बुधवार, २० एप्रिल, २०२२

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया 


(रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले. ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होती. आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत. रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ.उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे,अनिल मालुसरेश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा शिवतीर्थावर गौरव ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला उपस्थित असलेल्या समस्त मालुसरे यांच्यावतीने रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ) यांनी हा सन्मान स्वीकारला. सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात दिला. यावेळी राज्याच्या विविध ७२ गावातून सुमारे शेकडो मालुसरे पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २५ एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा नारळ देऊन रायगडावर सन्मान करण्यात आला होता त्यानंतर १२७ वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे अनिल मालुसरे, मिलिंद मालुसरे (साखर), सुभाष मालुसरे, सपना मालुसरे, अनिल मालुसरे (पारमाची), नितीन मालुसरे, सुनीता मालुसरे, स्नेहल मालुसरे (गोवा साखळी) प्रदीप मालुसरे, कल्पना प्रदीप मालुसरे (कासुर्डी), संतोष मालुसरे (लव्हेरी), सुनील मालुसरे (सुधागड),शिवराम मालुसरे (किये), संजय विजय मालुसरे (धुळे), बाळासाहेब मालुसरे(निगडे), मधुकर मालुसरे ((भावे पठार), भगवान मालुसरे, रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, विठ्ठल मालुसरे, सचिन मालुसरे, सुधीर मालुसरे, अविनाश मालुसरे, मारुती मालुसरे, पांडुरंग मारुती मालुसरे,,तेजस मालुसरे, यशवंत मालुसरे, कैलास मालुसरे,आंबेशिवथर),संतोष मालुसरे (फुरुस ), राकेश अ मालुसरे,सूर्याजी द मालुसरे, अनिल मा मालुसरे, सागर संतोष मालुसरे, अजय काशिनाथ मालुसरे (गावडी ),रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे (आंबे शिवथर), आबासाहेब मालुसरे,मंगेश मालुसरे (गोडवली), राजेंद्र मालुसरे, रुपेश मालुसरे,कुर्ले महाड), अनिल मालुसरे (बडोदा), संतोष शा मालुसरे (खोपोली), महीपत मालुसरे, गेणू मालुसरे, सोनल म मालुसरे (पारमाची), अरुण मालुसरे, धोंडिबा मालुसरे, सुनीता अ मालुसरे-सरपंच (हिरडोशी), वालचंद मालुसरे (केळघर), मेघनाथ मालुसरे (पौड), चंद्रकांत मालुसरेआदी प्रमुख मालुसरे वंशजांचा याप्रसंगी मंडळाच्या वतीने सन्मान केला. समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आलातर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

कर्मे इशु भजावा

 कर्मे इशु भजावा 

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८० वर्षांपूर्वी एका अज्ञानी, दरिद्री, विपन्नावस्थेत वावरणाऱ्या कुटुंबात जन्माला आले, जे पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज म्हणून समाजाला ललामभूत ठरले.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. त्यात पहिले तीन भौतिक उद्देश आहेत.. चौथा ज्ञानी. त्याला एका कामासाठी देवाने मर्त्यलोकी पाठविलेला असतो. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे जगायचे कल्याण चिंतने आणि त्यासाठी देह कष्टविणे हे संतांच्या कर्तव्यापैकी एक आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात केलेले भव्यदिव्य काम पाहता ते एक व्यक्ती आहे असे मी मानत नाही, त्यांचं जीवन आता पारमार्थिक क्षेत्रातील एक विचार बनलेला आहे.

मनुष्याला त्याच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा संतसंग किंवा सत्संग लाभतो तेव्हा त्याच्या पाठीमागे पूर्वपुण्याई, पूर्वजन्माचे संस्कार व सुकृत असते.रिंगेमहाराजांचा सहवास आपल्या सर्वाना लाभतो आहे हे आपले परम भाग्यच. 


हरिभाऊंना मुंबईत आल्यानंतर परम पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा सहवास लाभला. त्यांच्या हातून तुळशीची माळ घेतल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण आंतरर्बाह्य बदलले. तुझ्या गळ्यात सूर आहे ...तुम्ही आयुष्यभर सुरात गात चला. नंतर भजन सम्राट खाशाबा कोकाटे यांच्याकडे संगीताची रागदरबारी शिकण्यासाठी जाऊ लागले. गात राहिले... शिकत राहिले...वयाच्या २० व्या वर्षांपासून आता वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांचा रोजचा सराव आणि साधना यामुळे  हरिबुवा रिंगेमहाराज यांची नाममुद्रा श्रद्धेने आणि कर्तृत्वाने मंतरलेली झाली आहे. महाराजांनी महाराष्ट्रात वारकरी गायन क्षेत्रात संस्मरणीय कार्य केले आहे. गेली ६० वर्षे अखंड साधना केल्यामुळे स्वतः सुरेल आणि पल्लेदार पहाडी आवाजाचे ते जसे धनी आहेत तसेच शेकडो गुणिजन विद्यार्थ्यांचे ज्ञानदान करणारे गुरुजींही आहेत. श्री पांडुरंगाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी आणि निस्सीम भक्त म्हणून महिन्याची वारी करणारे अशा अनेकविध नात्यांनी ते जसे समाजात सुपरिचित आहेत. तशी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची मुद्रा उमटवली आहे. उदा. दोन वर्षांपूर्वी लहुलसे गावात द्वादशी व्रताचा करण्याचा संकल्प त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. गावाने त्यांचा शब्द प्रमाण मानला, एकजुटीने एकमताने उभा राहिला. न भूतो न भविष्यती असा कोकणात महायज्ञ सुफळ संपन्न झाला.

