रविवार, ८ जानेवारी, २०२३

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

 

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त
'
ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

मुंबई (रवींद्र मालुसरे) :  घर आणि आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते. नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन:स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांना असल्याने त्यांनी खोपोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त जागेत थ्री स्टारला साजेसा रमाधाम वृद्धाश्रम सुरु केला. वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर त्याठिकाणी वृद्धांची अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार यांची सोय करणे त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा त्यांच्या पश्च्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे रमाधामचे विश्वस्त अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सामाजिक सेवेचे त्यांचे व्रत पुढे सुरु ठेवले आहे. समाजातल्या गरजूंनी या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणच्या सुखसोयी आणि व्यवस्था पाहून समाजातल्या गरजूना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन शिवसेनानेते खासदार अनिल देसाई यांनी केले.

जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि स्व मीनाताई बाळासाहेब ठाकरे स्मृती 'ममता दिनानिमित' खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमात मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि शिवसेना लोकाधिकार महासमितीच्या वतीने 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमाधाम विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीचा वेध घेतांना वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की, प्रत्येक मुलांनी सुनेने आपल्या आई वडिलांचा तसेच सासू सासऱ्यांचा संभाळ करावा. मात्र, बरीच मुले ही नोकरीसाठी देश - परदेशामध्ये जात असल्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढतेच आहे.
समाजासाठी खरोखरच काहीतरी करावे अशी तळमळ असणारे शिवसेनाप्रमुख आणि माँ मिनाताई होत्या. ‘मार्केटची गरज म्हणून नव्हे तर जिव्हाळ्याच्या आत्मीयतेने ही वास्तू उभी राहिली आहे. वृद्ध हा घटक तसा गरीब आणि काही प्रमाणात असाहाय्य असतो याची जाणीव ठेवून इथे येऊ इच्छिणाऱ्या काही गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक निकष लावता अत्यंत वाजवी दरात रमाधाम विश्वस्त मंडळ सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे त्यासाठी कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नाही. त्यांनी 9820060132 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.


वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे श्री वामन भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई, स्वा सावरकर अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख कार्यवाह दिलीप सावंत, संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्रीनिवास डोंगरे, अनिरुद्ध नारकर यांनी मुक्तचर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र लेखक संघाचे अरुण खटावकर, सुनील कुवरे, प्रशांत भाटकर, सतीश भोसले, विवेक तवटे, दिलीप दळवी तर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उल्हास बिले, उमेश नाईक, शरद एक्के, बाळासाहेब सुदाम कांबळे, विलास जाधव, प्रवीण हाटे, राजन तांडेल, सुधाकर नर, तुकाराम गवळी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

प्रभादेवीतील आगरी सेवा संघ

 प्रभादेवीतील आगरी सेवा संघ


आज प्रभादेवीत आगरी सेवा संघाच्या वतीने वार्षिक कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे, सन २०११ मध्ये वरळी कोळीवाड्याच्या जनता शाळेत अमृत महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता.

त्यावेळी १२ डिसेंबरला मुंबईतील काही दैनिकातून मी यासंदर्भात लेख लिहून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मुंबईकरांना ओळख करून दिली होती. यानंतरच्या ११ वर्षात भटचाळ येथे आगरी सेवा संघ चौक, मुरारी घाग मार्ग येथे माजी नगरसेवक मोतीराम तांडेल चौक, खाडा येथे आगरी सेवा संघाचे समाजमंदिराची स्वतःची वास्तू अशी कामे उभी राहिली आहेत.
काळाच्या ओघात संस्थेची स्थापना करणारे काही समाजधुरीण ज्यांनी संस्थेला उर्जितावस्था दिली, आर्थिक ताकद दिली, समाजातील सर्व थरात पोहोचवली असे समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही वयोवृद्ध झाल्याने घरी आहेत मात्र पद्माकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडची तरुण पिढी सातत्याने कार्यरत आहे. यातूनच कैलास पाटील, संजय भगत, नरेंद्र बांधणकर, कोठेकर, ज्योति जुईकर असे बरेचजण राजकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. गुणवत्ता असलेले अनेक तरुण वैद्यकीय क्षेत्रासह आधुनिक तांत्रिक युगात मोठमोठ्या हुद्यावर काम करीत आहेत.....या नवीन पिढीसमोर इतकेच आहे, आपल्या पूर्वजांनी बोलीभाषेसह जोपासलेली मूळ संस्कृती जपण्याची गरज आहे.
-------------------------------
"अगोदर प्रकाशित झालेला लेख"

