शुक्रवार, २३ जून, २०२३

|| नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ||

 || नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ||

वै. श्री सदगुरु रामकृष्ण भावे महाराज

वै. श्री सदगुरु अर्जुनमामा साळुंखे महाराज

वै. श्री सदगुरु नारायणदादा घाडगे महाराज

महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यासह श्रीक्षेत्र पंढरपूर व आळंदी येथे भागवत धर्माची पताका उंचावून हरिनामाचा गजर करणाऱ्या, गेल्या शतकातील या महान सत्पुरुष त्रयींच्या पारमार्थिक कार्याची संपूर्ण महती सांगणारा 'नारायण नामे होऊ जीवन्मुक्त' हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आहे. 

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी ला तो आपल्यापर्यंत पोहोचेल ...रामकृष्णहरी....

स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा |

मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा||

नारायण नामे होऊ जीवन मुक्त |

कीर्तनी अनंत गाऊ गीती ||

वैकुंठीचे जण सदा इच्छिताती |

कइ येथे येती हरिचे दास ||

यम धर्म वाट पाहे निरंतर |

जोडोनिया कर तिष्ठतसे ||

तुका म्हणे पावावया पैलपार |

नाममंञ सार भाविकांशी ||

जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा पाच चरणाचा नामाचा आणि मृत्युलोकाचा महिमा सांगणारा उत्कृष्ट असा हा अभंग आहे, या अभंगात  तुकोबाराय म्हणतात, स्वर्गातील अमरत्व प्राप्त असलेले  देव म्हणतात की, हे भगवंता आम्ही मृत्यूलोकी जाऊन मनुष्य जन्माचे सार्थक करू.  नारायण नामाचा गजर करू आणि कीर्तन भजनात आनंदाने नाचू आणि पापमुक्त होऊ. याहेतूने स्वर्गातील देव भगवंताला विनंती करतात कि, आम्हाला मनुष्य जन्म द्यावा. आमचा जन्म मृत्यूलोकात व्हावा !मृत्यू लोकी असे काय आहे की स्वर्गातील देव येथे येण्यासाठी आतूर  झाले आहेत ? तेंव्हा तुकोबाराय म्हणतात," येथे त्रिवेणी संगम आहे !!...त्रिवेणी संगम म्हणजे काय तर,  पृथ्वीतलावर  देव, भक्त आणि संत आहेत. ते पवित्र पावन तीर्थक्षेत्री  वास्तव्यास असतात.आणि या भूमीत जन्म मिळाला तर....

नारायण नामे होऊ जीवन मुक्त | कीर्तनी अनंत गाऊ गीती || म्हणूनच  या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय नारायण नामाचे महत्व विषद करतात. 

मायबाप संतसज्जनहो....आपल्या सर्वांचे परमभाग्य सद्गगुरू  वै ह.भ.प. नारायणदादा रा घाडगे या संत सत्पुरुषाचा आपणाला सहवास आणि कृपाशिर्वाद लाभला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सत्कर्म,सत्कार्य करायला आणि देवाधिदेव 'नारायणाचे' नाम घेण्यास शिकवले. आपली सर्व इंद्रिये बिथरतील पण नेहमी आपल्या मनाला स्थिर ठेवा. नामाच्या सामर्थ्याला प्रयत्नांची जोड दिल्यास  या जगात अशक्य काहीच नाही.  संसारातून तरूण जाण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे !  आणि हेच त्यांनी आपल्या कीर्तन-प्रवचनातून सोप्या भाषेत अहोरात्र सांगितले.परम श्रध्येय दादांमहाराजांची देवभक्ती,मानव भक्ती आणि त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातल्या आचार-विचार-व्यवहाराचे  मोठेपण   हे सर्व संपादित करून विद्यमान गुरुवर्य हा.भ.प. रामदादा महाराज घाडगे यांच्या आशीर्वादाने समग्रपणे "नारायण नारायण नामे होऊ जीवनमुक्त" या नावाने  जीवनचरित्र ग्रंथ आपणा समोर आणण्याचा संकल्प लवकरच माझ्याकडून पूर्णत्वास जात आहे. 