हाती घेतलेलं कोणतंही काम करताना त्यांचे केवळ कोरडं कर्तव्य नसतं, तर ते भावस्निग्ध व्रत असतं. ते काम सरस आणि सकस व्हावं, कार्यपूर्तीला सौजन्याचं कोंदण हवं याची त्यांना सतत जाणीव असते.  आपले अनेक विद्यार्थी, सहकारी आणि स्नेही यांच्या भल्यासाठी ते जीवाचं रान करतात.

त्यांच्या प्रत्येक श्वासात प्रभुनाम स्मरणाची स्पंदने आहेत.पारमार्थिक तळमळ असणारे आणि अध्यात्मिक जीवन जगणारे असे हरिभाऊ रिंगे यांच्या वयाच्या ८० व्या वर्षपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. कर्मानेच ईश्वराची सेवा करावी लागते. सेवा करण्याला भजन म्हणतात. म्हणजे सर्व सुखासाठी 'कर्मे ईशु भजावा' हेच खरे. हरिभाऊ रिंगे महाराज यांचा जीवनपट नजरेसमोर आणला तर कर्माने ईश्वराला भजावे म्हणजे 'कर्मे ईशु भजावा' चा अर्थ अधिक स्पष्टपणे लक्षात येईल.

हरिभाऊंना माणसाची विलक्षण ओढ आहे. अनेक स्तरांतील आणि विविध व्यवसायातील माणसंविषयी त्यांना उत्कट प्रेम आहे. दोष कुणात नसतात ? दोष बाजूला ठेऊन माणूस शोधायचा असतो, असे अनेक उभे आडवे धागे जुळवीत समाज जीवनाचं वस्त्र ते विणत असतात. हरिभाऊ ८० वर्षानंतरची वाटचाल करीत असताना त्यांची उमेद पूर्वीसारखीच उदंड आहे. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे हरिभाऊंचे जीवन आहे.

हरिभाऊंनी आयुष्यभर नाद ब्रम्हाचा अर्थ सांगितला व लेखाच्या विद्वान संगीत तज्ज्ञांपेक्षा काकणभर सरस असे भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले चिंतन मांडले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान नाही. विद्यादान हे म्हणजे आत्मानंद देणारे ज्ञानदान होय. सतचित आनंद देणारे ज्ञान. यासाठी योग्य गुरु योग्य शिष्यासाठी जीवन जगतो आणि योग्यतेचा शिष्य भेटल्यावर अनेक कसोट्यांतून नेल्यावर नाते निर्माण होते.  मानवधर्म मानणाऱ्या वारकरी संप्रदायाची विचारधारा जगाला मार्गदर्शक ठरेल, अशी हरिभाऊंची धारणा आहे. नभोमंडलात तळपणाऱ्या भास्काराप्रमाणे रिंगेमहाराज आपल्या शिष्यगणांसह अवघा महाराष्ट्र फिरत असतात. ऐसी कळवल्याची जाती करी लाभावीण प्रीती श्री तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे भाविक भक्तगणांना गेली ६० वर्षे दीपप्रकाशात रिंगे महाराज सन्मार्ग दाखवीत आहेत. कर्तव्यतत्पर माणसाला विश्रांती माहीत नसते. संगीत क्षेत्राची अफाट बौद्धिक ताकद असलेले कल्पक कलावंत जेव्हा एखाद्या समाजात निर्माण होतात तेव्हा त्या समाजाच्या परंपरेच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवर काही नवे घडत असते. काळाच्या ओघात समाजात सतत स्थित्यंतरे घडत असतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आणि तन-मन-धन अर्पण करणारे निष्काम महापुरुष ठामपणे उभे राहातात तेव्हाच इतिहासात नोंद घेणारे बरेचसे त्यांच्याकडून घडत असते. पोलादपूरच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात हरिभाऊंनी वारकरी गायन क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असेच आहे.

