मंगळवार, १६ जुलै, २०२४

प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम


प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ किंवा जगभरात आपल्या भारत देशाची औद्योगिक नगरी असेही म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल.   मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आज आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची,   त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर वेगवेगळ्या देवींची मंदिरेही पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिरे सुद्धा मुंबईत आहेत. तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि अलीकडच्या  काळात तर झपाट्याने अस्तंगत होत चालल्या आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई उंचच उंच टॉवर्सच्या माध्यमातून गगनभेदी होत आकाशाला भिडत  चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी हे शहर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे असल्याने काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतरच्या जागतिक संपानंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील कीर्तने आणि भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर हळूहळू क्षीण होत गेले. पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असत. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची वारकरी कीर्तन - भजन - पूजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने वा भक्तिभावाने टिकवण्यासाठी जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण हा  मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह  क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत पंढरीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु  मुंबई येथील भक्तांना या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी हे भक्त मुंबईतील वसलेल्या विठुरायाला भेट देतात. परंतु भविष्यात मंदिराचे अस्तित्व राहून परमार्थ सुरुवातीच्या काळातली उंची गाठणार आहे का हा प्रश्न काळ देणार आहे.

प्रभादेवीतील आप्पासाहेब मराठे मार्गाला जोडून असलेल्या मुरारी घाग मार्गावरील १२४ वर्षांपूर्वी उभारलेले पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर हे यापैकी एक. स्वयंभू मूर्ती असलेल्या या मंदिराला श्री सद्गुगुरू भावे महाराज वारकरी समाज या १०४ वर्षे धार्मिक परंपरा लाभलेल्या वारकरी फडाच्या थोर श्रीगुरूंची परंपरा लाभली आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर आणि देवाचे दर्शन घेतल्यानंतर शुचिर्भूतता, पावित्र्य आणि भक्तिभाव तात्काळ अनुभवास येतो. हे मंदिर पुढच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. यंदाच्या आषाढी वारीनिमित्त शंभरहून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा इतिहास परंपरचा, आणि नित्यनेमाने चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांची रुपरेषा ओळख करून देत आहे. 

शंभर वर्षाहून अधिक वर्षे किंबहुना आजही या मंदिरात श्री सद्गुगुरू भावे महाराज वारकरी समाजाच्या वतीने नियमितपणे  दररोज संध्याकाळी ज्ञानेश्वरी प्रवचन, पांडुरंगाची आरती होत असते. प्रत्येक महिन्याच्या २ एकादशीच्या दिवशी वेगवेगळ्या कीर्तनकारांची हरिकीर्तने होतात. माघ शुद्ध दशमी निमित्त ७ दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह, गोकुळ अष्टमीनिमित्त ७ दिवसांचा हरिनाम सप्ताह, संतांची चाळ अमेय सोसायटी येथे ७ दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर गुरुवर्य नारायण दादा महाराज घाडगे यांची पुण्यतिथी, संत तुकाराम बीज, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत एकनाथ षष्टी उत्सव, गुढीपाडवा उत्सव, श्री राम नवमी, हनुमान जयंती उत्सवसंत अर्जुनमामा पुण्यतिथी, संत नामदेव महाराज पुण्यतिथी, संत भावे महाराज यांची पुण्यतिथी, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा, श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने होत असतो. या कार्यक्रमाला प्रभादेवी परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने उपस्थित राहत असतात. प्रभादेवीतील एक निस्सीम भगवद भक्त ह भ प कृष्णामास्तर घाडगे हे या मंदिरातील पारमार्थिक सेवा अखंडपणे पार पडावी यासाठी भक्तिभावाने लक्ष देत असतात. 

ब्रम्हभूमी संत जगी अवतरले | उद्धारावया आले दीन जना "|| मानवी जीवनात संतसमागम, संतसंगती, संतांचा अनुग्रह आणि संतबोधाचे श्रवण या गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यांच्या आचरणाशिवाय माणसाचे जीवन कृतार्थ होत नाही. संतसज्जन, संतमहात्मे व आचार्य या सर्वांनीच तसे आपल्या वाड्मयात प्रतिपादले आहे. ज्ञानाची प्राप्ती संतांच्या संगतीशिवाय होणार नाही, हा विचार श्री ज्ञानेश्वरांनी मांडताना म्हटले आहे की -

ते ज्ञान पै गा बरवा |जरी मनी आथी आणावे || तरी संता या भजावे | सर्वस्वेसी ||

श्री संत तुकाराम महाराजांनी संतांचा "कैवल्यानिधानी" असा गौरवपूर्व उल्लेख केला आहे, ते म्हणतात - तुम्ही साधुसंत कैवल्य सागर | मोक्षाचे आगर तुम्हा घरी || थोडक्यात मानवी जीवन ज्ञानसंपन्नते शिवाय प्रसन्न, संपन्न, कृतार्थ आणि शांती देणारे होणार नाही आणि हे सर्व केवळ संतसमागम किंवा संतसंगतीने प्राप्त होते.

संतांच्या विभूती | धर्मालागी अवतरती || महाभारतात यक्ष व युधिष्ठिर यांच्या संवादात यक्षाने 'को दिक् ?' असा प्रश्न विचारताच 'सन्तो दिक्' असे युधिष्ठीराने उत्तर दिल्याचा उल्लेख आहे, संत खरोखरच समाजाचे दिशादर्शक होत. संत म्हणजे भोंदूगिरी, चमत्कार, मठ शिष्यांच्या ताफ्यात ऐशरामी जीवन जगणारे बाबा, बुवा, बापू ...या कल्पनाच चुकीच्या, किंबहुना अशा पद्धतीचे जीवन जगणारे ते संतच नव्हेत. याउलट संत हे समाजाचे खरे मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक होत. हीच खरी प्रतिमा लोकांत असायला पाहिजे. म्हणूनच त्यांना' 'युगपुरुष' म्हणण्याचा मोह होतो. 'बुडती हे जन न देखवे डोळा' या उक्तीनुसार आज आपण सर्वजण एका भयंकर सामाजिक परिस्थितीचा सामना करीत जीवन जगत आहोत. आर्थिक, मानसिक क्षेत्रातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सभोवतालच्या वातावरणात सामाजिक, सांस्कृतिक, कित्येकदा दाहक आणि भ्रष्ट स्पर्धा जाणवते आहे, आणि सर्वात वाईट याचे आहे की, सामान्य आणि निष्पाप जीवांचा बळी जातो आहे. या परिस्थितीत प्रत्येक जीवात गुणात्मक परिवर्तन घडून धर्मशील असे जीवन जगण्याची उर्मी वाढीस लागणे अत्यंत गरजेचे आहे. सत्पुरुषांचे अवतार हे नेहमीच लोकोपयोगी कार्यासाठी, जनकल्याणार्थ आणि समाजोद्धारासाठीच असतात.  म्हणूनच ते शतकोनशतके वंदनीय, आदरणीय ठरतात. निरनिराळ्या वेळी भिन्न भिन्न स्थळी साधू संत जन्मास येतात व नियोजित कार्य पार पाडले की, निजधामास जातात. कित्येक अवतार प्रसिद्धी पावतात. तर काही अप्रसिद्ध राहातात. आपल्या भक्तिमार्गाने आध्यात्मिक परंपरेचा वारसा त्यांनी जतन केला आहे. काहींनी तर आपल्या जीवितकार्याने केवळ भारतातीलच नव्हे तर अखिल विश्वातील मानवास ईश्वरी स्वरूपाचा साक्षात्कार करून देवून नरजन्माचे सार्थकत्व सिद्ध करून दाखविण्याचा साधनमार्ग उपलब्ध करून दिला आहे. संताचे हे या जगावर झालेले थोर उपकार आहेत. भक्तिमार्गाचा 'प्रवाह' अशा संतांच्या कार्यामुळे अखंडपणे चालत राहिला असून अधूनमधून तो कमीअधिक किंवा प्रसंगी खंडित झाला असला तरी कधी प्रेरणा तर कधी प्रत्यक्ष कार्य अशा रूपाने तो मात्र टिकून राहिला आहे असे विवरण करण्याचे कारण म्हणजे गेल्या शतकात महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीवर ज्या मोजक्या संतपर व्यक्तींचा अवतार झाला, त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या श्री पंढरपूरक्षेत्री उमटला, अशांपैकींच्या पंगतीमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे संत सदगुरु श्री रामकृष्ण भावे महाराज. विसाव्या शतकातही ज्यांनी हा भक्तिमार्ग चालविला आणि आपल्या गुरुपरंपरेची आणि त्यांच्या साधनमार्गाची ख्याती त्रिखंडात पसरविली आणि अनेक साधकांना ईश्वरी स्वरूपाचा साक्षात्कार घडविला, श्रीगुरूकृपेची प्रचीती दाखवून दिली, अशा रामकृष्ण भावे महाराजांचे चरित्र आपण समजावून घेऊया. अखंड नामस्मरण करून याची देही याची डोळा त्यांनी ईश्वराचे दर्शन घेतले आणि ते गुरुपदवीस पोहोचले. इतरही भक्तीमार्गी साधकांना 'नाममंत्र' देऊन त्यांनी आत्मोद्वाराची दिशा दाखवून दिली. आणि त्या दिशेने वाटचाल करण्याचे सामर्थ्य केवळ कृपाकटाक्ष त्यांनी अनेकांना मिळवून दिले. तेव्हा त्यांच्या चरित्राचा आणि साधनमार्गाचा मागोवा घेणे हे कोणाही भक्तीमार्गीयांस त्याच्या पारमार्थिक वाटचालीत प्रेरकच ठरेल यात मुळीच संदेह नाही.

