शनिवार, ३१ जुलै, २०२१

पाय गमावलेल्या उदयोन्मुख तरुण खेळाडू "साक्षी दाभेकरचा टाहो" मला मैदानात उतरायचे आहे !

 पाय गमावलेल्या उदयोन्मुख तरुण खेळाडू 

'साक्षी दाभेकरचा' टाहो

मला मैदानात उतरायचे आहे !

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  


 
दरवर्षी जुलै महिन्यातला पाऊस मन विषण्ण करणाऱ्या जखमा देऊन जातो. यंदा २२ जुलैला बरसलेल्या आस्मानी संकटानं निसर्गानं नटलेल्या कोकणावर वक्रदृष्टी केली आणि हा हा म्हणता होत्याचं नव्हतं झालं. महाड, पोलादपूर, चिपळूण, रत्नागिरी अशा बऱ्याच ठिकाणी मृत्यूनं थैमान घातलं. कित्येकांना आपल्यासोबत नेलं, तर त्यातून बचावलेल्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. धो-धो पडणाऱ्या पावसामुळं आलेल्या या महापूरात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात डोंगराळ भागात वसलेल्या केवनाळे गावातील १४ वर्षांच्या कुमारी साक्षी नारायण दाभेकर या उदयोन्मुख खेळाडूची स्वप्नंच वाहून गेली आहेत.

केवनाळे गाव दरड कोसळली 
पोलादपूर तालुक्यातील सावित्री खोऱ्यात केवनाळे गाव गेल्या अनेक शतकांपासून अतिदुर्गम डोंगरात वसलेले आहे, परवाच्या दुर्घटनेत ५ माणसे मृत्युमुखी पडल्याने महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे. आंबेनळी घाट ते सावित्री नदीच्या दरम्यानच्या प्रदेशात हा गाव वसलेला आहे. गेल्या आठवड्यात रौद्र रूप धारण करीत पावसाच्या रूपाने अस्मानी संकट या सावित्री खोऱ्यात कोसळत होते. संध्याकाळ दिवेलागणीच्या वेळी समोरच्या डोंगरातून गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या  नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि शाळेत प्रत्येकवेळी रनिंग स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या साक्षीने तिकडे धाव घेतली, एका उडीतच तिने शेजारचे उफाळेताईचे यांचे घर गाठले आणि समोर दिसणाऱ्या बाळावर ती उपडी पडली. दररोज खेळवणाऱ्या निरागस हसऱ्या त्या लहानग्याचा जीव वाचविण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नव्हती. पुढच्याच मिनिटाला साक्षीने सुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती. लाईट गेली होती. पावसाचे थैमान सुरूच होते. आजूबाजूचे आणखी काहीजण धावले तोपर्यंत लक्षात आले चार घरांवर दरड कोसळून  पाच  जणांचा  जागीच मृत्यू झाला  आहे, तर साक्षी नारायण दाभेकरचा पाय उचलत नव्हता, रक्ताने तो पूर्ण माखला होता.

साक्षीचे क्रीडानैपुण्य 
साक्षी ....वय वर्षे १४. नुकतीच पोलादपूर तालुक्यात उदयाला येणारी क्रीडापटू.  देवळे येथील नरवीर तानाजी मालुसरे विद्यालयात इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेणारी. रनिंग, खो खो आणि कबड्डी या खेळात दिवसेंदिवस प्रगती करणारी म्हणून शिक्षकांची लाडकी. शिक्षणातही हुषार असलेली साक्षी अतिशय जिद्दी आहे. याच जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मागील पाच वर्षांमध्ये तिनं बऱ्याच बक्षिसांसोबतच सन्मानपत्रांवर आपलं नाव कोरलं आहे. देवळे हायस्कूल आणि तालुका स्तरावरील स्पर्धात ती प्राविण्य मिळवायची. दोन वर्षापूर्वी जिल्हापातळीवर खेळण्यासाठी तिची निवड झाली, परंतु कोरोनामुळे आपले कौशल्य तीला दाखविता आले नाही

साक्षीचे वडील नारायण दाभेकर यांना एकूण तीन मुली आहेत.  ते महाबळेश्वर मेढा येथे एका साध्या हॉटेलमध्ये कामाला होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे काम दोन वर्षे बंद आहे अर्थात त्यामुळे कमाई बंद, आई सतत आजारी असते. नारायण दाभेकर इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी काम करून कुटुंबासह गुजराण करीत असतात. दोन महिन्यांच्या मुलाला (उफाळे यांचा नातू) वाचविण्यासाठी साक्षी गेली त्याच्यावर उपडी झोपली आणि मुलाला वाचविले पण तिच्यावर भिंत कोसळली, कोवळ्या मुलाचा आणि स्वतःचा  जीव वाचविला पण एक पाय मात्र गमावून बसली आहे.

पावसाचं थैमान आणि मिट्ट काळोखात बाळावर आलेलं संकट साक्षीनं स्वत:वर झेललं खरं, पण याची पुढं आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी सुतरामही कल्पना, तेव्हा त्या निरागस मुलीला नव्हती. स्वत:चा जीव गेला तरी बेहत्तर पण बाळाला वाचवायचं या परोपकारी भावनेतून तिनं दोन महिन्यांच्या बाळाला जणू मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं.
दुर्घटना घडल्यानंतर पुढे जे घडलं ते खरं तर साक्षी दुर्दैवी ठरलं. संकटांनी जणू साक्षीला कोंडीतच पडकलं होतं. एकीकडं पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता, तर दुसरीकडं गावातल्या दोन रिक्षा चिखलात रुतल्या होत्या, अशा परिस्थितीत गावकरी केवनाळे गावातून पाऊण तासावर असलेल्या पितळवाडीत अक्षरश: धावत गेले. तिथून रिक्षा घेऊन साक्षीला तिथल्याच डॅाक्टरांकडे घेऊन गेले. लाईट गेलेल्या असतानाही डॅाक्टरांनी ड्रेसिंग केलं, पण जखम फार गंभीर असल्यानं पोलादपूरला नेण्यास सांगितलं.