वारकरी गायन क्षेत्रातील एक तपस्वी म्हणून त्यांनी हजारॊना जे ज्ञान दिले ते देताना त्यांच्या कर्मात निष्कामता होती. कर्मामध्ये निष्कामता येणे अत्यंत अवघड आहे. जो निष्कामतेने कर्म करतो त्यास 'कर्मयोगी' असे म्हणतात. कर्मामध्ये निष्कामता येण्यासाठी कर्माचे तत्व नीट समजले पाहिजे. जे करावयाचे आहे ते भगवंतासाठीच करावयाचे आहे असा भाव मनात निर्माण करावयाचा म्हणजेच निष्काम कर्म करावयाचे. सर्वव्यापी ईश्वर भावाने केलेले कर्म हे निष्काम कर्मच होते. यालाच दुसरे नाव 'भक्तिमार्ग' असे आहे. ती वाट परमात्म्याच्या पर्यंत पोहोचते व जीवास परमात्मरूप करते. हरिभाऊंनी ईश्वर भक्ती त्यांच्या विचारातून व आचारातून जाणवते कारण महाराज हे सच्चे वैष्णव आहेत. जीवन पराकोटीचं समर्पित केले की जीवन जीर्णशीर्ण होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्या कधीच संकोचत नाही. चंद्र कधीच जुना होत नाही. विनाश कधीच त्यांच्याजवळ पोहोचत नाही. त्यांच्यात ना स्थित्यंतर ना कायापालट होतो.

भजनानंदी सुप्रसिद्ध भजन सम्राट ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल अंतःकरणपूर्वक शुभेच्छा ! यांनी हरिभाऊंनी मंगल जीवनाची, गौरवमय ऐंशी वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याचे निमित्त साधून त्यांच्या अभिष्टचिंतन करण्याची हि सुवर्णसंधी लाभली आहे, विश्वात्मक देवाच्या या महान भक्तास उत्कृष्ट, आरोग्य, दीर्घायुष्य, समाधान व शांती व सर्व भाविक भक्तांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन लाभून त्यांचे जीवन पुढील अनेक वर्षे कृतार्थ होवो हीच माउलींच्या चरणी प्रार्थना. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. 'कसा' हा शब्द संबंधित व्यक्तीची जीवनपद्धती, संस्कार व तिच्या जीवनविषयक ध्येयाचा निर्देशक असतो.

हरिभाऊ हे कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे, वारकरी संप्रदायाचे उपकारकर्ते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, त्याची जाणीव मनात असून उपकार कर्त्याविषयी मनात सदैव सद्भावना असणे व त्याला अनुसरून उपकारकर्त्याशी वेळप्रसंगी तसे आपले वर्तन असणे ही झाली 'कृतज्ञता' या शब्दाची व्याख्या. आपल्या भारतीय संस्कृतीची जी अंगे उपांगे आहेत, त्यात कृतज्ञतेचा समावेश होतो. ....या चार शब्दांची ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पण !

-




रवींद्र मालुसरे (
अध्यक्ष )

 मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  ९३२३११७७०४ 


१२७ वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

     

 रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे.



१२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील  गोडोली, फुरुसपारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील ७० गावांतील  मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

रायगडवरील पहिल्या उत्सवाची कहाणी -

रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला ! १० मे १८१८ कर्नल प्रॉथरने नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला, किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते, शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता, शिवछत्रपतींची समाधी सुद्धा भग्न झाली होती...पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती, ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते, गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती, रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता. त्यानंतर रायगडचा उध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती, रायगडचे राजकीय महत्व नष्ट झाले होते, पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले होते. पूढे मुंबईहून बोटीने नागोठणे आणि नंतर टांग्याने खडखडत लोक रायगडावर पोहोचत असत, पाचाडचा मुजावर सैद महम्मद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेठ सोनार यांपैकी कोणीतरी गड दाखविण्याचे काम करीत. १८८५ मध्ये वर्तमानपत्रातून काही तुरळक उल्लेख येऊ लागले, १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन असे पुस्तक लिहिले, जोशी यांनी छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा असे लिहिले, यातूनच पुढे २५ एप्रिल १८९६ रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला, बारा मावळचे प्रतिनिधीसह महत्वाच्या जागी यावेळी माणसांची दाटी झाली होती, मेळ्याची पदे, विनायकशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, शिवरामपंताचे भाषण, लोकमान्य टिळकांचे समारोपाचे भाषण, गंगाप्रसादाजवळ प्रसादाचे भोजन, छबिना इत्यादी कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर "तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले." इ.स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या रायगडाच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय....


या कार्यक्रमाचा हा पूर्ण इतिवृत्तांत त्यावेळी दैनिक केसरीमध्ये प्रकाशित झाला होता.

रवींद्र मालुसरे - अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४




शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

चित्रपट अभिनेत्रीची दुनिया

 

अभिनेत्री सीमा देव चा इंग्रजीचा क्लास

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा सराव करून देण्यासाठी  त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव  देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.

 

झीनत अमानची 'मोलकरीण'

झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली.  झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला, यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ?

ती म्हणाली ...राखी गुलजार कडे

झीनत म्हणाली,'मग ती नोकरी सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ?