श्रीगुरु वै ह भ प रामकृष्ण भावे महाराज - 

श्री सद्गुरू रामचंद्र तथा रामकृष्ण कृष्णाजी भावे महाराज यांचे मूळ घराणे अडोमचे. त्यानंतर गुहागर तालुक्यातील हेदवी येथे स्थलांतर झाले. तिसऱ्या पिढीतील कृष्णाजी बल्लाळ हे साताऱ्याजवळील जकातवाडी येथे गेल्याचा दाखल सापडतो. त्यांच्या बंधूंची मुलेही तेथे होती. यावरून बल्लाळ हरी (दुसऱ्या पिढीतील) हेच कोकणातून जकातवाडी येथे जाऊन कायमचे झाले असण्याचा संभव आहे. जकातवाडी सातारा येथे "भावे याचा मारुती" म्हणून एक पडिक देवालय आहे. सध्या या घराण्यातील मंडळी मुंबई, अलिबाग, दापोली, वेतोशी, बुलढाणा, सोलापूर व  चिपळूण तालुक्यातील तुरंबव इत्यादी ठिकाणी विखुरलेली आहेत. रामकृष्ण कृष्णाजी भावेयांचा जन्म १९७२ मध्ये झाला. मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले. पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी केली. बी एस नॅव्हिगेशन कंपनीमध्ये व इं को नॅशनल ट्रेडिंग कंपनीमध्ये हर्णे येथे एजंटची जागा पत्करून काही काळ नोकरी केली. लहानपणापासूनच त्यांना धाडसाची कामे करण्याची आवड असल्याने आपणही आपल्या बंधूंप्रमाणे सर्कसमध्ये वन्य प्राण्यांच्या समवेत काम करावे, निधड्या छातीने हिंस्त्र प्राण्यांसमोर सामोरे जावे असे त्यांना सतत वाटत असे. त्यांना सर्कसची ओढ असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सर्कसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर ते ईश्वरभक्त होते. नेहमी आषाढी एकादशीस मित्रांबरोबर पंढरपूरला जात. बऱ्याच लोकांना उपदेश देऊन ईश्वरभक्तीस लावले. अशाच एका वारीनंतर अतिसार होऊन वयाच्या ५५ व्या वर्षी श्रावण शुद्ध ४ शके १८४९ म्हणजे दि १ ऑगस्ट १९२७ रोजी मुंबईत प्रभादेवी येथे निधन झाले. यापूर्वी त्यांचे आयुष्य रंजक होते. एके दिवशी सर्कसमध्ये रिंगणामध्ये खेळ करताना हिंस्त्र वाघाने हल्ला केल्यानंतर ते  जखमी झाले, वाघाच्या झडपांनी रक्तात पुरते माखून गेलेल्या रामकृष्णांवर मिरजेतील दवाखान्यात प्राथमिक उपचार केले गेले.  ते मूर्च्छितावस्थेत गेले होते. तात्काळ औषधोपचार सुरु झाले त्यामुळे काही वेळाने ते शुद्धीवर आले. अंगमेहनत आणि दररोजच्या व्यायामामुळे शरीर कमावले होते. त्यांनी हा आघात सहन केला मात्र दोन्ही  हातांची जखम कमी न होता दिवसेंदिवस वेदना देत होती, ते सहन करण्यापालिकडले होते. औषधोपचाराचा काही फरक पडत नव्हता. अखेर सर्कस मालक व त्यांच्या बंधूनी मिरज मधील एका निष्णात वैद्याला बोलावले. सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांनी निदान केले की, यांचे दोन्ही हात काढावे लागतील. पिसाळलेल्या वाघाच्या तीव्र झडपांनी झालेल्या त्यांच्या हाताच्या जखमा इतक्या खोलवर गेल्या होत्या की जीव वाचावावयाचा असेल तर डॉक्टरांपुढे त्यांचे दोन्ही हात कापण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. ऑपरेशन करावेच लागेल या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे रामकृष्ण खूपच कासावीस झाले.  ब्राम्हण कुळातील असल्याने पारमार्थिक होते.अक्कलकोटच्या स्वामीसमर्थांची आणि श्री विठ्ठलाची आषाढी वारी ही त्यांची नित्याची वारी ठरलेली असे. त्यामुळेच रिंगणात जीवावर प्रसंग बेतला तेव्हा त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. या जीवघेण्या प्रसंगातून पांडुरंगानीच वाचविले अशीच त्यांची श्रद्धा झाली. सर्कसमधील नोकरी ही पोटासाठी मात्र ज्या परमेश्वराचे सकाळ-संध्याकाळ भजन करायचे ते हातच आता कापून टाकायची वेळ आली आहे याचे त्यांना मनस्वी अतोनात दुःख झाले.आपले हात आपण गमावले तर सकाळ-संध्याकाळ ज्या दोन्ही हातांनी पांडुरंगाचे भजन करीत आहे  त्या ईश्वरी भजनासाठी आपले हात राहणार नाहीत, याचे अमाप दु:ख त्यांना झाले. अंथरुणावरून उठण्याची शक्ती नाही. चित्तास क्षणभर चैन नाही. झोप नाही. परंतु श्रीसमर्थांचे स्मरण सुटले नाही.
ऑपरेशनची तारीख ठरली होती. इकडे अतीव दुःखाने रामकृष्ण भावे यांचा पांडुरंगाचा धावा सुरु होता. दिवस रात्र झोप लागत नव्हती. अखंड परमेश्वराचे नामस्मरण सुरु होते. ऑपरेशन पूर्वी दोन दिवस अगोदर एका रात्री पहाटे त्यांना झोप लागली. आणि एक दिवस त्यांची तपश्चर्या फळाला आली. ब्राम्हयमुहूर्ती एक दिव्यमूर्ती साकार झाली. साक्षात समर्थ अवतरले. झोपलेले असताना स्वप्नामध्ये आशीर्वाद मुद्रा दर्शवित एक तेज:पुंज साधू प्रगट झाले. एक दिवस त्यांची तपश्चर्या फळाला आली. ब्राम्हयमुहूर्ती एक दिव्यमूर्ती साकार झाली.  विद्युल्लतेप्रमाणे प्रकाशमान पण चंद्राप्रमाणे शीतळ अंगकांती त्यावर कौपिन धारण केलेली, कानी कुंडले, मस्तकी जटाजुट, पायी खडावा, काखेस झोळी, हाती चिमटा अशा वेशात त्या तेजस्वी महापुरुषांचे दर्शन झाले. सर्व कामधन, सर्वसिद्धीपूर्ण, पतितपावन असे ते स्वामी समर्थ मनीचे आर्त पूर्ण करण्यास धावून आले होते. साक्षात समर्थ अवतरले. रामकृष्णांनी त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. आणि त्यांनी महाराजांच्या हातावरून हात फिरवला. आणि त्यांना म्हटले, तुमचा रोग मी नाहीसा करतो. स्वप्न पडले ते असे होते….. पहाटे पहाटे खिन्न मुद्रेने दरवाजासमोर भावे महाराज  बसले होते, मात्र समोर लालबुंद सुर्यनारायणाच्या उजेडात त्यांचा चेहरा आणि कांती उजळली होती. रामकृष्णा, खेद कशासाठी व कां करीत आहेस ? तुम्ही पंढरपूरचे वारकरी दिसता, संसाराचा काही पाश आहे का ? तुमच्या चर्येवरून तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. दु:खीकष्टी असण्याचे कारण मला समजेल काय ? रामकृष्ण भावे यांनी त्यांना हात जोडून म्हणाले, सर्कसचा खेळ करताना आपले दोन्ही हात जायबंदी झाल्याचे व ऑपरेशन करुन पूर्ण हात काढणार असल्याचे सांगितले. यानंतर मी टाळी वाजवून नामस्मरण करु शकणार नाही याची मला खंत आहे. जर देवाची भक्ती होणार नसेल तर माझ्या जगण्याला अर्थ तो काय उरणार आहे. माझे जीवन व्यर्थ जाणार आहे अशी करुण व्यथा त्यांनी साधूपुढे मांडताच ते साधू म्हणाले, घाबरू नकोस, तुम्ही म्हणता ते खरेच आहे. मी एक विभूती तुम्हाला देतो. ते आज  ब्रम्हमुहूर्तावर जखमेवर लावा. तुम्हाला आराम पडेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. त्या साधुमहाराजांनी आपल्या मेखलेमधून भस्माची पुडी काढून त्यांच्या हाती दिली. आणि साधूमहाराज अंतर्धान पावले. या स्वप्नानंतर भावे महाराज जागे झाले.  समोर कुणीच नव्हते. स्वप्नात स्वामीं आले होते, समर्थांच्या समर्थ प्रत्ययाने भावे महाराजांच्या  नेत्रावाटे अश्रू पाझरू लागले. रामकृष्णांनी त्यांच्या चरणावर मनोमन लोटांगण घातले. रामकृष्ण भावे यांना काही वेळाने जाग आली. स्वप्न दृष्टांत त्यांना आठवू लागला. अंथरुणावर उठून बसले आणि अधू हातांनी उशाकडे चाचपू लागले असता, त्यांना एक भस्माची पुडी सापडली. काही वेळाने त्यांचे बंधू त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे आले. रामकृष्ण यांनी त्यांना तो स्वप्नदृष्टांत सांगितला. आणि सत्य ठरल्याची खूण म्हणून ती भस्माची पुडीही दाखविली एकनाथमुर्ती याचे आश्चर्य वाटले. नाहीतरी दोन दिवसांत ऑपरेशन करावे लागणारच आहे. अशा बिकट प्रसंगात जबाबदारी असलेली कुटुंबातील माणसे इतरेजण जे उपाय सांगतात, दवापाणी सुचवित असतात ते ऐकून त्यांचा ते ते करण्याकडे प्रयत्न सुरूच असतो. एकनाथमुर्ती यांनीही हे भस्म लावून बघूया असा मनात विचार आणून त्या दिवशी ते दवाखान्यातच झोपले, व त्या पहाटेला म्हणजे ब्रम्हमुहूर्तावर त्यांच्या हातानेच परमेश्वराचे व कुलदैवताचे नामस्मरण करून ती विभूती त्यांच्या दोन्ही हातांना आणि कपाळाला लावली. एकनाथमुर्ती संध्याकाळी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात आले. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, अंगातला वेदनेचा ठणका थांबला आहे. एकनाथमुर्तीना ते ऐकून बरे वाटले. परमेश्वराचे आणि स्वप्नातील स्वामी समर्थ महाराजांचे आभार मानले. जखमेवरचा ठणका थांबल्याने त्या रात्री रामकृष्ण यांना गाढ व शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे ती विभूती लावताना जखम पूर्वीपेक्षा कोरडी होत असल्याचे दिसून आले. पुन्हा त्यांनी देवाचा धावा करून ते भस्म लावले. त्या दिवशी संध्याकाळी तर रामकृष्ण आनंदी आणि दुःखाचा लवलेशही चेहऱ्यावर नसलेले प्रसन्न चित्त दिसले. त्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे दुपारी ऑपरेशन होते. सकाळपासून त्याची तयारी सुरू होती. कारण दोन्ही हात काढण्याची मोठी शस्त्रक्रिया होती. इथे मात्र वेदना थांबून जखमा सुकत गेल्या होत्या. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी प्रख्यात शल्यविशारद रामकृष्ण यांना भेटण्यासाठी व क्लोरोफार्म म्हणजे गुंगीचे इंजेक्शन देण्यासाठी त्यांच्या खोलीत आले. जुजबी चौकशी करुन जखम पाहात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव क्षणाक्षणाला उमटत होतें. दोन्ही हात काढण्याविषयीचे त्यांचे निदान चुकणार नव्हते. कारण त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभवात असे कधी घडले नव्हते की, जखम झटझट कोरडी झाली व रोग्याला आराम पडत गेला. डॉक्टरांनी पुन्हा काही चाचण्या केल्या आणि ऑपरेशन रहित करण्याचा निर्णय घेतला. काय आश्चर्य आठच दिवसात त्यांचे दोन्ही हात पूर्ण बरे झाले. मात्र व्रण आणि हातांचा दुबळेपणा शिल्लक राहिला होता. परमेश्वरानेच स्वप्नात येऊन आपली भेट घेतली आणि विभूती दिल्यानेच आपण या मरणप्राय यातनेतून सुटलो. आपल्या हाकेला देव धावून आला व आपल्याला जीवनदान प्राप्त झाले आहे. त्याचीच कृपादृष्टी आपल्यावर झाल्याचे रामकृष्ण भावे यांनी मनोमन जाणले. त्यामुळे यानंतर मुळातच धार्मिक वृत्तीच्या रामकृष्णांचा जास्तीत जास्त वेळ ईशचिंतनात जावू लागला. त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. विरक्तवृत्तीने ते आता जगू लागले. यापुढचे आयुष्य परमेश्वराच्या नामचिंतनात घालवायचे असा त्यांचा मनोनिग्रह झाला. पुढे अशाच एका रात्री पुन्हा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. अजानबाहू, सुहास्यवदन, गळ्यात रुद्राक्षमाळा, सर्वांगाला भासम लावलेला, डोक्याला बनावटीची टोपी, ब्रम्हतेजाची छाप मुखावर असे वरदपाणी उभे राहिले. आणि म्हणाले " वत्सा, मी तुझ्यासाठी प्रकटलो आहे. तुझ्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि ब्रम्हाचा शोध नि:संशय लागेल. प्रत्यक्ष भेटीची खंत मनात ह्यावेळी धरू नकोस. स्वप्नातील काही गोष्टी असत्या मानू नये. माझा हात तुझ्या मस्तकावर आहे. आता कशाचीही काळजी करू नको. तेच तेज:पुंज साधुपुरुष म्हणजे स्वामी समर्थ आले आणि त्यांच्या उशाजवळ भगवे कपडे ठेऊन गेले. सकाळी उठून पाहतात तो काय ? स्वप्न पुन्हा खरे ठरले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते अंथरुणातून उठले. प्रांतर्विधीसह स्नान करून ते परमेश्वराला करुणा भाकण्यासाठी बसले. त्यांनी मनाशी ठाम निग्रह केला आणि परमेश्वराला निश्चयाने प्रार्थना केली, देवा माझे मन आतूनही भगवे कर. या भगव्या कपड्यांची मला गरज नाही. मी माझे संपुर्ण आयुष्य तुझ्याच चरणाजवळ आणि अहोरात्र तुझ्या चिंतनात घालविणार आहे. तेव्हा ते ते:जपुंज साधू प्रसन्नतेचा भाव चेहऱ्यावर आणून त्यांना म्हणाले, रामकृष्णा, तुझ्या मनी जे इप्सित आहे तसेच घडेल. मला कल्पना आहे, वारकरी संप्रदायाशी तुमचे अनुसंधान जुळले आहे, ‘रामकृष्णहरी’ मंत्राची ओढ लागली आहे, मात्र तुला ‘गुरु’ करावा लागेल. लवकरच एका अधिकारी व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभेल. "सद्गुरू साक्षात परब्रम्ह" असा न्याय तुमच्या बाबतीत घडणार आहे. अशी श्रद्धा गुरुचरणी घडावी असा योग तुमच्याबाबतीत साधणार आहे, यापरते भाग्य कोणते आहे ?  सद्गुरुंनी तुझा अंगीकार केल्यानंतर ना भय, ना चिंता बाळगण्याची गरज उरणार. गुरुपदी दृढ व्हा. ऐक्यरूप होऊन भक्ती, ज्ञान, वैराग्याने गुरुमार्गाचेच आचरण करा. त्यानंतर तुमच्या आयुष्याची खरी मौज पहा. त्या साधूंनी पुढे होऊन झोळीतून विभूती काढली व रामकृष्णांच्या कपाळी लावीत ते म्हणाले, 'गुरूची भेट घ्या ! स्वहित साधा ! माझे  आशीर्वाद आहेतच. !" आणि अंतर्धान पावले. .... त्या दिव्यस्पर्शाने रामकृष्ण एकाएकी जागे झाले. कितीतरी वेळ ते आश्चर्यसागरी बुडत पुन: पुन्हा तो स्वप्नप्रसंग आठवीत होते. तेजोरुपातील त्या तपोमुर्तीना स्मरून वंदन करीत होते. प्रभू तुम्ही मला जागेपणी साक्षात दर्शन का दिले नाहीत. मनाची शांती स्वप्नाने होत नाही,  रामकृष्णांच्या मनीचा संदेह मावळला होता. तसेच निर्माण झालेला विपरीत शेष प्रारब्धदोष उठाउठी निरसून गेला होता. सदगुरू दर्शनासाठी आसुसलेल्या मनोरूपी चक्रवाकाचा आकांत शांत झाला होता. जीवाची तळमळ थांबली होती. त्याच रात्री ते भगवे कपडे गायब झाले आणि रामकृष्ण नावाच्या व्यक्तीचा जीवनातील भावे महाराज असा भविष्यातला प्रवास सुरु झाला. 