*पाण्यानं अडवली साक्षीची वाट*
स्थानिक डॅाक्टरांनी सांगितल्यानंतर रिक्षानं साक्षीला रुग्णालयात नेण्याची खरी कसरत सुरू झाली. पावसाच्या पाण्यानं रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही अडवला होता. कापडे गावात असलेल्या पुलावरून पाणी वहात होतं आणि एका बाजूनं पुलाचा काही भाग कोसळलाही होता. अशा अवस्थेत त्यावरू रिक्षा घेऊन नेणं म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं होतं. त्यामुळं रानवडी-चरई मार्गे फिरून साक्षीला पोलादपूरला नेण्यात आलं. लांबच्या रस्त्यानं गेल्यानं तासभर अंतर वाढलं. पाऊस धो धो पडतच होता. पोलादपूरला नेईपर्यंत साक्षीचा पाय पुन्हा रक्तानं माखल्यानं तिथंही ड्रेसिंग करण्यात आलं. डॅाक्टरांनी प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्वरीत पुणे किंवा मुंबई गाठण्याचा सल्ला दिला. तिथून साक्षीला महाडमध्ये आॅर्थोपेडीक डॉ रानडे यांच्या हॅास्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला गेला. महाडला पोहोचल्यावर ते हॅास्पिटलर अर्ध्या पाण्यात बुडालेलं दिसलं. त्यामुळं साक्षीला पुन्हा पोलादपूरमध्ये आणून ड्रेसिंग करण्यात आलं.



*परोपकारासाठी धावली अन...*
साक्षीला मुंबईला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील प्रवासही फार खडतर होता. पाऊस, खड्डे, वातावरण यांचा अडथळा पार करत साक्षीला पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं डॅाक्टरांनी पाहणी केल्यानंर पाय कापण्या शिवाय गत्यंतर नसल्याचं सांगितलं. तिथे साक्षीला एक दिवस ठेवण्यात आलं. सेकंड ओपिनीयन म्हणून दुसऱ्या दिवशी साक्षीला परळ येथील केईएम रुग्णालयात आणण्यात आलं. तिथेही डॅाक्टरांनी पाय कापण्याचाच सल्ला दिला. डॅाक्टरांच्या या सल्ल्यासोबतच धावणे, कबड्डी आणि खो-खोच्या माध्यमातून मैदान गाजवण्याच्या साक्षीच्या स्वप्नांचाही गळा कापला गेला. एका उदयोन्मुख खेळाडूला केवळ परोपकाराच्या भावनेमुळं आपला डावा पाय गमावावा लागला. यापुढे साक्षी एका पायावरच आयुष्य काढणार आहे. सध्या  के ई एम नवीन बिल्डिंगमध्ये चौथा माळा, वोर्ड नं २९ मध्ये उपचार घेत आहे, लोकप्रतिनिधींचा लवाजमा तिची विचारपूस करण्यासाठी अलीकडे येतोय मात्र तो रिक्त हाताने. फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले की त्यांच्या सहानुभूतीचे काम संपले.  सरकारी लाल फितीच्या कारभारातून तिच्या कुटुंबाला तुटपुंजी मदत यापुढे मिळेल सुद्धा पण त्याने भविष्याचा अंधार मिटेल काय.  आज मी तिची भेट घेतली असता तिच्या डोळ्यात अश्रू होते पण, अपंगांवस्थेतही तिची मला मैदानात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द दिसून आली. नियतीने साक्षीला  एका पायाने अपंग केले असूनही ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे. तिच्याकडे असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर एका पायावर भावी आयुष्यात उत्तुंग यश मिळवण्याचे ध्येय साक्षी चिकाटीच्या जोरावर  आत्मसात करील असेच वाटतेय. सध्या तरी त्यांच्या कुटुंबात समाजातल्या दानशुरांनी आर्थिक मदतीचा एक तरी दिवा लावून गरिबीचा अंधकार दूर करण्यासाठी पुढे यावे असेच सांगणे आहे.साक्षीला पुन्हा आपल्या पायावर उभं रहायचं आहे. पुन्हा खेळाचं मैदान गाजवायचं आहे. हे केवळ आता आपणा सर्वांच्या साथीनंच शक्य होऊ शकेल. निसर्गाच्या कोपामुळं साक्षीला वैद्यकीय मदत वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही, पण मानवता धर्माला जागत आज जर आपण तिला आर्थिक मदत केली, तर भविष्यात ती नक्कीच पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज होईल. साक्षी नारायण दाभेकरला आर्थिक मदत करण्यासाठी बँक तपशील खालीलप्रमाणे आहे...