दुर्गम खेड्यातला आणि गरीब कुटुंबातला एखादा सामान्य तरुण साधक होतो....साधकाचा संत होतो संतत्वातून तो गुरुपदास आणि पुढे मोक्षाला पोहोचतो आणि विश्वाला वंद्य होतो. अशी ही दादामहाराजांची महानता सर्वांच्या हृदयी बिंबली आहे.  श्रेष्ठ सत्पुरुषांची चरित्ररेखा त्यांच्या लौकिक जन्मापासून पारलौकिक मोक्ष स्थितीपर्यंत अत्यंत लक्षणीय असते.असा हा लक्षवेधी चरित्रग्रंथ आपणासमोर येण्यापूर्वी आपल्या काही योग्य सूचना असतील तर नक्की कळवा, धन्यवाद ! 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा - ९३२३११७७०४

चरित्र ग्रंथात वाचायला काय असेल 

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील  वारकरी संप्रदायाची सद्यस्थिती       

प्रभादेवीतील श्री सद्गगुरू भावे  महाराज वारकरी समाजाविषयी


वै सद्गगुरू ह.भ.प.रामकृष्ण भावे महाराज :-


 





यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिका,  कुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य, वैकुंठगमन 

वै. सद्गगुरू  ह.भ.प.अर्जुनमामा  साळूंखे 








यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिका,  कुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य, वैकुंठगमन

वै. सद्गगुरू  ह.भ.प. नारायणदादा रामजी घाडगे  








यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिकाकुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य

दादामहाराजांचे बालपण

दादामहाराजांचा गृहस्थाश्रम        

दादामहाराजांचे मुंबईस स्थलांतर

दादामहाराजांची परमार्थातील  वाटचाल                                    

दादामहाराजांची सदगुरू  भेट    अनुग्रह

दादामहाराजांच्या सदगुरू  कार्याचा प्रारंभ                             

दादामहाराजांच्या नेतृत्वाखाली  समाजाचा विस्तार

दादामहाराजांच्या नेतृत्वाखाली  सामुदायिक पारायण सोहळे.          

सामुदायिक पारायणाच्या  आठवणी

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील समाजाच्या स्वमालकीच्या धर्मशाळेचे स्वप्न      

संकल्पपूर्ती आणि आलेल्या  अडचणी त्यावरील मात

धर्मशाळेतील समाजाच्या  परमार्थाची वाटचाल

धर्मशाळेच्या नवीन इमारतीच्या  बांधकामाचा संकल्प व पूर्तता

दादामहाराजांचे अखेरचे दिवस

दादामहाराजांचे वैकुंठगमन

याचबरोबर - समाजाच्या अनुयायी गावातील हरिनाम सप्ताहाचा सुरुवातीपासूनचा इतिहास

दादामहाराजांचे फोटो आणि आठवणी                

दादामहाराजांविषयीमान्यवरांचे वाचनीय लेख

लेखक : 

रवींद्र तुकाराम  मालुसरे 

(अध्यक्ष मराठी  वृत्तपत्र  लेखक संघ मुंबई )

9323117704


रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४

गुरुवार, २२ जून, २०२३

बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड

बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड

(मुंबई : रवींद्र मालुसरे)

शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र बाजीराव विठोबा मालुसरे
यांची मुंबईतील दक्षिण मुंबई फोर्ट उपविभागप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
बाजीराव मालुसरे हे यापूर्वी फोर्ट मुंबई येथे शाखाप्रमुख होते तर सध्या हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आणि कोल्हापूर शिरोळ तालुक्याचे संपर्क प्रमुख आहेत.
राजकीय,सामाजिक आणि पारमार्थिक अशी समृद्ध परंपरा लाभलेले बाजीराव मालुसरे हे नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्न असून तत्कालीन कुलाबा जिल्हापरिषदेमध्ये कृषी सभापती व पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती असलेल्या स्व विठोबा आण्णा मालुसरे यांचे सुपुत्र आहेत. बाजीराव यांचे मोठे बंधू ज्ञानोबा मालुसरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते व त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. सध्या गुरुवर्य गणेशनाथबाबा संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत.
तर दुसरे बंधू तानाजी मालुसरे हे डोंबिवली येथे शिवसेना उपशहर प्रमुख आहेत. त्यांचे पुतणे अनिल ज्ञानोबा मालुसरे हे पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख आहेत.
बाजीराव मालुसरे हे फोर्टमध्ये ३५ वर्षेहून अधिक वर्षे एक जुने कट्टर शिवसैनिक म्हणून सर्वपरिचित आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या अनेक संघर्ष लढ्यात अग्रेसर असलेले बाजीराव मालुसरे यांची एक बेडर आणि निर्भिड कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्याचप्रमाणे नाईक मराठा समाजाचे कार्याध्यक्ष असलेले बाजीराव हे उत्तम अभ्यासू वक्ते आणि शिवचरित्राचे अभ्यासक आहेत. संपर्क बाजीराव मालूूसरेे 8779671894
💐🚩मनःपूर्वक अभिनंदन 💐🚩