मी माझा ऐसी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण || पार्था तो संन्यासी जाण | निरंतर ||

जोग महाराजांचे हे लक्ष्मणबुवा इगतपुरीकर हे त्यांचे शिष्य सतत भ्रमंतीवर असायचे. बऱ्याच वर्षांनी ते मिरज शहरात येत होते. त्यामुळे त्यांचे कीर्तन आवडीने ऐकायला मिळणार याचा आनंद त्यांना झालाच. ठरल्या दिवशी गणपती मंदिरात कीर्तनाला गेले. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते तरीही कीर्तनाला प्रचंड संख्येने भाविक जमले होते. रामकृष्ण गर्दीतून वाट काढीत अगदी जवळ जाऊन बसले. कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर विठोबा रखुमाईचा गजर झाल्यानंतर लक्ष्मणबुवा निरूपणासाठी गादीवर येऊन उभे राहिले. संपूर्ण मंदिरभर विलक्षण शांतता, स्तब्धता पसरली होती. संथ गतीने सुरुवात होत महाराजांनी वक्तृत्वाची सम साधली. सर्व श्रोते मनाचा कान करून कीर्तन ऐकत होते. कीर्तनकार रसाळ भाषेत विषयाची मांडणी करीत होते. कीर्तन ऐन रंगात आले असताना उत्तरंगापूर्वी कीर्तनकार बुवांनी श्रोत्यांना आवाहन केले, दोन्ही हात वर करुन टाळ्या वाजवून देवाचे भजन करा. भावे महाराज खिन्न झाले. हातात ताकद नसल्याने ते हात उचलू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मन कासावीस झाले आणि परमेश्वराचा धावा करु लागले. कीर्तनकार, टाळकरी व मृदंग वाजविणाऱ्यांचा सूर टिपेला  पोहोचला होता. उपस्थित श्रोतेही हात करून विठ्ठल ! विठ्ठल !! असा गजर जोरात करीत होते,  भावे महाराजांचेही मन उन्मनी झाले, त्यांच्या दोन्ही हातांची धडपड टाळी वाजविण्यासाठी नकळत सुरुच होती. दोन्ही हातात ताकद एकवटली गेली आणि काय आश्चर्य महाराजांचे दोन्ही हात वर गेले.... पांडुरंगाचा गजर सुरु झाला. बुवां 'पुंडलिक वरदा हरीविठ्ठल' म्हणाले आणि गजर संपला. भावे महाराजांना एकाएकी जाणीव झाली, आपले हात वर उचलले गेले आहेत, आपल्या हातात पूर्वीप्रमाणे ताकद आली आहे. हातांची हालचाल व्यवस्थित होतेय. तेच हात त्यांनी पांडुरंगाला भक्तिभावाने जोडले, लक्ष्मणबुवांची रसवंती दोन तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून अखेर थांबली. आता मात्र भावे महाराजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. कीर्तन संपल्यानंतर ते तडक कीर्तनकार बुवांजवळ गेले. त्यानंतर शिक्षण घेऊन लिहायला वाचायला येत असल्याने आणि फक्त परमार्थाचा ध्यास असल्याने त्यांच्या परमार्थाच्या ज्ञानात अधिक भर पडत असे. अभ्यासाने लवकरच प्रवचन-कीर्तन करु लागले. सद्गुरू रामकृष्ण भावे महाराजांनी आयुष्याच्या अखेरच्या काळात घरादाराचा पाश सोडून विरक्त आयुष्य स्वीकारले. आणि मुंबईत वास्तव्यासाठी आले, पंढरीची वारी केली आणि श्री विठ्लाचा सेवापरमार्थ करण्यात धन्यता मानली. सन १९१५ चा काळ असेल, ह. भ. प. रामकृष्ण भावे महाराज मुंबईत याच उद्देशाने आले होते. 'जगाच्या कल्याणा' या ध्येयाने प्रेरित झालेल्या भावे महाराजांसमोर आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथी' हेच कार्य ठळकपणे होते. यापुढचा काळ मुंबईत व्यतीत करण्याचे आणि वारकरी सांप्रदायातील संतसाहित्याच्या आधाराने महाराजांनी मध्यमवर्गीयांत काम करण्याचे ठरविले  सुरुवातीला लालबाग परिसरात त्यांचे वास्तव्य होते. श्रावण महिन्यात मठातून एकदा रात्री लालबागला जात असताना प्रभादेवी परिसरात बाळकृष्ण वासुदेव चाळ येथे दासबोध ग्रंथाचे वाचन आणि निरूपण चालू असल्याचे त्यांनी ऐकले. त्यांची पाऊले आपोआप तिकडे वळली. त्यांनी दूर बसूनच त्या दिवशी श्रवण केले. नंतर तिथे राहणाऱ्या श्री अर्जुनमामा साळुंखे, श्री पेंढारेबुवा, नाना साळवी, देसाई मास्तर, सितारामबुवा, डीचोळकर, धामापूरकर इत्यादी मंडळींशी भेट होऊन परिचय झाला. त्यानंतर भावे महाराज दररोज त्या ठिकाणी श्रवणास येवू लागले. आता ते तिथे येणाऱ्या सर्वांच्या परिचयाचे झाले होते, आणि त्यांची वेगळी ओळख सुध्दा झाली होती. ह. भ. प. रामकृष्ण भावे हे वारकरी आणि श्री विठ्ठल भक्त असून आषाढी वारी नियमित करतात. वारकरी पद्धतीने कीर्तन-प्रवचन करतात असे सर्वांना समजल्यानंतर ग्रंथ समाप्तीच्या दिवशी या चाळीत रात्रौ त्यांनी कीर्तन करावे असा आग्रह करण्यात आला. भावे महाराजांनी त्या रात्री कीर्तन करताना आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीने प्रभादेवीकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांची स्पष्ट उच्चारांच्या अमृतमयवाणीने थोरामोठ्यांना सुखावले होते, 'तैसे साच आणि मवाळ | मितले रसाळ | शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे || त्यांच्या वाणीने श्रध्दावंतांसह अश्रध्दावंतांनाही डोलवले होते, आता तर त्या परिसरातील इतरांच्याही परिचयाचे झाले. सध्याच्या दत्तमंदिराच्या समोरच्या चाळीत राहणारे वै. काळोजी पाटील हे भावे महाराजांना रोजच चौपाटीकडे जाताना पहायचे. दोघांत फक्त स्मितहास्य व्हायचे. एके दिवशी पहाटे भावे महाराज त्यांच्या घरासमोरून जात असताना समुद्राच्या वाटेवर गर्दी पाहिली तर आपल्याला दररोज हात हलवून नमस्कार करणाऱ्या एका व्यक्तीला मूर्च्छा आली आहे, भावे महाराज पुढे झाले घरातून तांब्याभर पाणी मागितले. हातात पाणी घेऊन काही मंत्र पुटपुटले व त्यांच्या चेहऱ्यावर मारले. लगेच त्यांना शुद्ध आली. त्यांना नंतर म्हणाले, तुम्हाला यापुढे केव्हाही मिरगी येणार नाही. आजार कायमचा निघून जाईल. यानंतर दोघांचाही निकटचा परिचय झाला. भावे महाराजांना घरी येण्याचा त्यांच्याकडून आग्रह होऊ लागला. एके संध्याकाळी काळोजी पाटील भावे महाराजांना म्हणाले, महाराज इथून हाकेच्या अंतरावरील मुख्य रस्त्याच्या मागच्या गल्लीत एक स्वयंभू श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. मी तिथे जातो आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. भावे महाराज लगेच त्यांच्याबरोबर निघाले. ते मंदिर आणि मूर्ती पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले, आता ते तिथेही नियमितपणे येवू लागले. पण या मंदिरात संध्याकाळच्या आरती शिवाय काही धार्मिक कार्यक्रम होत नसल्याबद्दल त्यांना खंत वाटत असे. त्यांनी लगेचच मंदिरात आणि बाळकृष्ण वासुदेव चाळीत असे दोन ग्रंथ येणाऱ्या श्रावण महिन्यात निरुपणासाठी लावले. स्वतः ओव्या वाचन आणि  त्याचा रसाळ ओघवत्या शब्दात निरूपण करीत असत. लवकरच त्यांची कीर्ती पसरत गेली. प्रभादेवीच्या आगरबाजारापासून ते कोळीवाड्यापर्यंत वाड्यावाड्यांत आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे कोळी आणि भंडारी जमातीचे लोक गर्दी करू लागले. भावे महाराजांचे श्रावण महिन्यात कीर्तन ऐकून अर्जुनमामा अगोदरच प्रभावित झाले होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपला मनोदय सांगितला आणि मामांच्या आयुष्यात तो दिवस उगवला. अर्जुन मामांनी ह भ प रामकृष्ण भावे महाराज यांच्याकडून तुळशीची माळ घेऊन दिक्षा घेतली. नित्यपाठ आणि जपासाठी व ध्यानासाठी मंत्र समजून घेतला. आता तर भावे महाराज गुरु आणि अर्जुनमामा साळुंखे शिष्य असे नाते निर्माण झाले. अर्जुनमामा खरे तर भायखळा स्टेशनसमोर एका चाळीत काझी बिल्डिंगमध्ये परिवारासह राहायचे, पण कार्यक्रम, मित्रपरिवाराच्या ओढीने त्यांचे येणे जाणे प्रभादेवीत सतत असायचे. जणू ते प्रभादेवीकरच आहेत असेच इतरांना वाटायचे. त्या दिवशी चाळीत आनंदाचे वातावरण होते. चाळीतील सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मंडळींसह आजूबाजूच्या परिसरातील मामांच्या ओळखीचे शेकडो लोकं त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी परमार्थ, आवश्यकता आणि त्याची वाटचाल याचे महत्त्व याचा उहापोह ह. भ. प. रामकृष्ण भावे महाराज यांनी आपल्या उपदेशात केला. अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अपेक्षा व्यक्त करुन विनंती केली की, या चाळीत सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि एकोप्याने होत असतात. या चाळीत अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. लोकांनी या सुचनेचे स्वागत केले आणि १९२० पासून चैत्र कृष्ण ६ ते चैत्र कृष्ण १२ या कालावधीत बाळकृष्ण वासुदेव चाळीत अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. हीच चाळ पुढे दादर-प्रभादेवी-वरळी परिसरात संताची चाळ म्हणून प्रख्यात झाली.

मग भावे महाराजांच्या मनात विचार आला, आपण इथेही प्रभादेवीच्या मंदीरात हरिनाम सप्ताह सुरु करु शकतो. पूर्वीच्या प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मंदिर सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले होते. त्यांनी त्यांच्या नात्यातील परिचयाच्या श्री रामभाऊ नाईक यांच्याकडे मंदिराची व्यवस्था सोपविली होती. रामभाऊ नाईक यांना भावे महाराज भेटले आणि म्हणाले, तुमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्याची आमची इच्छा आहे. मंदिराचे मालक श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि काही भार सुद्धा उचलण्याचे आश्वासन दिले. मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. प्रभादेवीत परमार्थाची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भावे महाराज प्रभादेवीत राहायला आले तर, मामा केव्हा बाळकृष्ण वासुदेव चाळीत कायम स्वरूपी राहायला आले. ह भ प अर्जुनमामाही आता श्रीगुरु रामकृष्ण भावे महाराजांच्या सानिध्यात राहून वारकरी मुळतत्वांचा अभ्यास करीत होते. ज्ञानेश्वरी, भागवत आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग एकपाठी असल्याने त्यांच्या लक्षात राहात होते. प्रभादेवीत खाडा परिसरात परबत सोलंकी या खारवी कुटुंबियांचे एक लहानसे मंदिर होते. तिथे श्रीविठ्ठल-रखुमाई स्थापित होते. त्या ठिकाणी सदगुरु दादामहाराज सातारकर अधूनमधून येऊन कीर्तने करीत असत. हे परबत सोलंकी  दादामहाराज सातारकर यांचे माळकरी होते. जवळच असलेल्या त्या ठिकाणी भावे महाराज त्यांच्या कीर्तनाला जात असत, त्यामुळे सातारकर यांच्याशी भावे महाराजांचा निकटचा परिचय झाला होता. अर्जुनमामा गिरणीतून काम करुन आल्यानंतर धार्मिक वाङमयाचे अध्ययन आणि अभ्यास अधिकाधिक वेळ देऊन करीत असत. त्याचा साहजिकच परिणाम असा झाला, मामा सुरुवातीला प्रवचने आणि नंतर कीर्तनासाठी उभे राहू लागले. सद्गुरु भावे महाराज आपल्या समोर बसले असतानाही प्रचंड गर्दीलाही न घाबरता निर्भीडपणे ते अभंगाचे निरूपण करीत असत. परमार्थातली दिवसेंदिवस होत असलेली त्यांची प्रगती पाहून भावे महाराजांनाही अत्यंत समाधान होत असे. प्रभादेवी सारख्या गिरणगावात परमार्थाचे बीज टाकून ते रुजवण्यासाठी नित्यनेमाने त्यांचे काम सुरु होते. सन १९२५ सालच्या माघ शुद्ध दशमी या दिवशी भावे महाराजांनी यापुढचे गुरुपद स्वीकारण्यासाठी मामांना अनुग्रह दिला. आपण हयात असताना आपल्या समोरच ह. भ. प. अर्जुनमामा साळुंखे यांनी परंपरा सांभाळून सांप्रदायाचे कामकाज करावे असाच त्यांचा मानस होता. सन १९२६ च्या अखेरीस पंढरपूरहून आल्यानंतर गुरुवर्य भावे महाराजांना अतिसार सुरु झाला, पंढरपूरमध्ये कॉलऱ्याची साथ पसरली होती. आजारी अवस्थेतच भावे महाराज मुंबईत पोहोचले होते. अनेक उपचार करूनही त्यांना बरे वाटेना. एका पहाटे त्यांनी अर्जुनमामांना भेट घेण्यासाठी निरोप पाठविला. मामा भेटायला आल्यानंतर मायेच्या ओलाव्याने त्यांनी अगदी डोळे भरून त्यांना पाहून घेतले. प्रेमाने त्यांचा हात हातात घेतला आणि शेजारी बसवले. थकल्या देहाने दीर्घ उसासा टाकून म्हणाले, येत्या चार दिवसांत प्रभादेवीच्या श्रीविठ्ठल मंदीरात आपल्या सर्व अनुयायांना भजनासाठी एकत्र करा. ठरलेल्या दिवशी अंगात उठण्याचेही त्राण नव्हते तरीही त्या दिवशी ते काही माणसांना सोबत घेवून त्यांच्या आधाराने प्रभादेवीत पोहोचले. भजन संपल्यावर त्यांना गहिवरून आले. शरीर कृश्य आणि थकले होते. सर्वांना रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले. अर्जुनमामांना त्यांनी जवळ बोलावून बसायला सांगितले. चेहऱ्यावर उल्हसित भाव आणीत पुढे म्हणाले, "अर्जुना मी अंथरुणावर पडून परमेश्वराचे नामस्मरण करीत मृत्यूशी झुंज देत आहे. आलेला दिवस पुढे ढकलीत आहे. उपचारांना शरीर साथ देत नाही. माझे आयुष्य आता काही दिवसांसाठी उरले आहे. आपला हा शुध्द पारमार्थिक संप्रदाय परमार्थ करीत आता वाढतो आहे. यापुढे तो तुमच्या नेतृत्वाखाली खूपच तळागाळात विस्तारणार आहे. माझा कृपाप्रसाद तुमच्या सोबत आहेच. ज्ञानवंतही सद्गुरू कृपेशिवाय उद्धरत नाहीत.

