गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ

 




नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ


निवृत्त सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे  यांची  भव्य मिरवणूक आणि सत्कार

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


सुभेदार नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गांवातील देशसेवेतून निवृत्त झालेले सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे यांची ग्रामस्थांकडून पितळवाडी फाट्यापासून गावापर्यंत ग्रामस्थांनी त्यांची विविध फुलांच्या हारांनी सजविलेल्या ओपन जीपमधून सपत्नीक ढोल ताश्यांच्या आवाजात आणि फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढून शेकडो समाजबांधवांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या निमित्ताने सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जवानाचे स्वागत करण्याचा हा प्रयत्न पोलादपूर तालुक्यात आणि नरवीर तान्हाजी - सूर्याजी यांचा वारसा सांगणाऱ्यांकडून  एक नवीन पायंडा पडला असून, या कृतीचे स्वागत करताना इतर ग्रामस्थांनी सुद्धा हा आदर्श घ्यावा अशा महाड -पोलादपूर तालुक्यातील जनतेमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  बेळगाव येथे भारतीय सैन्यदलात 6 मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये देशसेवा बजावून  22 वर्षांनंतर सेवानिवृत्त होऊन नायक पंढरीनाथ मालुसरे हे सहकुटूंब आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. ज्या जवानांच्या हाती आपलं आयुष्य सोपवून आपण देशात निर्धास्त राहत असतो ते आपली कर्तव्यपूर्ती केल्यानंतर जेव्हा परततात तेव्हा महाराष्ट्रात तरी गावागावातील मराठी माणसाने एकत्र येऊन त्यांचे स्वागत करायला हवे असा प्रघात झाला देशभावना अधिक बळकट निर्माण होण्यासाठी मदत होईल.

पितळवाडी येथे रिक्षा चालक - मालक संघटनेच्यावतीने पंढरीनाथ यांचे भव्य स्वागत करून सत्कार केला. ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. पंढरीनाथचे आई वडील आज हयात नाहीत मात्र त्यांनी हे स्वप्न पाहिले होते. पाण्यातला मासा झोपतो कसा असा सवाल करीत आईवडील पाठिशी नसताना लेकराची झेप गरुडासारखी झाली पाहिजे, पंढरीनाथाच्या कर्तृत्वाची गणना यात केली पाहिजे.



यावेळी जनतादल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, सचिन खेडेकर, बोरज ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी ज्ञानोबा मालुसरे, श्याम वरणकर, ज्ञानोबा कुंभार, स्वप्नील कुंभार, संदीप वरणकर, पंढरीनाथ जाधव, तुकाराम गायकवाड, विलास जाधव लक्ष्मण केसरकर, मिलींद मालुसरे, राजू गायकवाड, विनायक केसरकर, दिपक पार्टे, संजय चोरगे, संतोष खेडेकर, भाऊ तुडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मिरवणुकीत महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि उबाठा पक्षाच्या महाड - पोलादपूरच्या नेत्या स्नेहल माणिकराव जगताप-कामत यांनी सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुक साखरच्या आई नवलाई ग्रामदैवतेच्या मंदिराजवळ आल्यानंतर सेवानिवृत जवान मालुसरे यांनी सहकुटुंब देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर आई नवलाई ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गावातील ज्ञानोबा मालुसरे, भरत चोरगे, महादेव चोरगे, नारायण चोरगे गुरुजी, गोविंद चोरगे, सहदेव सुतार, गोविंद सुतार या मान्यवरांच्या हस्ते पंढरीनाथ मालुसरे यांचा ग्रामस्थ्यांच्या वतीने सत्कार सोहळा करण्यात आला.

शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना करताना  शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे आणि सुर्याजी मालुसरे यांच्या कुळाचा लढाऊ वारसा सांगणाऱ्या देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांच्या सैनिकी सेवेचा आढावा घेतला. बेळगाव, जम्मू काश्मीर(सांभा), नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ ईस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर(आखनूर ), पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, साऊथ सुदान देश, खंजळवान गुरेझ सेक्शन, पठाणकोट या ठिकाणी त्यांनी आपली ड्युटी बजावली. विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये सांभा येथे (2004), नॉर्थ सिक्कीम बंकर येथे (2006), नॉर्थ ईस्ट सिक्कीम लांचूग येथे (2007), जम्मू काश्मीर आखनूर येथे (2012), युनायटेड नेशन-दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान (2017),जम्मू काश्मीर खंजळवान गुरेझ सेक्शन येथे (2019) या ठिकाणी झालेल्या सैन्यदलाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये त्यांना कामगिरी बजावता आली. आमच्या साखर गावाला मोठी देशसेवेची तसेच समाजसेवेची परंपरा असून यापूर्वी पहिल्या जागतिक महायुद्धात परदेशात शहीद झालेले सुभेदार भाऊराव मालुसरे, स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसरे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सखाराम चोरगे, बिठोबा अण्णा मालुसरे, रामचंद्र खोत, गेणबा खोत, मारुती सुतार, घावरे, महादेव चोरगे यांचे योगदान फार मोठे आहे.

या कार्यक्रमात देशसेवेतून निवृत्त झालेले सैनिक माजी सैनिक नायब सुभेदार सुनील चोरगे, प्रदीप मालुसरे, पांडुरंग तांदळेकर, उमरठचे गणपत कळंबे, रामदास कळंबे यांना व्यासपीठावर सन्मानाने बसविण्यात आले होते.  नायक पंढरीनाथ मालुसरे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सुभेदार मनोहर धनवट यांचादेखीत यावेळी सत्कार करण्यात आला. 

रानवडीचे माजी सरपंच निवृत्ती उतेकर, चंद्रकांतदादा मोरे, तुकाराम मोरे गुरुजी,   विष्णू सणस, मुंबई पोलीस शिवप्रसन्न पवार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. साखर गावचे माजी सरपंच भरत चोरगे, ह.भ.प. चंद्रकांत घाडगे यांनी नायक पंढरीनाथ यांच्यावर गौरवपर भाषण केली. सत्काराला उत्तर देताना नायक पंढरीनाथ मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलामध्ये भरती झाल्यानंतर मातृछत्र गमावले पण ग्रामदैवतांनी माझी काळजी घेऊन 22 वर्षांच्या सेवेनंतर सुखरूप गावामध्ये आलो. त्याबद्दल आई नवळूबयेचे ऋण व्यक्त केले. 

दृष्टय लावणारा हा कार्यक्रम नेटकेपणाने यशस्वी करण्यासाठी साखर गावातील सर्व वाड्यातील तरुणांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मिलिंद महादेव मालुसरे यांनी मानले.



सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा




पोलादपूर-महाड  : शौर्याची परंपरा

- रवींद्र मालुसरे

गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी -  सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत आहे.

शिवकाळात, पेशवाईत, ब्रिटिश काळात व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वेळोवेळी या दोन्ही तालुक्यातील अनेक वीर पुरुषांनी पराक्रम केला व आपल्या नावाची व अद्वितीय पराक्रमाची नोंद इतिहासाच्या पानापानावर करून ठेवली आहे. आमचा साखर गाव तर या देव, देश, व धर्म कार्यात नेहमीच अग्रेसर राहात आला.  शिवकाळात सुभेदार तान्हाजी - सूर्याजी मालुसरे, पहिल्या जागतिक महायुद्धात सुभेदार भाऊराव मालुसरे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाना पुरोहित यांच्या सोबत स्वातंत्र्य सेनानी सखाराम चोरगे, बिठोबाअण्णा मालुसरे यांनी सहभाग घेतला. मालुसरे कुटुंबासह साखर गावाचा हा मोलाचा सहभाग आमचा ऐतिहासिकदृष्ट्या वारसा सांगणारा आणि समाजातल्या पुढच्या पिढीला ऊर्जा देणारा आहे...

पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे १९१४-१८ या काळात साखर खडकवाडीचे सुभेदार भाऊराव मालुसरे हे परभूमीत मेसोपोटेमियाच्या मोहिमेत धारातीर्थी पडले. मेसोपोटेमियाच्या मोहिमेत म्हणजे आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेय कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.  पंजाब आणि अन्य पाच 'मरहट्टा' बटालियन' यांनी मिळून युद्धाला तोंड दिलं होतं. मेजर जनरल चार्ल्स टाऊनशेंड यांच्या नेतृत्वाखालील सहाव्या पूना डिव्हिजनचा भाग असलेली पाचवी रॉयल 'मरहट्टा' ही या पाचांपैकी एक.ही लढाई नोव्हेंबर १९१५ पासून एप्रिल १९१६ पर्यंत चालली होती. या काळात सैन्याची रसद आधी निम्मी झाली, मग पाव झाली आणि शेवटी तर स्वतःचं खेचर मारून खा, नाहीतर उपाशी मरा अशी वेळ आली. मराठा लढवय्यांनी खेचराचं मांस खायला साफ नकार दिला. तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी तारेनं आपल्या सैन्याला कळवलं की, "खाण्यापिण्याच्या निर्बंधाविषयी असलेल्या मोठ्या अंधश्रद्धांपेक्षा जीव वाचवणं हे अधिक महत्त्वाचं आणि आवश्यक आहे." अखेर उपासमारीनं दमलेल्या खंगलेल्या, संख्याबळ कमी झालेल्या डिव्हिजनला शरणागती पत्करावी लागली. सर्व शूर अधिकारी आणि जवान तुर्की फौजेचे युद्धकैदी बनले. तुर्की छावणीत भारतीय युद्धकैद्यांच्या कष्टांना सीमा नव्हती. इराकी वाळवंटातून पायपीट करत त्यांना सिरियापर्यंत नेलं गेलं आणि सिरिया ते तुर्कस्थान हा रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामावर त्यांना जुंपलं गेलं. कित्येकांचा बंदिवासात छळ झाला. आजारपण, उपासमार यांनी खंगून कित्येक जण मृत्युमुखी पडले.ब्रिटिश साम्राज्यासाठी, स्वतंत्र जगाच्या निर्मितीसाठी भारतातल्या विशेषतः पंजाब आणि महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी परक्या भूमीवर आपल्या पलटणीखातर बलिदान दिलेलं आहे. ते जगले ते 'नाव', 'निशाण', 'इमान', (नमक), 'परंपरा' (दस्तुर) आणि 'इज्जत' यांच्यासाठी आणि त्यांनी देह ठेवला तोही त्यासाठीच. महाड-पोलादपूर तालुक्याच्या खेड्यापाड्यांतली लढवय्यी आणि काटक परंतु साधी, नेक, कष्टाळू अनेक जणांनी त्यावेळी हौतात्म्य पत्करले. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने राणीची मुद्रा असलेले  नंतर त्यांना पंचधातूचे एक शौर्य पदक त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने दिले होते. HE DEAD FOR FREEDOM & HONOUR - BHAU MALUSARE 

मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मेसोपोटेमियाची मोहीम ही त्यांच्या या कीर्तीला साजेशी युगप्रवर्तक आणि इतिहासावर आपली मोहोर उमटवणारी होती. त्यांचं शौर्य, धैर्य, चापल्य आणि अत्यंत खडतर परिस्थितीतही पहिल्या महायुद्धात चिवटपणे झुंजण्याचं सामर्थ्य या त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून या रेजिमेंटला लाइट इन्फन्ट्री (Light Infantry) हा किताब मिळाला.

भारताला खूप मोठा इतिहास आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी भारताला अशी काही सीमा नव्हती. खरं तर देश म्हणून असं वेगळं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. तर अनेक राजे, बादशहा, सरदार हे आपल्या राज्य विस्ताराकरता लढत होते. स्वसंरक्षण करत होते. मात्र १८५७ च्या पहिल्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांनी भारतीय भूखंडाची सत्ता ताब्यात घेतली आणि खऱ्या अर्थाने भारताला सीमारेषा प्राप्त झाली, ओळख मिळाली. दक्षिण आशियात आपलं स्थान बळकट रहावं यासाठी ब्रिटिशांनी शास्त्रोक्त पद्धतीने संरक्षण दलाची उभारणी सुरू केली आणि 'भारतीय सैन्य' म्हणून संरक्षण दलाला चेहरा प्राप्त झाला.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक उच्च पदवी घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे. भविष्यात ऐशआरामी जीवन जगण्यासाठी परदेशात जाणाऱ्या युवकांची संख्याही वाढत आहे.  परंतु महाड - पोलादपूर हे शूरवीरांची परंपरा जपणारे तालुके व प्रत्येक गावातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही अनेक गावात टिकून आहे. या दोन्ही तालुक्यांनी देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाहीत.