शनिवार, १७ जून, २०२३

 कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष - कॉ प्रकाश रेड्डी


मुंबई : (रवींद्र मालुसरे) स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी ज्यांनी सभागृहात आणि स्वच्छ चारित्र्याने जनमानसावर छाप पाडली अशा दिवंगत कॉम्रेड जयवंत पाटील यांची जन्मशताब्दी प्रभादेवीकर वर्षभर साजरी करणार आहेतलोकांचा हा व्यक्त होणारा कृतज्ञता भाव म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे असे उदगार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काढले. प्रभादेवी येथील आगरी सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले कीकॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष असलेला तो काळ होता. मधू दंडवते यांनी दादरमधून निवडणूक लढण्याचा हट्ट त्यावेळी सोडला असता तर अल्प मतांनी पराभूत झालेले कॉ जयवंत पाटील लोकांचा एक आमदार म्हणून सभागृहात गेले असते. मुंबईतील मध्यवस्तीतील गिरणगावात झोपडपट्टीचाळीगल्लीबोळात जाऊन लोकांसाठी अहोरात्र काम केल्यामुळे कॉ. जया पाटीलकॉ मणिशंकर कवठेकॉ गणाचार्यकॉ प्र के कुरणे यांच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने निवडून येत असतपरंतु ८२ च्या गिरणी संपानंतर मुंबई शहराची ओळख औद्योगिक राजधानी ऐवजी आर्थिक राजधानी म्हणून झालीत्यानंतर झालेली भ्रष्ट राजकारणी व माफियांची युती यांनी अनेक चळवळी दडपल्या. मुंबईतील लोकांच्यासाठी आवाज उठविणाऱ्या संस्था वा राजकीय पक्ष यांची मुस्कटदाबी केली त्याचा परिणाम एकेकाळी दिमाखाने फडकणाऱ्या लाल बावट्यावर सुद्धा झाला आहे हे नाकारून चालणार नाही. संसदीय राजकारणावर विश्वास असलेल्या करोडो लोकांचा लवकरच भ्रमनिरास होणार असून भविष्यात पुन्हा बळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 
तर प्रमुख पाहुणे म्हणून असलेले कॉ मिलिंद रानडे म्हणालेमहाराष्ट्र हे कम्युनिस्ट चळवळीची प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरा असलेले राज्य आहे. त्याला ब्रिटीश साम्राज्यवाद्यांशी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संगराचा वैभवशाली वारसा आहे. या लढाईत कित्येक कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजचा काळ हा गरिबांना जगण्यासाठी अधिक कष्ट करायला लावणारामुख्य प्रश्न बाजूला ठेवून राम मंदिरऔरंगजेबलव्हजिहाद यासारखे भावनिक धार्मिक तेढ वाढीस लावणारे प्रश्न उकरून काढून एका बाजूने देशवासियांना अडाणी आणि दुसरीकडे अंबानी - अदानी सारख्या उद्योगपतींना अधिक श्रीमंत करणारे हे सरकार आहे. अडाणी अधिक श्रीमंत कसा झाला याचा शोध सामान्यांनी घ्यायला हवा आणि त्यानंतर मुखंडपणा सोडून संबंधितांना जाब विचारायला हवा. या देशातील जनतेने काय बघायचेकाय वाचायचेकाय लिहायचे आणि कसे वागायचे हे सतत खोटं बोलणारी सत्तापिपासू लोकं ठरवीत आहेत. सर्व क्षेत्रांवर होणारे हे आक्रमक थोपविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे संघर्ष आणि क्रांती या कल्पनांनी झपाटलेला तारुण्याचा तो काळ ! मुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळमोलमजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
पत्रकार अशोक कारखानीस आपल्या भाषणात म्हणालेमुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळमोलमजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवा मुक्तीचा लढा आणि नंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात कम्युनिस्ट पक्षाने जी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यामध्ये जयवंत पाटील अग्रभागी होते. १९५७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने जो प्रचंड विजय मिळवला त्यात जयवंत पाटील महापालिकेवर निवडून आले.
मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्याने त्यांनी आपल्याच विभागात नव्हे तर एक निर्भिडलढाऊसर्वसमावेशक नेता म्हणून सा-या मुंबईतील नागरिकांमध्ये त्यांनी सर्वमान्यता मिळवली होती.
मोकळ्या मनाचासामंजस्य जोपासणारालोकसंग्रहात रमणारापण लोकहितासाठी सर्वस्व समर्पित करणारा नेता म्हणून जयवंत पाटील यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या कार्याला मुंबईच्या गिरणी कामगारांच्या लढ्याच्या आणि मुंबई मनपाच्या इतिहासाची नोंद घेताना विसरणे शक्य नाही. लोकविरोधी शक्ती आणि त्यांची लोकविरोधी धोरणे यांच्याविरोधी भूमिका घेणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी सोडून दिले आहे. काळाची गरज म्हणून लोकांचे प्रश्न हातात घेऊन जनतेचे लढे उभारण्यास कम्युनिस्टांनी कटिबद्ध होणे हाच खरा लाल सलाम जयवंत पाटील यांना अभिप्रेत ठरेल.
आगरी समाज हा नेहमीच लाल बावट्याखाली एकनिष्ठ आणि प्रत्येक संघर्ष लढ्यात अग्रेसर राहिला आहेप्रभादेवीत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना आधार देण्याचे काम जयवंत पाटील यांनी केले. प्रभादेवीकर त्यांचे ऋण विसरणे शक्य नाही असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद आणि आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी व्यक्त केले. कॉ उदय चौधरीकॉ एकनाथ मानेराष्ट्रवादीचे रमेश परबसुभाष मराठेमराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेकॉ विजय कोरेकॉ डॉ. अनुराधा रेड्डीकॉ पाटील यांच्या कन्या मिलन आणि रोशन यांनीही कॉ जयवंत पाटील यांच्या आठवणी आपल्या भाषणात जागविल्या. कॉ मधुकर कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वनाथ घवाळीकृष्णा पाटीलअनंत मोरेचित्तरंजन कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