दिनांक ०१.०८.१९२७ च्या श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सद्गुरू रामकृष्ण भावे महाराजांनी निजधामाला निघण्याची तयारी केली. उपस्थित काहींना नामस्मरण तर काहींना भजन करण्यास सांगितले. हात जोडीत डोळे मिटले ते कायमचे. काही वेळाने जगाचा निरोप घेऊन ते अनंतात विलीन झाले. समाजाची पुढील धुरा श्रीगुरु अर्जुनमामा साळुंखे यांच्याकडे सुपूर्द करीत निश्चिन्त मनाने दूरच्या प्रवासाला पुन्हा न परतण्यासाठी अखेर ईश्वरी अवतार संपवून देहाने निघून गेले. आपल्या गुरूंच्या प्रयाणाने सर्वांना अतीव दु:ख झाले.  

श्रीगुरु वैकुंठवासी ह भ प अर्जुनमामा बाबाजी साळुंखे

श्रीगुरु वैकुंठवासी ह भ प अर्जुनमामा बाबाजी साळुंखे यांचे मूळ जन्मगाव कोकणातील विजयदुर्ग परंतू त्यांचे आजोबा बाबाजी हे मामा तारुण्यावस्थेत असतानाच नंतर अलिबाग तालुक्यातील हाटाळे बाजारपेठ जवळील नागाव येथील बुरुड आळीतील तर सातरस्ता येथील सिम्प्लेक्स मिलमध्ये मुकादम (जॉबर ) या पदावर काम करीत होते. अर्जुनमामा भायखळा स्टेशनसमोरील  काझी बिल्डिंग मध्ये राहात असत.

 गिरणीतल्या तीन पाळ्यांचे टाइम टेबल सांभाळून अर्जुनमामा प्रभादेवी आणि मुंबईतील नैमित्तिक पारमार्थिक कार्यक्रम करीत असत. सद्गुरू वै. भावे महाराजांच्या निर्वाणानंतर मामांच्यावर समाजाची व स्वपरमार्थाची अशी जबाबदारी आल्याने स्व-स्वाध्यायाने त्यांनी खूपच प्रगती केली होती.अर्जुनमामांचा खडा आवाज, स्पष्ट वाणी,  पुण्यपुरुषी देहयष्टी, अनुभवातून नितळणारे शब्दब्रम्ह, कीर्तनात अधूनमधून संतवचनांची पेरणी होत असे, त्यामुळे एक अभ्यासू प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून मामांचा अनेक ठिकाणी नावलौकिक झाला होता. त्यांच्या कीर्तन श्रवणासाठी दुरदूरवरून भाविक श्रोते हजेरी लावत असत. असेच एके दिवशी भायखळा बकरी अड्डा येथे श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त मामांचे कीर्तन आयोजित केले होते. अर्जुनमामा सातरस्ता येथील ज्या सिम्प्लेस मिलमध्ये काम करीत होते, त्याठिकाणी त्यांच्या हाताखाली एका साच्यावर निपाणीचे ह भ प लक्ष्मणबुवा नावाचे सद्गृहस्थ काम करीत होते. लक्ष्मणबुवा वारकरी असल्याने अर्जुनमामा त्यांना म्हणाले, माझे बकरी अड्डा येथे अमूक दिवशी कीर्तन आहे, तुम्ही त्याठिकाणी या. लक्ष्मणबुवांनी होकार दिला आणि भायखळ्यातच त्यांच्या परिचयाचे असणाऱ्या ८५ वर्षीय श्रीगुरु ह भ प सावळारामबाबा पिंपळनेरकर यांना प्रत्यक्ष भेटून आग्रह केला की, आमच्या जॉबरांचे ह भ प अर्जुनमामा साळुंखे यांचे या ठिकाणी कीर्तन आहे तुम्ही याल काय ? बाबा वयोवृद्ध असूनही मला घेवून जाण्यासाठी सोबत म्हणून या असे सांगून त्यांनी होकार दिला. ह भ प लक्ष्मणबुवा आणि श्रीगुरु सावळारामबाबा पिंपळनेरकर यांचा पूर्वपरीचय होता. सावळारामबाबा हे संत निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या म्हणजे चैतन्य सांप्रदाय या शाखेतील प्रमुख धुरीण आणि जोग महाराजांकडून चालत आलेल्या ब्रम्हबीजशाखेचे असे अधिकारी पुरुष होते. बाबा कीर्तनाच्या ठिकाणी गेले तर अफाट जनसमुदाय गर्दीने जमला होता. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यासाठी जमेना. त्यामुळे ते पाठीमागेच थांबले. कीर्तन संपण्यासाठी उशीर झाल्याने गुरुवर्य ह भ प अर्जुनमामा साळुंखे, गुरुवर्य ह.भ. . सावळारामबाबा आणि ह.भ. . लक्ष्मणबुवा यांची भेट होवू शकली नाही. ते आपापल्या घरी निघून गेले.  काही दिवस मध्ये निघून गेले. एके दिवशी सावळाराम बाबांनी लक्ष्मणबुवा यांना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि सांगितले, तुमच्या परिचयाच्या ह.भ. . अर्जुनमामा या किर्तनकारांना माझा निरोप द्या. मी भेटण्यासाठी बोलाविले आहे. त्यांचे श्रीगुरु रामकृष्ण भावे महाराज निजधामाला जाण्यापूर्वी त्यांनी जे महत्त्वाचे तुमचे काम त्यांच्याकडून राहून गेले आहे. त्याची पूर्तता करून घेण्याची इच्छा असेल तर मला भेटा" आश्चर्य म्हणजे अर्जुनमामा आणि सावळारामबाबा यांची यापूर्वी केव्हाही जवळून भेट झाली नव्हती. बाबांचा निरोप मिळताच मामा त्याच संध्याकाळी कामावरुन घरी न येता भायखळ्याला त्यांच्या घरी पोहोचले. सावळाराम बाबा संध्याकाळी राणीच्या बागेत काही वेळासाठी फिरायला जायचे. मामा त्यांना शोधण्यासाठी तिकडे निघाले तर वाकड्या (एस) ब्रिजवर त्यांची भेट झाली. तिथेच मामांनी त्यांचे पाया पडून त्यांचे दर्शन घेतले. क्षेमकुशल झाले. नंतर मामा सावळाराम बाबांना म्हणाले, माझे श्रीगुरु वै. रामकृष्ण भावे महाराज यांनी सांप्रदायाची गुरुपदाची दिक्षा दिली आहे. त्यांच्या अंतकाळी माझा हात हातांत घेत कृपाप्रसाद देताना सांगून गेले आहेत की योग्य वेळ येईल तेव्हा योग्य पुरुष तुमच्या सानिध्यात येईल, तेव्हा त्यावेळी मी जी गोष्ट तुम्हाला देवू शकत नाही त्याची पूर्तता करुन घ्या. त्याप्रसंगी त्यांना तुम्ही शरण जा, तेथे तुम्हाला ब्रह्म वस्तू लाभून तुमच्या जीवनाचे सार्थक होईल."

आजपर्यंत श्रवणभक्तीसह पंढरीची वारी, कीर्तने-प्रवचने, त्यांच्याकडून बराच सत्संग घडला होता. जन्माचे सार्थक करून घेण्यास सदगुरु पाहिजे ही तळमळ गुरुवर्य अर्जुनमामांना अनेक वर्षांपासून लागली होतीच. श्रीगुरु ह भ प सावळारामबाबा पिंपळनेरकर यांनी श्रीगुरु अर्जुन मामांच्याकडे कृतार्थ मुद्रेने पहिले आणि हसले व नंतर म्हणाले, तुमचे अनुयायी व सहकाऱ्यांसह संध्याकाळी या मी आता त्या गोष्टीची वाच्यता करु शकत नाही. आता निवांत घरी जा. मात्र येत्या माघ शुद्ध दशमीला आमच्या भायखळ्याच्या श्रीविठ्ठल मंदीरात माझे हरिकीर्तन आहे. ठरलेल्या  माघ शुद्ध दशमीला मामांच्या सोबत अनेक अनुयायी भायखळा येथील त्या मंदिरात उपस्थित राहिले. कीर्तनाचा समारोप झाला आणि बाबांनी अर्जुनमामांना टाळ ठेवून बोलाविले आणि गादीवर आपल्या जवळ उभे केले. मामांनी त्यांचे दर्शन घेतले आणि उभे राहिले. बाबांनी अगोदरच पूर्वतयारी केल्याप्रमाणे एक हार, श्रीफळ, अबीर बुक्का मागवून घेतला. बाबांनी मामांच्या गळ्यात हार घातला मात्र त्याचवेळी दोघांची दृष्टादृष्ट झाली. एकमेकांची दृष्टी एकमेकांकडे जाताच क्षणार्धात युगानुयुगीच्या आठवणी उजळून निघाल्या. ज्या आत्मारामाची सगुणरूपात गाठ पडावी असे मामांना सारखे वाटत होते, जे रुप मामांच्या हृदयात अविर्भूत होऊन ते मामांना अधूनमधून जाणीव देत होते, अगदी तेच रूप दृष्टीसमोर येताच मामांच्या ठिकाणी एकदम अष्टसात्त्विक भाव उसळून आले.

"गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन" याचा प्रत्यय मामांच्या अंतरी दाटला. त्यांनी श्रीगुरु सावळाराम बाबांच्या पायाला एकदम मिठीच मारली. मामांच्या साश्रुनयनांनी बाबांचे पाय भिजू लागले. सावळारामबाबा पिंपळनेरकर यांनी मामांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना कृतकृत्य केले. यानंतर बाबांनी उपस्थितांना सदगुरु भावे महाराजांचे परमार्थातील योगदान सांगितले. त्यांनी लावलेल्या सांप्रदायिक बीजाचा भावे महाराजांनीच धुरा सोपविलेल्या मामांच्या कार्यातून प्रभादेवीतील वारकरी परंपरेच्या समाजाचे भविष्यात  वटवृक्ष होणार असून परंपरेचा अधिकारी या नात्याने आज मी ह भ प अर्जुनमामांना बीजमंत्र देणार आहे. परमार्थाला आणि सन्मार्गाला गती देण्यासाठी सावळाराम बाबांनी पुन्हा एकदा नाम जपाची तुळशीची माळ मामांच्या हातात दिली. यानंतर त्यांच्या हाती श्रीफळ दिला. अबीर-बुक्का त्यांच्या कपाळी लावला. सदगुरु रामकृष्ण भावे महाराजांकडे ध्यान लावा व माझ्याकडे कान एकाग्र करा. मामांनी श्रद्धेने ती कृती केली. जोग महाराजांकडून चालत आलेल्या ब्रम्हबीज मंत्राचा अनुग्रह ह भ प सावळारामबाबांनी मामांना दिला.

प्राणी यारे एक | बीज मंत्र उच्चारी | प्रतिदिन रामकृष्ण | म्हणे का मुरारी || (संत तुकाराम)

श्रीगुरु रामकृष्ण भावे महाराजांच्या पश्चात सद्गगुरु अर्जुनमामांनी बीजमंत्र प्राप्त केल्याची बातमी त्यांच्या सर्व ठिकाणच्या अनुयायांसह मुंबईतील वारकरी क्षेत्रातील इतर मान्यवरांना सुद्धा कळली. गुरुपरंपरेतील एक महत्त्वाचा अधिकार मामांना त्यांचे श्रीगुरु भावे महाराजांच्या कृपाशीर्वादाने मिळाला होता. अर्जुनमामांना वै रामकृष्ण भावे महाराजांसारखे मोक्षगुरु असतानाही, मामांनी बीजमंत्राची दीक्षा मात्र गुरुवर्य सावळारामबाबा पिंपळनेरकर यांच्याकडून घेतली. कारण वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आजच्या काळात जी विविध कार्ये करावयाची होती त्यावर बंधने आली असती.