प्रतीक्षा नारायण दाभेकर
बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा,
A/C No. 120310510002839
IFSC code - BKID 0001203
MICR - 402013520
संपर्क - 8291813078

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

चित्रकार बंधूंना आवाहन

 चित्रकार बंधूंना आवाहन 

"सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे"



१६ एप्रिल १९६५... मुक्काम उमरठ...सुप्रसिद्ध शिल्पकार श्री वि ग सहस्त्रबुद्धे यांनी उभारलेल्या पुर्णाकृती भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेवर ठरला....आणि भारत-चीन युद्धाला सुरुवात झाली, "यशवंतराव , सह्याद्री होऊन हिमालयाच्या मदतीला धावले"...आणि स्व वसंतराव नाईक मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमाला आले, त्यांनी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला उजाळा देत शेतकऱ्यांना सैनिकांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.
*चित्रघराची संकल्पना बासनात*
तत्कालीन मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या हस्ते चित्रघराची कोनशीला बसवताना ५५ वर्षांपूर्वी म्हणाले मुख्यमंत्री महोदय म्हणाले, प्रतापगड-रायगड कडे जाणारा शिवप्रेमी हे चित्रघर आवर्जून पाहण्यासाठी उमरठ येथे येईल असेच सरकारच्या वतीने साकारणार आहे. यात ऐतिहासिक वस्तू आणि छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रेखाटले जातील...
बंधुनो, चित्रघर राहुद्या गेल्या ५५ वर्षात कोनशीलेच्या बाजूला दुसरा साधा दगडही शासनाकडून लागला गेला नाही. हा प्रकल्प बासनातच गुंडाळला गेला. हे दुर्दैव !
महाराष्ट्रातील चित्रकार कलावंत मंडळींची प्रतिभावान कलात्मकता आणि त्याला शिवप्रेमींचा मदतीचा हात पुढे आला तर हा प्रकल्प दखल घेण्यायोग्य प्रेक्षणीय स्वरूपात आपल्याला लोकसहभागातून साकारता येईल.
मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने उर्वरित ७० गावातील मालूसऱ्याना या कामांसाठी एकत्र केले आहे.
आता आपल्या संकल्पनेची आणि विचारांची, व प्रत्यक्ष कृतीची गरज यामागे हवी आहे, आपण सहकार्याचा हात पुढे कराल याची खात्री वाटते. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर
२२ मार्च पूर्वी संपूर्ण जगाला टाळे लागण्यापूर्वी आम्ही सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे या अद्वितीय महापराक्रमी योध्याच्या जीवन चरित्रावर आधारीत राज्यस्तरीय चित्रस्पर्धा आयोजित केली होती. परंतु धास्तावलेले - थांबलेले जग आणि ठप्प झालेल्या दळणवळणाच्या साधनांमुळे आम्हांला अल्पसा प्रतिसाद मिळाला, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या असंख्यांचे फोन आले पण ३५० व्या वर्षपूर्ततेच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप येऊ शकले नाही......(सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे - पराक्रमाची विजयगाथा) हा स्मृतिग्रंथ साकार होण्याच्या निमित्ताने आम्ही 'पुनश्च हरिओम' म्हणत स्पर्धेला पुन्हा प्रारंभ करीत आहोत.
(1) तानाजी मालुसरे यांचा प्रतापगड युद्धातील सहभाग
(2) पिळाजीराव नीलकंठ यांना मोठ्या दगडाला बांधून सूर्यराव सुर्वे चा केलेला पराभव (संगमेश्वर ।युद्ध)
(3) राजगडाच्या सदरेवर छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्यासमोर कोंढाणा घेण्याची प्रतिज्ञा
(4) सिंहगड किल्ल्याची चढाई व
सिंहगडावरील युद्ध प्रसंग
(तानाजी,सुर्याजी, शेलारमामा, उदायभानू व मावळे)
(5) तान्हाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले
(6) पालखीतून ते शव राजगडावर आणल्यानंतरचा प्रसंग (छत्रपती शिवराय, जिजाऊ साहेब व मावळे)
(7) गड आला पण सिंह गेला
(8) शाहीर तुलसीदास डफ घेऊन तान्हाजीरावांचा पोवाडा गातो आहे
(9) स्वा सावरकर आणि तान्हाजी (सावरकरांच्या पोवाड्यावर इंग्रज सरकारने बंदी आणली होती)
(10) शाहिस्तेखाना सोबतची लालमहाल येथे हातघाईची लढाई
(11) तान्हाजीरावांचे करारी आणि उग्र बाण्याचे चेहऱ्यावरील हावभाव