बुधवार, ३ मे, २०२३

सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज

 सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज 


पंजाबमधून श्रीरामकृष्ण महाराज जे निघाले ते सुरतमध्ये आले. परंतु सुरत हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरणारे नव्हते. श्रीयुत कामेरकर या नावाचे मुंबईतील गृहस्थ सुरत येथे काही कामानिमित्त गेले असताना, कोणीतरी मराठी बोलणारा बुवा सुरतेच्या स्मशानात येऊन राहिला आहे अशी बातमी त्यांना लागली. त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याने ते त्यांच्या भेटीसाठी गेले. तुम्ही मुंबईला चला अशा त्यांच्या विनंतीवरून मग महाराज मुंबईला आले. मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र व्हायचे होते. मुंबईतील दुःखीकष्टी लोकांना उपकारक सहकार लाभावयाचा होता. ते मुंबईत कसे आले आणि तेथे येऊन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कार्य केले याची विस्तुत माहिती याविषयी तुम्हाला या लेखावरून होईल. अक्कलकोटच्या श्रीसमर्थ महाराजांची त्यांनी एकनिष्ठेने उपासना व भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. स्वामींची श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्यावर संपूर्ण कृपा होती. श्री जांभेकर महाराजांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा सदुपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. कोणतीही सिद्धी असो, ती सहजसाध्य नसते. त्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात. महाराजांनी आरामाच्या व सुखी जीवनाचा त्याग केला त्यामुळेच ते पुढे  सिद्ध पुरुष होऊ शकले. महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाची कुवत ओळखत असत. बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी येत असत. हे जाणत असतानाही त्यांनी प्रत्येकाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजही निष्ठावंत भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवत असते. त्यांचा पोशाख साधा असे. ते लुंगी नेसत. अंगात तोकड्या हाताची कफनी, डोक्यास साईबाबासारखे फडके गुंडाळीत. 