सन १९५४ पासून मामांच्या शरीराची कुरबुर सुरु झाली. अंगात कणकण असायची. अलीकडे त्यांना थकवाही जाणवत असे. त्या दोन वर्षात शारीरिक त्रास होत असतानाही त्यांनी मुख्य कार्यक्रम पार पाडले, पंढरपूरची वारी केली. अखेर बरा होऊ न शकणाऱ्या दुर्धर आजाराचे १९५६ साली निदान झाले. शरीरातल्या आजाराने अखेरच्या टप्प्यावर झेप घेतली होती. त्यामुळे आपण थोड्या दिवसांचे सोबती आहोत हे त्यांना कळून आले. आषाढ गुरुपौर्णिमेचा दिवस उगवला. मामांना पंढरीची वारी करण्यासारखी परिस्थिती नव्हती. भावे महाराजांच्याकडून दिक्षा घेतल्यानंतर त्यांनी कधी वारी चुकविली नव्हती. 'पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी' हा संतधर्म त्यांनी "काया वाचा मने सर्वस्व उदार | बापरखुमा देवीवर पंढरीचा वारीकर ||" या भावनेने जोपासला होता. समाजातील बिघडलेली मने स्वच्छ व्हावीत, समाजाला कल्याणाचा मार्ग दाखविला जावा, सर्वांवर मांगल्याचा वर्षाव व्हावा यासाठी आपली यष्टी झिजवली. श्री मामांनी पायाला जणू चक्रे बांधून घेतली होती, सतत भ्रमंतीत ते गुंतलेले असायचे. गुरुपौर्णिमेच्या अगोदरच्या दोन दिवसांपासूनच मामांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना व शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या कीर्तनाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण केले होते. गुरुआज्ञेनुसार त्या दिवशी नेहमी पेक्षा अधिक गर्दी जमली होती. प्रभादेवी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या शेजारी असलेल्या श्री मांडवकर यांच्या घरात मामांचे वास्तव्य होते. मामा शरीराने कृश्य झाले होते. खूपच अशक्तपणा आला होता, बोलताना धाप लागत असे. तरीही मामा त्या दिवशी मंदिरात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्तींच्या पायावर मस्तक ठेवले. आणि त्यांना बसण्यासाठी अंथरलेल्या गादीवर येवून बसले. कीर्तनाची तयारी झाली होती. टाळकरी, मृदंग वाजविणारे उभे होते. मामा खाली आपल्या जागेवर बसल्यानंतर आता कीर्तन कोणाचे आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. कीर्तनासाठी धरकरी म्हणून टाळ घेवून उभे असणाऱ्या दादांकडे हात करुन त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना आज्ञा केली, नारायणबुवा आजचे कीर्तन तुम्ही करा. अचानक दादांना हे सांगितल्याने क्षणभर दादा गांगरले, मात्र लगेच सावरल्यानंतर बाजूच्या मांडवकारांच्या घरी जाऊन त्यांनी किर्तनकाराचा वेष परिधान केला.

गुरुपरंपरेंचे महत्त्व सांगणारा एक अभंग त्या दिवशी नारायणदादांनी निरुपणासाठी घेतला होता. संतवचनांचा आणि गुरुभक्ती सांगणारे अभंगांची प्रमाणे घेत त्यांनी त्यादिवशी अभ्यासपूर्ण कीर्तन केले. कीर्तन संपल्यानंतर मामा दादांना म्हणाले, “आता तुम्ही तसेच त्या गादीवर उभे राहा” यानंतर मामांनी सर्वांना आपले कंप सुटलेल्या थरथरत्या हातांनी नमस्कार केला. आणि पुढे म्हणाले, “बाबांनो गेली २७ वर्षें मी या सांप्रदायाची पारमार्थिक सेवा केली. माझे श्रीगुरु ह भ प रामकृष्ण भावे महाराज यांनी त्यांच्या पश्चात मी या समाजाचे नेतृत्व करावे. परमार्थात वाढ करावी यासाठी माझ्याकडे गुरुपरंपरेची धुरा दिली होती. ती माझ्या बुद्धीने तुमच्या सर्वांच्या सोबत पार पाडली. अलीकडे माझा आजार बळावत चालला आहे. मी काही दिवसांचा तुमचा सोबती आहे. आपल्या समाजाच्या परंपरेनुसार यापुढे गुरुपदाच्या गादीवर कोण असावा याचा निर्णय श्रीगुरुकृपेने घेतला आहे. भागवत धर्माची पताका आणि विचार खांद्यावर व हा श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाज पुढे कोण घेवून जाईल. समाजाची आणखी खोलवर वाढ करील. पंढरपूर सारख्या पुण्यपावन क्षेत्रात समाजाच्या नावलौकिकात वाढ करील, अशी व्यक्ती मी यापुढचे समाजाचे श्रीगुरु म्हणून संकेतानुसार मी निवड केली आहे”. त्यानंतर मामांनी समोरच्या दोघांना बोलावून हाताने धरून त्यांना उभे करण्यास सांगितले. मंदिरातले एक श्रीफळ त्यांनी समाजातले एक नावाजलेले दानशूर व्यक्तिमत्व असलेले दैवज्ञ (सोनार) समाजाचे ह.भ.प. अंबाजी धामापूरकर यांच्या हातात दिले आणि त्यांना आज्ञा केली, शेठ हा श्रीफळ तुम्ही मनोभावे नारायणदादांच्या हाती द्या. मामांनी एक मोठा पुष्पहार दादांच्या गळ्यात घातला. पेढ्यांचा नैवेद्य श्रीविठ्ठल रखुमाई मूर्तींसमोर ठेवण्यास सांगितला. डोळे मिटून एकवार परमेश्वराकडे पाहून हात जोडले, बराच वेळ ध्यानात जाऊन करुणा भाकली आणि ह.भ.प. अंबाजी धामापूरकर शेठ आणि ह.भ.प. नारायण दादांना म्हणाले, तुम्ही दोघे गुरुबंधू.... माझ्या परमार्थाचा संसार यापुढे तुम्हा दोघांना एकमताने एकविचाराने करायचा आहे. आणि या समाजाचा गाढा हाकताना त्याचा नावलौकिक सुद्धा वाढवायचा आहे. नंतर दादांकडे वळून म्हणाले,  नारायणा 'रामकृष्ण' मंत्र मोठयाने म्हणा. दादांनी गुरुआज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे कृती केली. त्याचबरोबर उपस्थितांनी "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" असा एका सुरात मोठ्याने गजर केला. सन १९५७ च्या वैशाख शुद्ध शके १८७९ या दिवशी मामांनी नारायणदादा घाडगे, धुळप मास्तर, धामापूरकर, रंगनाथ लाटे, भिवाबुवा घाडगे, डंबे, भाईबुवा घाडगे, दिवेकर बुवा, पांडुरंगबुवा उतेकर, साळवी, दळवी मास्तर यांच्यासह देवळे, करंजे, सैतानचौकी सहा नंबरच्या चाळीतील उमरठकरांना मांडवकरांच्या निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले. अगदी शेवटच्या दिवसांत मामा आपल्या बिछान्यावर बसून अनेक भक्तांना दर्शन देत होते. त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत होती. ते अशक्त झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेकडो भक्त मामांच्या दर्शनाला प्रभादेवीच्या दाखल झाले होते. मामांची अखेरची घरघर सुरु झाली होती. मामांनी आवंढा गिळला क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले तुम्हांला भरपूर आशीर्वाद...ही परंपरा आता आपण पुढे चालवा. जो कोणी योग्य जीव दिसेल त्याला या परंपरेत आत्मीयतेने सहभागी करून घ्या. हे ईश्वरी कार्य आहे. प्रकृतीमानाप्रमाणे ते जसं  करता आलं तसं मजकडून केलं गेलं आहे. मामांची ही अखेरची निरवा-निरव सर्वांना अस्वस्थ करु लागली होती. दादांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू मामांच्या हातावर पडले. दादांनी मामांच्या चरणाचे दर्शन घेतले, त्यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. आणि गुरुवचन दिले, "मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून ती पूर्ण करील." हळूहळू मामा ग्लानीत जात होते. दादा, मामांचे चार चिरंजीव, भाचे धुळप आणि काही मंडळी मामांच्या बाजूला बसली होती. इतर वारकऱ्यांनी बाजूच्या मंदिरात पांडुरंगाचा भक्तिभावाने गजर सुरु केला होता. कुणीतरी मंदिरातून चंद्रभागेचे तीर्थ आणले त्याचे दोन थेंब बापूंनी त्यांच्या मुखात घातले. आणि पहाटे चतुर्थीला मामांची प्राणज्योत शांत झाली. मामा निजधामाला गेले. झांकलिये घटीचा दिवा | नेणिजे काय जाहला केव्हा | या रीती जो पांडवा | देह ठेवी || एक युगपुरुष परमशांतीकडे निघून गेला. मामा जन्म-मृत्यूच्या फेरीतून मुक्त झाले. हे वृत्त मुंबईत वाऱ्यासारखे पसरताच हजारो वारकऱ्यांनी प्रभादेवीकडे धाव घेतली. इतकी गर्दी झाली की, या गर्दीला आवर घालता येईना. शेकडो बायाबापड्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मामा स्वभावाने वागण्यात कर्तव्य कठोर असले तरी त्यांच्या अंगी फणसाचा गुणधर्म होता. प्रत्येकाशी त्यांचे वागणे रसाळ असे. त्याच गोडीने असंख्य माणसे त्यांच्या प्रेमात पडली होती. त्यांची प्रेतयात्रा भव्य दिंडीच्या स्वरूपात श्रीविठ्ठल मंदिर, संताची चाळ, प्रभावती मातेचे मंदिर, किस्मत टॉकीज, श्रीसिद्धिविनायक मंदिर मार्गे शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचली. त्यांचे चिरंजीव ह भ प बाबाजी तथा बापू यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पारमार्थिक भाषेत मामांच्या कार्याचे मोठेपण आपल्या शब्दांत गुंफत श्रद्धांजली अर्पण केली.

वैकुंठवासी सद्गुरू ह भ प नारायणदादा घाडगे महाराज 

त्यावेळच्या कुलाबा तर आताच्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महालातील देवळे पंचक्रोशीतील कडेकपारीत दुर्गम ठिकाणी करंजे गाव वसलेले आहे. दादामहाराजांचे म्हणजे घाडगे परिवाराचे मूळ पुरुष वलकडे घराणे हे घाटमाथ्यावरील पांचगणी खोऱ्यातून करंजे गावी आले होते. मूळ पुरुषांपासून दादा हे बारावे वंशज होत. कोंडोजी घाडगे हे राजदरबाराशी संबंधित वीर लढवय्ये होते. ४०० वर्षांपूर्वी हा भूभाग ऐतिहासिक दृष्टीने फारच महत्वाचा. घटदाट अरण्याने व्यापलेला हा प्रदेश राज्य करण्यासाठी कुणालाही अत्यंत सुरक्षित वाटत असे. पाचगणी पासून बिरवाडीपर्यंत पसरलेल्या या भूभागावर सुरुवातीला चंद्रराव मोरे यांचे तर नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते. साडेतीन शतकापूर्वी पोलादपूरचा पावन परिसर राजे श्री शिवछत्रपती आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने आणि भारलेल्या राष्ट्रकार्याने सुगंधीत झाला होता. याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांनी महाराष्ट्र धर्माचे आचरण करून हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी, रयतेचे स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली होती."कोणाही जीवाचा न घडो मत्सर" असे त्या कुटुंबाचे सदाचाराचे व्रत होते. घरची प्रचंड गरीबी असूनही काबाडकष्ट करून "आचरे विधी गौरवे | श्रुंगारुनी || या धर्मन्यायानुसार त्या कुटुंबाचा दिनक्रम चालत असे. ते कुटुंब होते रामजी धोंडू घाडगे आणि चिमाबाई रामजी घाडगे. त्यांना एकूण सहा अपत्ये होती. रामजींचे दुसरे अपत्य म्हणून नारायण दादांनी या कुटुंबात, कुळात जन्म घेतल्याने ते सारेच पावन झाले. दादामहाराजांच्या वयाच्या १२ व्या वर्षी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर अनपेक्षितपणे कोसळला. काडी काडी जमवून करीत असलेल्या रामजी व चिमाबाईच्या संसाराला दृष्ट लागली. दादांचे वडिल आताच्या पाकिस्तान मध्ये असलेल्या कराची शहरात एका इमारतीला रंगकाम करीत असताना उंचावरून खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धुळपाटी गिरवून अक्षर ओळख करून देण्याची गावात सोय होती. सहाव्या वयातच दादांना अक्षरे समजू लागली. पावकी-निमकी-अडीचकी पाठ होवू लागली. एक बुद्धिमान व तेजस्वी विद्यार्थ्याचे गुण त्या पंतोजीच्या लक्षात येवू लागले, पण शिक्षणाची मर्यादाच तेवढी होती. एकतर वडिलांचे कृपाछत्र नसल्याने शेती-भातीत आईला जमेल तशी मदत करण्यावाचून पर्याय नव्हता. नारायणदादांच्या लहानपणापासून ओढा ईश्वराकडे होता. गावातील पुरातन मारुतीरायाच्या दर्शनास ते नियमितपणे जात असत. आपल्या गावातील इतरांसारखे मुंबई शहरात जावून नोकरी करावी त्यांच्या पाठीवरची बहीण काशीबाई (आत्या) या नुकतेच लग्न होवून त्यांचे पती नारायण उतेकर यांच्यासोबत मुंबईत प्रभादेवीत खाडा परिसरात राहाण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडेच दादा मुक्कामाला आले. त्याच आठवड्यात बिर्ला शेठजींच्या सेंच्युरी मिलमध्ये त्रासन खात्यात बदली कामगार नोकरी लागली. सुरुवातीला बदली कामगार म्हणून तिन्ही पाळ्यांत काम करावे लागे. त्यांची बहीण काशीबाई (आत्या) यासुद्धा गिरणीत काम करीत होत्या. परंतु त्या वारकरी होत्या. आळंदी येथील कबीर महाराजांच्या हस्ते तुळशीची माळ घेवून त्यांनी शिष्यत्व पत्करले होते. मात्र त्या दररोज प्रभादेवीतील श्रीविठ्ठल रखुमाई मंदिरात हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन यासाठी जात असत. आता त्या नारायण दादांना सोबत घेवून जाऊ लागल्या. मंदिरात भजनासाठी बसू लागले. कीर्तन असले की धरकरी म्हणून उभे राहू लागले. वहीच्या पानावरील एका कागदावर अभंग लिहून गिरणीत साच्यावर काम करताना त्याचे पाठांतर करु लागले. असे करता करता त्यांचे शेकडो अभंग पाठ झाले. मंदिराची साफसफाई, भाविकांना बसण्यासाठी बारदाने अंथरणे, टाळ, मृदंग, वीणा यांची तयारी करणे व त्यानंतर श्रोता म्हणून किंवा धरकरी म्हणून उभे राहात असत. अर्जुनमामा हे ब्रम्हसाक्षात्कारी संतपुरुष होते. त्यांच्या भेटीत व संतसमागमात दादांना मामांच्या थोर व्यक्तिमत्वाची ओळख पटू लागली व मन त्यांच्याकडे खेचू लागले होते. त्याप्रमाणे त्या वर्षीच्या कार्तिक वारीला मामांच्या सोबत जावून संत तुकाराम मंदिरात मामांच्या हस्ते तुळशीची माळ घेतली. दादांचे अध्ययन, चिंतनसेवा मामांच्या लक्षात येवू लागली. श्री सदगुरू भावे महाराज वारकरी समाजाचे परंपरेचे पारमार्थिक कार्य पुढे नेण्याची वेळ समीप येवू लागली होती. आणि अचानक १९५६ च्या आषाढ गुरु पौर्णिमेच्या दिवशी मामांनी नारायण दादांना कीर्तन करण्याची आज्ञा केली. दादा तसे मितभाषी व अबोल असले तरी धार्मिक चर्चेतली त्यांची मांडणी, त्यासाठी केलेला सखोल अभ्यास व अनेक ग्रंथांचे वाचन, संतसमागमाने केलेली श्रवणभक्ति व स्वतःची स्वतंत्र बुद्धी त्यामुळे दादांच्या वाणीत ओज निर्माण झाले होते. ज्ञानेश्वरीची घरच्या घरी नित्यनियमाने केलेली पारायणे, आळंदी-पंढरपूर वारीमधील सेवा व तीर्थक्षेत्री वास यामुळे त्यांचे जीवन तपस्वी साधकाप्रमाणे आत्मप्रभावीत झाले होते. काम, क्रोध, असूया, मत्सरादि विकारांना त्यांनी त्यागले होते. 'काम क्रोध वाहिले विठ्ठली'' अशी त्यांची अवस्था होती. आजही तसेच घडत होते. त्या दिवसाचे कीर्तन संपल्यानंतर मामांनी त्याच नारदमुनींच्या गादीवर त्यांना उभे राहण्यास सांगितले. आणि उपस्थितांना म्हणाले, 'नारायण' हे चार शब्द. पण त्रिखंड व्यापून काहीतरी उरलंय अशी जाण या शब्दातून व्यक्त होते. मूर्तिमंत प्रेम, अंतर्यामी करुणा, तेजोमय ज्ञान, प्रशांत गाढ भक्ती, दृढ उपासना, नित्य नियमित कर्ममयता या अशा विविध गुणांच्या सूत्रांनी बद्ध असलेला हा नारायण आपल्या मागच्या पिढीसह पुढील पुढील तुम्हां सर्वांचा नावलौकिक वाढविणार आहे. मी आजपासून यांच्याकडे समाजाची गुरुपदाची धुरा सोपवित आहे. विठ्ठल भक्तीच्या परमार्थाचा आणि श्री सदगुरू भावे महाराज वारकरी समाजाच्या विस्ताराचे महत्वाचे काम तुमच्या साथीने नारायण दादांच्याकडून होणार आहे. मामांच्या कॅन्सरच्या आजाराने शरीर पूर्ण खंगले होते. बोलताना धाप लागत असे. व गतीही मंदावली होती. अगोदरच्या दिवशी समाजातल्या काही श्रेष्ठीना बोलावून दादांचा हात हातात घेवून मामांनी गुरुवचन मागितले होते. श्रीक्षेत्र पंढरपूर सारख्या महातीर्थक्षेत्री माझ्या श्रीगुरूंच्या नावाने धर्मशाळा असायला हवी. हे वचन घेतल्यानंतर १९५७ च्या वैशाख प्रतिपदेला मामांचे देहावसान झाले होते. सन १९५८ च्या माघ शुद्ध दशमीला प्रभादेवीतील श्रीविठ्ठल राखुमाई मंदिरात समाजातल्या सर्व ज्येष्ठ अनुयायी आणि हितचिंतकांची सभा दादांनी आमंत्रित केली. अर्थात विषय होता श्रीगुरु अर्जुनमामांनी मृत्यू समयी घेतलेल्या वचनाची आणि त्याची पूर्तता करण्याची. याबाबत बोलताना दादांनी संतवचनांचे व गुरुवचनाचे दाखले देत विषय आणि त्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. दादा जसजसे आपले विचार मांडत होते तसतशी लोकांच्यात प्रबळ दृढभावना निर्माण होत होती. श्री सदगुरू भावे महाराज वारकरी समाज अशा नावाची पाटी असलेली समाजाच्या स्वमालकीची धर्मशाळा असावी असाच उच्चकोटीचा विचार उपस्थितांच्या मनात तयार झाला. मंदिराच्या जवळपास एखादी जूनी इमारत वा धर्मशाळा विकत घेण्याचा निर्णय सर्वानुमते ठरला. गुरुवचनाची पूर्तता करण्याचे अवघड धनुष्य उचलले खरे परंतु आर्थिक नियोजनाची वाणवा होती. मुळात पंढरपूर आणि पोलादपूर मधला समाजाचा अनुयायी हा मध्यम वर्गीय. कुटुंबाला शेतीसाठी गावी ठेवून गिरणीत वा कंपनीत काम करायचे. बैठकीच्या खोलीवर समूहाने स्वतःची वळकटी टाकून एकत्र झोपायचे. कुठल्यातरी ओळखीच्या खानावळी दोन वेळा जेवायचे. जमेल तेवढा परमार्थ करायचा असाच प्रत्येकाचा परिपाठ असायचा. या व्यवहारासाठी 'नगद नारायण' महत्वाचा असल्याने काही जाणत्यांनी पैसा फंड उभा करण्याचा निर्णय घेतला. त्याला सुरुवातही केली. ज्यांना व्यवहाराचे ज्ञान होते व समाज भावनेने पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा होती, त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

श्रीक्षेत्र पंढपूर महाद्वार येथील एका जुन्या वाड्याच्या स्वरूपात असलेली श्री तिळवणकर नावाच्या ब्राम्हणाची इमारत दादांना पसंत पडली. श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ महाद्वार प्रदक्षिणा मार्गावरील या इमारतीत जुने भाडेकरू होते. त्याचा खरेदीचा व्यवहार ठरल्यानंतर ही वास्तू घेणार आली. त्यानंतर आलेली कार्तिक वारी भव्य स्वरूपात साजरी झाली. यावेळी पोलादपूरकर आणि मालवणकर मंडळींना झालेला आनंद काय वर्णावा. श्रीक्षेत्र पंढरपूर सारख्या महाक्षेत्री आपल्या श्रीगुरूंच्या नावाची आणि समाजाची स्वतःची धर्मशाळा अस्तित्वात आल्याचे समाधान सर्वच लहान थोरास झाले होते. परमार्थाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा मैलाचा दगड उभा राहिला होता. आज याठिकाणी नंतरच्या पिढीने भव्य सुसज्ज इमारत उभी केली आहे. त्यामुळे चैत्र, माघ, कार्तिक, आषाढी या वाऱ्यांसह चातुर्मासाचे कार्यक्रम या वाड्यात नियमित होतात. परंतु त्याहीपेक्षा पंढरपुरात विखुरलेला समाजाचा अनुयायी एकत्र येवून परमार्थ करीत आहे. 

ह भ प नारायणदादा घाडगे हे ज्ञानेश्वरीचे उपासक, अभ्यासक व अधिकारी होते. दादांच्या वाणीत एक विशिष्ट तऱ्हेचा आगळाच गोडवा होता. सातत्याने होत असलेले चिंतन आणि प्रभुकृपा या दोन्हीचाही स्पर्श दादांच्या वाणीला लाभला होता. वक्ते पुष्कळ असतात, परंतु ज्यांची वाणी श्रोतयांची धणी पुरविते त्यांच्या वाणीची शब्दाक्षरे श्रोतयांच्या ह्रदयमंदिरी स्थिर होतात. ज्या वाणीला परतत्वाचा स्पर्श झालेला असतो, ज्यांच्या वाणीकडेच अर्थ धावतो, ज्यांच्या वाणीला वाकडेपणा माहित असत नाही, ज्यांच्या शब्दाशब्दात साचता, मवाळता आणि रसाळता असते, ज्या वाणीने निंदा - प्रतारणादी शब्दांचा संन्यास घेतलेला असतो. ज्यांची वाणी वाचस्पतीशी स्पर्धा करण्यास समर्थ असूनही जे वेड पांघरतात, ज्यांचे अंतरंग सरळ असते त्यांची वाणीही तशीच. अंतर्बाह्य शुचिता आणि चोखडेपणा असला की, ती वाणीही तशीच जोखड बनते. असा दादांच्या वाणीचा गौरव करता येईल. वयाच्या तिसाव्या वर्षांपासून तर दादांच्या अमोघ वाणीने लोकांना अक्षरशः वेड लावले.

दादांचा पंच्याहत्तरी  निमित्त सत्कार केला. त्यावेळी समाजातले अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना दादामहाराज भावपूर्णतेने म्हणाले होते. "जीवनात प्राण असेपर्यंत श्री ज्ञानोबा माऊलींनी ही सेवा करून घ्यावी हीच माझी भावना आहे. परमार्थाचा अथक जन्मभर प्रचार, प्रवास, प्रेमप्रबोधन आणि अखंड अभ्यास यामुळे देह थकला होता. त्याला ईश्वरचरणी विलिन  होण्याची ओढ लागली होती. देवही अशा भक्तांची वाट पाहत असतो. शेवटपर्यंत परमार्थ चालू होता. पौष कृष्ण द्वितीय सोमवार, १२.०२.२००९ रोजी हा साधुशील महात्मा महापुरुष ईश्वराच्या चिंतनात देवलोकी परतला. दादा महाराज शरीराने थकले होते. मरणाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी त्यांचे शरीर सज्ज झाले होते. चित्तवृत्ती पांडुरंगाच्या चरणी स्थिर झाली होती. महामृत्युंची चाहूल त्यांना लागली होती. ज्येष्ठ चिरंजीव रामदादांना जवळ बोलाविले. जणू मौनाने सारे सांगितले. देव, देश, धर्म सेवेसह लोकसेवा मूकपणे सांगितली. करंजे गावासह संपूर्ण तालुका व मुंबई पासून बडोद्यापर्यंतचा परिसर शोकाकुल झाला. एक कर्मयोगी, एक धर्माज्ञ योगी काळाआड झाला. दादांचे दयालुत्व, उदारत्व आठवून गावागावातील माणसे, अनुयायी अश्रू ढाळू लागली. दादांचे सारे आयुष्य त्यागात आणि लोकांच्या उपयोगी पडण्यात गेले. भक्तीला त्यागाची संगत लागते. तो त्याग त्यांनी जन्मभर आचरला

