ्यासू लेखक महाराष्ट्र टाईम्सचे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (बाबू मोशाय या नावाने लेखन करणारे ) यांना सुद्धा सॅल्युट करतो. त्यांनी लिहिलेले अमिताभचे चरित्र परिपूर्ण आणि वाचनीय आहे.

अमिताभच्या चित्रपटांचं, त्यातील त्यांच्या भूमिकांचं विश्लेषण करून ते थांबत नाहीत. हरिवंशराय व तेजी बच्चन या माता-पित्यांनी त्याचं लालनपालन कसं केलं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होत गेली, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले, यासंबंधीचा बारीकसारीक तपशील बाबू मोशाय पुरवतात. अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, साधार चित्रण लेखकानं केलं आहे. हिंदी सिनेमांत गाजलेल्या यच्चयावत अभिनेत्यांशी चरित्रनायकाची तुलना लेखकानं केली आहेच, बाबू मोशाय यांचं लेखन अभ्यासपूर्ण, तलस्पर्शी आणि प्रत्येक विषयाच्या सर्व बाजूंची सांगोपांग दखल घेणारं आहे. निखळ गांभीर्यांनं लिहिलेलं हे चरित्र अथपासून इतिपर्यंत वाचनीय झालं आहे हे नि:संशय.


हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. २४ जानेवारी १९७५ हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला ‘दिवार’ चित्रपट प्रदर्शित झाला. मी यापूर्वी तो दोनदा पाहिला. पण आज तिसऱ्यांदा पाहताना पुस्तकातील दिवार चित्रपट विषयक पाने चाळत हा चित्रपट पहात होतो. ७२ च्या युद्धानंतर आणीबाणी लादेपर्यंतचा तो काळ म्हणजे व्यवस्थेविरुद्ध खदखद होती. ती दिवार चित्रपटातील नायक अँग्री यंग मॅन अमिताभच्या रूपाने पडद्यावर लोकांना दिसली, अभिनयाचा तो अंगार आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर ठसलेला आहे. अडल्या-नाडलेल्यांची पिळवणूक करणाऱ्यांना ठोसे लगावणारा कोणीतरी मासिहा अवतीर्ण व्हावा असे लोकांना वाटत होते असा तो काळ.
सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटच्या मृत्यूच्या सीनपर्यंत मनाची पकड घेतो. अमिताभ या चित्रपटामुळे सुपरस्टार झाला तो आजही त्या पदावर विराजमान आहे.
चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच काही संवादही लक्षात आहेत....मस्त मजा आली.


आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास….. मेरे पास माँ है!
उफ! तुम्हारे ये उसूल, तुम्हारे आदर्श!
खुश तो बहोत होगे तुम आज!
जाओ पहले तुम उस आदमी का साईन लेकर आओ जिस्ने मेरे हाथ पे ये लिखा दिया था….
फिर तुम जहाँ कहोगे मेरे भाई… वहाँ साईन कर दुंगा…
मै आज भी फेके हुएँ पैसे नही उठाता…
दिवार चित्रपटामध्ये अमिताभ च्या हातावर तुझे वडील चोर आहे लिहिलं पण त्याच्या वडिलांनी कुटुंबासाठी सही केली होती. आजच्या राजकारण्यांनी आणि उद्योगपतींनी अल्पावधीतच कोट्यानकोटी केलेली उड्डाणे पाहिल्यानंतर त्यांच्या मुलांच्या बाबतीत मात्र असे कुणी म्हणणार नाही. १९७५ मध्ये प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा युवक हा चित्रपट पाहून जेपीना नजरेसमोर ठेऊन घोषणा देत होता...अंधेरेमे एक प्रकाश - जयप्रकाश जयप्रकाश, आजचा युवक मात्र स्वतःच अंधारात चाचपडत आहे, निवडणुकीपूरता तो उठतोही पण चोरांच्या मुलांच्या पालख्यांना स्वतःहून खांदा देण्यासाठी !

-रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...