सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे

 मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी

मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी, ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की, मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून, यापुढे  प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया.

मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने तर सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री  डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, प्रशासकीय सेवेत असताना मी रुग्णांची नाळ सोडली नाही. सकाळी आठपासून संध्याकाळपर्यंत मी रुग्णांना भेटत राहिलो त्यांना माझ्यासमोर बसवून माझ्या गावाकडच्या बोलीभाषेत संवाद साधत राहिलो. त्यामुळे लाखो रुग्णांना मी कुणीतरी जवळची व्यक्ती आहे असा विश्वास वाटू लागलो. मी खेडेगावात मातृभाषेतच शिक्षण घेतले नावलौकिक मिळवला. त्यामुळे अनुभवांती मी खात्रीने सांगू शकतो. इंग्रजी ही फक्त पोपटपंची करण्यासाठी आहे खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळते. अपमान-अपयशाचा अनुभव तुमच्यासारखा माझ्याही आयुष्यात आला, पण मी जिद्द सोडली नाही. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. डॉ लहाने साहेबांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना बदलत्या परिस्थिती वर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले की, मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका. मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपला आहे. पूर्वी माणूस शंभर पाने वाचायचा आता शंभर शब्द सुद्धा ऐकण्याची क्षमता त्याच्यापाशी राहिली नाही.

मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात जन्मलेल्या आपल्या सर्वांना माय मराठीने सर्वांना सर्वकाही दिले. ओळख आणि ज्ञान भरभरून दिली, परंतु माणसाचे संस्कारित मन बऱ्याचदा सैरभैर होते. माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही....मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो,लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शकतो. पण त्यासाठी मनशांती आणि मनशक्ती ची गरज आहे. आपल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी मराठी भाषेचा शाहीर, कीर्तनकार, कथाकार, कादंबरीकार, कवी यांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली याचे विवेचन आपल्या भाषणात केले.

यावेळी व्यासपीठावर दासावाच्या प्रमुख कार्यवाह शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी चळवळीचा आढावा घेताना गेली ४८ वर्षे दिवाळी अंकांचे संपादक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व संपादकांचे आभार मानले. तर दासावाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार तर मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण करताना मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्स, चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - सकाळ अवतरण, पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - मुक्त आनंदघन, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - गोवन वार्ता, पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक -कालनिर्णयसाने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक -अधोरेखित, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनशक्तीकृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - श्रमकल्याण युग, याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार,नवरंग रुपेरी, कनक रंगवाचा, पुरुष स्पंदनं,शब्दगांधार, समदा, सह्याचल, ठाणे नागरिक, त्याचप्रमाणे  उल्लेखनीय अंक म्हणून - संस्कार भक्तिधारा, क्रीककथा, कालतरंग, शैव प्रबोधन, धगधगती मुंबई,निशांत, सत्यवेध, गावगाथा यांना प्रदान करण्यात आले.

 मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण झाले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव 'केवल प्रयोगी' चे सादरीकरण झाले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, आदेश गुरव  यांनी विशेष मेहनत घेतली. 



सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !

 दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !

नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसं भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचऊ धोरण अवलंबविणाऱ्या माणसांचा गजबजाट आज सभोवती दिसतो आहे. आयुष्याच्या प्रवासात ऐन उमेदीच्या काळात कोणीतरी भेटावे आणि त्याच्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे मैत्रीच्या रुपात कौटुंबीक ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे दिवंगत शरद वर्तक साहेब नकळत माझ्या आयुष्यात आले आणि ३७ वर्षे कायम मुक्कामाला राहिले. त्या राहण्यात त्यांच्या सौ वर्तकांचे घरच्या माणसाचे आपलेपण तर शरदरावांचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचे नाते होते. वर्तक जेवढे साधे दिसत तेवढेच ते साधेपणाने बोलत परंतु निर्भीड आणि परखडपणे संपादकीय पानावर लिहीत असत. वर्तक साहेबांची आणि माझी भेट १९८६ ला शिंदेवाडीच्या संस्थेच्या कार्यालयात झाली. पुढे दर शनिवारी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होत गेली. काही माणसे अनेक चेहऱ्यांनी समाजात वावरत असतात. शरद वर्तकांना दुसरा चेहरा नव्हताच, एकच होता. सार्वजनिक  जीवनात वावरताना आज मी थोडीफार श्रीमंती  अनुभवतोय ते दिवंगत ग शं सामंत, गणेश केळकर, भाई तांबे, शरद वर्तक व सध्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या मधू शिरोडकर, वि अ सावंत, नंदकुमार रोपळेकर, विश्वनाथ पंडित यांच्यामुळे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कामाचा डोंगर उभ्या केलेल्या या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात मी, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन कदम, दिलीप ल सावंत, प्रकाश नागणे,दत्ताराम घुगे आलो. 

