सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण





बैल दिवाळी

इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदाया दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदीपावली(बैलदिवाळी ). हा दिवस कोकणातदेव दीपावलीकिंवादेवदिवाळीया नावानं साजरा होतो. पोलादपूर तालुक्यात 'बैल दिवाळी' म्हणून साजरा होतो.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या देवदीपावलीचा  उत्साह आबालवृद्धांच्या अंगी संचारलेला असतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती -

दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच ! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. या दिवसालानवान्न पौर्णिमाअसेही म्हणतातकारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी धाकटी दिवाळी आणि थोरली दिवाळी सणाची योजना झालेली दिसते. प्रसिद्ध गोवंश अभ्यासक पशुतज्ज्ञ मिलिंदजी देवल यांनी या सणामागची कारणमीमांसा फार चिकित्सकपणानं उलगडून दाखवलीय.







ओला-चारा बैल माजले- लेझीम चाले जोरात

शेतकरी मन प्रसन्न झाले- ढामटीकी ढूमढूम।।

एका सुप्रसिद्ध मराठी कवीच्या या ओळी सत्यातच उतरलेल्या असतात. भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशाकड़े नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडताच पिके तरारून उठतात. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. तुकड्या-तुकडय़ांत विभागलेली अडचणीच्या जागेत, डोंगरात, कडय़ाकपारीत असलेली शेती कसायला, शेतक-याला बैल हा जीवाभावाचा सखासोबती वाटतो. शेतकरी आपल्या बैलजोडीची कसोशीनं निगा राखतो. रानवनातला हिरवागार चारा (गवत) आणि पेंड घालून  बैलाला तजेलदार बनवलेला असतो.  थंडी पडायला सुरुवात झालेली असते. कोकणातली थंडी म्हणजे हाडं गोठवणारी. ओला चारा कसदार झालेला असतो. कोवळी उन्हं आल्हाददायक वाटू लागतात. अशा वेळी कोकणातील शेतकरी जवळजवळ शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो. टपोर्या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे. उन्हाळी भाजीपाला, नाचणीची कापणी संपलेली असते, अशा वेळी पशुधनाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडला गेला असावा, असं मिलिंद देवल यांनी सांगितलं. मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवदीपावली हे संस्कृती परंपरेतील सण आपण डोळसपणानं स्वीकारायला हवेत.






धाकट्या दिवाळीची म्हणजे शहरात फटाक्यांची आतषबाजी करंज्या-लाडू-फरसाण, आणि  दारात कंदील ही दिवाळीची सुरूवात होते ती अश्विन वद्य द्वादशीला म्हणजे गोवत्सद्वादशीला.  या सणातही  पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. थोरली दिवाळी मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या नव्या दिवसाला साजरी होते. या दिवसाच्या तयारीसाठी आधीपासूनच धामधूम सुरू होते. कोकणातील देवदिवाळी म्हणजे जणू बैलपोळाच !
अरडं मरड बैल खरडं
देव दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या,लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा ...
दे माय खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी...!

हे गीत आठवलं की जाणीव होते देव दिवाळीची, पोलादपूर तालुक्यात गावागावात ही दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी होत असते.  या ऐतिहासिक दिवाळीच्या वर्णनाच्या काही नोंदी तत्कालीन पेशवाई दप्तरातील कागदपत्रांमध्ये आढळतात.  या दिवाळीपूर्वी दोन महिने आधी काही शेतकरी आपल्या बैलांना रानातला हिरवागार चारा आणि पेंड घालून धुष्टपुष्ट करतात. शरीराने मस्तवाल झालेला  बैल पाहूनच आणि तो मारकुटा असला तर  उरात धडकी भरली पाहिजे अशी त्यांनी त्याची तयारी केलेली असते. बैल दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यापासून आपल्या बैलावर  प्रेम करणारा शेतकरी किंवा गावात असलेली शाळकरी मुलं बैलांच्या शिंगांना रंगबेरंगी गोंडा लावण्यासाठी रानातून खवशीचे झाड तोडून आणतात. त्याच्यावर दिवसरात्र बरीच मेहनत केल्यानंतर त्यापासून गोंडा बनवतात. गोंडा तयार झाल्यानंतर त्याची विणलेली वीण आणि त्याला लावलेला रंगबेरंगी रंग फारच आकर्षक दिसतो

त्यानंतर आदल्या दिवसापासूनच बैलाच्या शिंगाना तो गोंडा बांधण्यासाठी आणि तो सहज कुणी उपटू नये यासाठी मेहनत घेतात. बैलाच्या शिंगाना गुळ आणि चुना लावून तो अधिक घट्ट चिटकेल तो गोंडा सहजासहजी कुणालाही उपटता येणार नाही असा प्रयत्न यामागे असतो.  आपल्या सजवलेल्या बैलाकडे त्या दिवशी तर घरधनीण (गृहलक्ष्मी) आणि बैलाचा मालक ( बळीराजा ) मायेने निरखून पाहत असतात. शेतकऱ्याचे हृदय अभिमानाने फुलून जात असते  कारण तो मनोमन कबूल करीत असतो की त्याची मेहनत आणि घाम त्याच्या विश्वासू बैलाच्या घामाशी अखंडपणे गुंफलेले आहे, जो पेरणी, पालनपोषण आणि कापणी या शाश्वत नृत्यात आपला भागीदार झालेला असतो म्हणून घरात असलेली धान्याची कणगी भरलेली असते.