सन १९३५ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आगरी सेवा संघाची स्थापना झाली. आज २०२२ च्या दसऱ्याला ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरात अनेक ठिकाणी आगरी समाजाची वस्ती फार मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. त्यापैकी प्रभादेवी, वरळी कोळीवाडा, सास्मिराच्या मागे भटचाळ, वडाळा, भोईवाडा, स्यान्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, मानखुर्द अशी ठळक ठिकाणे आहेत. परंतु प्रभादेवी आणि  वरळी कोळीवाडा येथे ही संख्या विलक्षण आहे. कामगार वस्तीतील या ठिकाणी गेल्या २० वर्षतात विलक्षण बदल होतो आहे. मुख्यतः  चाळी आणि झोपडपट्टयांनी व्यापलेला हा भाग सध्या टोळेजंग टॉवर्सनी व्यापलेला आहे. त्यामुळे आगरी समाजासह बहुजनांची काळाच्या ओघात प्रतिष्ठा वाढली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योजकता व राजकीय क्षेत्रात तीन दशकापूर्वी अत्यंत मागास असलेला या समाजातील अनेक तरुण कायापालट झालेल्या या समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षित झाला आहे. इतकेच नव्हे तर बदललेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा वेध घेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. काहींनी तर परदेशात चांगल्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. शिक्षणाबरोबरच सधनता आणि समृद्धी आल्याने समाजात चंगळवाद बोकाळला आहे, सर्वच समाजातील अलीकडची युवापिढी शिकली आहे पण जगाच्या बाजारात वावरताना प्रगल्भ बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अवांतर वाचन करीत नाही, बहुसंख्यजण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने स्वकेंद्रित झाली आहे, असाच सूर मागच्या पिढीचा असतो. असे असतानाही या समाजातील अलीकडच्या पिढीने प्रभादेवी परिसरात राजकीय  अस्तित्व निर्माण करतानाच समाजाची सदानंद वाडीत (खाडा ) स्वतःची वास्तू उभी केली आहे.
देशाचा स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९३५ चा आसपासचा काळ हा मुंबई शहरात विशेषतः कष्टकरी कामगारांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी व उलथापालथी करणारा होता. मुंबई गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली १९२८ मध्ये गिरणी कामगारांचा प्रदीर्घ असा ६ महिन्यांचा जागतिक नोंद करणारा बलाढ्य संप लढला गेला होता. महात्मा गांधी यांनी पुकारलेला १९३० च्या  मिठाचा सत्याग्रहाचा देशव्यापी लढ्यात मुंबईवासीय ब्रिटिश साम्राज्याला हादरे देण्यासाठी लढाऊ बाणाने उतरला होता. १९३४ साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खऱ्या अर्थाने कामगार विभाग ओळख असलेला वरळी येथे राष्ट्रीय लढ्याची धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले होते. १९३५ मध्ये पुन्हा गिरणी कामगार संपाचा घोषणा वातावरणात दुमुदुमु लागला होता. अशाच वातावरणात त्यावेळचे आगरी समाजातील धुरीण समाजाला एकत्र करावे या भावनेने विचार करीत होता. मुंबई शहराशेजारी असलेला अलिबाग तालुक्यातील पोयनाड,  सांबार,  फणसापुर, पेण तालुक्यातील वडखळ, वाशी, आमटेम, शहाबाज, चरी, शहापूर, पेझारी, कासू, गडब, पिटकीरी या विभागातील आगरी बांधव गिरणी - कारखान्यात अंगमेहनत करून सेंच्युरी बाजार, वरळी कोळीवाडा या भागात स्वतःचा किंवा भाड्याच्या चाळीत राहत होता. तर इकडे ग्रामीण भागातला बांधव निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आपली खारटण जमिनीच्या तुकड्यांवर दिवसरात्र काबाडकष्ट करून त्यावर आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदर एका बाजूने निसर्गाची आपत्ती तर दुसऱ्या बाजूला मागासलेपणामुळे हा समाज हलाकीच्या परिस्थितीत जखडला गेला होताच, परंतु त्याचबरोबर आणखी एक जबरदस्त आणि तितकेच महत्वाचे असे कारण होते, ते म्हणजे सर्वांगीण सामाजिक मागासलेपणा व त्यासोबतचा अशिक्षितपणा. अनेक प्रकारचा अनिष्ट अपप्रवृतींना तो बळी पडलेला होता. पोलीस-कोर्ट कबजाच्या हेलपाट्यांच्या बरोबर पैशाचीही उधळपट्टी करीत असे. केवळ मीपणाचा दिखाऊ हौसेपोटी लग्नसमारंभ किंवा इतर प्रसंगी कर्ज काढून वारेमाप खर्च करण्यात तो धन्यता मानत असे. व्यसनाबरोबरच अंधश्रद्धेचा आहारी जाऊन बुवाबाजी,  भगतगिरी, देवदेवस्की, भुताटकी यांचा सारखा फसवणूक होणाऱ्या गोष्टीना तो सहज शिकार बनत होता. त्या काळात अशा परिस्थितीत अडकल्याने त्याला आपला मायभूमीस मुकून मुंबईचा रस्ता धरावा लागला होता.