वर्तक साहेब सातत्याने पत्रलेखन करायचे, विशेषतः महाराष्ट्र टाइम्स हे त्यांचे आवडीचे दैनिक. मराठी - हिंदी चित्रपट गतवैभवाचा काळ ते आठवणींच्या स्वरूपात आपल्या लेखणीतून उतरवत असत.  सध्या संपादकीय पानावर समाजाचा आरसा दाखविणारी वृत्तपत्र लेखकाची हक्काची जागा दिवसेंदिवस आकसत चालली आहे. जसा आज प्रिंट मीडियाच्या समोर त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तसाच संघाच्याही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला आहे. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून अलीकडे जोरात सुरु आहे. असे घडत असले तरी....वृत्तपत्र लेखक म्हणजे रात्रीच्या काळोखातही कार्यरत राहणारा जागल्या आहे. यापुढे...यापुढे...आणि यापुढेही तो राहाणार आहे. 

एखाद्या लहानश्या स्टेशनावर अंधाऱ्या रात्री रेल्वेगाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती कंदील घेऊन एक कामगार गाडीच्या चाकावर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी  करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी देत असतात. वर्तक साहेब त्यापैकी एक होते. प्रकाशकणांची पेरणी करणारे आणि आले  तसेच नकळत निघून जाणारे ! ....'शरद वसंत वर्तक, चेंबूर'  हे संपादकीय पानावरचे नाव अनेकांच्या कायम स्मरणात राहील. 

!! तुमच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा सलाम !!

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 


रविवार, ८ जानेवारी, २०२३

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

 

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त
'
ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

मुंबई (रवींद्र मालुसरे) :  घर आणि आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते. नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन:स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांना असल्याने त्यांनी खोपोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त जागेत थ्री स्टारला साजेसा रमाधाम वृद्धाश्रम सुरु केला. वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर त्याठिकाणी वृद्धांची अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार यांची सोय करणे त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा त्यांच्या पश्च्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे रमाधामचे विश्वस्त अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सामाजिक सेवेचे त्यांचे व्रत पुढे सुरु ठेवले आहे. समाजातल्या गरजूंनी या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणच्या सुखसोयी आणि व्यवस्था पाहून समाजातल्या गरजूना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन शिवसेनानेते खासदार अनिल देसाई यांनी केले.

जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि स्व मीनाताई बाळासाहेब ठाकरे स्मृती 'ममता दिनानिमित' खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमात मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि शिवसेना लोकाधिकार महासमितीच्या वतीने 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमाधाम विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीचा वेध घेतांना वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की, प्रत्येक मुलांनी सुनेने आपल्या आई वडिलांचा तसेच सासू सासऱ्यांचा संभाळ करावा. मात्र, बरीच मुले ही नोकरीसाठी देश - परदेशामध्ये जात असल्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढतेच आहे.
समाजासाठी खरोखरच काहीतरी करावे अशी तळमळ असणारे शिवसेनाप्रमुख आणि माँ मिनाताई होत्या. ‘मार्केटची गरज म्हणून नव्हे तर जिव्हाळ्याच्या आत्मीयतेने ही वास्तू उभी राहिली आहे. वृद्ध हा घटक तसा गरीब आणि काही प्रमाणात असाहाय्य असतो याची जाणीव ठेवून इथे येऊ इच्छिणाऱ्या काही गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक निकष लावता अत्यंत वाजवी दरात रमाधाम विश्वस्त मंडळ सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे त्यासाठी कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नाही. त्यांनी 9820060132 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.


वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे श्री वामन भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई, स्वा सावरकर अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख कार्यवाह दिलीप सावंत, संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्रीनिवास डोंगरे, अनिरुद्ध नारकर यांनी मुक्तचर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र लेखक संघाचे अरुण खटावकर, सुनील कुवरे, प्रशांत भाटकर, सतीश भोसले, विवेक तवटे, दिलीप दळवी तर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उल्हास बिले, उमेश नाईक, शरद एक्के, बाळासाहेब सुदाम कांबळे, विलास जाधव, प्रवीण हाटे, राजन तांडेल, सुधाकर नर, तुकाराम गवळी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...