त्या दिवशी शक्यतो घराघरात वडे-मटणाचा झणझणित बेत ठरलेला असतो. सोयरे धायरे पाहुणचारासाठी आलेले असतात. हे सजवलेले बैल ज्या पूर्वपरंपरागत खाचरात दिवाळी साजरी होते त्या ठिकाणी आणून बांधून ठेवले जातात.  गावातील आबालवृद्ध आणि आजूबाजूच्या गावातील पैपाहुणे, सगे-सोयरे त्या खाचराच्या बांधांवर हातात काठी घेऊन उभे असतात. सोडल्यानंतर मस्तवाल बैल गर्दीच्या दिशेने जर अंगावर आला तर त्याला हुसकावण्याचा प्रयत्न होतो.  गावऱ्हाटीच्या परंपरेनुसार त्यानंतर दिवाळीला सुरुवात होते. मानकऱ्यांच्या प्रथेनुसार एका अंगणात गावातील मुख्य एकत्र येतात. त्याठिकाणी फुले-रांगोळीचा कना काढून त्यावर बैलांना बांधण्यासाठीचा मजबूत जाडीचा एक दोरखंड (सोल) ठेवलेला असतो. ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून त्याची पूजा केली जाते 







त्यानंतर परंपरेचा मानाचा बैल त्याठिकाणी आणून त्याला सोल लावून वाजंत्र्यांसोबत तो गावदेवी आणि हर हर महादेवाचा गजर करीत दिवाळीच्या खाचरात घेऊन जातात. सोलाच्या मध्यभागी बैल बांधलेला असतो तर दोन्ही बाजूने १५-२० तरबेज गडी ती सोल पकडून असतात. त्या खाचरात एका ठिकाणी मांगोळी उभारलेली असते. तो बैल त्या ठिकाणी आणल्यास त्याला बकऱ्याचे कातडे लावलेल्या लांब काठीने हुसकावले जाते, त्यामुळे तो बैल वाजंत्र्याच्या तालावर नाचायला लागतो. बैल जर मारकुटा आणि रागीट असला तर तो ढुशी मारून सोलकऱ्यांना लोळवतो किंवा खाचरात असणाऱ्यांना शिंगाने मारायला धावतो. बैल त्या मंगोलीच्या खालून जायला पाहिजे असा दंडक आहे. थोडावेळ असे केल्यानंतर त्या बैलाला बांधलेला गोंडा उपटण्यासाठी दिवाळीसाठी आलेल्या सोयऱ्यांना बोलावले जाते अनेकदा काही हौशी व्यक्ती स्वतःच बेधडकपणे पुढे जातात, आणि बैलाशी झुंजण्याचा व गोंडा उपटण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा एखादा उत्साही गडी बैलाच्या ताकदीचा अंदाज न आल्याने जखमी होतो.  यानंतर जेव्हढे बैल दिवाळीसाठी आणलेले असतात ते एकामागोमाग एक खाचरात आणले जातात आणि वाजंत्र्याच्या तालावर नाचवले जातात. काही गावात दुपारनंतर  रेड्यांच्या झोंब्या होत असत. मात्र आता ही परंपरा थांबली आहे. 

पोळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेळ्या पद्धतीने विशेषतः पोलादपूर तालुक्यात सावित्री-कामथी-ढवळी खोऱ्यात हा एक महत्त्वपूर्ण कृषी उत्सव  असतो.  नांगर आपल्या हातात असतो, पण पुढे जमीन नांगरण्याची ताकद आणि चैतन्य बैलाच्या हृदयातून येते. ज्यांच्या घामाने मातीचे पोषण होते. आशेचे बीज पेरले जाते आणि श्रमाने शेतातले सोने हातात येते. जेव्हा बैल पुढे जातो म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग नांगरतो म्हणूनच समृद्धी येते अशी बळीराजाच्या मनाची धारणा आहे.  या सणाद्वारे ग्राम्य संस्कृती गावकऱ्यांची एकता व केवळ उपजीविकाच नाही तर ग्रामीण भारताची भावना देखील टिकवून ठेवण्यास मदत होते. अलीकडच्या काळात वाडीवस्त्यांवरील तरुणाईने उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. गावच्या गावे आणि वाड्यावस्त्या ओस पडत चालल्या असताना ही देवदिवाळी साजरी करण्यासाठी हौसेने आपल्या गावी जाणारी तरुणाई आजही मोठ्या प्रमाणात आहे. शिकल्या सावरल्या आजकालच्या पिढीला शारीरिक ताकद दाखविण्यासाठी उद्युक्त करणारा हा सण म्हणजे कदाचित वेडेपणा वाटेल परंतु आपले वाडवडील म्हणजे बळीराजा यांनी ही कृषी संस्कृती जोपासण्या सोबतच पूर्वापार पशुधनही जोपासत आला आहे. मित्रानो पोलादपूर तालुक्यातील हा एक सण आहे जो परंपरेच्या पिढ्यानपिढ्या ओलांडतो आहे. एक परंपरा अशी आहे जी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे कृतज्ञता आणि आदराच्या मायेमध्ये विणली जाते. शेतकर्‍यांची लवचिकता, बैलांची ताकद आणि समाज आणि संस्कृती टिकवून ठेवणार्‍या कृषी जीवनशैलीचे सौंदर्य साजरे करण्याच्या या बैल दिवाळीच्या दिवशी स्थानिक परंपरेनुसार तुम्ही मनापासून जर यात सामील झालात तर तुम्हाला मनापासून आनंद, उत्साह देण्यासाठी ही दिवाळी येते व संध्याकाळी होते तेव्हा मात्र ती मनाला हुरहुर लावून.





- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०२ 

संदर्भ सहकार्य : ह.भ.प. रामदादा ह मालुसरे (साखर)


शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना

 

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना" 

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण


द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. त्यावेळची घडलेली गोष्ट. साताऱ्याच्या जेलमधला आपला एक सहकारी सर्वात मोठया पदावर बसल्याचा सर्वाधिक आनंद साखर गावच्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालूसऱ्यांना झाला. आणि ते तडक मुंबईत दाखल झाले. करीरोडला खोजा चाळीतील नातेवाईकांकडे उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जुन्या मंत्र्यालयाकडे निघाले. सोबत त्याच चाळीतील घाटावरचा वसंत पाटील नावाचा तरुण होता. धोतर, सदरा, फेटा आणि घुंगराची काठी या वेशभूषेत अंबाजीराव मंत्र्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर तडक आतमध्ये घुसले...त्यावेळी आजच्या इतकी कडक सुरक्षा बंदोबस्त नसे. पोलीस अडवू लागले तेव्हा बेडर अंबाजीराव मोठया आवाजात म्हणाले, मी यशवंताला भेटायला आलोय. त्याचे हाफीस कुठं आहे ते सांगा. ते पोलीस काहीच ऐकायला तयार नव्हते...इकडे अंबाजीरावांचे दरडावणे चालूच होते. मी साखर गावचा पाटील. सुभेदार तान्हाजीरावांचा वंशज. जाऊन सांगा यशवंतरावाला अंबाजीराव आलाय म्हणून. हा आरडाओरडा ड्युटीवरच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने ऐकल्यावर जवळ आला आणि म्हणाला, आजोबा १० मिनिटे इथे थांबा मी येतो लगेच. तो अधिकारी आतमध्ये गेला, यशवंतराव चव्हाणांना केबिनमध्ये चिठ्ठी पाठवून प्रसंग कळवला. त्या अधिकाऱ्याला यशवंतरावानी केबिनमध्ये बोलावून सांगितले, तुम्हीच त्यांना लगेच माझ्याकडे घेऊन या.....आणि पुढच्या काही क्षणात यशवंतराव आणि अंबाजीराव या दोन मित्रांची ह्रदयभेट झाली.

या भेटीमागची पार्श्वभूमी काय होती. जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यामागे असे काय घडले होते...तर याची बीजं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात रोवली गेली होती. 

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती. 

१९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातही ते सामील झाले होते.  सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; याच तुरूंगात अंबाजीराव सुध्दा अटकेत होते. 

१९४२ च्या लढ्याचा फारसा प्रभाव पोलादपूर मध्ये नव्हता, महात्मा गांधींच्या आदेशानंतर पोलादपूर मधील वृद्ध कार्यकर्ते स्व गोपीनाथ लालाजी गांधी यांनी हालचाल सुरू केली. महात्मा गांधी व वल्लभभाई पटेल हे महाड व पोलादपूरला येऊन गेल्यानंतर चळवळीला गती मिळाली. श्री नानासाहेब पुरोहित यांचा मोर्चा महाडला येणार आणि मामलेदार कचेरी ताब्यात घेणार याची बातमी पसरली. मोर्चा निघाल्यानंतर ब्रिटीश सरकारने राक्षसी भूमिका घेत अनेकांवर अन्याय व अत्याचार सुरु केले. अनेकांना अटक केली. त्यावेळी पोलादपूर मधील गोपीनाथभाई गांधी, डॉ गणेश अनंत करमरकर, दत्तात्रय काशिनाथ जोशी, दत्तात्र्येय गणपत साबळे, बाळकृष्ण पीतांबर तलाठी, अंबाजीबुवा मालुसरे, विठ्ठल गणपत शेठ इत्यादींनी मोठा सत्याग्रह केला.