इकडे मुंबईत आलेल्या या आगरी बांधवांवर शहरी वातावरणात इतर पुढारलेला समाजाशी सामाजिक, व्यावहारिक, धार्मिक व इतर संबंध व संपर्क आल्यामुले त्यांचे आचार,  राहणीमान,  चालीरीती, बोलीभाषा यावर कळत नकळत प्रागतिक असा हळूहळू का होईना पण चांगला परिणाम बदल होऊ लागला होता. शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे विशेषतः युवकांना आपल्या समाजातला सर्वच अनिष्ट गोंष्टींविरुद्ध लढा देण्याचे विचार त्यांच्यात घोळू लागले होते. याच सुमारास १९३२ - ३३ सालांत आगरी समाजातील मुंबईचे दोन गरीब होतकरू तरुण जी एल पाटील व भाऊराव मुकुंद पाटील हे विश्वविद्यालयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. अशा या महत्वपूर्ण सामाजिक घटनेपासून स्फूर्ती घेऊन प्रभादेवी, वरळी, कोळीवाडा भागातील प्रमुख युवकांनी आगरी समाजाला संघटीत करून मागासलेपणा विरुद्धच्या लढ्यास हात घालण्यास सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने अखेर १९३५ साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक भव्य संमेलनाचे आयोजन करून आगरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. समाज वस्तीचा अशा सर्व भागातून त्या त्या भागाचे प्रतिनिधी निवडून घेऊन संघाचा कार्यकारिणीची रचना करण्यात आली. विशेष म्हणजे संघाचे कार्यकर्ते श्रमजीवी वर्गातील गिरणी कामगार होते. १९३६ सालचा राष्ट्रीय काँग्रेसचा महाराष्ट्रातील पहिल्या मंत्रिमंडळाच्या आमदानीत संपूर्ण दारूबंदीचा कायदा पास करण्यात आला.
कामगार भागांत त्याचे आगरी सेवा संघाने स्वागत केले. थाळीनाद, प्रचार बैठका राबवून दारूबंदीचा हा संदेश संघाने परिणामकारपणे घरोघरी पोचविला होता. तसेच संघाच्या कचेरी शेजारीच मोफत वाचनालय सुरु करण्यात आले होते. दैनिके, मासिके याबरोबरच ३०० निवडक पुस्तकांचा भरणा असलेले छोटेसे ग्रंथालय संघाच्या सभासदांसाठी विनामूल्य चालविले होते. हे ग्रंथालयाला संघाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी जनरल सेक्रेटरी कै विठ्ठल बा पाटील यांचा स्मरणार्थ आजगायत चालू आहे. तसेच कुस्ती, चेअर बॅलन्सिंग, लेझीम, दांडपट्टा इत्यादी व्यायाम प्रकार तज्ज्ञा शिक्षाकडून विनामूल्य शिकविले जात असत. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त गोविंदा पथक, दसरा संमेलन,  संघाचा आर्थिक उन्नतीसाठी चित्रपट किंवा नाट्यप्रयोग,वधु-वर संशोधन मंडळ, इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवीधर झालेला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, वैद्यकीय शिबीर असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे होत असतात. संघाच्या अशा तऱ्हेने चालविलेला या सर्वांगीण समाजकार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने १९३९ साली भटाच्या चाळीत १ रुपया नाममात्र दराने भाड्याने संघाच्या कार्यालयासाठी जागा दिली. जी एल पाटील यांनी आगरी सेवा संघाचे कार्य हे आपले जीवन कार्यच मानले होते.