नाही मॅडम,

मग माझ्याकडे नोकरी का मागायला आली आहेस

मला जेथे कामाचा ताण कमी पडेल अशा नोकरीची गरज हवी आहे म्हणून. राखीबाईंच्या प्रमाणे तुम्ही अंगभर कपडे काही घालत नाहीत. आणि राखीबाई अंगभर कपडे घालतात आणि बाहेर जाताना दिवसातून तीन-चारदा सतत कपडे बदलतात. त्यामुळे त्यांच्याकडे धुण्याच्या कपड्यांचा ढीग पडतो. तुम्ही तर पाच-सहा वेळा जरी कपडे बदललेत तरी तुमच्या तोकड्या कपड्यामुळे मोठा ढीग पडणार नाही.

….हे ऐकून झीनतची काय अवस्था झाली असेल बरे.

 

नर्गिसजींचा 'स्विमिंग सूट'

नर्गिस यांच्यावर राज  कपूर यांच्या 'आवरा' चित्रपटात स्विमिन्ग सूट घालून एक दृश्य द्यायचे होते. तेव्हा आता बंद करण्यात आलेला आर के स्टुडिओ तेव्हा उभा राहिलेला नव्हता. नर्गिसजींना चार भिंतीची मर्यादा सांभाळून हा सिन द्यायचा होता. यामुळे मास्तर भगवान दादांच्या ''आशा स्टुडिओत'' एक सेट लावून त्या सेटवर नर्गिसचे आवारातील तो स्विमिंगचा सीन चित्रित करायचे ठरले. त्यासाठी त्या सूटमधील तिचे दर्शन एकदम खुलेआम होणार नाही याची काळजी घेत राज कपूरने सर्व काळजी घेतली. त्यासाठी भगवानदादांचा स्टुडिओ त्यांनी खोदून खोदून स्टुडिओतच तलाव केला. आणि नर्गिस पडदानशिन अवस्थेतुनच डायरेक्ट त्या सूटमध्ये पडद्यावर आली.

 

मनोरुग्ण परवीनच्या जीवनातील 'अर्थ'

काही चित्रपटात प्रेक्षक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. कागज के फुल या चित्रपटात गुरुदत्त-वहिदा-गीता दत्त यांच्यामधल्या नात्यांचा शोध घेतला, तसा ''अर्थ'' या महेश भट्ट यांच्या चित्रपटाबाबत घडले. या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांच्याच जीवनातली. त्यांची पत्नी किरण आणि अभिनेत्री परवीन बाबी यांची. परंतु चित्रपटात महेशजींची भूमिका कुलभूषण खरवंदा यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका शबाना आझमीने तर एक मनोरुग्ण नायिका स्मिता पाटीलने केली होती, अर्थ पडद्यावर आल्यानंतर स्मिताची व्यक्तिरेखा पाहून परवींन बाबीचा तोल ढळू लागला. त्यापूर्वीच तीच्याकडून काम करून घेणे अनेक निर्मात्यांना-दिग्दर्शकाना तिचा त्रास होऊ लागला होता. मात्र अर्थ प्रदर्शित झाल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली. यामुळे अनेकांनी तिच्याकडे पाठ फिरवली.चित्रपटाच्या दुनियेतून ती एकदम आउट झाली. आणि पुढे तर मनोरुग्ण होत या जगातून सुद्धा

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षानंतर वर्ग भरला.

 ४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...

आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. अस्मिता गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार अरुणा केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली.                      
      
तर विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र मालुसरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेच्या नावाचा फक्त शिक्का आहे परंतु आमच्या मनामनात आणि आठवणीत कायमचे गेली ४० वर्षे तुम्ही राहिलात याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही निरपेक्षपणे आम्हाला घडण्या-बिघडण्याच्या वयात चांगले संस्कार देण्याचे काम केलेत. आज आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आम्हाला स्मरणरंजन करण्याची संधी दिलीत, तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला महेश पै, प्रशांत भाटकर, गणेश तोडणकर, उमेश शिरधनकर यांनी गाणी तर संगीता पाटणकर, मीनाक्षी बोरकर यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला शुभांगी पेडणेकर-विलणकर, शुभांगी भुवड-बैकर, मिनाक्षी बोरकर-मोपकर, साधना बोरकर, सविता गाड-धुरी, संगीता पाटणकर-जाधव, सुनंदा धाडवे, सुरेखा चव्हाण, कल्पना किर-आंबेरकर, शोभा पोटे, रेखा चव्हाण-सुभेदार, प्रतिभा खाटपे-बहिरट, कांचन शिर्के-शिंदे, भारती चव्हाण या माजी विद्यार्थीनी तर रविंद्र मालुसरे, प्रशांत भाटकर, सचिन पाताडे, रमेश राऊळ, नरेश म्हात्रे, महेश पै, जगन्नाथ कदम, अविनाश हुळे, गणेश तोडणकर, विजय विलणकर, संतोष गुरव, गुरुनाथ पटनाईक, नंदकुमार लोखंडे, उमेश शिरधणकर, पांडुरंग वारिसे, दिनेश पांढरे, शेखर भुर्के, अनिल कदम, किशोर किर, हनुमंत नाईक, दिनकर मोहिते, शैलेश माळी, राजू दोडे, संजय धामापूरकर, दिनेश मोकल, दीनानाथ शेळके, दत्ताराम बोरकर, विश्वनाथ म्हापसेकर, संदीप केणी हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