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704





मंगळवार, २३ मार्च, २०२१

व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे

 व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे



एका मांजरीला ९ वेळा जन्म मिळतो. असे म्हटले जाते. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या एका मित्राच्या बाबतीत त्याच्या २९ वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा पट ऐकल्यानंतर हे खरे आहे की, त्याला २ वेळेस जन्म मिळाला. पहिल्यांदा नैसर्गिक आयुष्य मिळाले. म्हणजे जेंव्हा त्यांच्या आईने जन्म दिला. आणि दुसरा जन्म बायकोमुळे 'क्रिपा व्यसनमुक्ती' केंद्र येथे मिळाला. जेथे त्यांचे चांगल्या निर्व्यसनी मनुष्यामध्ये रुपांतर झाले. फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याच्या वागण्यात आणि एकंदर व्यक्तीमत्वामध्ये त्यानंतर खुप फरक पडला. याच केंद्रामध्ये तो परत परत चांगला विचार करायला व वागायला शिकला. आणि समाजातला उपयुक्त असा नागरिक बनला.
रमेश भिकाजी सांगळे हा युवक शालांत परीक्षा पास होऊन, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड पवई येथे १५ सप्टेंबर १९७७ साली शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला. आणि प्रशिक्षण पूर्ण करून १३ डिसेंबर १९८१ साली कामगार म्हणून कायम झाला. कंपनीच्या सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदा बिअरचा ग्लास उचलून त्याने स्वताच्या ओठाशी लावला. जिभेवर रेंगाळलेल्या याच पहिल्या घोटाने पुढे त्याचे जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. अतिशय सावकाश, मजेसाठी दारूने त्याच्या जीवनात प्रवेश केला. आणि मग दारू म्हणजे मजा, आनंद, जल्लोष असा ठसा त्याच्या मनावर उमटला. प्रचंड मजा येऊ लागली. त्याला दारू खुप मोठी-मोठी स्वप्ने दाखवू लागली. सुरुवातीला त्याला वाटले इतरांप्रमाणे मी सर्वसामान्यपणे दारु पिऊ शकेल. पण अचानकच यात बदल झाला. त्याला त्याचे व्यसन जडले. आणि त्याचा त्याच्यावर ताबाच  उरला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीतील कामावर होऊ लागला, कामावरची गैरहजेरी वाढली. त्यामुळे चार्जशीट, नोटिसा मिळाल्या. दारू ही त्याच्या जीवनाची समस्या झाली. या अविवेकी दारूपायी वारंवार पैशाची चणचण त्यामुळे बायकोशी रोजची भांडणे व मारहाण यामुळे संसार रोज मोडू लागला. असे का झाले ? का होत आहे ? व मला दारू एवढी का प्यावी लागत आहे ? हे त्याला कळेनासे झाले. आता तर दारू पिण्यासाठी घरात चोऱ्या, खोटं बोलणे सुरू झाले. पैसे अपुरे पडू लागल्यामुळे दारूचा दर्जा घसरला. घरातील सर्वजण हरले होते. प्रतिष्ठित कंपनीतील एक कामगार रस्त्यावरील दारुड्याचे जीवन जगायला लागला. शेवटी एका प्रसंगात तर बायकोला जाळण्याचा असफल प्रयत्न करीत, स्वतः देखील रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेला होता. एका चांगल्या मुलाचा दारूने राक्षस केला होता. त्या दारूच्या नशेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. बायकोवर नाही-नाही ते आरोप करू लागला. नराधमासारखा वागू लागला. वेड लागल्यासारखा बडबडू लागला. मग मात्र बायको घाबरली, घरचे हादरले व त्याची दारू सोडविण्याचे प्रयोग सुरू झाले. मद्यपाश हा एक आजार आहे. आणि आपण या आजारला बळी पडलो आहोत हे त्याला समजले पण उमजत नव्हते. जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा त्याचे मित्र , कामावरील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याला दारु सोडण्याचा सल्ला दिला. परिणामी त्याने त्यांच्याशी मैत्री कमी केली. निरनिराळ्या जागा बदलून मित्र बदलून त्याचे पिणे चालूच होते. परंतु जेंव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की, याचे अजुन दारु पिणे धोक्याचे आहे. तेंव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. नंतरही दारू सोडण्याचे खूप प्रयत्नही केले गेले. आणाभाका घेतल्या, परंतु नाही जमले. पुन्हा पहीले पाढे पंच्चावन. नातेवाईक आणि मित्रांनी पुन्हा पुन्हा खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण एक दारूडया दुसऱ्यांचे सहसा ऐकत नाही. कारण आडवा येतो त्यांचा अहंकार व तो याबाबत दुस-यांनाच दोषी धरतो. त्याने दारूचे व्यसन सोडावे म्हणून बायकोने गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, बाबा, बुवा इत्यादी सर्व प्रयोग त्याच्यावर करून पहिले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिच्या पदरी निराशाच आली. नंतर तिच्याच प्रयत्नाने एल अँड टी मधील त्याचे विभागीय व्यवस्थापक पी.एल.चावला, कामगार कल्याण विभागाच्या लीला करकरीया यांच्या सांगण्यानुसार त्याला बांद्रे येथील फादर जो परेरा यांच्या क्रिपा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. 


तो दिवस होता मंगळवार दि. २४ मार्च १९९२. तशी त्याची पण इच्छा होतीच दारू सोडण्याची. परंतु त्याला आपण व्यसनमुक्त होण्याची शाश्वती नव्हती. इथे आल्यावर त्याला इथले वेगळेच चित्र दिसले. प्रत्येक चेहरा वेगळा होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा भाव होता. कोणी बळजबरीने ऍडमिट केल्यामुळे रागात होता, कोणी आत्मविश्वासाने ओथंबत होता, कोणी व्यसनमुक्ती होईल की नाही यामुळे साशंक होता. त्यात स्वत:च्या अनुभवातून शिकत चांगल्या बदलासाठी प्रयत्नशील असणारे पेशंट पण होते. त्यांना विश्वास होता की प्रयत्न केला तर माणूस बदलू शकतो. व्यसनाधीनता या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने प्रथम अपयशाची जबाबदारी स्वत:ची स्वत: घ्यायला हवी. माणूस अपयशाची जबाबदारी इतरांवर टाकायला लागतो. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनामध्ये अधिकाअधिक गुरफटत जाते. मुद्दा असा आहे की, आपण व्यसनात गुरफटलो हा एक उत्तम प्रतीचा मूर्खपणा केला हे ठणठणीत पणे मान्य करायला खूप मोठ मन लागतं, आणि हा स्वतःचा अपराध रमेशने मनापासून तेथे स्वीकारला होता. त्याने त्याच्यासाठी घेतलेला हा एक योग्य निर्णय होता. सुरुवातीच्या दिवसांत त्याला बरेच काही उमगू लागले. खरे तर त्याला तेथे मिळालेला सुविचार ‘one day at a time’ चा अर्थ इथे कळला. आणि समुपदेशातून बरेच काही म्हणजेच आपला ‘प्रत्येक दिवस हा आजचाच दिवस’ असतो. कालची रात्र पडद्याआड गेली. उघाच्या दिवसाची सावली सुध्दा नाही आली, सत्य आहे आजचा दिवस, आत्ताचा तास, आणि हातातला आत्ताचा क्षण! डिप्रेशन आणि ऍडिक्शन या दोन्हीमधून बाहेर पडण्यासाठी आहे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा. तिथेच व्यसनमुक्तीचा मार्ग सुरू होतो. दारू सोडणं ही प्रवासाची सुरूवात आहे. अंतिम बिंदू नव्हे. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न हा उपचाराचा भाग आहे. व्यसन करण्याची कृती थांबविणे म्हणजे वरवर दिसणाऱ्या लक्षणावरचा उपाय... "treatment of symptoms" या शब्दाचा अर्थ आहे "treatment of diseases within" आणि व्यक्ती आहे तोवर व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्याबद्दलचे गुणदोषही आहेत. त्यामुळे उपचाराची प्रतिक्रिया सतत चालूच राहणार. अगदी अखेरच्या क्षणापर्यत !  स्वत:ला स्वत:च्या मनाशीच बऱ्याच लढाया लढाव्या लागणार हे त्याच्या काही दिवसातच लक्षात आले. काळानुसार अनुभवांची समृध्दी आली. तरी त्या लढाया संपत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांचे  स्वरूप बदलेल. हा निश्चयसुद्धा मनाशी कोरून ठेवला. ‘सोचो तुम क्या चाहते हो, जो चाहते हो वही मिलेगा, जो सोचते हो वही देखो, जो देखते हो वही मॉँगो, ओर जो मॉँगेगा वही मिलेगा ! रमेशने जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातील शिबिर पूर्ण करून आत्मविश्वासाने बाहेर नव्याने पाऊल ठेवले. तेव्हा प्रत्येक संधीचा उपयोग करायचा व यश मिळेपर्यत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवायचे याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली.