बेस्टमधील कामगारांची संघटना आणि आगरी सेवा संघ अशी दुहेरी कामगिरी ते पार पाडीत असत. संबंध देशभर कम्युनिष्ठांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले असताना त्यांना अटक झाली आणि ते ४ वर्षे नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. त्यामुळे अप्रत्यपक्षपणे संघाचा कार्यावर परिणाम झालाच. थोडी शिथिलता आणि विस्कळीतपणा आला. परंतु अभिमानाची बाब अशी की बिकट प्रसंगी संघाचा तरुण कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे होऊन धैर्याने व नेटाने संघाचा कारभार हाती घेतला. संघाच्या कार्याप्रती जी एल यांची निष्ठा एवढी होती की, १९५२ साली जेलमधून सुटल्यानंतर ते प्रथम संघाच्या ऑफिसवर आले. त्यानंतर झालेला १९५२ सालचा मुंबई कॉर्पोरेशन निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या पश्चात संघाचे अध्यक्ष रामचंद्र  बांधणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यवाह राजेंद्र टेमकर, कार्यवाह अशोक पाटील, कोषाध्यक्ष नरेंद्र बांधणकर यांनी ही संघटना टिकविण्यासाठी आणि यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.






- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
9323117704 





माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब

माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब 

डोंबिवली : (रवींद्र मालुसरे)

कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्गसंशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांनी रविवारी डोंबिवलीत केले.
परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात आप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी मान्यवरांचे लेख असलेली डायरीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी परबांच्या पत्नी अनुराधा, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, निवेदिका मंजिरी मराठे हे उपस्थित होते.

परब पुढे म्हणाले इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे सुक्ष्मदर्शी दृष्टीकोन असायला हवा. इतिहासाच्या प्रत्येक गोष्टीत काही कारणे लपलेली आहेत. ही याच दृष्टीकोनातून पहिली तर उलगडत जातात. प्रत्येकाने जीवनात असे काहीतरी कर्तव्य करावे, ज्यामुळे देशाचे, समाजाचे, संस्कृतीचे आणि स्वतःच्या घराण्याचे नाव उज्वल होईल. नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व दाखवून स्वतःला अजरामर करा, असा सल्ला दुर्गतपस्वी बाळकृष्ण सदाशिव तथा आप्पा परब यांनी दिला. ते पुढे असेही म्हणाले की, पाठांतरात मोठी शक्ति आहे हे सांगताना त्यांनी मुलांना पाठांतराची सवय लावा हे त्यांनी अपार असावे पाठांतर... संधीतची असावा विचार असे सुभाषितद्वारे कवी भूषण यांचे शिवाजी महाराजांवरील काव्य आपल्या मुलांकडून पाठांतर करून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते हे मनाशी ठरवून प्रपंच ठरविला पाहिजे याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
तर इतक्या मोठ्या व्रतस्थव्यक्तीला आपल्या हस्ते पुरस्कार दिला गेला  हे आपले भाग्य असल्याचे सदानंद दाते यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान टिकविण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच शहरात झाल्याचे सांगत  डोंबिवली शहराचा गौरव केला.  प्रत्येकाकडे गुणाची एक खाण असल्याचे म्हणताना समृद्धीकडून सार्थकाकडे जाण्यासाठी समृद्ध समाज आणि सार्थक व्यक्ती निर्माण करण्याची प्रेरणा आप्पांच्या जीवनातून मिळत असल्याचे सांगत त्यांनी आप्पांच्या कार्याला वंदन केले.
छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा इतिहास अभ्यासताना दंतकथेच्या मुळाशी लपलेल्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत अचूक इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवणाऱ्या आप्पांचे कर्तृत्व फार कमी लोकांना माहीत आहे. ते महाराष्ट्रासमोर पोहोचावे या उद्देशाने त्यांची निवड केली, असे विनायक परब यांनी सांगितले. तर सुधीर जोगळेकर यांनी आप्पांच्या जीवन प्रवासावर दृष्टिक्षेप टाकताना त्यांना महत्वपूर्ण लोकाभिमुख कार्य करणाऱ्या पाच वेगवेगळ्या संस्थांकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले.
चतुरंगची माहिती केतकी जोगळेकर, राजन देसाई यांनी शब्दांकित केलेल्या मानपत्राचे वाचन रंगकर्मी प्रसाद भिडे, आभारप्रदर्शन मेघना काळे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ समीरा गुजर यांनी केले. 






मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

 गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

                            रवींद्र मालुसरे (अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)









आप्पा परब ..... 

एक सामान्य गिरणी कामगारदादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तकेदिवाळी अंकनियतकालिके विकणारे विक्रेतेप्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.

 

शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूकत्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी जाणे होऊ लागले. माझ्या 'मालुसरे' आडनावासह उमरठ-साखर या जन्मगावाचा परिचय त्यांना झाल्यानंतर तर आम्ही दोघे अधिकच जवळ आलो. पुढे डिसिल्व्हा लगतच्या सोजपाल चाळीतल्या त्यांच्या घरी माझे जसजसे जाणे झाले, तसतसा त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या घरी वा सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन गेलो. आप्पांची ओळख झाल्यावर गप्पा मारताना अनेक गोष्टींचे मला अप्रूप वाटत राहिले. त्यापैकी एक गोष्ट होती. परिस्थिती कशीही असो मनाची शांतता जराही ढळू न देता ते कमालीचे स्थितप्रज्ञेत राहत. आणि माणसाच्या स्थितप्रज्ञेतही इतकी उत्कटता असते हे मला तेव्हाच प्रकर्षाने जाणवले. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल असणारी आत्यंतिक श्रद्धा आणि हे कार्य चिकित्सक पद्धतीने पुढे घेऊन जाणारी नवी पिढी यापुढच्या काळात कार्यरत राहील काय याबद्दल वाटणारी चिंता.

 

शिवकार्याच्या अभ्यासासाठीप्रचार-प्रसारासाठी अहोरात्र वाहून घेतलेल्या या ऋषितुल्य साधकाचे चालणेबोलणेवागणे मला याची देही याची डोळा अनुभवता आलेय याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. सह्याद्रीच्या रांगात महाराष्ट्राच्या कडे- कपारीत दऱ्याखोऱ्यात अखंड भटकंती करणारे आप्पा परब लाखो इतिहासप्रेमींना परिचित आहेत. इतिहासावरील निष्ठे प्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाचीगडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय.  महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञानवास्तुशास्त्रभूगोलतत्कालीन सामाजिक - आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड - किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे  हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठीसांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. 'माझा धर्म इतिहासमाझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाहीतर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकचआपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथात्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केलेकठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञाशिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्नआणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते.

 

नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचाराआप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. एखाद्या माऊलीने जात्यावर ओवी आठवावी तसा शिवकाळातला इतिहास सांगताना त्यांच्या अनुभव विचारांचे गाणे होत जाते. 'दास राहतो डोंगरीहा रामदासांचा एक श्लोक आप्पांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी आप्पा क्वचितच असतील पण रायगडराजगडसिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत. त्यामागची त्यांची 'फिलॉसॉफी'' ही तितकीच वेगळी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व आपल्या खारीच्या वाट्याने समाजासमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना प्रसिद्धी ती  कसली मिळवायची हा त्यांचा रोखठोक सवाल आजकाल उठसुठ प्रसिद्धीच्या मागे घोडे दामटविणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

 

ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी (शंभाजी)तानाजीबाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला.... तानाजी - सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले.... महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात. म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,

प्राचीवरूनि मावळतीच्याजगा सांग भास्करा ।

रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।

सह्यगिरीत दुमदुमतील भेरीगर्जतील खोरी ।।

हिंडता फिरता तुम्हा सांगतीलत्यागाची महती ।

तुवा घडावे अन घडवावेपेटवीत ज्योती ।।

गडकिल्ल्यांतून भटकंती करणारे आप्पा अनेकदा जीवघेण्या प्रसंगातूनही गेले आहेत. रायगडावर मशिदीचे बांधकाम सुरु असल्याचे कळताच तातडीने रायगडावर धाव घेऊन ते रोखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे तिथल्या खवळलेल्या मुस्लिमांनीआप्पांना जीवे मारण्याची धमकीही दिलीपरंतु अशा धमक्यांना भीक न घालता आप्पांची रायगडावरी सुरूच आहे. आप्पांच्या अशा प्रकारच्या स्वाभिमानी घटनांची खरे तर एक मोठी जंत्रीच होईल स्वाभिमानी मराठ्यांचे उसळते रक्त पाहायचे असेल तर ते आप्पांच्या ठायीठायी बसले आहे.