दरडग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडले दागीने

 दरडग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडले दागीने

२२ जूलै रोजी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे भुसख्खलन होत दरड कोसळली होती. या दर्घटनेत साखर सुतारवाडीतील २३ घरे जोत्यासह वाहुन गेली होती तर पाच व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला होता. सहा महिने उलटलेल्या या काळरात्रीत अनेकांच्या संसाराची वाताहत होताना पुंजी पुंजी जमवून साठवलेला दागदागिन्यांसह पैसा अडका वाहून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सामाजिक संस्था, सर्व पक्षीय नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या तातडीच्या मदतीने महाड-चिपळूण यांच्यासह हे गावसुद्धा सावरले, परंतू पै पै जमा करून भविष्यात उपयोगात येईल या आशेने पदरच्या हरवलेल्या दागदागीण्यांचे दुःख आपत्तीग्रस्त विसरु शकत नव्हते.



पोलादपूर तालुक्यातील शिवसेनेचे युवानेतृत्व अनिल मालुसरे यांनी साखर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जि प उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहीरे, ग्रामपंचायत सरपंच पांडूरंग सुतार यांच्या माध्यमातून तहसीलदार पोलादपूर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मातीचा ढीगारा उपसण्याच्या कामास प्रशासकीय पातळीवर आदेश मिळवून कामाला सुरूवात केली असता संपूर्ण घर वाहुन गेलेले लक्ष्मण नारायण सुतार यांच्या पत्नीचे काही दागीने ढिगाऱ्याखाली सापडले. सरपंच व काही जबाबदार ग्रामस्थानी सदर बाधीत कुटूंबाच्या ते स्वाधीन केले असता त्या कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 


अजूनही एका चव्हाण कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागीने यावेळी पुर्णपणे वाहुन गेलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली सापडावेत अशी सर्व ग्रामस्थांनी भावना बोलून दाखवली. 


नुकताच साखरपुडा झालेल्या या मुलीच्या लग्नाची जबाबदारी त्याचवेळी जुलैमध्ये स्वीकारून महाड येथील ज्येष्ठ सामाजिक दिलीप जाधव साहेब यांनी चव्हाण कुटुंबाला धीर दिला आहे.

रवींद्र मालुसरे 
संपादक 
पोलादपूर अस्मिता 

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

 

स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

कबराच्या दरबारातील तानसेन केवळ माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यानाही आपल्या गायनाने मुग्ध करीत असे, विझलेले दिवे प्रकाशित करणे आणि मेघमल्हार राग गाऊन वर्षाव घडवून आणणे आदी किमया देखील त्याने घडविल्याच्या दंतकथा त्यांच्या गायनातील कर्तबगारीपुढे जोडल्या जातात. या शतकाच्या प्रारंभी कलकत्त्याजवळील एका बातमीने जगभर  उडवून दिली होती. एका मंदिराजवळ एक खजुरीचे झाड होते व ते ६० अंशाच्या कोनात कललेले होते. या मंदिरात सायंकाळी रितीनुसार घंटानाद केला जात असे. प्रार्थनेच्या वेळी होणाऱ्या या घंटानादास प्रारंभ होताच हे झाड वाकून जात असे. जणू काही प्रार्थनेसाठीच ते मस्तक झुकवीत असे. सकाळ होताच ते झाड पुन्हा आपले मस्तक उंचावून घेत असे. झाडाचा हा भक्तिभाव पाहून परिसरातील माणसे अवाक झाली. या झाडाची पूजाही होऊ  होऊ लागली. भाविकांना असं वाटू लागलं होत की, या झाडाची पूजा केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होईल. पण असा काही भाग नव्हता. हा केवळ संगीताचाच परिणाम होता.