सैन्यातील नोकरी आता बिकट होऊ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणाऱ्या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्व:ताला झोकून देणारे अनेक जण या दोन्ही तालुक्यात दिसतात.

ज्यांच्या हाती आपलं आयुष्य सोपवून आपण देशात निर्धास्त राहत असतो अशा तालुक्यातील आंर्मी इतिहासाचा धांडोळा घेत तालुक्यातील अनेक योध्यांची दखल या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. लढवय्या ही अस्मिता असलेल्या तालुकावासीयांना हे वाचायला नक्की आवडेल व स्फूर्तिदायक ठरेल अशी खात्री आहे. याचे कारणही महत्वाचे आहे  ते असे की, दि मराठा लाईट इन्फन्ट्रीचं बोधचिन्ह आहे 'कर्तव्य, सन्मान आणि धाडस' (Duty, Honour and Courage) तेही मला तितकंच प्रिय आहे.परिश्रम, सचोटी, निष्ठा आणि दैव या तत्वांवर विश्वास ठेऊन अनेकजण सैन्यदलात भरती झाले त्याप्रमाणे- 

सुभेदार नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या कुळाचा वारसा सांगणारे आमच्या साखर गावातील नायक पंढरीनाथ तुकाराम मालुसरे हे भारतीय सैन्यदलात देशसेवा करण्यासाठी६ मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव मध्ये भरती झाल्यानंतर २२  वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त झाले आहेत, बेळगाव, जम्मू काश्मीर(सांभा), नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ ईस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर(आखनूर ), पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, साऊथ सुदान देश, खंजळवान गुरेझ सेक्शन, पठाणकोट या ठिकाणी त्यांनी आपली ड्युटी बजावली. विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये सांभा येथे (२००४ ), नॉर्थ सिक्कीम बंकर येथे (२००६ )नॉर्थ ईस्ट सिक्कीम लांचूग येथे (२००७ ), जम्मू काश्मीर आखनूर येथे (२०१२ ), युनायटेड नेशन-दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान (२०१७ ),जम्मू काश्मीर खंजळवान गुरेझ सेक्शन येथे (२०१९ ) या ठिकाणी झालेल्या सैन्यदलाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये त्यांना कामगिरी बजावता आली.

नायक पंढरीनाथ मालुसरे हे सैन्यदलातील निवृत्तीनंतर मंगळवार, दिनांक १०  सप्टेंबर २०२४  रोजी सकाळी ११  वाजता आपल्या जन्मभूमीत साखर गावात येत आहेत. साखर गावातील सर्व आबाल-वृद्धाना याचा अत्यंत आनंद होत आहे. याप्रित्यर्थ गावाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत होत आहे. साखर ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमास तालुक्यातील सर्व समाजबांधव सुद्धा अगत्याने उपस्थित राहात आहेत यालाही महत्व आहे.

लष्कराच्या समूहात, गणवेशाच्या आवरणाखाली स्वतःचे व्यक्तिगत अस्तित्त्व हरवून धैर्याने, शौर्याने भारताचे सर्वार्थाने संरक्षण करून, समाजाकडून काहीही अपेक्षा न ठेवणाऱ्या भारतीय सैन्यातील वीर जवान जेव्हा आपल्या गावात येईल तेव्हा प्रत्येक सैनिकास, कृतज्ञतापूर्वक त्याचे स्वागत करण्यासाठी एकत्र पुढे सामोरे जायला हवे याचा चांगला पायंडा निर्माण होणे यानिमित्ताने गरजेचे आहे. साखर गावातील यापूर्वी नारायण रामचंद्र मालुसरे, पांडुरंग तांदळेकर, सुधीर चोरगे, शशिकांत खैरे, प्रदीप मारुती मालुसरे आणि पंढरीनाथ तुकाराम मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलात देशसेवा केली आहे.  साखर गावाची ही  मोठी असाधारण कमाई म्हणावी लागेल.