 

आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी  कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. ज्ञानीपुरुषांना प्रसिद्धी मुळीसुद्धा हाव नसल्याने ते आपले जीवन चरित्र सांगण्याच्या अगर जोपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एखाद्या ज्ञानी योग्याच्या जीवन चरित्राकडे सामान्य लौकिकदृष्टीने पाहून चालत नाही. ज्ञानी व्यक्तिमत्वाच्याज्ञानोत्तर सिद्ध स्वरूप अवस्थेतील लौकिक सदृश्य वर्तनात आणि ज्ञानसाक्षात्कार पूर्वलौकिक जीवनात पौर्वदेहिक संचिताचावंशपरंपरेतील ज्ञानमार्गी साधना परंपरेचा अनुबंध प्रकटलेला असतो. आप्पांच्या वर्तनातून तो दिसून येतो. आप्पांनी त्यांच्या आयुष्यात सातत्याने ज्ञान-कर्मनिष्ठ राहण्याचा दीर्घोद्योग केला. त्याचबरोबर कर्माला मग ते प्रापंचीकव्यावहारिक असे कोणत्याही प्रकारचे असोत्या कर्माला आप्पांनी शिवकार्याची आणि अध्यात्मशास्त्राची भक्कम  बैठक प्राप्त करून दिली. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे  'सिद्धऋषीम्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.

 

आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो.

 

आधुनिक युगात इतिहासाची पाने उलगडताना भूगोलाला विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड देऊन त्यांची मांडणी करणे हे ऐतिहासिक साहित्यात आजपर्यंत घडले नाही. जो जो कागद वा नाणी हाताशी सापडले त्यावर बुद्धिनिष्ठ संशोधन करून काढलेले निष्कर्ष आप्पांनी वाचकांसमोर विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. त्यात मुख्यतः संशोधनात्मक भाषाशैली वापरावी लागलीपण ती सर्वसामान्यांना समजेल अशी सोप्या शब्दांत त्यांनी मांडली. आणि हे मांडताना नेहमीच सचोटीविश्वाससत्य कथन या बाबींना अग्रकम दिला. प्रसंग कितीही बाका असूदे त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता आपल्या विचारधारेला कधीही तिलांजली दिली नाही. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे.  तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने  थकलेला नाहीहे प्रतित होते.  अभ्यासांती निष्कर्ष काढून आपल्या पद्धतीने मांडणी करीत त्यांचा लेखनयज्ञ पहाटेपासूनच सुरू होतो. अल्प किंमतींत छापून घेतलेली आपली ग्रंथसंपदा पदरमोड करून स्वतःच ती  जनमानसात पोहोचविणारा साहित्यिक असे त्रिविध प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व सहज डोळ्यात भरते. अशी व्यक्तिमत्त्व आधुनिक काळात दिसत नाहीत.

 

संतवृत्तीच्या विभूती मग ते कोणत्याही काळातील असोतसमाजासाठी ते आपले जीवन हेतुपूर्वक आणि हेतूपुरस्पर व्यतीत करतात. त्यांचे महत्व पटते पण त्यांच्या कार्याचे माहात्म्य समजत नाही असा काहीसा विचित्र प्रकार आजच्या धारणेत निर्माण झाला आहे. अतिरेकी अभिनिवेशअनाठायी  अहंकारअनावश्यक वाचाळता यामुळे आजचे विचारविश्व पार झाकोळून गेले आहे. अशावेळी वैभवी गतकाळाचा किंबहुना आपल्या पुर्वासुरींच्या इतिहासाच्या चिंतनाचीमननाची आवश्यकता असतेच असते.