गुरुवर्य रामदादा नारायण घाडगे 

श्रीगुरु नारायणदादा महाराज घाडगे यांचे गुरुवर्य ह भ प रामदादा घाडगे हे ज्येष्ठ चिरंजीव. मोठे दादा वैकुंठवासी झाल्यानंतर ह भ प रामदादांना आकाश फाटल्यासारखे झाले. भावे महाराज वारकरी समाज नावाच्या मोठ्या प्रपंचाची जबाबदारी अंगावर पडली होती. समाजाचा व स्वतःच्या प्रपंचाचा व्यवहार पहावायाचा, नित्याचे वाचन, चिंतन, कीर्तन-प्रवचनाची तयारी करायची. अशी सर्वच जबाबदारी पार पाडणे ही त्यांची इतिकर्तव्यता ठरली. ठिकठिकाणची परमार्थातील ज्येष्ठ मंडळी गुरुवर्य दादांचे सांत्वन करण्यासाठी येत. तेव्हा त्यांना ते सांगत आपण गुरुवर्य नारायणदादांच्या आश्रयाखाली व कृपाशीर्वादाने परमार्थात तयार झाला आहात. पांडुरंग काही कमी पडू देणार नाही. गुरुवर्य रामदादानी सुद्धा नम्र होत त्यांच्या प्रसादाचा स्वीकार केला. 'जगा धाकुटे होइजे, जे जवळीक माझी' या ज्ञानवाणीने त्यांचे अंतःकरण काठोकाठ भरले असल्याने नम्रता न आली तरच नवल ! गेल्या दशकभरात अन्य संतसांगातीचे सानिध्य गुरुवर्य दादामहाराजाना मोलाचे वाटते आहे. सारी पारमार्थीक जबाबदारी आनंदाने सांभाळणे त्यांचे चालू आहे. कसली उदासीनता नाही, औदासिन्य नाही, खेद नाही, भीती-नैराश्य नाही त्यामुळे 'देव सखा जरी विश्व | अवघे कृपा करी' या हा अमृतानुभव त्यांना येतो आहे. काही माणसे अलौकीकत्वाचा वसा घेवून जन्माला येतात. थोरत्व हे अनेक जन्मांच्या तपस्येचे फलित असते. थोर कुळी जन्म घेण्यासाठी भाग्याचा उदयच व्हावा लागतो. कुळात सात्त्विक कन्यापुत्रांचा लाभ होणे या योगासह ईश्वरी तत्वही हर्षित होते. श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे - कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा || ईश्वरीकृपा प्राप्त झालेल्या सदगुरू परंपरेची कृपा प्राप्त झालेले सत्पुरुष गुरुवर्य ह भ प. रामदादामहाराज सध्या या गुरूंगादीची समृद्ध परंपरा गुरुपदावरच्या अधिष्ठान पदावरची वाटचाल सांभाळत आहेत.  संतपरंपरेतील ज्ञानदानाचे, जनजागृतीचे व लोकोध्दाराचे महत्वाचे काम त्यांच्या परीने त्यांच्याकडून होते आहे.  मनुष्य जन्माला येतो तो पूर्वकर्माची शिदोरी घेऊन. गुरुवर्य रामदादा महाराज समाजाला जे ज्ञानदान देत आहेत त्यावरून त्यांचे पूर्वसंचित ज्ञानमय होते. यामुळे या जन्मात शुद्धाचरण, संतपूजन आणि देवदर्शन हा त्यांचा ध्यास ठरला आहे. श्री निळोबारायांनी तर सदाचार संपन्नतेलाच संतपूजन म्हटले आहे. मोठ्या दादांच्या  निर्वाणानंतर तुळशीची माळ आणि नामस्मरणाचा मंत्र घ्यावा यासाठी रामदादांकडे अनुयायांची रीघ लागलेली असते.  'मनुष्यजात सकळ | स्वभावता भजनशील ||' त्यामुळे डोंगर कोळी, माळी, धनगर, समुद्र किनाऱ्यावरचे कोळी, कुणबी, लोहार, सुतार, कातकरी, चर्मकार अशा अठरा पगड जाती धर्मियांनी दादांचे शिष्यत्व पत्करले आहे. तुळशीची माळ आणि पुष्पहार घातल्यानंतर ते पुढे सांगतात  दररोज सकाळी लवकर उठून घरीच देवाची पूजा करा. ज्ञानेश्वरीच्या क्रमशः ओव्या वाचा. गाथ्यातील अभंग वाचा. जपाची माळ हातात घेऊन नामजपाचा मंत्र पूर्ण म्हणा. तुळशीला पाणी घाला. आषाढी किंवा कार्तिक वारीपैकी कोणतीही एक पंढरपूरची वारी करा, दररोज परमेश्वराचे नाव घ्या आणि गुरुपौर्णिमेला गुरूंचे स्मरण करा. फार फार पुण्याईने सदगुरूंकडून मिळालेले नाम घट्ट धरावे कारण तेच तुमच्या आयुष्याचे पाथेय आहे.' देवदेवतांच्या अनेक मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना अनेक ठिकाणी दादामहाराजांच्या हस्ते झाल्या. मंदिरांचा पायाभरणी समारंभ सुद्धा अनेक झाले. मुंबईत प्रभादेवीच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरात, सैतान चौकीच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरात, कोळीवाड्यातील शंभू महादेवाच्या मंदिरात बरीच वर्षे सातत्याने दादांची प्रवचने झाली. कारणपरत्वे व आग्रहाने मुंबई बाहेरही पंढरपूर, आळंदी, कोकण, बडोदे अशा वेगवेगळ्या ठिकाणी शक्य होऊन पोहोचता येईल तिथे जावून त्यांनी समाजाच्या परंपरेची प्रवचने आणि कीर्तन सेवा सुरु ठेवली आहे. तुम्हांसी त्याची काय चिंता असे | भक्ती चालविता देव असे || देवाच्या इच्छेनेच भक्ती चालू राहाणार आहे ही देवावरील श्रद्धा, निष्ठा व्यक्त केली की, माणसाच्या जीवाचे सोने होते. श्रीगुरु अर्जुनमामांच्या निर्वाणानंतर आपल्या शिष्यांना उपदेश करतांना मामांचेच वाक्य प्रमाण मानून त्यांच्याच वचनांचा उल्लेख करून त्या आधारेच रामदादा  परमार्थ करीत आहेत. पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची चरण धुळी लागो मज ।। अशी त्यांची श्रद्धाशीलता आहे. विठ्ठलावांचुनी ब्रम्ह जे बोलती । वचन ते सती मानू  नये । अशा आवडीने त्यांची ही सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी रुजू होते आहे. रामकृष्ण हरी !

 







- रवींद्र मालुसरे 

(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक)

 संपर्क : ९३२३११७७०४ 

 

" " नारायण नामे होऊ जीवन्मुक्त या नावाचे माझे पुस्तक लिहून झाले आहे. मनाच्या समाधान पूर्ततेसाठी थांबलो आहे. ३०० पानांच्या या पुस्तकात या तीन साधूंच्या जीवन चरित्राचा समग्र सचित्र आढावा घेतला आहे. या मंदिराचा इतिहास, या तिन्ही श्रीगुरूंच्या पारमार्थिक कार्याचा आणि जीवन चरित्राचा धांडोळा आणि इतरही काही संग्राह्य माहिती यात आहे. ग्रंथ वाचनीय आणि संग्राह्य असेल एवढे मात्र नक्की ...थोडावेळ वाट पहा नक्की आपल्या भेटीला  पुस्तक रूपाने येतो आहे. पुस्तकातील हा त्रोटक भाग आपल्या वाचनासाठी देत आहे. कृपया माझ्या मोबाईलवर लेखी प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.  

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 



सोमवार, १५ जुलै, २०२४

लोकदेव श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका

 


लोकदेव श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका

श्रीविठ्ठलाला विष्णु-कृष्ण-रूपाचा, वैष्णव चरित्राचा आणि तदनुकूल पावित्र्यसंभाराचा लाभ झाला, तो महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील श्रीक्षेत्र पंढरपूर नामक क्षेत्रात हे आपल्याला माहीत आहे. पंढरपूर क्षेत्रात विठ्ठलाचे वैष्णवीकरण इ. स. च्या तेराव्या शतकापूर्वीच पूर्णता पावले होते असे पंढरपूरमध्ये उपलब्ध झालेल्या प्राचीन कोरीव लेखांवरून, तेराव्या शतकातील मराठी संतांच्या वाङ्मयातील उल्लेखां वरून आणि निःसंदिग्ध प्रमाणांनी हेमाद्रिपूर्वकालीन ठरलेल्या स्कांद 'पांडुरंगमाहात्म्या 'वरून दिसून येते.

ज्ञानेश्वरकालीन सामाजिक परिस्थितिचे वर्णन करताना हा काळ धर्मग्लानीचा होता. "क्षीणः कालय- शात्पुनस्तरुणतां धर्मोऽपि सम्प्रापितः' असे त्या काळाचें वर्णन जरी हेमाद्री पंडितांच्या राजप्रशस्तीत केलेलें असले, तरी तें वस्तुस्थितीला धरून नाहीं. त्या काळात वैदिक परंपरा निष्प्रभ झाली होती, बदलत्या परिस्थितीप्रमाणें समाजाला नवी प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या धर्मसंस्थेत उरला नव्हता, म्हणूनच अवच्या पंचवीस वर्षांत दक्षिणेंतील बहुतेक हिंदु-राज्यें परधर्मीय आक्रमकांना खालसा करतां आलीं. यज्ञयाग, व्रतवैकल्यें, जपजाप्य येवढ्यांपुरतेंच धर्मभावनेचे क्षेत्र आकुंचित बनलें होतें. कर्मठपणाचें अवास्तव बंड माजल्यामुळे नैतिक मूल्यांची चाड राहिली नव्हती. उच्चवर्णीयांत सुखासीनतेची चर्चा व भोगविलासाची प्रवृत्ति वाढली होती. ब्राह्मण व क्षत्रिय कर्तव्यपराङ्‌मुख झाले होते. याद‌वांच्या राजवटीत  वैदिक विद्येला भरपूर आश्रय होता; परंतु ठराविक चाकोरीतून जुन्या ग्रंथांचें चर्वितचर्वण करण्यापलीकडे वा पंडितांच्या हातून कोही विशेष कामगिरी झाली नाहीं. विज्ञानेश्वरापासून हेमाद्रीपर्यंतच्या काळांत वैदिक परंपरेंत धर्मसुधारणेच्या जिवंत प्रेरणेपेक्षां पुनरुज्जीवनाची निस्तेज प्रवृत्तीच दिसून येते. जगद्गुरू  संत तुकाराम महाराजांच्या  शब्दांत सांगावयाचे म्हणजे "अर्थ लोपलीं पुराणे। नाश केला शब्दज्ञानें। विषयलोभी मनें। साधनें बुडविलीं ॥" अश्या तर्हेची  सनातन धर्माची अवस्था त्या काळात  झाली होती. त्यामुळे देशभाषांच्या आश्रयानें सर्वसामान्य लोकांत मिसळणाच्या जैन, लिंगायत, नाथ इत्यादि पंथांचा झपाटयानें प्रसार होऊं लागला होता. परंतु या पंथांतहि एकोपा असल्याचे दिसून येत नाहीं. जैन व लिंगायत या दोघांच्यात तर अव्याहत झगडा चालू होता. त्या काळातील झगड्याच्या काही हकीकती वाचल्या म्हणजे या पंथांतील वैमनस्य किती विकोपाला गेले होते याची बरोबर कल्पना येते. इतर बहुसंख्य समाज हा तर बोलून चालून मूढ व अज्ञानी होता; पशुतुल्य जीवन कंठण्यापलीकडे त्याला दुसरी गति नव्हती. त्याच्या ठिकाणी जी थोडीबहुत धर्मश्रद्धा होती तिला कधीं उच्च विचारांची बैठक लाभलीच नाहीं. म्हणून अशांची भीतीनें किंवा स्वार्थबुद्धीने मंगळाई, जाखाई, म्हसोया, बहिरोबा इत्यादि देवतांची भक्ती करण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाहीं.

वारकरी पंथानें आत्यंतिक निवृत्तीचा- मायावादाचा उपदेश करून देश दुबळा केला, नाम- संकीर्तनामुळे टाळकुटेपणान्ची साथ फैलावून समाज रसातळाला नेला असा आक्षेप नेहमींच घेतला जातो; परंतु सर्वसाधारण लोकांचे ग्रह बहुधा अगदी ढोबळ मानानें व कित्येकदां तर केवळ काकतालीय न्यायानेंहि बनलेले असतात ! गतानुगतिकत्यामुळे ते वारंवार पडताळून पाहण्याची तसदी सहसा कोणी घेतच नाहीं; त्यामुळे एकदां रूढ झालेले ग्रह उत्तरोत्तर ठाम होत जातात. प्रवृत्तिनिवृत्तींचा निर्णय इतक्या स्थूल दृष्टीनें करुन चालणार नाहीं. संत ज्ञानेश्वर एकनाथांच्या तत्वविवेचनपर ग्रंथांच्या व अभंगाचा तुलनात्मक परामर्श घेऊनच वारकरी पंथाची भूमिका निश्चित केली पाहिजे.

देखे प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पायले । तयांही कर्तव्य असे उरहें। लोकांलागीं ॥

मार्गाधारें वर्तायें। विश्व हैं मोहरे लावावें। अलौकिक नोहावें। लोकांप्रति ।।

या ओव्यांतील आशय तर अगदी स्वष्ट आहे." नलगे सायास, जावें बनांतरा। सुखें येतो घरा नारायण !" अशी वारकरी संतांची श्र‌द्धा होती. "सुखें संसार करावा ! " पण माझा विठ्ठल आठवावा येवढेच त्यांचे सांगणें होतें. सिद्धपुरुषाने अलौकिकत्व  निरखूं नये, अगदीं सामान्य माणसाप्रमाणें वागावें, यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. ज्ञानेश्वरीत जागोजाग ज्ञानी पुरुषांची, आदर्श भक्तांची व स्थितप्रशांची वर्णन आहेत तीं जगा वेगळी वा लोकविलक्षण नाहींत, तर व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषकच आहेत.

संत ज्ञानेश्वरादी सर्व संतांची दृष्टी हीच होती. 'मराठीचिये नगरी' त्यांना 'ब्रह्म- विद्येचा सुकाळ' करावयाचा होता. शूद्रातिशूद्रांच्या मृतकल्प जीवनांत त्यांनी नवचैतन्य ओतलें, त्यांच्या मूक भावनांना वाचा फोडली. तेव्हां मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र-संस्कृतीचाच पाया घातला हैं उघड आहे. आपण लोकांना नवा अनुभव, नव्या भावना, नवें जीवन देत आहों, त्यांच्यासाठीं नवसंस्कृति निर्माण करीत आहोंत, असा अहंकार, अभिनिवेश, आत्मविश्वास त्यांच्या कडून यांत जागोजाग आढळतो. चक्रधर व ज्ञानेश्वर यांची भूमिका जरी एक असली, तरी त्यांच्या व्यक्तित्वात त्यांत व कर्तृत्वांत पुष्कळच तफावत आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी साहित्याची अविच्छिन्न परंपरा निर्माण केली व महाराष्ट्रांतील लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान मिळवून दिले.