या केंद्रात दाखल होऊन एकूण १६१ दिवसांचा कार्यक्रम कालावधी त्याने पूर्ण केला. तेथे सर्वोत्कृष्ट समुपदेशक लाभले होते, त्यांनी त्याला एका भावाप्रमाणे व्यसनातुन बाहेर येण्याकरता सल्ला दिला. आणि मदत केली. या केंद्रामधील वास्तव्यामुळे त्याच्यामध्ये खुप बदल घडुन आला. हा बदल फक्त व्यसनमुक्त होणे हा नव्हता. तर योगासनांमुळे तो शारिरीक द्रुष्ट्या चांगला झाला. तसेच रागावर नियंत्रण कसे मिळवावे हे शिकला. तसेच शिस्त काय असते, तसेच कठीण प्रसंगाना कसे सामोरे जावे हे देखील शिकला. केंद्रातील उपचारने त्याला दारुला नाही म्हणायला शिकवले. आणि सुरुवातीला जेंव्हा कधी दारु पिण्याचा विचार त्याच्या मनात येत असे तेंव्हा तो केंद्रामधले वास्तव्य आठवत असे. जो त्याला योग्य असा विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवत असे.
 आई, पत्नीआणि मुलाबाळांना, जवळच्यांना व्यसनामुळे दिलेला त्रास फार भयंकर होता. हे उमजू लागले. 'दारुडा' म्हणून समाजाकडून मिळविलेली पदवी त्याने तेथेच टाकून देऊन, मनाशी संकल्प केला. यापुढे व्यसनाधीन व्यक्तींचे जीवन आणि त्याचे कुटुंब उद्धवस्त होऊन द्यायचे नाही. देवाने दिलेले बोनसरुपी पुनर्जीवन व्यसनमुक्तीच्या कार्यास अर्पण करायचे त्यांने ठरवले. कंपनीतील शिफ्ट ड्युटी, कामाचा ताण संभाळून बाहेर व्यसनमुक्ती कार्यास सुरुवात केली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि मिरॅकल फौंडेशन मुंबई या संस्थेची व्यासपीठे त्याला या कामाला बळ देण्यासाठी मिळाली. या व्यासपीठावरून व्यसनविरोधी प्रचार, प्रसार, प्रबोधन सुरु झाले. निर्व्यसनी तरुण पिढी घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, महिला, युवक, कामगार, मजूर, आदिवासी बांधव यांचे मेळावे भरवून स्वानुभव कथन करू लागला. व्यसनाधीन व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन चालू केले. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून निस्वार्थी भावनेने करीत असलेल्या या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथील व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन रमेशला सन्मानित केले गेले. या पुरस्काराची मिळालेली रक्कम रूपये १५,०००/- यात पदरचे रूपये १०,०००/- मिळवून स्वतःच्या गावच्या विकासासाठी हा निधी दिला. २०१२ साली लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ व्यसनमुक्तीचे कार्य मुंबईसह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात करण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रात मिळालेल्या 'आजचा दिवस फक्त ' या मंत्रावर रमेश २४ मार्च २०२१ रोजी त्यांच्या व्यसनमुक्त जीवनाची २९ वर्षे म्हणजेच १०५८८ दिवस पूर्ण करीत आहे. याचे सारे श्रेय ते त्यांची पत्नी कै. नंदा रमेश सांगळे यांना देतात. कारण तिने सावित्रीचा वसा घेतला. आपला पती व्यसनमुक्त व्हावा. यासाठी जिद्दीने प्रयत्न केले नसते तर रमेशरावांचा भिंतीवर हार घातलेला फोटोच २९ वर्षांपासून बघायला मिळाला असता.
आपल्याकडे व्यसन हा एक आजार आहे याची माहीती नसते. इथुन सर्व समस्या सुरु होते. आजार आहे हे जरी लक्षात आलं तरी त्यावर कुठलेही औषध उपलब्ध नाही. याची कल्पना नसते. कल्पना असली तरी ती स्विकारली जात नाही. आजाराचा चिवटपणा लक्षात घेतला जात नाही. त्यातुन निरनिराळे प्रयोग माणसे करु लागतात आणि व्यसनाच्या जाळ्यात पुन्हापुन्हा गुरफटत जातात. बरीच माणसे आणि त्यांचे नातेवाईक आपापले अनुभव सांगताना हे मान्य करतात की दारुचे व्यसन हा एक आजार आहे. हे आम्हाला माहीतच नव्हतं. हे माहीत होणं गरजेचं असतं. कारणं फार मोठ्या अपराधी भावनेतुन त्यामुळे माणसाची सुटका होते. त्याच्या कुटूंबियांचीही सुटका होते. कारण आपल्या नशीबी हे काय दुर्दैव आलं? या भावनेने ती मंडळी होरपळुन निघत असतात. त्यामुळे व्यसन हा आजार आहे. तो आपल्याला झाला आहे. आणि त्यावर कायम स्वरुपाचे औषध नाही. या गोष्टीचा स्विकार ही व्यसनाच्या विळख्यातुन निघण्याची पहिली पायरी असते. पण ही पहिली पायरी चढणं बहुतेकांना जड जातं. व्यसनाधीनांना आता दारु कायमची सोडावी लागणार. हा विचारही सहन होत नाही. व्यसनाच्या काळात व्यसन कमी करण्याचा प्रयत्न बहुतेकांनी केलेला असतो. त्यात यश येत नाही हेही त्यांना माहित असतं. काही जण अनेक महिने दारु बंद करुन पाहतात आणि त्यानंतर पुन्हा व्यसन सुरु होऊन ही मंडळी व्यसनाचा तळ गाठतात.