श्री जांभेकर महाराज सेंच्युरी बाजार सिग्नलच्या अगोदर लुकास कंपनीच्या समोर असलेल्या ज्याठिकाणी आज जयंत अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी  'भूतबंगला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका घरात राहत असत. त्या घरात कोणीही राहायला तयार नसे. कारण त्या घरात भुतांचे वास्तव्य होते अशी सर्वांची समजूत होती. महाराज तेथे राहावयास आले व काही दिवस सुखात राहिले. येथे राहायला आल्यानंतर त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढत गेली. तो बंगला आपण कायमचा विकत घ्यावा असे वाटून त्याच्या ख्रिश्चन मालकाशी त्यांनी बोलणे केले होते. परंतु तो काही केल्या विकायला तयार होईना. त्यामुळे विठ्ठल मंदिरजवळ म्हणजे श्रीदत्त  मंदिरासमोरील चंपावाडीत  त्यांनी प्रभादेवीतच एका आगरी समाजातील व्यक्तीचे म्हणजे 'फकीरशेट' यांचे घर भाड्याने घेतले. 

तेथे घरापुढे आलेल्या लोकांना बसण्याउठण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र घर भाड्याने देऊन फकीरशेट तो शेजारीच एका झोपडीत राहू लागला. त्याच्यापाशी नावाप्रमाणेच काही नव्हते. राहते घर भाड्याने गहाण पडले होते, नोकरी धंदा नव्हता. कुरुंबासह आयुष्याचे दिवस कसेबसे ढकलत होता. महाराजांना त्याची ही गरिबी लक्षात आल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाला चांगले कपडे घातले. आणि त्याला 'फकीरशेट' या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबाचा रुबाब वाढला. त्यामुळे पुढे ते सर्वांचे फकीरशेट झाले. ते घर म्हणजेच महाराजांचा मठ झाला. आणि त्याला नंतरच्या काळात आपोआप मठाचे स्वरूप आले. देवपूजा, आरती, प्रसाद वैगरे  सुरु होऊन त्या घराचे पावित्र्य व माहात्म्य वाढले. भक्तमंडळी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात त्या मठात येऊ लागले. येणाऱ्यांचे हेतू सफल होऊ लागले. तेथे सतत नंदादीप तेवत असे. महाराजांच्या नाना प्रकारच्या लीला तेथे चालत असत. ज्यांचे हेतू सफल होत ते तेलाचे व तुपाचे डबे तसेच लागेल तेवढे धान्य वैगरे आणून देत असत. रोज शेकडो लोक भोजन करून तृप्त होऊन जायचे. कधी काही कमी पडत नसे. महाराजांनी कधीही स्वतःजवळ पैशांचा संग्रह केला नाही. ते फक्त एकवेळ भोजन करायचे. बहुतेक दिवस उपवास करायचे. कधी कधी बेचाळीस दिवस उपोषण करीत. सकाळी व रात्री एक पेला दूध एवढाच त्यांचा त्या काळात आहार असे. ही सर्व अनुष्ठाने ते लोककल्याणासाठी करीत असत. पहाटेच्या प्रहरी काकड आरती होत असे व आरतीसाठी दोन-अडीचशे माणसे एकत्र जमायची. तर अन्नप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत चालायचा. गरीबी आणि धनिक अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाला येत असत. 

जांभेकर महाराजांचा जीवनपट अवघा १८९८ ते १९४० म्हणजे अवघ्या ४२ वर्षाचा त्यापैकी फक्त १९३० ते १९४० दहा वर्षे प्रभादेवीत राहिले. १० जानेवारी १९४० रोजी त्यांनी शिवाजीपार्क स्मशानभूमीजवळ समाधी घेतली. आज त्याठिकाणी 'श्रीरामकृष्ण जांभेकर मठ' आहे आणि धार्मिक कार्य अखंडितपणे सुरु आहे.

- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

९३२३११७७०४


मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।। https://youtu.be/xEOpbg0rnRw

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।।

 https://youtu.be/xEOpbg0rnRw


'ताठ कणा' मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे

 'ताठ कणामूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे


मुंबई (रवींद्र मालुसरे) : जगभरातली आई आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणी हेच शिकवते कीआयुष्यभर ताठ कण्याने जगत रहा. डॉ. प्रेमानंद म्हणजे पी एस रामाणी यांच्या आईने सुद्धा त्यांच्यावर तसेच संस्कार केले. त्यामुळे कुणासमोरही वाकायचंझुकयाचं किंवा माघारही घ्यायची नाही हे अंगीकारल्याने जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरो स्पायनल फ्लिप सर्जन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले असे गौरवपूर्ण उदगार मन:शक्ती केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी दादर येथे काढले.