जेव्हा जेव्हा आपण  पंडित भीमसेन जोशींचा भटियार ऐकतो. पं. जसराजचा भैरव ऐकतो किंवा प्रभा अत्रेंचा कलावती ऐकतो तेव्हा भारतीय संस्कृती जोपासणारी अभिजात  संगीत कला आणि त्यातून कलात्मक अविष्कार घडविणाऱ्या विविध घराण्यांचा हेवा वाटतोच, परंतु भजनसम्राट स्व. खाशाबा कोकाटे, मारुतीबुवा बागडे आणि गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या संगीत भजन अथवा चक्रीभजनाच्या निमित्ताने कंठातून निघालेल्या स्वरात आपल्याला साक्षात परमेश्वराची लीला दिसत असते. आपल्या सुरांमुळे गेल्या ४०-५०  वर्षात यांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले. त्यामुळेच या कलाकारांना कृतज्ञतेपोटी रसिकांनी भरभरून  प्रेम दिले.
१९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या. अशा परिस्थितीत स्वतः भजन, गायन करत असताना नवी भजनगायक पिढी घडवण्याचे काम हरिभाऊ रिंगे महाराजांनी केले. सुशिक्षित तरुणांच्यामध्ये भजनाची संस्कृती रुजविण्याचा ध्यास घेतला. मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले. पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी जी थोडी मंडळी प्रयत्न करीत होती त्यात हरिभाऊ महाराज रिंगे यांचे योगदान फार मोठे होते.
भक्ती संगीताची लोकप्रियता शिष्ट समाजात हरिओम शरण, अनुप जलोटा, पं भीमसेन जोशी, सुरेश वाडकर,अजित कडकडे, अभिषेकीबुवा अशा अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमातून वाढत असताना शिवरामबुवा वरळीकर, फुलाजीबुवा नांगरे, महादेवबुवा दांडेकर, एकनाथबुवा हातिस्कर, केसरीनाथबुवा भाये,  साटमबुवा, सावळारामबुवा शेजवळ, स्नेहल भाटकर, तुळशीरामबुवा दीक्षित, मारुतीबुवा  बागडे, खाशाबा कोकाटे आणि हरिभाऊ रिंगे महाराज यांनी चक्रीभजनाचे आपले स्वतंत्र अस्तित्व अधिकाधिक समृद्ध केले. चक्रीभजन आजही अबाधित राहिले याचे कारण वारकरी संप्रदायाची परंपरा हा चक्रीभजनाचा पाय असल्याने व्यावसायिकिकरणाच्या आपत्तीतून ते सुटले व आपला स्तर शाबूत राखला आहे. ‘गायकी’ पेक्षा ‘भावकी’ला म्हणजे सांप्रदायिक श्रद्धेला चक्रीभजनात प्राधान्य असल्याने ते शेकडो वर्षे टिकून राहिले आहे.
गायनामध्ये प्रत्येक घराण्यांची आपली अशी ठशीव वैशिट्ये असतात. शिस्तीच्या चौकटी असतात. त्यानुसार गायकीला ढंग असतो. किराणा घराणे म्हणजे अतिशय सौंदर्यपूर्ण संथ आलापी. जयपूर घराणे म्हणजे लयकारीशी लवचिक खेळ. ग्वाल्हेर म्हणजे जोरकस, भिंगरीसारख्या ताना अशी समीकरणे जाणकारांच्या घराणातही आखलेली असतात.

हरिभाऊंचे गुरुजी स्व खाशाबा कोकाटे यांनीही अविरत साधना, रियाज करून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. तीच गोष्ट हरिभाऊंची. पहाडी आणि सुरेल आवाजाच्या हरिभाऊंकडे गायनातील रागांचा साठा तर खूप मोठा आहेच. परंतु एकाच रागातील अनेक चीजाही त्यांनी आत्मसात केल्या आहेत. आज विश्वनाथ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आपल्याकडील हा साठा पुढील पिढीकडे देण्यासाठी त्यांची वयाच्या ८१ व्या वर्षातही अहोरात्र खटपट चालू असते. त्यांची एक संगीत साधक या नात्याने ही भावना लक्षात घेऊन त्यांच्या शिष्यवर्गाने एक रिकामपणाचा उद्योग म्हणून संगीत न शिकता विद्येची, ज्ञानाची ओढ घेऊन शिकावे आणि नावलौकिक मिळवावा. आज समाजातील विशेषतः वारकरी क्षेत्रातील गायन वादन क्षेत्रातील तरुणांचे ते आधारवड आहेत. भाऊ थोर कलावंत तर आहेतच, परंतु श्रद्धास्थानीही आहेत. त्यांनी जीवनात आलेली सर्व सुख-दुःखे समोर न आणता समाजाशी असणारं आपलं नातं कधीही तोडलं नाही. लहान-थोर सर्वांचे ते सुहृदय आहेत. प्रचंड यश, कीर्ती लाभूनही भाऊ कधीही अहंमन्य, आढ्यताखोर वागत नाहीत. एक कलावंत आणि माणूस म्हणूनही भाऊंचं व्यक्तिमत्व फार उत्तुंग. भव्य असंच आहे. वारकरी क्षेत्रातील अशा महापुरुषाचा परिचय होणे, सहवास लाभणे हा काळ सर्वकाळ धन्यतेचा कृतार्थतेचा असतो.
आयुष्यात भजनाशिवाय कोणताही विचार त्यांच्या डोक्यात आला नाही. 'दिनरजनी हाचि धंदा | गोविंदाचे पोवाडे || ही तुकाराम महाराजांची उक्ती हरिभाऊंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडल्याचे दिसून येते. कुणाशीही बोलताना ते भजन याच विषयावर बोलतात. विचार करताना भजनाविषयीच करतात. 'बोलणेही नाही देवाविण काही' ही अनुभूती त्यांच्याशी चर्चा करताना येते. १९८५ नंतर भजन संस्कृती पुन्हा समृद्ध करण्यासाठी हरिभाऊंनी कठोर परिश्रम केले. त्यासाठी स्वतः तपश्चर्या केली. आज इतक्या उतार वयातही ते स्वतः पहाटे उठून रियाज करतात. आपला आवाज  जपण्यासाठी अनेक तऱ्हेचे पथ्य पाळून मनोनिग्रहाचे दर्शन घडवितात. स्वतःची भजन गायकी समृद्ध करत असतानाच ही गायकी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची तळमळ पाहून मन अचंबित होते. आजही दररोज तीन-चार तास रियाज केल्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथ, कल्याण, घाटकोपर, करीरोड येथे जाऊन विद्यार्थ्यांना भजनाचे धडे देतात. आपला विद्यार्थी भजन गायनात सर्वांगांनी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. रियाज करताना घोटून घेतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे हजारो शिष्य आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांचा आवाज गोड आणि सुराला धरून असेल त्याला संगीतातील समाज चांगली असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करीत सतत त्याला प्रोत्साहन देत असतात. तर एखाद्याची या क्षेत्रातील समज कमी असेल तर त्याला शिकविण्यासाठी स्वतः त्याच्यासोबत कष्ट घेतात. पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्यानंतर त्याच्या गळ्यातून एखादी तान ज्यावेळी उमटते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सार्थकतेचे आनंदी भाव तरळताना दिसतात. 