गोऱ्या सार्जंटना महाबळेश्वरला जाता येऊ नये यासाठी तिन्ही खोऱ्यातील काही समाजधुरीणांना सोबत घेऊन घाट तोडला होता. आणि पोलादपूर महालाच्या कचेरीसमोर वंदे मातरम च्या घोषणा देत तिरंगा फडकावला होता. याचा पुढारपणा करणाऱ्या अंबाजीबुवांना अटक करून प्रथम वरळी नंतर श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल मध्ये  घेऊन गेले. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे-लाईनवर असलेल्या विसापूर स्टेशनपासून दोन-तीन मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणा-या माळावर बांधलेला हा जुना जेल बऱ्याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो.

 त्याचवेळी एस एम जोशी, यशवंतराव चव्हाण, आचार्य भागवत यांना येरवडा तुरूंगातून विसापूरला आणले होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर हेसुद्धा होते. योगायोगाने स्वातंत्र्यात भाग घेणाऱ्या सर्वांना एकाच ठिकाणी ठेवले होते, त्या बराकीतच यशवंतराव - अंबाजीराव होते. जेलमध्ये सुद्धा हे चळवळे गप्प राहतील ते कसले. दुसऱ्या दिवशीच भल्या पहाटे हे सर्व कैदी एकत्र आले. दहीहंडीचा मनोरे रचण्याचा खेळ सुरु केला.  तब्येतीने शरीरयष्टीने चांगल्या बांध्याचे आणि जाडजूड व ताकदीने असलेले खालच्या थराला उभे राहतील असे ठरले, अर्थात यशवंतराव व अंबाजीराव खालच्या थरासाठी उभे राहिले. चार थर रचल्यानंतर शेवटच्या थरावर चढलेल्याने लपवून ठेवलेला तिरंगा ध्वज बाहेर काढून फडकावला. त्याचबरोबर सर्वजण वंदेमातरम आणि भारतमाता की जय म्हणून घोषणा  जोरदार देऊ लागले. मग काय अधिकाऱ्यांची फलटण आली. सर्वांना काठीने फटकावू लागले. सर्वांना दरडावून दमबाजी करून गेले.....पुन्हा दुसऱ्या दिवशी असेच घडले. आता मात्र याचा बंदोबस्त करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी चौकशी सुरु केली....यातले म्होरके कोण ? तीन-चार जण पुढे झाले, यात यशवंतराव आणि अंबाजीराव होतेच. त्यांना बाजूला घेऊन अर्थातच अधिक मार बसला. 

जेलमध्ये काढलेल्या या आठवणी यशवंतरावानी लिहिल्या आहेत. ते लिहितात  एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेल इथे झाली. एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते.  

विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल, अशी त्याची ख्याती होती. हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता, फार कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल, अशी या जेलची ख्याती होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीतल्या सत्याग्रहींतून एक प्रमुख ‘स्पोक्समन’ निवडला जात असे. त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील, ते हा पुढारी सोडवून घेत असे. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. 

याचवेळी त्यांनी उमरठच्या नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालूसऱ्यांच्या समाधीचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती चर्चेत समजावून सांगितली. त्यानंतर पुढे  अंबाजीरावांची तुरूंगातून सुटकाही झाली. मात्र दोघांचा हा स्नेह कायम राहिला...भेटीगाठी होत राहिल्या आणि वाढलाही. पुढे एप्रिल १९६५ ला जेव्हा उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यशवंतरावांच्या शुभहस्ते करण्याचा कार्यक्रम ठरला तेव्हा आवर्जून स्वातंत्र्यसेनानी अंबाजीरावांचा विशेष सत्कार करण्याचा आदेश त्यांनी दिला होता, परंतु चीन ने भारतावर आक्रमण केले...यशवंतरावाना त्यावेळचे पंतप्रधान पं नेहरूंनी देशाचे सरंक्षणमंत्री म्हणून बोलावले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे अनावरणासाठी आल्यानंतर त्यांनी तालुक्यातून जमलेल्या हजारो जनसमुदयासमोर अंबाजीरावांचा आदर सत्कार केला. त्याचा वृत्तांत त्यावेळच्या दैनिक लोकसत्ता मध्ये फोटोसह प्रकाशित झाला ते माझ्या संग्रही आजही आहे. 


लोकनेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन... त्यानिमित्ताने आठवणीला हा उजाळा !

- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...