डॉ रामाणींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना नुकताच 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करून गौरविले होते. याचे औचित्य साधून शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा व प्रतिमा रामाणी यांचा विशेष सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमोद शिंदे पुढे असेही म्हणाले कीमनशक्ती केंद्रात लहान मुलांना शिकवताना आम्ही विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी IQ,EQ,SQ हे शिवण्यावर अधिक भर देतो. IQ=Intelligent quotient म्हणजे बुध्यांक, EQ=Emotional quotient म्हणजे भावनिक बुध्दीमत्ता बुध्यांक. SQ=Social, spiritual quotient म्हणजे सामाजिकसात्विक बुध्दीमत्ता सत्विकांक म्हणजेच IQ EQ SQ ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो जीवनात ताठ कण्याने उभा राहिल. डॉक्टरांनी असहाय रुग्णांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जगण्याचे बळ तर दिलेच यापेक्षाही वैद्यकीय क्षेत्राला वरदान ठरणारा ते शोध लावू शकले त्यामुळे अनेकांना ते देवदूत वाटतात. 'ताठ कणाहे पुस्तक आणि चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरो.
माणसामध्ये सत्वरजतम हे तीन गुण असतातचपरंतु सात्विक गुण स्वीकारून त्याने परोपकारी वृत्तीने जगायला शिकले व ते स्वतःत अंमलात आणले पाहिजेत. ही सवय लागली तर भगवद्गगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे माणूस आपोआप कर्मयोग स्वीकारुन जगायला लागतोतेव्हा मोक्ष वैगरे कुठे नसतो तर तो आयुष्यात चांगले वागलो तर इथेच मिळतो. मनाला मिळणारा आनंद आणि समाधान म्हणजेच मोक्ष असे मत डॉ. रामाणी यांनी व्यक्त केले.
ज्या दिव्यांग अपंग व्यक्ती आणि मुले चालू शकत नाहीत अशा १७ जणांना शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्हीलचेअर आणि वैद्यकीय वस्तूंचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी 'ताठ कणाचित्रपटाचे निर्माते गिरीश मोहिते आणि पटकथा संवाद लेखक श्रीकांत बोजेवार यांनी या बायोपिकचे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले. सेक्रेटरी भूषण जाक यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गवाणकर तर आभार प्रदर्शन डॉ तुषार रेगे यांनी केले. कार्यक्रमात 'ताठ कणाहा चित्रपट दाखविण्यात आला. खजिनदार संजय दिवाडकरकिशोर कुलकर्णीजयंत गायतोंडेविनायक पंडितसंजय कुलकर्णीसतिश दाभोळकरस्वप्नील पंडितदिपक देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे

 मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी

मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी, ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की, मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून, यापुढे  प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया.

मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने तर सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री  डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, प्रशासकीय सेवेत असताना मी रुग्णांची नाळ सोडली नाही. सकाळी आठपासून संध्याकाळपर्यंत मी रुग्णांना भेटत राहिलो त्यांना माझ्यासमोर बसवून माझ्या गावाकडच्या बोलीभाषेत संवाद साधत राहिलो. त्यामुळे लाखो रुग्णांना मी कुणीतरी जवळची व्यक्ती आहे असा विश्वास वाटू लागलो. मी खेडेगावात मातृभाषेतच शिक्षण घेतले नावलौकिक मिळवला. त्यामुळे अनुभवांती मी खात्रीने सांगू शकतो. इंग्रजी ही फक्त पोपटपंची करण्यासाठी आहे खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळते. अपमान-अपयशाचा अनुभव तुमच्यासारखा माझ्याही आयुष्यात आला, पण मी जिद्द सोडली नाही. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. डॉ लहाने साहेबांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना बदलत्या परिस्थिती वर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले की, मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका. मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपला आहे. पूर्वी माणूस शंभर पाने वाचायचा आता शंभर शब्द सुद्धा ऐकण्याची क्षमता त्याच्यापाशी राहिली नाही.

मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात जन्मलेल्या आपल्या सर्वांना माय मराठीने सर्वांना सर्वकाही दिले. ओळख आणि ज्ञान भरभरून दिली, परंतु माणसाचे संस्कारित मन बऱ्याचदा सैरभैर होते. माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही....मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो,लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शकतो. पण त्यासाठी मनशांती आणि मनशक्ती ची गरज आहे. आपल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी मराठी भाषेचा शाहीर, कीर्तनकार, कथाकार, कादंबरीकार, कवी यांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली याचे विवेचन आपल्या भाषणात केले.