 

भजनानंदी हरिभाऊ रिंगे यांचा जन्म १९४२ मध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील लहुळसे या गावी झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर घरच्या गरिबीमुळे कुटुंबीयांची जबाबदारी शिरावर घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी १९५८ साली मुंबईस येऊन सुरुवातीला क्राऊन मिलमध्ये व त्यानंतर कमला मिल मध्ये नोकरी केली. दुर्गम कड्याकपाऱ्यात वसलेल्या लहुळसे ग्रामस्थांच्या मुंबईतील बैठकीच्या खोलीत राहून १९५९ सालापासून तब्बल ३६ वर्षे भजनसम्राट वै. खाशाबाबुवा कोकाटे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तर १९६२ साली अखिल महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सेक्रेटरी वै सदगुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचे शिष्यत्व पत्करून वारकरी संप्रदायाची द्योतक तुळशीमाळ कंठी धारण केली. 
पुढे खाशाबांचे शिष्यत्व पत्करून आपला छंद जोपासला, वाढवला इतकेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला. पन्नास-शंभर वर्षांपूर्वी संगीत किंवा संगीताचे शिक्षण घेणे याला समाजजीवनात फारशी प्रतिष्ठा नव्हती. घरदार सोडल्याशिवाय गायन कला वश होणे शक्य नाही अशीही सर्वसामान्यांची समजूत होती. ही विद्या शिकून लोकप्रियता व धनलाभ होऊन संसाराचा गाडा चालेल याची खात्री नसायची. संगीताची विद्या मुक्तहस्ते देणारे गुरु मुळातच संख्येने कमी होते. त्यात विक्षिप्त आणि तऱ्हेवाईक अधिक. त्यांची वर्षानुवर्षे सेवा केली तरी पदरात काही पडेलच याची खात्री नसे. ग्रंथांची उपलब्धता आणि प्रवासाची साधने आजच्या तुलनेने कमी. अनुदान, शिष्यवृत्ती नाही, प्रोत्साहन नाही, दिलासा देणारी दाद नाही त्यामुळे कसलेही भविष्य नाही. अशा प्रतिकूलतेवर मात करून ज्यांनी ही संगीत विद्या तिच्या प्रेमापोटी व ध्यासापोटी आत्मसात करून जोपासली, पाळली, सांभाळली व पुढील पिढीच्या हवाली केली अश्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ.

कलावंत हा मुळातच जन्माला यावा लागतो. त्याला त्याच्या भाग्याचे पैलू पाडणारा गुरु भेटला की जन्मजात कलावंत त्या क्षेत्रातील महान मानदंड होऊ शकतो. परंतु एखादा जन्मजात नसूनही त्या संगीत विद्येसी सर्वस्व समर्पणाच्या भावनेने झोकून त्याने परिश्रमाची सीमा गाठली तर तोही थोर विद्यावंत व कलावंत होऊ शकतो. हरिभाऊ आणि रामभाऊ या दोघांनी हे सिद्ध करून दाखविले. संगीताचा अभ्यास हा खरा तर सात अधिक पाच अशा बारा स्वरांचा पायाभूत अभ्यास आहे. ज्याच्या गळ्यावर हे बारा स्वर पूर्णार्थाने विराजमान झाले त्यालाच त्यापुढची वाट अधिक सुकर होते. संगीताचा साधक हा प्राधान्याने स्वरसाधक'' असलाच पाहिजे. ही संगीताची पहिली मागणी आहे. स्वरसाधना हीच या क्षेत्रातली पहिली मागणी असते आणि असायला हवी. आणि म्हणूनच गायनाचार्य हरिभाऊसारख्या स्वरसाधकाची वेळोवेळी वारकरी समाजाने पूजा बांधली. गेल्या ६० वर्षाचा वारकरी संप्रदायाच्या भजन क्षेत्रातील इतिहास लिहिताना हरिभाऊंना डावलून चालणार नाही. इतके या क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व आणि योगदान आहे. '
पोलादपूर तालुका हा खरं तर वारकऱ्यांचा तालुका. वै हबाजीबाबा, वै. हनवतीबुवा, वै मारुतीबाबा मोरे, वै गणेशनाथ महाराज, वै ढवळेबाबा, वै नारायणदादा घाडगे, वै श्रीपततात्या,वै विठोबाअण्णा मालुसरे, वै मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली, परंतु या क्षेत्रातील दुसरे अंग उणे होते. काही वर्षानंतर पखवाज वादनात ख्यातनाम स्व रामदादा मेस्त्री आणि गायनात हरिभाऊ रिंगे यांनी न्यूनता भरून काढली.हरिभाऊ कीर्तनात प्रमाण व चाली यांची बरसात करीत सोबतीला रामभाऊ मेस्त्रींचा पखवाज असला की कीर्तनात क्षणभर स्तब्धता होत असे.  
ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे नाव उच्चरताच एक निरागस, निर्मळ व निरहंकारी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. धोतर, सदरा त्यावर जॅकीट व डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा साधा सुद्धा पेहराव. आजही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा आहे की, हजारो व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधाच्या नात्याने त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. संगीत भजन क्षेत्रातील एक ज्येष्ठ कलावंत म्हणून त्यांचा आजही पंढरपूर, आळंदी, रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. आजही एखाद्या कीर्तनात रिंगे महाराज चाल म्हणायला उभे राहातात तेव्हा त्यांच्या गायकीचा थाट त्यांच्या या क्षेत्रातील ऐश्वर्याची साक्ष प्रत्येक तानेतून देतात. भजन ही वारकरी पंथाची मुख्य उपासना आहे. पारमार्थिक जीवनातून भजन वजा केले तर जीवन उपासनाशून्य होईल. वारकरी संतांनी आत्मोद्वाराकरिता भजन केले आणि लोकोद्वाराकरिता कीर्तन केले. भजन हे प्रभूचे निवासस्थान, जेथे हरिदास हरिभजन करीत असतात तेथे त्याचा अखंड वास असतो. अशा हरिभजनाचा वसा घेऊन त्याचा वारसा अनेकांना मुक्तपणे आयुष्यभर वाटणारे हरिभाऊ सावित्रीच्या कुशीतील लहुळसे गावचे.
त्यांच्याकडून धडे घेतले अनेक नामवंत भजन गायक आज महाराष्ट्रात आपल्या भजन गायकीचा ठसा उमटवीत आहेत. इतकेच नव्हे तर कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या अनेक मान्यवर प्रबोधनकारांनी त्यांच्याकडून स्वरांचे ज्ञान घेतले आहे. एखाद्या कीर्तनकाराची विषय मांडण्याची हातोटी चांगली असते. परंतु संगीत आणि स्वरांचे ज्ञान नसल्याने कीर्तनकारात न्यूनगंड येण्याची शक्यता असते. अशा अनेकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. भजन गायकी ही मनाला  समाधान देणारी कला असून भगवंताच्या जवळ जाण्याचे ते एक साधन आहे ते आत्मसात करताना खूप कष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे हरिभाऊ सांगतात.
कोणतीही विद्या किंवा कला वीर्यवती व्हावयाची म्हणजे ती केवळ निखळ श्रद्धेने आत्मसात करावी लागते. ज्या गुरूकडून विद्या संपादन करावयाची त्याच्याविषयी त्या विद्यार्थ्यांच्या मनात  असीम श्रद्धा असावी लागते. शिवाय जी विद्या हस्तगत करायची असते तिच्याबद्दल उत्कट प्रेम असावे लागते. 'स्वीकृत गुरु आणि संकल्पित विद्या' या दोघांवरही परम श्रद्धा असावी लागते. समर्थ रामदास स्वामी याबाबत म्हणतात-



जाणत्यासी गावे गाणे | जाणत्यासी वाजविणे |
नाना आलाप सिकणे | जाणत्यासी ||
जाणता म्हणजे ज्ञानी गुरु, जे शिकायचे ते जाणत्याकडून शिकले म्हणजे विद्येत काही न्यूनता उरत नाही.
संगीतात घराणी मानावीत की नाही, घराण्यांच्या शिस्तीच्या चौकटीनुसार मैफल करणारा प्रतिभावान असतो की नसतो. या प्रचलित वादाच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष बुद्धीने मान्य करायला पाहिजे की हरिभाऊंनी अथक परिश्रम करून वारकरी संप्रदायात आपले योगदान सिद्ध केले आहे.
खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न करता तो मडके साकारणाऱ्या कुंभारासारखे कष्ट घेतो. कुंभार जसा ओली माती मळून योग्य मिश्रण करून त्या मातीतून हळुवार हाताने सुबक मडके आकारास आणतो, तसाच खरा गुरुही शिष्यरूपी ओल्या मातीत सुविचारांचे-सद्गुणांचे सिंचन करून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करत असतो, हरिभाऊंकडे समाज याच दृष्टीकोनातून पाहत आला आहे.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई







 

 

 

 

 

 

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...