अशाच प्रकारें एकनाथ व तुकाराम यांनीही  प्रवृत्ति व निवृत्ति यांचा मेळ घातला आहे. "अवताराचे सामर्थ्य पूर्ण। प्रपंच-परमार्थी सावधान ॥" असें सांगून संत एकनाथांनी संत रामदासांच्या अगोदरच प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधला आहे. केवळ एकाद‌ दुसऱ्या बंधनाच्या आधारावर मी हे  विधान करीत नाहीं. एकनाथी भागवतांत व भावार्थरामायणांत याच अर्थाची किती तरी वचने इतस्ततः आढळतात  वारकरी पंथानें समाजाला नेभळट बनविलें हा आरोप तर हास्यास्पद आहे! "अर्जुना देऊनि समाधी । सर्वेच्चि घातला महायुद्धा ॥" या उक्तींतील अभिप्राय क्रियाशीलतेचा द्योतक आहे, निष्क्रियतेचा निदर्शक नाहीं. एकनाथ महाराज शांत व क्षमाशील होते, पण तुकाराम महाराज तर न्याय निष्ठुर व आक्रमक होते ! दांभिकतेवर कठोरपणे कोरडे ओढून त्यांनी आपल्या अभंगांत सर्वत्र भक्ति आणि भूतदया, परमार्थ आणि परोपकार यांचा संगम घडवून आणला आहे. वारकरी पंथांत देवांपेक्षांहि संतांचे महत्त्व जास्त आहे:

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥ देव सारावे परते । संत सारावे आरते ॥ संत स्वतःच्या आचरणानें जगाला धडा घालून देतात :

अर्भकाचे साठीं । पंतें हाती धरिली पाटी  ॥ तैसें संत जगीं । क्रिया करूनि दाविती अंगी ॥ संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार, संत सांवता माळी हे सर्व संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. ते आप आपले व्यवसाय निश्चयाने करीत होते. लोकांपासून ते दूर राहिले नाहीत; म्हणून त्यांच्याबद्दल लोकांना ते आपल्यांतलेच आहेत असा विश्वास वाटत होता. "नाहीं संतपण मिळत हैं हाटीं। हिंडतां कपाठीं रानीं वनीं ।" याबद्दल त्यांना शंका नव्हती; म्हणून संन्यासधर्माचें बंड त्यांनी माजविलें नाहीं कीं जैन, लिंगायत व महानुभाव या पंथांतल्याप्रमाणें यती, जंगम किंया महंत यांसारखा वेगळा संतांचा वर्गहि काढला नाहीं. मात्र "खटनट यावें, शुद्ध होउनि जायें। दवंडी पिटी भावें, चोखा मेळा ॥" ही चोखा मेळ्याची दवंडी देशांतील अठरापगड जातीना आध्यात्मिक क्षेत्रांत सारखाच दर्जा मिळवून देणारी असल्यामुळे हजारों लोकांना वारकरी पंथाची कांस धरली व खडतर संन्यासामुळे महानुभाव पंथाला मात्र शेवटी फक्त मूठभर पंडितांचाच पाठिंबा मिळाला !

वारकरी पंथ हा सर्वसंग्राहक आहे. त्यानें संकुचित सांप्रदायिकता बाळगली नाहीं, प्रतीकाचा दुराग्रह धरला नाहीं, दैवतावर रणें माजविली नाहींत. परमेश्वर सर्वव्यापी आहे व तो विविध रूपांनी नटलेला आहे; "तुका म्हणे हरि। अवघा एकला ॥ परी हा धाकुला। भक्तीसाठीं ।।" म्हणून उपासकांची भावनाच मुख्य आहे, प्रतिमा गौण आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे राम, कृष्ण, दत्त, शिव इत्यादि दैवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यांत सामावून घेतले. वारकरी संतांनी तर नेहमींच विष्णु व शिव यांच्या ऐक्यावर भर दिला आहे. "शिव मस्तकी धरिला। भेद मक्तांचा काढिला ॥" वारकरी पंथांत विठ्ठलभक्तीचा महिमा विशेष आहे. पंढरीच्या या विठ्ठलानें महाराष्ट्रांतील साधुसंतांना चारशें वर्षे ग्रंथलेखन व कवित्व लिहिण्याची  स्कूर्ति दिली आहे. लक्षावधी शूद्राशूद्राना या दयामय दैवतानें आत्मोद्वाराची प्रेरणा दिली आहे, बंधुभावाचे  पाठ दिले आहेत. संत रामदासांच्या मते कोदंडधारी रामाशी तुलना केली, मात्र संतांच्या मताप्रमाणे 'विठोबा हा वारकऱ्यांच्या दृष्टीने राम, कृष्ण व विठ्ठल हे तिथेहि एकाच परमेश्वराचे अवतार आहेत. मात्र त्यांच्यें अवतारकार्य हे प्रभू रामाप्रमाणे राक्षसांच्या संहारासाठी कोदंड हाती घेऊन  निघाले नाहीत तर पतितांना पावन करण्यासाठीं, जडमूडांचा उध्दार करण्यासाठीं दलितांना आश्वासन देण्यासाठीं अहर्निश उभा राहणाऱ्या पांडुरंगाला शस्त्रास्त्रांची काय गरज . लोकदेव विठोबा हा गुलामांचा देव नाही तर गरिबांचा देव आहे. द्वारकेच्या राण्याचे ऐश्वर्य त्यानें सोडून दिलें आहे "देव भावाचा लंपट । सांडून आलासे वैकुंठ ॥" त्याचें कार्य विध्वंसक नाहीं, तर विधायक आहे. वात्सल्य, दयाशीलता, सहिष्णुता, क्षमाशीलता इत्यादि गुणांनीं तो संपन्न आहे. विठाई ही खरी अनाथांची माउली आहे. म्हणूनच तिच्याशी प्रेमानें सलगी करतांना भक्तांना कधीं संकोच किंवा भीति वाटत नाहीं. ते लडिवाळपणानें तिच्यापुढे हट्ट करतात, तिच्यावर रुसतात, रागावतात आणि पुनः भक्तीभावानें तिच्या पायांवर लोटांगण घालतात !

वारकरीपंथीय संतांनी आपल्या धर्मप्रचारासाठी एक नवें व्यासपीठ निर्माण केलें. त्यांची निरुपणें व कीर्तने यांचा थाट अगदी वेगळा आहे. पंडितांच्या पुस्तकी प्रवचनांशी किंवा हरदासांच्या दरबारी कीर्तनांशी त्यांचे यत्किंचितही साम्य नाहीं. लोकांत आत्मीयता व आत्मविश्वास उत्पन्न होण्यासाठी लोकांतीलच पुढारी आघाडीवर यावे लागतात. वारकरी पंथानें लोकांतून धर्मप्रवक्ते तयार केले, संत नामदेव हे  त्यांच्या कीर्तन संप्रदायाचे आद्य प्रवर्तक होय. "सुंबाचा करदोडा । रकट्याची लंगोटी। नामा वाळवंटी । कथा करी ॥" हे दृश्य शुद्रातिशूद्रांना खरोखरच किती स्फूर्तिदायक वाटलें असेल ? आपल्या धर्मजीवनांत ही घटना निःसंशय अभूतपूर्व अशीच होती. अध्यात्मविद्या ही आतां केवळ दशग्रंथी ब्राह्मणांची मिरास राहिली नाहीं. संत-कीर्तनकार हे महानुभावीय आचार्याप्रमाणें कोणत्याहि एका विशिष्ट वर्गाचे नव्हते. "आम्हां 'कीर्तन' कुळ धाडी" अश्या भावनेनें ते आपला जन्मसिद्ध हक्क गाजवू लागले. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेनें या लोकांना कवित्वाची प्रेरणा, तशीच कीर्तनाची स्फूर्ति दिली. संत जनाबाईसारखी मामुली मोलकरीण अध्यात्माचे सिद्धान्त अभंगांत गाऊं लागली. "वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां !" असें आव्हानपूर्वक म्हणण्याइतका आत्मविश्वास संत तुकारामांसारख्या कुणब्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. संत ज्ञानेश्वरांच्या मोठेपणाचें खरें रहस्य या लोकोत्तर स्फूर्तिदायकतेत  सांठविलेलें आहे.

या ठिकाणी आणखी एका आक्षेपाचें निरसन करणें जरूर आहे. 'वारकरी पंथ हा अडाणी लोकांचा पंथ आहे, त्याचा शहाणपणाशी कांही संबंध नाहीं. भोळीभाबडी भक्ति हाच त्या पंथाचा आधार असल्यामुळे हजारों लोक त्यांत सामील झाले, असा पुष्कळांचा समज आहे; पण त्यांत तिळमात्र तथ्य नाहीं. या पंथानें विद्वत्तेचें अवडंबर माजविलें नाहीं हैं खरें; परंतु त्यानें अंधभक्तीलाहि कोठेंच थारा दिलेला नाहीं. 'ज्ञानादेव तु कैवल्यम्' हैं वेदान्ताचें मुख्य सूत्र त्यानें कधींहि सोडलें नाहीं. नामसंकीर्तनासारख्या सहजसुलभ साधनाचा त्यानें उदोउदो केला; पण साधनाच्या दृष्टीनें ही केवळ पहिली पायरी आहे हें त्यानें वारंवार व निक्षून सांगितलें आहे. भक्ती ही सुळावरील पोळी आहे. भक्त होण्यासाठीं 'विष खावें ग्रासोग्रासीं' अशी खडतर साधना करावी लागते ! तें 'येरा गबाळां'चें काम नाहीं. "तुका म्हणे मिळे जिवाचीयेसाठीं। नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥" असा संत तुकारामानी रोखठोक इशारा दिला आहे. या पंथांत भाक्तभावाचा जो गौरव आहे, नामसंकीर्तनाचा जो अट्टहास आहे तो कर्मठपणाची नांगी ठेचण्यासाठी आहे; शिवाय, आत्मशुद्धीवर व सदाचरणावरहि या पंथानें खूप भर दिला आहे. त्यांत "विवेकासहित वैराग्याचे बळ " मिळविण्याची शिकवण आहे. त्याचें अभंगवाङ्मय व त्याचा कीर्तनसंप्रदाय म्हणजे धर्मशिक्षणाची एक प्रचंड मोहीमच होती असे म्हणावयास हरकत नाहीं. संत ज्ञानेश्वर हे तर ज्ञानियांचे राजेच होते. परंतु " नाचू कीर्तनाचे रंगीं। ज्ञानदीप लावृं जगीं " अशी नामदेवांचीहि प्रतिज्ञा होती. लोकांत श्रद्धा होतीच, तिला संतांनी डोळसपणा आणला.

नामदेवांचें 'मडकें' कच्चे असल्याची गोरोबा- काकांची परीक्षा, आणी विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर 'डोळियांचा डोळा उघडिला जेणें, ' हा नामदेवांचा उदगार यांवरून वारकरी संप्रदायांत ज्ञानाला किती महत्त्व आहे हें स्पष्ट दिसतें. संतवाङ्मयांत हा आत्मप्रचीतीचा जिव्हाळा उत्कटतेनें आढळतो. "सांडिली त्रिपुटी। दीप उळजला घटी ॥ " हा अनुभव अज्ञानमूलक आहे काय ? तसे पाहिलें तर अद्वैतमताची कांस धरणाऱ्या पंथाला तरी ज्ञानाशिवाय दुसरी गतीच नाहीं. शब्दज्ञानाच्या क्षेत्रांतही  एकनाथ महापंडित होते. "जयाची बदे पूर्ण वेदांत वाणी" असा तुकोबांचा अधिकार वामनानें वर्णिलाच आहे. यानंतर शास्त्रप्रामाण्याचा विचार केला पाहिजे. चक्रधरानी वेदप्रामाण्य मानलें नाहीं म्हणून ते  क्रांतिकारक आहे ही विचारसरणी चूक असल्याचें मी आरंभीच सांगितलें आहे, संत ज्ञानेश्वरांनी वैदिक परंपरेला श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माला प्रमाण मानले होतें. श्रुतीला तर ते साक्षात् 'माउली' म्हणतात ! बहुजनसमाजाच्या आत्मिक उन्नतीसाठीं त्यांनी वारकरी पंथाला नवें वळण लावलें. संत ज्ञानेश्वर हे वास्तववादी धर्मसुधारक होते. बौद्ध, जैन व लिंगायत या पंथांच्या सामाजिक अपयशाचे दृश्य त्यांच्यापुढें होतें. या पंथांनी वेदप्रामाण्य झुगारून देऊन चातुर्वण्यावर घाला घातला, पण त्यामुळे जातिव्यवस्था कोलमडली नाहीं, की वर्णाश्रमधर्माची समाजावरील पकड सुटली नाहीं. उलट, या पंथांचे अनुयायीच सामाजिक व्यवहारांत जातिभेद व रूढ आचार कांटेकोरपणानें पाळू लागले. त्यामुळे आचार-विचारांत विसंगति पत्करण्याचा अनवस्था-प्रसंग या पंथांवर ओढवला. या इतिहासापासून जरूर तो बोध घेऊन संत ज्ञानेश्वरांनी सामाजिक व्यवहारांत ढवळाढवळ केली नाहीं, समाजक्रांतीच्या खोट्या आशा बाळगल्या नाहीत किंवा एकदम आकाशालान्च गवसणी घालण्याचा खटाटोपहि केला नाहीं. त्यांनी फक्त धार्मिक जीवनांत समता नि बंधुभाव आणण्याचा यशस्वी उपक्रम केला. त्यांच हैं मर्यादित यश ऐतिहासिक दृष्ट्या तर फारच मोठें आहे. समाज रचनेशी निगडित असलेली अर्थव्यवस्था आरपार बदलण्याजोगी परिस्थिति त्या काळीं नव्हती; नुसत्या विचार- परिवर्तनानें हैं कार्य घडण्याचा संभव नव्हता. म्हणून धर्मसुधारकांनी सामाजिक समतेसाठी त्यावेळी जे जे प्रयत्न केले, ते ते सारे सपशेल फसले ! वारकरी संतांनी फक्त धार्मिक क्षेत्रांतील भेदभाव दूर केला. देवाच्या मंदिरांत हा ब्राह्मण, हा शूद्र असा फरक नाहीं, त्याच्या पुढें सर्व भक्त सारखे, तो फक्त भावाचा भुकेला आहे. 

"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 'भेदाभेद' भ्रम अमंगळ ॥"





रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...