यावेळी व्यासपीठावर दासावाच्या प्रमुख कार्यवाह शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी चळवळीचा आढावा घेताना गेली ४८ वर्षे दिवाळी अंकांचे संपादक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व संपादकांचे आभार मानले. तर दासावाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार तर मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण करताना मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्स, चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - सकाळ अवतरण, पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - मुक्त आनंदघन, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - गोवन वार्ता, पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक -कालनिर्णयसाने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक -अधोरेखित, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनशक्तीकृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - श्रमकल्याण युग, याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार,नवरंग रुपेरी, कनक रंगवाचा, पुरुष स्पंदनं,शब्दगांधार, समदा, सह्याचल, ठाणे नागरिक, त्याचप्रमाणे  उल्लेखनीय अंक म्हणून - संस्कार भक्तिधारा, क्रीककथा, कालतरंग, शैव प्रबोधन, धगधगती मुंबई,निशांत, सत्यवेध, गावगाथा यांना प्रदान करण्यात आले.

 मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण झाले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव 'केवल प्रयोगी' चे सादरीकरण झाले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, आदेश गुरव  यांनी विशेष मेहनत घेतली. 



सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !

 दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !

नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसं भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचऊ धोरण अवलंबविणाऱ्या माणसांचा गजबजाट आज सभोवती दिसतो आहे. आयुष्याच्या प्रवासात ऐन उमेदीच्या काळात कोणीतरी भेटावे आणि त्याच्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे मैत्रीच्या रुपात कौटुंबीक ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे दिवंगत शरद वर्तक साहेब नकळत माझ्या आयुष्यात आले आणि ३७ वर्षे कायम मुक्कामाला राहिले. त्या राहण्यात त्यांच्या सौ वर्तकांचे घरच्या माणसाचे आपलेपण तर शरदरावांचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचे नाते होते. वर्तक जेवढे साधे दिसत तेवढेच ते साधेपणाने बोलत परंतु निर्भीड आणि परखडपणे संपादकीय पानावर लिहीत असत. वर्तक साहेबांची आणि माझी भेट १९८६ ला शिंदेवाडीच्या संस्थेच्या कार्यालयात झाली. पुढे दर शनिवारी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होत गेली. काही माणसे अनेक चेहऱ्यांनी समाजात वावरत असतात. शरद वर्तकांना दुसरा चेहरा नव्हताच, एकच होता. सार्वजनिक  जीवनात वावरताना आज मी थोडीफार श्रीमंती  अनुभवतोय ते दिवंगत ग शं सामंत, गणेश केळकर, भाई तांबे, शरद वर्तक व सध्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या मधू शिरोडकर, वि अ सावंत, नंदकुमार रोपळेकर, विश्वनाथ पंडित यांच्यामुळे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कामाचा डोंगर उभ्या केलेल्या या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात मी, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन कदम, दिलीप ल सावंत, प्रकाश नागणे,दत्ताराम घुगे आलो. 

वर्तक साहेब सातत्याने पत्रलेखन करायचे, विशेषतः महाराष्ट्र टाइम्स हे त्यांचे आवडीचे दैनिक. मराठी - हिंदी चित्रपट गतवैभवाचा काळ ते आठवणींच्या स्वरूपात आपल्या लेखणीतून उतरवत असत.  सध्या संपादकीय पानावर समाजाचा आरसा दाखविणारी वृत्तपत्र लेखकाची हक्काची जागा दिवसेंदिवस आकसत चालली आहे. जसा आज प्रिंट मीडियाच्या समोर त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तसाच संघाच्याही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला आहे. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून अलीकडे जोरात सुरु आहे. असे घडत असले तरी....वृत्तपत्र लेखक म्हणजे रात्रीच्या काळोखातही कार्यरत राहणारा जागल्या आहे. यापुढे...यापुढे...आणि यापुढेही तो राहाणार आहे. 

एखाद्या लहानश्या स्टेशनावर अंधाऱ्या रात्री रेल्वेगाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती कंदील घेऊन एक कामगार गाडीच्या चाकावर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी  करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी देत असतात. वर्तक साहेब त्यापैकी एक होते. प्रकाशकणांची पेरणी करणारे आणि आले  तसेच नकळत निघून जाणारे ! ....'शरद वसंत वर्तक, चेंबूर'  हे संपादकीय पानावरचे नाव अनेकांच्या कायम स्मरणात राहील. 

!! तुमच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा सलाम !!

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...