 

सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचेइतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वेचारित्र्यसत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतातपरंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल 'चतुरंगनेघेतली.  ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

 

रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704  chalval1949@gmail.com

(रवींद्र मालुसरे हे - नरवीर तानाजी–सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्नरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ-साखर ही ऐत्याहासिक भूमी रवींद्र मालुसरे यांची जन्मभूमी )


शिवइतिहासदुर्गअभ्यासक आप्पा परब

यांना चतुरंग सन्मान जीवन गौरव पुरस्कार


मुंबई (रवींद्र मालुसरे ) : 

तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखककिल्ले अभ्यासकशिवइतिहासनाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवारदि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धेसुधीर जोगळेकरमाधव जोशीप्रसाद भिडेविनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतोज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरीदुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके 

  • किल्ले रायगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड कथा पंचविसी
  • किल्ले रायगड कथा पंचविसी
  • श्रीशिवबावनी
  • शिवरायांच्या अष्टराज्ञी
  • किल्ले पन्हाळगड कथा दशमी
  • शिवजन्म
  • किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सिंहगड
  • लोहगड
  • दंडाराजपुरी दुर्ग
  • पावनखिंडीची साक्ष
  • रणपति शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • सिन्धुदुर्ग 
  • विजयनगर साम्राज्यातील किल्ले
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
  • युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग १ 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग २ 
  • शिवराजाभिषेक 
  • आगामी -
  • निजामी अंमलातील किल्ले 
  • बहमनी 
  • आदिली
  • मोंगल 
  • आदिली (शिवकाळ )
  • कुतूबी
  • रायगड नगरी
  • ठाणे जिल्ह्यातील किल्ले
  • युद्धपती शंभू महाराज 


शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

   'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन                                  

                                         कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी

                     भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला



लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जातप्रसंगी उपाशी पोटीफुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरतासन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या 'भुकेचा सोहळा' या गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले.


स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या 'मराठी आठव दिवसया उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बालरोतज्ज्ञ डॉ सुहास चौधरीकवी-समीक्षक राजीव जोशीकल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सचिवसाहित्यीक- रंगकर्मी भिकू बारस्करकवी अजित मालांडकरअनिस पत्रिकेचे संपादक उत्तम जोगदंडअनिस ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देवरुखकरअनिस कल्याण शाखाध्यक्ष डॉ बसवंतशाहू शिक्षण मंडळाचे सचिव डॉ गिरीश लटकेरंगकर्मी श्रीरंग दातेसुरेश पवारदेवेंद्र शिंदेसीताराम शिंदेराजेंद्र वाघमारेसुधा पालवेप्रज्ञा वैद्यसीमा झुंजाररावमीना ठाकरेविजया शिंदेसुनील खांडेकरश्रीकांत पेटकरसाक्षी धोरण आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली कविता जपणाऱ्या कवीचा हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित करताना मनस्वी आनंद होतो आहे.
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक उमरठ या गावचा आणि आता डोंबिवलीकर असलेला हा शायर मितभाषी आणि कलेच्या प्रांतात रमणारा आहे. संदीपने अवघ्या ३०-३२ वर्षांच्या आयुष्यात दूनियेचे रंग पाहिलेअनुभवले आणि ते पचवले केवळ आपल्या लेखणीच्या जोरावर. बालपणी आईवडिलांचे छत्र नसल्यात जमा झाल्यानंतर कविता आणि चित्रकला यांचाच आधार लाभलेल्या संदीपच्या आयुष्याच्या सोबतीला हा कवीता संग्रह यापुढच्या काळात दिशा देणारा ठरणार आहे असे उदगार गझलकार प्रशांत वैद्य यांनी याप्रसंगी काढले. अभिनेत्री मेघा विश्वास यांनी नितांत सुंदरदमदार आणि आशयघन शब्दकळा लाभलेला तरुण गझलकार आहे साहित्य विश्वात संदीपचे आणि या गझल संग्रहाचे जोरदार स्वागत होईल असे कौतुक केले. तर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने वैचारिक दिवाळी साजरी होते आहे असे टिव्ही कलाकार सुधाकर वसईकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
जन्म अपुल्यांच्या धगीमध्ये जळाला
कोळसा होतानिखारा होत गेला...
घेतले नाही जवळ मजला कुणीही
मग मला माझा सहारा होत गेला...

या पंक्ती सादर करीत आपल्या मनोगतात भविष्याच्या वाटचालीचा वेध घेताना संदिप कळंबे म्हणालेभूक लागली म्हणूनभाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणूनभुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. हृदयातून येत असलेल्या काव्यप्रतिभेच्या भुकेच्या जोरावर मी गावापासून मुंबई पर्यंतच्या प्रवासातली पोटातली भूक मी सहन करू शकलो.
कार्यक्रमाचे संयोजक सुधीर चित्ते यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर केली. स्वररंग निर्मित "इये मराठीचीये नगरीआम्हां घरी नित्य दिवाळी!" हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते जमा झालेली रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...