सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज

 सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज 


पंजाबमधून श्रीरामकृष्ण महाराज जे निघाले ते सुरतमध्ये आले. परंतु सुरत हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरणारे नव्हते. श्रीयुत कामेरकर या नावाचे मुंबईतील गृहस्थ सुरत येथे काही कामानिमित्त गेले असताना, कोणीतरी मराठी बोलणारा बुवा सुरतेच्या स्मशानात येऊन राहिला आहे अशी बातमी त्यांना लागली. त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याने ते त्यांच्या भेटीसाठी गेले. तुम्ही मुंबईला चला अशा त्यांच्या विनंतीवरून मग महाराज मुंबईला आले. मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र व्हायचे होते. मुंबईतील दुःखीकष्टी लोकांना उपकारक सहकार लाभावयाचा होता. ते मुंबईत कसे आले आणि तेथे येऊन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कार्य केले याची विस्तुत माहिती याविषयी तुम्हाला या लेखावरून होईल. अक्कलकोटच्या श्रीसमर्थ महाराजांची त्यांनी एकनिष्ठेने उपासना व भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. स्वामींची श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्यावर संपूर्ण कृपा होती. श्री जांभेकर महाराजांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा सदुपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. कोणतीही सिद्धी असो, ती सहजसाध्य नसते. त्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात. महाराजांनी आरामाच्या व सुखी जीवनाचा त्याग केला त्यामुळेच ते पुढे  सिद्ध पुरुष होऊ शकले. महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाची कुवत ओळखत असत. बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी येत असत. हे जाणत असतानाही त्यांनी प्रत्येकाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजही निष्ठावंत भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवत असते. त्यांचा पोशाख साधा असे. ते लुंगी नेसत. अंगात तोकड्या हाताची कफनी, डोक्यास साईबाबासारखे फडके गुंडाळीत. 

श्री जांभेकर महाराज सेंच्युरी बाजार सिग्नलच्या अगोदर लुकास कंपनीच्या समोर असलेल्या ज्याठिकाणी आज जयंत अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी  'भूतबंगला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका घरात राहत असत. त्या घरात कोणीही राहायला तयार नसे. कारण त्या घरात भुतांचे वास्तव्य होते अशी सर्वांची समजूत होती. महाराज तेथे राहावयास आले व काही दिवस सुखात राहिले. येथे राहायला आल्यानंतर त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढत गेली. तो बंगला आपण कायमचा विकत घ्यावा असे वाटून त्याच्या ख्रिश्चन मालकाशी त्यांनी बोलणे केले होते. परंतु तो काही केल्या विकायला तयार होईना. त्यामुळे विठ्ठल मंदिरजवळ म्हणजे श्रीदत्त  मंदिरासमोरील चंपावाडीत  त्यांनी प्रभादेवीतच एका आगरी समाजातील व्यक्तीचे म्हणजे 'फकीरशेट' यांचे घर भाड्याने घेतले. 

तेथे घरापुढे आलेल्या लोकांना बसण्याउठण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र घर भाड्याने देऊन फकीरशेट तो शेजारीच एका झोपडीत राहू लागला. त्याच्यापाशी नावाप्रमाणेच काही नव्हते. राहते घर भाड्याने गहाण पडले होते, नोकरी धंदा नव्हता. कुरुंबासह आयुष्याचे दिवस कसेबसे ढकलत होता. महाराजांना त्याची ही गरिबी लक्षात आल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाला चांगले कपडे घातले. आणि त्याला 'फकीरशेट' या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबाचा रुबाब वाढला. त्यामुळे पुढे ते सर्वांचे फकीरशेट झाले. ते घर म्हणजेच महाराजांचा मठ झाला. आणि त्याला नंतरच्या काळात आपोआप मठाचे स्वरूप आले. देवपूजा, आरती, प्रसाद वैगरे  सुरु होऊन त्या घराचे पावित्र्य व माहात्म्य वाढले. भक्तमंडळी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात त्या मठात येऊ लागले. येणाऱ्यांचे हेतू सफल होऊ लागले. तेथे सतत नंदादीप तेवत असे. महाराजांच्या नाना प्रकारच्या लीला तेथे चालत असत. ज्यांचे हेतू सफल होत ते तेलाचे व तुपाचे डबे तसेच लागेल तेवढे धान्य वैगरे आणून देत असत. रोज शेकडो लोक भोजन करून तृप्त होऊन जायचे. कधी काही कमी पडत नसे. महाराजांनी कधीही स्वतःजवळ पैशांचा संग्रह केला नाही. ते फक्त एकवेळ भोजन करायचे. बहुतेक दिवस उपवास करायचे. कधी कधी बेचाळीस दिवस उपोषण करीत. सकाळी व रात्री एक पेला दूध एवढाच त्यांचा त्या काळात आहार असे. ही सर्व अनुष्ठाने ते लोककल्याणासाठी करीत असत. पहाटेच्या प्रहरी काकड आरती होत असे व आरतीसाठी दोन-अडीचशे माणसे एकत्र जमायची. तर अन्नप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत चालायचा. गरीबी आणि धनिक अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाला येत असत. 

जांभेकर महाराजांचा जीवनपट अवघा १८९८ ते १९४० म्हणजे अवघ्या ४२ वर्षाचा त्यापैकी फक्त १९३० ते १९४० दहा वर्षे प्रभादेवीत राहिले. १० जानेवारी १९४० रोजी त्यांनी शिवाजीपार्क स्मशानभूमीजवळ समाधी घेतली. आज त्याठिकाणी 'श्रीरामकृष्ण जांभेकर मठ' आहे आणि धार्मिक कार्य अखंडितपणे सुरु आहे.

- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

९३२३११७७०४


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण