सोमवार, १३ मे, २०२४

जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन"

 

जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन"


मुंबई (रवींद्र मालुसरे) : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महासंघाचे अध्यक्ष राहीलेले ज्येष्ठ चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन" प्रदर्शन दि.१४ते २०मे च्या दरम्यान जहांगीर कला दालनात सुरू आहे. या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती पाहतांनाच त्यांच्या कला प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रकार श्री. मल्लिकाजूर्न सिंदगी सरांचा परिचय फार मोठा आहे. त्यांच्या परिचयाचा  सारांश रूपाने परिचय करून देत त्यांच्या कलाकृतींचा परिचय रसग्रहण स्वरूपात करणे जास्त रास्त राहिल.
घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा कलेचा वारसा नसलेल्या परिस्थिती मधून चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी यांनी कलेचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण टप्याटप्याने पूर्ण करून , प्रपंच भागवण्यासाठी अंदाजे 37 ते38 वर्षापूर्वी कलाशिक्षकाची सेवा स्विकारून ते मुख्याध्यापक पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत. कलाशिक्षक मुख्याध्यापक पदी निवड होणारे चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे मोजक्या कलाशिक्षकां पैकी ओळखले जातात. चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी यांनी कलाशिक्षक ते मुख्याध्यापक पद या कार्यकाळात , कलाशिक्षक संघटनेचे संघटन करण्याचे कार्य अतिशय कौशल्याने कुशलतेने सांभाळलेले आहे. चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांना अनेक मानसन्मान मिळालेले असून महाराष्ट्र राज्य शासनाने, त्यांना "आदर्श कला शिक्षक "  पुरस्कार  प्रदान करुन गौरविलेले आहे .

चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी , हे कलेविषयी अनेक प्रकाराचे साहित्य लिखाण सातत्याने करत असतात . त्यांचे कला विषयक लेखन ,हे कांही पुस्तकांच्या रुपांने अनेकांच्या संग्रही आहे. चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी सरांनी कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील .टी.डी. वर्गासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमां मध्ये " भाषाअध्यापन शास्त्र " या विषयांवरील शास्त्र शुद्ध पद्धतीने , मुद्देसुद सविस्तर पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आहे आणि ते प्रशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले आहे .

चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे मुळातच  बहुभाषिक आहेत,१४भाषांचे ते जाणकार असूनही त्यांची बोलीभाषा ही प्राधान्यक्रमाने मराठी त्यामुळे त्यांची राहाणीमान जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चित्र र्निर्मीतीतून दिसून येतो आहे.

चित्रकार श्री. मलिकार्जून सिंदगी हे कोरोना काळात कोरोना बाधीत झाले होते. कोरोना माहामारीच्या कालावधीत ते बाधीत होवून ते एकलकोंडेपणा असहय जीवण जगत होते . मरण त्यांच्या नजरेसमोर तरळत होते. अशा परिस्थितीमध्ये काय करावे? या विवंचनेतून त्यांनी आपल्या मनांतील भावना जागृत केल्या आणि कलासाधना हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय हे प्रमाण मानून त्यांनी त्यावेळी कलासाधनेला सुरुवात केली आणि संबंध कोरोना कालावधीत कलेची साधना केली ती कला साधना त्यांच्या फळरूपाला आली. "कला जीवनाचे सार" अशा आशयाचे त्यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे. कला माणसाला जीवन जगण्याची उमेद देते असे चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी सर्वांना आर्वजून सांगतात किंबहुना हा सामाजिक संदेश देतात. चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे कलाकृती / चित्र निर्मिती करतांना फारसा विचार करता प्रथम  उपलब्ध पृष्ठभागावर उपलब्ध माध्यमाद्वारे सहजपणे छेडछाड करतात आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची कलाकृती निर्माण होण्यास सुरुवात होते .कलाकारांना आपली कला साकारण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकाराचा आकार हवा असतो , तो मूर्त असो कि अमूर्त स्वरूपाचा. चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी  यांनी साधे- साधे कागदापासून ते कॅनव्हासपर्यंत कलाकृती साकारण्यासाठी अनेक प्रकाराचे पृष्ठभाग छोट्या मोठ्या , कमी अधिक प्रमाणात वापरले आहेत किंबहुना ते हाताळलेले आहेत चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी चारकोल/ कोळश्या सारख्या पारंपारिक माध्यमापासून ते विविध रंगी पेन ,रंगीत पेंन्सिल्स, रंगखडू , ॲक्रॅलिक , तैलमाध्यम अशा अनेक प्रकाराच्या  अधुनिक माध्यामाचा वापर खुबीने करतातमुख्यत्वेकरून प्रदर्शनामध्ये कॅनव्हॉस ॲक्रॅलिक तैल माध्यमातील कांही निवडकच मोजक्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत . इतर माध्यमात केलेल्या कलाकृती काही शेकडोच्या संख्येने त्यांच्याकडे संग्रही आहेत.

चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे पृष्ठभागावर सहजपणे चित्र निर्मितीला सुरुवात करतांना माध्यमांशी छेडछाड करतात मग त्यांना पृष्ठभागात/ अवकाशात एखादा छोटा-मोठा बिंदू दिसतो तर कधी-कधी रेषांचे वेगवेगळे प्रकार दिसतात आणि मग चित्रकार श्री. मलिलकार्जून सिंदगी सर चित्ररूप साकारण्या कडे सरसावतात . कलेच्या मुलतत्वामधले एखादे मुलतत्व चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांच्या दृष्टिक्षेपात आला की  मग मूर्त स्वरूपात असो की अमूर्त स्वरूपात असो कलाकृती निर्माण करण्यासाठी आपल्या कला कौशल्याचा परिपूर्ण वापर करतात .

एखाद्या बिंदूला किंवा रेषांच्या प्रकाराला मूर्त- अमूर्त रूप देत देत कलाकृती मध्ये मुलभूत भौमितिक आकारांची निर्मिती तर नैसर्गिक आकारांत नदी, नाले , सुर्य, डोंगर , झाडा झुडूपांचे विविध डौलदार आकार , आकाशामधील विविध प्रकारच्या आकाराची निर्मिती , अथांग समुद्र किनारे , खवळलेल्या पाण्याच्या लाटा , जहाज, बोटी ,  सुर्य किरणे इत्यादी अनेक प्रकाराचे मूर्त - अर्मूत स्वरूपाचे आकाराचे विषय चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांच्या कलाकृतीमधून दिसून येतात .

विशेष म्हणजे चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी सरांच्या कलाकृती मध्ये ध्वज, शिव पार्वती , नंदी बैल , शंख- डमरू , त्रिशूल , शंकराची पिंड , होम- हवन , ज्वाला इत्यादी पारंपारिक दैवीय आकार मूर्त - अमूर्त स्वरूपात दिसून येतात. चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे, आपल्या कला निर्मितीमध्ये उजेड अंधार , उन सावल्यांचा खेळ अतिशय कौशल्यपूर्ण विविध प्रकारच्या रंगसंगती माध्यमातून साकारण्यामध्ये कमालीचे यशस्वी झालेले आहेत.

चित्रकार श्री. मल्लिकार्जुन सिंदगी यांनी कलाकृती / रंगलेपन कधी कधी समरंग पटलाद्वारे तर कधी कधी श्रेणीक्रमाने तर कधी कधी आच्छादित पद्धतीने तर कधी- कधी तुटक पद्धतीने तर कधी कधी मिश्रित पद्धतीने रंगलेपन करून अतिशय सुंदर मनमोहक कलाकृती साकारलेल्या आहेत . चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांनी रंगलेपनामध्ये पांढरा रंग, काळा रंग, कृष्ण धवल रंग, पिवळा हिरा, फिक्कट निळा , गडद निळा , पिवळा, तांबडा, नारंगी आश्या उष्ण शीत रंगाचा वापर त्यांच्या चित्राकृतींमध्ये चपखलपणे केलेला आहे . त्यामुळे चित्र पहातांना चित्रामध्ये जवळचे -लांबचे अंतर दिसून येते. चित्रामध्ये धुसर पणा जाणवतो आहे तर कांही चित्रांमध्ये धुरकटपणा , धुर निघणारे , वातावरणात जाळ धगधगत आहे , आभाळ भरून आलेलं आहे , कडक उन पडले आहे , सकाळ सकाळीचे पहाटेचे दृश्य चित्र निर्माण करण्यामध्ये चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे कुंचल्याच्या माध्यमातून रंगलेपन करून चित्र निर्मितीला , चित्र विषयाला , चित्र वातावरणाला , चित्रमाध्यमाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कमालीचे यशस्वी झालेले आहेत. विशेषतः भडक रंगाचे आयोजन हे अनेक चित्रकृतीचे वैशिष्ठ्ये वाटते.

कुंचला, नाईफ , रोलर इत्यादी अनेक प्रकाराच्या माध्यमांचा वापर करण्यास  चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी महत्व देतात. अशा विविध मुलतत्वांचा कौशल्यपूर्ण उपयोग करून तयार केलेल्या कलाकृती रसिकांच्या मनामनामध्ये सौंदर्य भाव निर्माण करतीलच या बद्दल शंका नाही .

दि.१४ में ते२०मे२०२४ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी , काला घोडा , मुंबई येथे होत असलेल्या चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांच्या एकल चित्र प्रदर्शनास कला रसिकांनी,कला प्रेमींनी, आणि कला संग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न


युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे - वीरमाता अनुराधा गोरे

फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

मुंबई (रवींद्र मालुसरे) :-  युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा करण्यासाठी विविध सेवा मार्ग  खुले आहेत. त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा, आत्मविश्वासाने पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षण सामोरे जा. स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो. आपल्याला सुरक्षितता हवी असते मात्र देशाच्या सुरक्षिततेचा विचार आपण विशेषतः युवा पिढी करणार आहे की नाही. देशाचे भविष्य घडविणे तुमच्या हाती आहे असे आवाहन शहिद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. शेकडो युवा-युवतींना प्रेरित करताना अनेक प्रासंगिक उदाहरणे ओघवत्या शब्दात देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना दादर येथे मार्गदर्शन केले


महाड येथील फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील मुंबई निवासी युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दादर येथील धुरू हॉल मध्ये केले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन केले.  

 

स्पर्धा  परीक्षा तज्ज्ञ आणि  लक्ष्य अकॅडमीचे सिनियर फॅकल्टी वसीम खान यांनी प्रारंभीचे सत्र गुंफताना म्हणाले की, सरकारी नोकरीत आर्थिक सुरक्षितता आहे, मानसन्मान मिळतो, हाती अधिकार येतात, हाती अधिकार आल्यामुळे देशसेवा करायला मिळते, चांगलं काम करता येते .... एकूणच काय तर आकर्षण ही अशी गोष्ट आहे जी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित करतेइंजिनिअरिंग आणि एमएमबीबीएचे अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आली आहे, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही वाढली आहे. काही विद्यार्थी मात्र याला अपवाद आहेत. ते केवळ आकर्षणापोटी नव्हे तर मनाशी ध्येय बाळगून आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते म्हणून विचाराअंती स्पर्धा परीक्षेकडे आलेले असतात. यूपीएससीमध्ये निवड होणाऱ्यांमध्ये बीई, एमई, एमटेक, डॉक्टर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढते आहे. यंदाही निवड झालेल्यांमध्ये अभियांत्रिकीतील पदवीधरांची संख्या लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी अथक परिश्रम आवश्यक असतात,


लक्ष्य अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. आपली ध्येयनिश्चिती ही वास्तववादी असायला हवी. आपल्या सामर्थ्याची आणि मर्यादांची जाणीव असायला हवी. स्पष्टता असेल तर इकडे वळण्यात अर्थ आहेघर, परिस्थिती, आईवडील, स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण या सर्वांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवास्पर्धा परीक्षा देणे हे करिअर नव्हे. परीक्षा पास झाल्यावर आपल्या करिअरची खरी सुरुवात होत असते. पास झाल्यानंतर पुढे काय आणि नाही झाल्यास पुढे काय या दोन्हींचा विचार करायला हवास्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपली लक्ष्मणरेषा आखायला हवी. म्हणजे मी किती वर्षे हा अभ्यास करणार आहे, हे ठरवायला हवे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो. परीक्षेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात पण एका मर्यादेपेक्षा जास्त काळ आपण इथे राहिलो तर त्याचे नकारात्मक परिणामही होतात. परीक्षेत अपयश आले म्हणून सगळे संपले असे वाटून घेणेही चुकीचे आहे. परीक्षेतील अपयशाचा संबंध आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाशी जोडता येत नसतो. परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. तो आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. परीक्षेत अयशस्वी झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांत नंतर देदिप्यमान यश मिळवले आहे.

बँकिंग परीक्षा तज्ज्ञ ओंकार तपकीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, बहुसंख्य विद्यार्थ्यांना 'आयपीएस' आणि ‘आयएएसच व्हायचे असते. तेच ध्येय त्यांनी बाळगलेले असते. त्यामुळे इतर पोस्ट आणि परीक्षांकडे पाहण्यात त्यांना रस नसतो. 'एमपीएससी' देणारे विद्यार्थीही काही ठराविक पोस्ट लक्ष्य ठेवून परीक्षा देत असतात. असे ध्येय असणे चांगले असले तरी,परीक्षार्थींनी असे एकाच पदावर किंवा परीक्षेवर अडून राहता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या इतरही परीक्षांचा विचार करायला हवा, जेणेकरून त्यातून अनेक संधी खुल्या होतील. म्हणूनच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्या अंतर्गत किती परीक्षा येतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

मंडळाचे माजी सचिव  नितीन पवार यांनी प्रास्ताविक करताना मंडळाचे कार्य, शिबीर आयोजनाचा हेतू  सांगताना फौजी आंबवडे गावाचे ऐत्याहासिक महत्व आपल्या भाषणात सांगितले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, मृत्यु समोर आहे हे माहित असुनही सैन्यातील नोकरीत स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३ लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सुद्धा आमचे पूर्वज होते. पहिल्या महायुद्धात गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाली. याची साक्ष ब्रिटिश सरकारने गावात उभारलेला स्मृतिस्तंभ आजही देत आहे. दुस-या महायुद्धात २५० तरुणांनी भाग घेतला त्यातील ७० जणांना वीरगती प्राप्त झाली. एकाच दिवशी २१ धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्या होत्या. भारत- पाकिस्तान, बांगलादेश युद्धातही गावातील अनेक सुपुत्रांनी मर्दुमकी गाजवली. आज सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. परंतु १९५६ साली स्थापन झालेल्या मंडळाने सरकारी पाठपुरावा करून गावात धरण बांधून घेतले. हायस्कुलसाठी प्रयत्न करून शिक्षणाची सोय केली. सामाजिक सुधारणासह मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रयत्न केला.

संस्थेचे सचिव जयदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले. तर शेकडो विद्यार्थी उपस्थित असलेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ना पवार यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र पवार, शशिकांत पवार, सुशील पवार, विलास ता.पवार, संतोष जाधव, दाजी कदम, विश्वास पवार जयदीप पवार, प्रमोद पवार, सुरेश शिंदे, आत्माराम गायकवाड आदींनी विशेष प्रयत्न केले.

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 









वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...