व्यसनी माणसाच्या मनात हे विचार तर घरच्यांच्या मनात आणखी काही वेगळेच असते. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होताना माणसे हतबल झालेली असतात. याला बरा करा आम्ही त्याला बसुन खायला घालु म्हणणारी माणसे आपला माणुस केंद्रामधून परत आल्याबरोबर त्याने काम शोधावे म्हणुन मागे भुणभुण लावतात. याचा अर्थ त्याने आयुष्यभर बसुन खायचे असा नसतो. पण व्यसनातुन बाहेर पडलेल्या माणसाची परिस्थिती नाजुक असते. त्याला स्वतःला सावरायला थोडासा वेळ हवा असतो. अनेक वर्षे वाया गेलेली असतात. अनेक हिशेब पुन्हा बसुन नव्याने करायचे असतात. साऱ्या आयुष्याची घडी पुन्हा बसवायची असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनापासुन दुर राहायचे असते. अशावेळी थोडासा ताणतणाव हा व्यसनाकडे वळवायला कारणीभुत होऊ शकतो. घरच्यांना त्रास दिलेला असतो त्यामुळे संबंधांमध्ये कडवटपणा आलेला असु शकतो. अशावेळी दोन्हीकडुन समजुतदारपणाची आवश्यकता असते. काहींच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे संशय घेणे सुरु होते. बाहेरुन आल्यावर निरखुन पाहणे, तोंडाचा वास घेणे हे प्रकार सुरु होतात. काही जणांना हे सहन होत नाही आणि आपण इतका स्वतःवर संयम ठेऊनही ही माणसे आपल्यावर संशय घेतात यामुळे त्यांना नैराश्य येते. आणि ते पुन्हा दारुकडे वळतात. व्यसनामुळे समाजापासुन दुरावलेली व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. आपल्याला कुणी बोलावत नाही, सर्वजण टाळतात, घरातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपला सल्ला कुणी विचारत नाही, सणासमारंभाला आपल्याला आमंत्रण नसतं. हे माणसाला जाणवत असतं. ही जाणीव अतिशय खचवणारी असते. समाज आणि व्यक्ती यातल्या सामंजस्याचे संतुलन साधणे हा व्यसनमुक्तीतला महत्त्वाचा टप्पा आहे असे त्यांना वाटते.
आपणच बदलायला हवं, समाज बदलणार नाही किंवा तो बदलणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. हे समजवुन द्यायला एक उदाहरण हमखास दिलं जातं. आपण पाऊस थांबवु शकत नाही. आपण त्यापासुन बचाव करण्यासाठी छ्त्री घेऊ शकतो. मुळात पाऊस आणि माणसात नेमका फरक आहे तो हाच. पाऊस विचार करीत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे पडतो. माणसं विचार करतात.
आपल्या नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक लोक असतात. मात्र योग्य वेळी डोळे उघडून व्यसनाधीनतेच्या दु:खदायक चक्रातून बाहेर उडी मारून पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसवणे खरोखरी धैर्याचे काम आहे. दरम्यानच्या काळामध्ये रमेश सांगळे यांनी बऱ्याच चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे वाचन, वाचकांच्या सदरातून पत्रलेखन सुरू केले. रोज किमान तासभर वाचन चालूच ठेवले. विषयाचे बंधन न ठेवता चांगली चांगली पुस्तके वाचून काढली. पुस्तकांचा छोटासा संग्रह केला. चित्रपट, नाटक बघणे गाणी ऐकण्याचा छंद जोपासला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, मिरॅकल व्यसनमुक्ती केंद्र या संस्थांच्या कार्याशी जोडून घेतले आहे. त्यांनी एक ठरवले आहे की रिकामे बसायचे नाही. मोकळ्या वेळात काही ना काही चांगले काम करत राहायचे. जिथून जे शिकायला मिळेल ते शिकत राहायचे. आपल्याला पुढे कामी येईल की नाही हा विचार न करता शिकत जायचे. व्यसनमुक्तीची २९ वर्षे पूर्ण होताना रमेश सांगळेना गत आयुष्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मला वाईटही वाटत नाही आणि पश्चात्तापदेखील होत नाही. व्यसन हा एक आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मान्य केले आहे. तो मला झाला आणि वेळेवर मिळालेल्या योग्य उपचारांमुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो. व्यसन एक स्वभावदोष आहे, जो अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रित करता येतो. आपण लहानपणापासून काही गोष्टी वाचतो, ऐकतो आणि त्या आपल्या मनावर कोरल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, मी अमुक एक चूक केली आणि बरबाद झालो किंवा मी अमुक निर्णय योग्य घेतला आणि माझे आयुष्य सुधारले, क्रमाने केलेल्या चुका व क्रमाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची मालिका व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरतात. सुधारणा हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. क्रमाने घेतलेल्या योग्य निर्णयांची मालिका सुधारणा घडवून आणते. म्हणून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप आवश्यक असते. याबरोबरच उच्चशक्तीवरचा विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, आणि माझ्या पत्नीने घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे मला वेळेवर मदत मिळाली. मी सुदैवी आहे की, आयुष्याच्या सुरुवातीलाच ऐन उमेदीत मला हा धडा मिळाला. 