आपल्या तालुक्यातील बहुसंख्य जवान हे पायदळात असतात. इन्फंट्री अथवा पायदळ हा सेनादलाचा प्रत्यक्ष सरहद्दीवर शत्रूशी आमने-सामने लढणारा विभाग. शत्रूवर हे पायदळाचे लोक चढाई करतात तेव्हा तोफखाना व रणगाडा तुकड्या त्यांना साहाय्य करतात. भारतातील सीमेचा खूप मोठा भाग असा आहे की, जिथे रणगाडे जाऊच शकत नाहीत. तर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमुळे तोफखान्याला मर्यादा पडते. अशा ठिकाणी सर्व मदार पायदळावरच असते. चढाई करताना एक संघ किंवा तुकडी असणे आवश्यक असते, म्हणून पायदळाची रचना पूर्वीपासून वेगळी आहे. पायदळ हे अनेक रेजिमेंटस् (अथवा विभाग) मध्ये विभागले गेले आहे. काही पलटणी खूप जुन्या आहेत. मराठा रेजिमेंटच्या १ मराठा, २ मराठा ह्या अडीचशे वर्षे जुन्या पलटणी आहेत.  एका भागातल्या लोकांची भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असतात. त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत साम्य असते. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, देवदैवते एक असतात. ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या, तरी त्याने बराच फरक पडतो. 'शिवाजी महाराज की जय' ह्या आरोळीने मराठा जवानाला जेवढी 'स्फूर्ती' मिळेल तेवढी शीख जवानाला मिळणार नाही, तर 'सत् श्री अकाल' म्हटल्यावर त्यांना जेवढे स्फुरण चढेल तेवढे इतर कुणाला चढणार नाही. वरून छोट्या वाटणाऱ्या ह्या गोष्टींची पाळेमुळे अशी खोलवर रुजली आहेत.










हे मरहट्टे मोठे शूर, कडवे आणि चिवट असतात. म्हणून तर त्यांना त्या युद्धात 'लाइट इन्फन्ट्री' हा किताब मिळाला." शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मराठा सैनिकांना पूर्वी 'गणपत' म्हणायचे. पहिल्या महायुद्धाच्या काळात Frankfurter Zeitung मध्ये एका जर्मन सैनिकाचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात भारतीय सैन्याच्या शौर्याचं वर्णन त्यानं असं केलेलं आहे

फौजी आंबवडे गावाचा इतिहास :

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची परंपरा जपणारे गाव प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही टिकून आहे. फौजी आंबवडे गावाने देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाही.

सैन्यातील नोकरी आता बिकट होउ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणा-या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३  लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात येथील अनेक कुटुंब होती. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही काहींनी गुप्तहेरांची जबाबदारी पार पाडली होती. गावातील या पराक्रमाची साक्ष वतनदारी सनदीचे कागद व मानाची पंचधातूची तलवार गावात देत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेले महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या फौजी आंबवडे या गावाचा इतिहास आजदेखील संपूर्ण देशाला प्रेरणादायी व आदर्शवत राहिला आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरुण आज भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहे. आजघडीला या गावाची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे. १९१४  मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात या गावातील १११  सैनिकांनी सहभाग घेतला. पैकी सहा जवान शहीद झाले होते. या १११  मधील १०५  जवान मायदेशी परतले. दुस-या महायुद्धात २५०  तरुणांनी भाग घेतला त्यातील ७०  जणांना वीरगती प्राप्त झाली.एकाच दिवशी २१  धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्याचे वृध्द व्यक्ती सांगात. या युद्धाचे प्रतीक म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने शहीद जवान स्मारक गावात उभे केले. ते आजही स्फूर्ती देत आहे.

