सोमवार, ३ जुलै, २०२३

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा - रवींद्र मालुसरे

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा  - रवींद्र मालुसरे 





मुंबई : (रवींद्र मालुसरे) 


महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवलेले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. ‘‘ ‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे,’’‘‘स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले. नव्वद टक्क्याहून ज्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करताना हा विचार मनात कायमस्वरूपासाठी रुजवला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय न्यूरो स्पायन सर्जन डॉ प्रेमानंद रामाणी यांनी काढले. श्री शांता सिद्धी ट्रस्टच्या वतीने दादर येथे संस्थेच्या या वेबसाईटचे उदघाटन आणि इयत्ता दहावीमध्ये उत्तम मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, डाइव्हिंग या ऑलम्पिक या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकाराचे  पंच  श्री मयूर व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

डॉ रामाणी विद्यार्थ्यांना पुढे असेही म्हणाले की, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यारणा, ध्यान आणि समाधी. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार होते.  व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.तर रवींद्र मालुसरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी-बारावीचे सर्वोच्च मार्कांचे यश म्हणजे आई -वडिलांची लादलेली आकांक्षा पूर्ण करण्याचे यश. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या आयुष्यात आपली स्वतःची वाट निवडायला हवी. का, कशासाठी, कुठपर्यंत पोहोचण्यासाठी  असे प्रश्न मनात धरून विशिष्ट ध्येय ठेऊन आपण निवडलेला मार्ग आनंद, यश, कीर्ती आणि पैसे देतो. तंत्रज्ञानाच्या शतकात वावरताना स्वतःचा चेहरा ओळखा  म्हणजे तुमच्या गुणवत्तेला न्याय दिल्यासारखे होईल. श्री मयूर व्यास यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एकातरी क्रीडाप्रकारात विद्यार्थ्याने मैदानात उतरायला हवे. संस्थेची माहिती  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यवाह भूषण जॅक यांनी केले. 


सोहम मोये, सिया मोये, वेदांत पराग व्होरा, महालक्ष्मी श्रीधर शानबाग,रुजूला भाटकर, श्रावणी जोशी, रीती करण रावत, साची जवाहर खांडेपारकर, आषिता आरोसकर या ९२% हुन अधिक मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. किशोर  कुलकर्णी, संजय  दिवाडकर, जयंत  गायतोंडे, विनायक  पंडीत, संजय  कुलकर्णी, सतीश  दाभोळकर, दीपक  देसाई इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला हजर होते














रवींद्र मालुसरे





अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४  

मंगळवार, २७ जून, २०२३

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

 'मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा'

रवींद्र मालुसरे 

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जातेतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावरग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजनमंजुळ स्वर मंदावले. 

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीचीत्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं.  श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा - वडाळा बस डेपोजवळकात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती  सापडलीत्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या- पताका घेऊन येथे येत असतात.  मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाहीत्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी - प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर  सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखेगुरुवर्य नारायणदादा घाडगेगुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत.  सन १९१५ च्या काळात ह भ प रामकृष्ण भावे महाराज मुंबईत  'जगाच्या कल्याणाया ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होतेहाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथीहेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केलीआमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य ह  भ प नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू ह भ प श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य ह भ प रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली ह भ प कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा - सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई  पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहसाजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूरअशी  पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहेबरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ - वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै ह भ प निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा ह भ प राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै ह भ प मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणशंकरराव चव्हाणबाळासाहेब भारदेवि स पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहेगिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत.  रजनीकांत दीक्षितमनोहर राणेललन गोपाळ शर्मादत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल - येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर . श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे  ज्ञानेश्वर मोरे माऊली हे  वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु  ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर ह भ प कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.  सध्या गुरुवर्य अनंतदादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य  म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. 

वरळी कोळीवाडा - श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरस्र कुठेही नाही१९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकरनारायणदादा घाडगेप्रमोद महाराज जगतापकेशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन - शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणलीपरंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होतीत्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला.  प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम - माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर.  १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे - बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा - भायखळा पश्चिमेला ना म जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजनपोथीवाचनआरतीहरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर - जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झेंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन,पोथी वाचनएकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य ह भ प गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूरआळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकीएल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम - डी एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकरधुंडा महाराज देगलूरकरगुंडामहाराजतात्यासाहेब वास्करशंकरमहाराज कंधारकर,रामचंद्र महाराज नागपूरकरअमृतमहाराज नरखेडकरबन्सीमहाराज तांबेभानुदास महाराज देगलूरकरकिसनमहाराज साखरेअर्जुनमामा साळुंखेकिसनदादा निगडीकरमारुतीबाबा कुर्हेकरजगन्नाथ महाराज पवाररामदासबुवा मनसुखह भ प गहिनीनाथ औसेकर महाराजमाधवराव शास्त्रीगोपाळबुवा रिसबूडभीमसिंग महाराजचैतन्य महाराज देगलूरकरबंडातात्या कराडकररामकृष्ण महाराज लहवितकरज्ञानेश्वर महाराज मोरेमहंत प्रमोद महाराज जगतापरविदास महाराज शिरसाटएकनाथमहाराज सदगीरकेशव महाराज उखळीकरसंदीपान महाराज शिंदेबंडातात्या कराडकरपांडुरंगबुवा घुले बळवंत महाराज औटीन्यायमूर्ती मदन गोसावीअशोक महाराज सूर्यवंशीबोडके बुवाआनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.

गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचाकष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरेहातिस्कर बुवावासुदेव (स्नेहल) भाटकरशिवरामबुवा वरळीकरमारुतीबुवा बागडेखाशाबा कोकाटेहरिभाऊ रिंगेखाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडेतुळशीरामबुवा दीक्षितहरिबुवा रिंगेकिशनबुवा मुंगसेभगवानबुवा निगडीकरदामू अण्णा माळीपांडुरंगबुवा रावडेविठोबाबापू घाडगेबाबुबुवा कळंबेचंद्रकांत पांचाळविलासबुवा पाटीलपरशुरामबुवा पांचाळरामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्रीगोविंदराव नलावडेतुकाराम शेट्येमल्हारीबुवा भोईटेसत्यवान मानेगणपतबुवा लेकावलेशंकर मेस्त्रीभाऊ पार्टेविठोबाअण्णा घाडगेराम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे  'वारकरी प्रबोधन महासमितीचेसंस्थापक अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष ह भ प राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल कायकिंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

9323117704

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...