आज संपूर्ण आयुष्यभर बेडवर काढावे लागणाऱ्या, शरीराने विकलांग असलेल्या माझ्या एकुलत्या एक ३५ वर्षीय मुलाची सर्व जबाबदारी माझ्याकडे देऊन, माझी पत्नी नंदा हिचे ६ महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. आता यापुढे घरात मुलाचा आणि समाजातील व्यसनाधितांचा पालक म्हणून निवृत्तीनंतरही हिमतीने आणि निस्वार्थीपणे आयुष्याच्या साठीनंतरही उमेदीने जगणार आहे. हे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
(रमेश सांगळे ९८२१५७४८९१ )


--- रवींद्र मालुसरे 
(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) ९३२३११७७०४

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

छत्रपती शिवाजीराजे भोसले




(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) 

छत्रपती शिवाजीराजे हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

“आम्ही पूर्ण जग फिरलो. त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा यावर आज विश्वास बसत नाही. शिवाजीसारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ही पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे निर्माण झाले असते” असे लॉर्ड एल्फिस्टन यांनी तर इंग्लंडचे ग्रँड डफ यांनी “राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. हतबल झालेल्या बहुजनांना त्यांच्या चाणाक्ष योजनेमुळे सत्ताधीश होता आले.”  
ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केले त्यांच्या दोन अधिकाऱ्यांचे हे विचार त्यांनी जागतिक इतिहासात कायमचे कोरून ठेवले आहेत………………….
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.
निश्चयाचा महामेरू !
बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू !
श्रीमंत योगी !!


अशा साक्षपूर्ण शब्दांत या जाणत्या राजाचे वर्णन इतिहासात केले आहे. शिवाजी महाराज श्रीमंत तर होतेच; पण योगीही होते. दक्षता, कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता, उत्साह होता, चंचलता नव्हती, निग्रह होता, मोह नव्हता, ममता होती, भोगवाद नव्हता, त्यागवाद होता. अष्टपैलू, अष्टवधानजागृत, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहितदक्ष, धर्माभिमानी; पण परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, असा हा जाणता राजा होता. जगातील थोर पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांची यादी जर समोर धरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा मोहरा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस, सिकंदर, किंवा दुसरे कोणतेही नृपती उदाहरणार्थ घेतले तरी प्रत्येक नृपतीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कांकणभर अधिक आहेत आणि हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत म्हणून त्यांना श्रेष्ठ ठरवायचे नसून ते एक ऐतिहासिक सत्य आहे. सर्व नृपती मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान मिळण्याचे पहिले कारण असे आहे की, त्यांची नीतीमत्ता बलवत्तर होती. मोगल सत्तेने जिकडे तिकडे आपला अंमल बसवला होता व स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रसंग केव्हा येईल, याचा नेम नव्हता. अशा धामधुमीच्या काळामध्ये महाराजांचा जन्म झाला होता. राजांनी हे चित्र स्वराज्यात संपूर्ण बदलून टाकले होते. सर यदूनाथ सरकारांच्या मते,‘ कृषकवर्ग ’ (कुणबी) शिवाजी महाराजांच्या लष्कराच्या पाठीचा कणा होता. लष्करात कुणबी, मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी, मुसलमान, न्हावी, महार, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर, आगरी, वैगेरे ५६ जातीचे लोक होते. शिवरायांचे सैन्य राष्ट्रीय होते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील सर्व जातीतील गुणवंतांना शिवरायांच्या सैन्यात प्रवेश मिळे. माणसांची पारख करूनच त्यांचा सैन्यात समावेश केला जाई.

भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले,
 
 त्यांच्या मागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक शिवनेरी या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले  शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे इतिहासकार मानतात
 
कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे, न्यायाच्या कामात कोणाची भीडमूर्वत न धरणारे, दुष्टांचा काळ, पण गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे, पापभीरू परंतु रणशूर, असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्य संस्थापक, श्रीमंत  छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोकांच्या पंक्तीस बसण्यास सर्वथैव  पात्र आहेत.


रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

बुधवार, २० मे, २०२०

सार्वजनिक गणेशोत्सव


सार्वजनिक गणेशोत्सव
आनंदाची पर्वणी अन् जल्लोषाचा साज.


उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती तर उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः हि आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभ प्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते. श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा हि पूर्वापार परंपरा आहे.  विवाहाचा शुभ प्रसंग असो वा लक्षमीपूजन, वास्तुशांती, गृहप्रवेश, कोनशिला समारंभ असो इतकेच काय कोणत्याही मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची असली तरी  प्रथम गणेशपूजन केले जाते.
गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश हि विद्येची देवता साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश हि अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला 'गणपती' हे अधिदान प्राप्त झालेले आहे. आपल्या राज्यातील गणेशोत्सवाला समृद्ध अशी ऐत्याहासिक परंपरा आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला 'वरदा चतुर्थी' असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजही गणेशभक्त होते. त्यांना हा वारसा त्यांच्या मातापित्यांच्या कडून मिळाला होता. त्यांचे वडील शहाजी महाराज आणि आई जिजाऊ हे उभयता श्री गजाननाचे उपासक होते. शाहूराजांनी सुद्धा मोरया गोसावींच्या संस्थानाला इनामे देणग्या दिल्याचे इतिहासात दाखले आहेत. पुण्यातील कसबा पेठेतील गणपती मंदिर मातोश्री जिजाऊंनी बांधले. एकदा स्वारीवर असताना शिवाजी महाराजांचा मुक्काम आंबवडे गावी झाला. त्या दिवशी चतुर्थी होती. उपवास असल्याने संध्याकाळी स्नान करून श्रीगणेशाचे दर्शन घेऊन भोजन करण्याचा महाराजांचा शिरस्ता होता. परंतु या गावी श्री गणपतीचे मंदिर नव्हते. पूर्वीचे मंदिर यवनी  टोळ्यांनी उध्वस्त केल्याचे महाराजांना गावकऱ्यांकडून समजल्यानंतर महाराजांनी नव्याने गजाननाची प्राणप्रतिष्ठा स्थानिक पुजाऱ्याच्या हस्ते करून तेथे स्थापना केली. त्या मंदिराच्या उभारणीच्या  खर्चासाठी रोख रक्कम आणि जमीनही इनाम दिली. पेशवाईच्या काळात चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशपूजा पार पडू लागली. नंतर तर लोकमान्य टिळकांनी या गणेशपूजनाला सार्वजनिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे फार मोठे उपासक होते. त्यांची तपश्चर्या फारच कडक होती. त्यांनी श्रीगणेशाला मोरगावाहून चिंचवडला आणले असे सांगितले जाते. आपल्या राज्यातील आठ तीर्थक्षेत्रे अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राज्यात मोरया गोसावी यांची गणेशभक्ती म्हणून जी कीर्ती पसरली त्या कीर्तीचा महिमा औरंगजेब बादशहा पर्यंत पसरला.बादशहा प्रभावित झाला आणि त्यांनी मोरया गोसावी यांच्या गणपती संस्थानाला इनामे दिली. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान,कथेकरी,हरिदास यांचे शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार दरबारी  प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव होत इतमामाने असे.

१८९२  मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले, श्री धोडवडेकर श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसवले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित व्हावा ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल हि कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसे राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता हि साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात पहिला सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो. समाजातील सर्व थरातील जाती-जमातींचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले. पुढे तर कोचीनपासून कलकत्त्यापर्यंत शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक उत्सव साजरे होऊ लागले. इतकेच नव्हे तर एडन नैरोबीपर्यंत परदेशात हि उत्सवाची लाट गेली. ब्रिटिश प्रशासनाने सुद्धा हिंदू-मुसलमानांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.

टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक, चि.केळकर, नाट्याचार्य खाडिलकर
काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम.अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे.  पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे .. . सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत, वक्ते, कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर, गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. प्रथम या उत्सवाकडे राष्ट्रीय उत्सव म्हणून बघितले गेले. या उत्सवाचा विचार करता १८९३ आरंभापासून ते १९२० लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत त्यानंतर १९२० ते १९४७ देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, १९४७ ते १९८०, १९८० नंतर आजच्या तंत्रज्ञान-संगणक युग असे टप्प्यांचा कालखंड आहे. सुरुवातीच्या नऊ दशकांत नव्हता तो फरक गेल्या तीन दशकात जाणवतो आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. दोन जागतिक महायुद्धे झाली. आपल्या देशाची पाकिस्तानबरोबर तीन तर चीन बरोबर एक अशी युद्ध झाली.
देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे. महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण 'गणेश' बाजूला पडून 'उत्साही उत्सवच' जास्त होत आहे हि दुःखदायक बाब आहे. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे. कार्यक्रमातील विकृतता, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक मशीन, विसर्जनाच्या मिरवणुकीतील फटाके आणि दणदणाटात अचकट-विचकट विकृत नाच करीत मिरवणूक तासनतास चालवणे. अलीकडे तर पाट पूजन, मंडप पूजन, पाद्य पूजन असे नवीन फंडे आले आहेत. एकाच विभागात राजा-महाराजा-नवसाला पावणारे असे विराजमान होत आहेत. प्रसिद्धीचा झोत आपल्या मंडळावर यावा यासाठी सेलिब्रेटी ना गाऱ्हाणे घालून मंडपात आणले जात आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी शतकापूर्वीपासून सुरु केलेला हा उत्सव आजही आपले उदिष्ट बऱ्याच प्रमाणात जपवणूक करून आहे  ! गणेशोत्सव हा केवळ मराठी माणसांचा सण म्हणणे बरोबर होणार नाही. या निमित्ताने सर्व धर्मातील राज्याराज्यातील माणसांचा हातभार या उत्सवास लागतो. गणेशोत्सवाच्या मंडपासाठी बांबू पुरवणारी मंडळी मुस्लिम, ताडपत्री कच्छि, वेलवेट सिल्कचे कापड सिंधी, गणेशमूर्ती मराठी, गणेश विसर्जन कोळी, ताशा,बंद,लेझीम हिंदू-मुलसलमान, आणि महाआरतीसाठी गुजराथी,जैन,पंजाबी, दाक्षिणात्य मंडळी असतात. मराठी मनात गणपती उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. शेवटी त्यातही आजच्या समाजाचे प्रतिबिंब पडल्याखेरीज राहील कसे ? आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले असले, हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत जात असला तरी त्याचे धार्मिक आणि भावनिक अस्तित्व बऱ्याच प्रमाणात कालातीत टिकून राहणार आहे.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...