सहा पिढ्यांपासून शौर्य परंपरा

१९४२  चा रणसंग्राम, १९६०  संयुक्त महाराष्ट्र, १९६२  चीनचे युद्ध, १९६५  भारत-पाक युद्ध, १९७१ चे युद्ध व १९९९  च्या कारगिल युद्धामध्येदेखील फौजी अंबवडे गावच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याची साक्ष भारतीय सैन्य दलातील ऐतिहासिक दस्तऐवजांमधून पाहावयास मिळते. भारत पाकिस्तान, बांगला देश युद्धातही या गावातील अनेक सुपुत्रांनी शौर्य गाजवले. या गावचे शहीद सुभेदार रघुनाथ गणपत कदम १९६५ च्या युद्धामध्ये जम्मू-काश्मीर येथे लढत असताना शहीद झाले, त्याचप्रमाणे २००३  यावर्षी मनोज रामचंद्र पवार यांना लेह लडाख भारत-पाक सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झाली. या वीरांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने समाधी स्मारक गावात उभारण्यात आले असून, ते पुढील पिढीला प्रेरणादायी ठरले आहे. १९८०  मध्ये महाराष्ट्र सरकारने या गावाचे नामांतर 'फौजी आंबवडे' असे केले. आज या गावामध्ये माजी सैनिकांची संख्या पाचशेच्यावर असून आज भारतीय सैन्यात १००  पेक्षा जास्त तरुण कर्तव्य पार पाडत आहेत. आज या गावातील सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत तर एकशे बारा निवृत्त झालेले आहेत. तरुण वर्ग सैन्य भरतीत कायम पुढे असतो. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोहर रखमाजी पवार यांना तसेच काहीना त्यांच्या कामगिरीबद्दल सेनापदकेही मिळालेली आहेत. या गावातील तरुण शिक्षण कोणतेही घेतील परंतु सैन्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही असे माजी सैनिक कृष्णा पवार यांनी सांगितले. या गावातील 





फौजी अंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे.



महावीरचक्र प्राप्त सुभेदार कृष्णा सोनावणे :

कृष्णा सयाजी सोनावणे यांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला. ७नोव्हेंबर १९४१ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. १६फेब्रुवारी१९४८ रोजी शत्रूने नौशेराच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी चौफेर हल्ला चढविला. त्यांपैकी ७ क्रमांकाच्या एम.एम.जी. चौकीवर शत्रूच्या सुमारे बाराशे जणांनी जोरदार हल्ला केला. कृष्णा सोनावणे यांच्या ताब्यात ही चौकी होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून आपल्या बंदुका चालविल्या. हल्लेखोरांचे गट चौकीवर एकसारखे हल्ले करू लागले.

     नाईक कृष्णा सोनावणे यांनी आपल्या पथकाला आपली शांतता ढळू न देता मारा चालू ठेवण्याचे आदेश दिले आणि शत्रूची मोठी हानी करणे चालू ठेवले. या चकमकीत क्रमांक एकचा बंदूकधारी मानेवर गोळी लागून जखमी झाला. नाईक सोनावणे यांनी स्वत: ती बंदूक चालविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना शत्रूच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या हाताची चाळण झाली. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी जीवाची तमा न बाळगता डाव्या हाताने बंदुकीचा मारा चालू ठेवला. त्यांच्या चौकीचे भवितव्य दोलायमान स्थितीत असताना त्यांनी लढा चालूच ठेवला. त्यांची बंदूक नंतर नादुरुस्त झाली. अशा परिस्थितीत त्यांनी डाव्या हाताने हातगोळा फेकून व आपल्या सैनिकांनाही तसे करण्याचा आदेश देऊन लढा जारी ठेवला. अशा प्रकारे शत्रूची जबरदस्त हानी करून त्यांनी हल्ला परतवून लावला. अशा प्रकारे धैर्य व निर्धार दाखवून कठीण प्रसंगातही थंड डोक्यानेे कर्तव्यनिष्ठा बजावली आणि दोन तासांच्या अतिशय निकराच्या व बिकट प्रसंगात आपल्या सहकार्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कृतीमुळे शत्रूचे सातशेहून अधिक सैनिक ठार झाले व महत्त्वाचे ठाणे वाचविणे शक्य झाले. या कार्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

वाकण गावचे कॅप्टन आनंद रामजी साने हे १९६२ च्या लाईट इन्फ्रंट्री मराठा रेजिमेंट मध्ये देशसेवेच्या ध्येयाने  दाखल झाले होते. १९७१मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या युद्धात सरहद्दीवर शत्रुसैन्याशीं प्रतिकूल परिस्थितीत झुंज देऊन अतुलनीय कामगिरी करून शौर्याचे दर्शन घडवले होते, त्याबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींकडून सन्मानित केले होते. 

पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्ह्यातील अनेक वीर जवानांनी रणभूमीत पराक्रम केला व आपल्या नावाची, पराक्रमाची नोंद इतिहासात करून ठेवली आहे. ब्रिटिश काळापासून सैनिकी पेशातील महाड-पोलादपूर मधील ज्या वीरांनी लढताना वीरमरण पत्करले त्यांची यादी -

(१) सयाजी गणपत जाधव - १८ जून १९४२ दुसरे जागतिक महायुद्ध - खडपी ता. पोलापूर

(२) देऊ दाजी सकपाळ - २१ मे १९४२ - भारत पाकिस्तान युद्ध - धामणेची वाडी - पोलादपूर

(३) गणपत राघोबा सालेकर - १९ नोव्हेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - मोरसडे - पोलादपूर

(४) अनाजी धोंडू चव्हाण - १८ डिसेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - फणसकोंड कोंढवी - पोलादपूर

(५) बाबुराव विठ्ठल जाधव - १२ सप्टेंबर १९६५ - भारत पाकिस्तान युद्ध -  पळसुले - पोलादपूर

(६) गणपत पार्टे - २६ नोव्हेंबर १९७१ -     भारत पाकिस्तान युद्ध -  तुर्भे बुद्रुक - पोलादपूर

(७) सखाराम गोविंद लाड - ३ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  उंदेरी - महाड

(८) लक्ष्मण गमरे - १० डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  पार्ले  - पोलादपूर

(९) यशवंत रामचंद्र गावंड - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाघेरी - महाड

(१०) गणपत गोपाळ कळमकर - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाकी - महाड

(११) नथुराम गोविंद कासारे - १६ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  नातोंडी - महाड

(१२) सुडकोजीं दगडू जाधव - १७ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वरंध - महाड 

(१३) सुरेश गुणाजी भोसले - १५ डिसेंबर १९८७ - ऑपरेशन मेघदूत -  लोहारे - पोलादपूर

(१४) सुरेश दगडू सुतार - १३ मे १९८८ - ऑपरेशन रक्षक - मांडला - पोलादपूर

(१५) प्रकाश अर्जुन सावंत - १५ ऑगस्ट १९९३ - ऑपरेशन रक्षक - दिवील - पोलादपूर

(१६) विश्वनाथ रामजी कोरपे - ११ डिसेंबर १९९४ - ऑपरेशन रक्षक - पुनाडे - महाड

(१७) नामदेव दगडू पवार - २१ सप्टेंबर १९९९ - ऑपरेशन मेघदूत - धामणे - महाड

(१८) तानाजी हबाजी  बांदल - ४ मे २००१ -  ऑपरेशन पराक्रम - चिखली - पोलादपूर

(१९) मनोज रामचंद्र पवार - २१ फेब्रुवारी २००३ - ऑपरेशन पराक्रम - फौजी आंबवडे - महाड

(२०) सुभेदार भरत अमृत मोरे - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२१ ) लक्ष्मण महादेव निकम  - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२२) ६ जून २००९ राकेश तात्याबा सावंत -  सावंत कोंड - पोलादपूर

(२३) १ सप्टेंबर १९२१ पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावातील भुमीपुत्र श्री धीरज साळुंखे

(२४) २ ऑक्टोबरला २०२२ महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावचेराहुल आनंद भगत

(२५) १२ मे २०१८ महाड तालुक्यातील शेवते गावातील प्रथमेश कदम

 


रवींद्र तुकाराम मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

हा लेख वाचल्यानंतर कृपया ९३२३११७७०४ यावर प्रतिक्रिया द्याव्या.



 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...